गावाकडची अमेरिका – पार्श्वभूमी – २

तसं बघायला गेलं तर भारत हा प्रगतीशील देश तर अमेरिका म्हणजे अतिप्रगत देश. आपल्याकडे ग्रामीण भागातून शहराकडे वळणारा ओघ हा तसा गेल्या काही दशकांतला. आपली शहरी लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या २८%, तर अमेरिकेतली शहरी लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या तब्बल ८२%. थोडक्यात म्हणजे अमेरिका हा एक बहुतांशी शहरी / नागरी लोकवस्तीचा देश आहे. पण जसं मुंबई, पुणे, दिल्ली, बंगलोरू, कोलकोता म्हणजे भारत नाही तसंच न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डी.सी., लॉस एंजेलीस, शिकागो, ह्युस्टन म्हणजे अमेरिका नाही. या छोटया मोठया अतिप्रगत, अद्ययावत, नागरी, शहरी केंद्रांच्या अल्ल्याड पल्ल्याड दुसरी देखील एक अमेरिका विखुरलेली आहे. परंतु एकंदरीत अमेरिकेबद्दलची आपली कल्पना इतकी ठरावीक आणि साचेबंद असते की त्यापलीकडे जाऊन बघण्याची आपल्याला फारशी जिज्ञासा नसते. ‘आपल्या आसपासच्या किंवा कल्पनेतल्या झगमगीत, रंगीबेरंगी, बेगडी, भोगवादी, चंगळवादी अमेरिकेच्या पडद्याआड काही आहे का ? साधंसुधं दैनंदिन जीवन जगणारी, शेतात राबणारी, खाणीत काम करणारी, आपल्या पंचक्रोशीच्या बाहेरचं फारसं जग न बघितलेली, शहरी जीवनाचा वारा न लागलेली, टंचाईने ग्रासलेली, कष्टकरी, देवभोळी अशी एखादी अमेरिका आहे का ?’ असे प्रश्न आपल्याला सहसा पडत नाहीत.

मला देखील हे प्रश्न पडले नसते. परंतु माझे कार्यक्षेत्र पशुपालनाशी निगडीत असल्यामुळे, आमचे अमेरिकेतील वास्तव्य हे मुख्यत्वे ग्रामीण / निमग्रामीण भागात झाले. आम्ही आयोवा, कनेक्टिकट आणि पेनसिल्व्हेनीया या तीन राज्यांमधे प्रत्येकी दोन ते चार वर्षे राहिलो. यातील आयोवा आणि पेनसिल्व्हेनीया ही बहुतांशी ग्रामीण राज्ये तर कनेक्टिकट हे थोडे आधुनिक आणि औद्योगिकीकरण झालेले राज्य. परंतु त्यात देखील ‘लॅंड ग्रॅंट स्टेट युनिव्हर्सिटी’ म्हटली की ती सहसा ग्रामीण भागातच असायची. त्यामुळे आमचे कनेक्टिकटमधले वास्तव्य देखील तसे निमग्रामीण भागातच झाले. ही तीनही राज्ये अमेरिकेच्या ईशान्य (Northeast) आणि उत्तर मध्य (Upper midwest) भागात येतात. या सर्व ठिकाणी हवामान साधारण सारखेच. तशीच कडाक्याची थंडी आणि ऋतुमान देखील तसेच. कामानिमित्ताने आणि पर्यटनासाठी आजूबाजूच्या म्हणजे व्हरमॉंट, मॅसेच्युसेट्स, न्यूयॉर्क, न्यूहॅंपशायर, साउथ डाकोटा, मिनेसोटा, विस्कॉनसीन, नेब्रास्का, मिसुरी वगैरे राज्यांतून फिरणे झाले होते. पण ही देखील राज्ये बहुतांशी ग्रामीण आणि शेतीप्रधान.

त्यामुळे आमच्या पाहण्यातली ग्रामीण अमेरिका ही मुख्यत्वे ईशान्य (Northeast) आणि उत्त्तर मध्य (Upper midwest) या भागांतली. अमेरिकेच्या पश्चिम किंवा दक्षिण भागांत फिरायचा योग अजून फारसा आलेला नाही. त्यामुळे ग्रामीण अमेरिकेचे हे वर्णन सर्वच ठिकाणी लागू होईल असे समजणे चूक ठरेल. हा खंडप्राय देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या तिप्पट. भौगोलिक आणि नैसर्गिक वैविध्याने संपन्न. त्यामुळे अमेरिकेच्या ग्रामीण भागाबद्दलचे लिखाण हे सर्वसमावेशक असेल असे मानणेच मुळी गैर. किंबहुना कोणत्याही देशाबद्दल आणि त्यातही अमेरिकेसारख्या खंडप्राय देशाबद्दल लिहीणं म्हणजे आंधळ्या माणसाने हत्ती चाचपडून त्याचं वर्णन करण्यासारखं आहे.

सात आठ वर्षांत मला ग्रामीण अमेरिका समजली, असे मला अजिबात म्हणायचे नाही. किंवा ग्रामीण अमेरिकेच्या भौगोलिक, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अंगांवर विद्वत्तापूर्ण आणि अधिकारवाणीने लिहिण्याचा आव देखील मला आणायचा नाही. या लिखाणांत, अमेरिकेच्या आणि भारताच्या ग्रामीण जीवनाची किंवा शेती व्यवसायाची तौलनिक मिमांसा नाही किंवा कसली तात्विक चर्चा नाही. हे एका मध्यमवर्गीय, भारतीय आणि मराठी माणसाने कुतुहलाने केलेलं अमेरिकेच्या ग्रामीण भागाचे वर्णन आहे.
काही लिहायचे, असा संकल्प सोडून काही इथे आलो नव्हतो. लिहिण्यासाठी विषय शोधण्यासाठी आडवाटेला गेलो नव्हतो. परंतु कामाच्या, व्यवसायाच्या स्वरूपामुळे ग्रामीण / निम ग्रामीण भागात झालेला प्रवास आणि वास्तव्य जसंजसं वाढूं लागलं तसतसं या सर्वस्वी वेगळ्या विश्वाचे धागेदोरे माझ्यापुढे उलगडू लागले. हे जीवन सगळ्यांनाच आवडेल असे नाही. आडवाटेच्या लहानशा गावात, आधुनिकतेपासून काहीसे मागे, शहरी सुखसोयींपासून दूर, असं राहणं कोणी आपणहून पसंत करेल असं देखील वाटत नाही. किंबहुना शहरी लोकांना या आयुष्याचा पटकन उबग येईल. सहसा कोणाच्या वाट्यास न येणारा हा ग्रामीण अमेरिकन जीवनाचा अनुभव आम्हाला उपभोगता आल्यामुळॆ, तो इतरांपर्यंत पोहोचवून बघावा असा विचार सुमारे दोन वर्षांपासून माझ्या मनात घोळू लागला. अमेरिकेमध्येच परंतु मोठमोठ्या शहरांमधे रहाणार्या मराठी लोकांना ग्रामीण अमेरिकेचा हा पैलू उमजावा आणि भारतात राहून अमेरिकेची झगझगीत आणि भव्यदिव्य कल्पनाचित्रे रेखाटणार्‍या मंडळींना वास्तवाचे थोडे भान यावे, हा त्या मागचा उद्देश. अर्थात वर म्हटल्याप्रमाणे हा आंधळ्या माणसाने हत्ती चाचपडण्याचा प्रकार आहे. जे काही बघितलं, समजलं, उमजून घ्यायचा प्रयास केला, ते शब्दबद्ध करण्याचा हा एक प्रयत्न !

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....