कॉलेजच्या नोटीस बोर्डावर गॅदरींगची नोटीस लागली होती.हे जस समजल तसं गण्यानं टुन्नकन उडीच मारली.गण्या कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांत नेहमीच पुढं पुढं करायचा.गण्यालं नाटकात काम करायची लय हौस होती.तसं पाहिलं तर लहान पणापासुनच गण्याच्या अंगात अभिनयाची गोम वळवळ करायची.तर असा हा गणेश उर्फ गण्या रणवीर नाटकाचा प्रचंड शौकीन होता.गल्लीत गणपती बसले की गण्याच्या ग्रुपचा नाटकाचा एक कार्यक्रम हमखासच असायचा.गण्याला आपली कला लोकांपुढं पाजळायलं लय भारी वाटायचं. श्रीराम लागु,विक्रम गोखले,दाजी पणशीकर ते हल्लीच्या प्रशांत दामले पर्यंत त्याने सर्वांचे नाटकं पाहिले होते.नाटकाचा शौकीन असलेल्या गण्याला चित्रपटांविषयी मात्र प्रचंड राग होता.तो नाटकाला अभिजात कलाकृती मानायचा तर चित्रपटाला कलेला लागलेला कलंक मानायचा.तस गण्या नाटकात चांगलं काम करायचा पण कुठल्या प्रेक्षकांपुढं काय सादर करावे हे गणित त्याला कधीच जुळले नाही.त्यामुळे नेहमीच त्याची फजीती व्हायची.एकदा असच गल्लीतल्या रसीक प्रेक्षकांपुढं गण्यानं कुठलंतरी एक प्रायोगीक नाटक सादर केलं.विषय ग्रामस्थांच्या डोक्यावरून गेलाच पण नाटकातले काही संवाद देवा धर्माविरोधात आसल्यानं पब्लीक खवताळली आण मग त्यांनी जे गण्याचा समाचार घेतला ते गण्या आठ दहा दिवस तरी खाटेला चिकटुनच राहिला होता.
असो तर मग गण्यान कॉलेजच्या गॅदरींगमध्ये नाटक सादर करायचं ठरवलं आणि त्याने त्यादृष्टीने जुळवाजुळव करायला सुरुवात केली.नाटकाकरीता एक उत्तम संहिता असावी म्हणुन मग गण्या नाट्यलेखनाकरीता एक लेखक शोधु लागला.विचार करता करता त्याला त्याच्याच वर्गातल्या शशी तिरळेची आठवन झाली.शशी हा कॉलेजच्या नियतकालीकांमध्ये विवीध विषयांवर लिहायचा.गण्याला त्याची शैली माहीत असल्याने गण्याने मनोमन शशी तिरळेची लेखक म्हणुन निवड केली आणि झटदिशी त्याची भेट घेऊन त्याला आपला प्लॅन सांगुन त्याला आपल्या गटात सामील केले.शशी तिरळे हा आपल्या आडनावाप्रमाणेच थोडा म्हणता येईल ईतका तिरळा होता.गबाळं राहणीमान अन चेहर्यावर कायमच गोंधळट भाव आणि चिरका आवाज असणारा शशी कॉलेज कॅंपसमध्ये आपल्या तिरळ्या डोळ्यांमुळे जसा प्रसिध्द होता तसाच तो त्याच्या विडंबनात्मक लेखनासाठीही प्रसिध्द होता.आपलं लेखन हे महाराष्ट्रातील साहीत्यीकांच्या आवाक्याबाहेरच असुन त्याची तुलना केवळ आंतरराष्ट्रीय साहित्याशीच होऊ शकते असं शशीला नेहमीच वाटायच.तो त्याच गुर्मीत असायचा.आपण ईथे असणार्यां सर्वांपेक्षा हुशार असुन आपल्या सारख्या सारस्वताने येथील तुच्छ अशा मुर्ख लोकांसोबत राहणं उचित नाही या भावनेने तो एकाकीच रहायचा.तो फारसा कधी कुणाशी बोलायचाही नाही.आत्ता शशीला कसं तयार करायच या पेचात गण्या पडला होता.हेकट आणि गर्विष्ठ व्यक्ती ह्या स्तुतीप्रीय असतात असं म्हणतात.गण्यानेही गर्विष्ट शशीला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी स्तुतीअस्त्राचा वापर करायच ठरवल.दुसर्या दिवशी दुपारचे लेक्चर संपताच गण्यानं शशीला गाठलं.प्रथम त्याने शशी लिहीत असलेल्या कॉलेजातील साप्ताहिकातील कवितांची स्तुती करायला सुरूवात केली.अबोल व एकटा राहणारा शशी गण्याला त्याच्या कविता आवडतात हे ऐकुण हुरळुन गेला.तो हळु हळु खुलायला लागला.
“कडुनिंबाच्या निंबोळ्या,
दिसती हिरव्या गोड गोळ्या,
वार्याने लाटांवरती हिंदोळती,
समुद्रात खेळती मासळ्या…..!”
गण्यानं शशीची तद्दन भिकार असलेली ही कविता जशी काय सारस्वतांच्या दुनियेतला महान खजिना आहे या आविर्भावात म्हणुन दाखवत स्तुती केली.गण्याच्या स्तुतीने शशी आणखीच खुलला.आत्ता तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहीत्य व त्याची व्याप्ती या विषयांवर बोलु लागला.शेक्सपियर, रविंद्रनाथ टागोर,मुन्शी प्रेमचंद,नगुइब महफूझ , ऑक्टावियो पाझ,डेरेक वॉल्कोट , टोनी मॉरिसन,सलमान रश्दी,व्ही.एस. नायपॉल ,ते शशी थरूर,सुधा मूर्ती,शोभा डे,अश्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील लेखकांबद्दल बोलायला लागला.गण्याला त्याचे बोलने काहीच कळत नव्हते.तरीही तो आपल्याला ह्या सर्व प्रभुतींबद्दल जाण असुन लवकरच शशी तिरळेचे नावही या प्रभुतिंच्या यादीत असणार या अविर्भावात तो चेहर्यावर कृत्रिम समाधानाचे भाव आणत शशीकडे पहात होता.थोडावेळ ईकडच्या तिकडच्या गप्पा करत गण्यान गॅदरिंगच्या मुळं मुद्यावर येत शशीला आपण बसवणार असणार्या नाटकाबद्दल सांगितले.जसही गण्यानं शशी तिरळेला आपला प्लॅन सांगीतला.तसं आपल्या गंभीर चेहर्यावर आणखीच गंभीर भाव आणत शशी तिरळे गहन विचारात बुडाला.क्षणभर तिथे रहस्यमय शांती पसरली.नाट्यकथा अंतिम करण्याच्या कामात दोघेही आकंठ बुडालेले असतांना तिथल्या शांतीचा आपल्या चिरक्या आवाजाने विनयभंग करत शशीने गण्याला प्रश्न केला की,“हे बघ गण्या तुला एक छानसी कथा मी देतो…तसे पाहिले तर माझ्या कथांना राज्यभरातुन मागणी असते परंतु मी कुणाला माझ्या कथा देत नाही. तु पडलास माझा वर्गमित्र,म्हणुन तुला मी कथा द्यायला तयार आहे.फक्त माझे एवढेच म्हणने आहे की,नाटक बसवितांना कथेत छेडछाड नको.तालीमिला मी स्वतः हजर राहीन.मंजुर असेल तर बोलं.”
तसही शशीच्या अटी मान्य करण्या शिवाय गण्याजवळ पर्याय नव्हताच.त्याने शशी तिरळेच्या सर्व अटी मान्य केल्या.मग शशीने आपल्या बॅग मधुन एक भलं मोठ्ठ रजीस्टर काढलं.त्यातील एक एक कथा तो गण्यालं सांगत होता.कथा वाचुन दाखविली की तो मोठ्या आशेने गण्याकडे बघुन कथा आवडली का म्हणुन विचारत असे.पंचविस तीस कथा ऐकुनही गण्याला त्यातली एकही कथा न आवडल्याने शशी खट्टु झाला होता.मग खुप विचारांती शशीने आणखी एक कथा गण्याला ऐकवली.ती कथा ऐकतांना गण्याच्या चेहर्यावरचे हाव भाव बदलत होते.त्याला ती कथा पसंत आली होती.अत्यानंदाने गण्याने बसल्या जागेवरच टुन्नकन उडी मारून “एस्स……दॅटस् ईट……हि अतिशय सुंदर आहे…अप्रतिम आहे.मला अशीच पाहिजे होती.हिच्यात लय आहे…..अभिजातपणा आहे,सृजणाचा आविष्कार आहे.ही साक्षात देवाची देणगी आहे शशी, आपल्याला अशीच पाहिजे होती……!”
गण्यानं असं म्हणताच शशी गोंधळुन गण्याकडे पहायला लागला होता.शशीची ही घालमेल गण्याच्या लक्षात आली आणि तो स्वतःवरच हसत शशीला म्हणाला ,“अहो,लेखक महोदय…मी तुमच्या कथेबद्दल बोलतोय…..कथेबद्दलं…..!”
गणाने जेंव्हा अस म्हटलं तेंव्हा शशीनं एकदाचा सुटकेचा निःश्वास सोडला.गण्याचे वाक्य ऐकुण व भाषेचा आवाका बघुन शशीला क्षणभर गलबलुन आले.त्याच्यासारख्या एका आंतरराष्ट्रीय पातळीवरील साहित्यिकाची कदर करणारा आंतरराष्ट्रीय पातळीवर रसीक,तथा कदाचित त्याच्याच तोडीचा साहित्यिक त्याला आत्ता त्याच्यासमोर दिसतं होता.क्षणार्धात त्याच्या डोक्यातल्या ईगोच्या किड्याने त्याच्या मेंदुत चावा घेतला आणि कळ त्याच्या काळजापर्यंत आली.
“नाही,नाही,माझ्यापेक्षा श्रेष्ठ साहित्यिक ईथेच काय महाराष्ट्रातही कुणी बनु शकत नाही” असं स्वगतच म्हणत शशीने आपल्या आतीलं ईगोवाल्या किड्याला झोपवलं.तसं तर विनोदी शैली असलेली ही कथा आपले कलाकार अभिनयाच्या जोरावर किती पैलतिरावर नेतील याची शशीला शंकाच होती.पण गण्या मात्र कथानकाबद्दल आशादायी होता.गण्यान शशीला कथेचं नाट्य रूपांतर करण्यास सांगुन तो पुढील तयारीला लागला.
कॉलेज जिवनातील मुलांच्या आयुष्यात येणारी एक मुलगी आणि ती आयुष्यात आल्यावर तिला पटवण्याची त्यांच्यातली स्पर्धा आणि शेवटी या घटमटीत त्यांचे निरोप पोचविता पोचविता घरात काम करणार्या घरगड्याच्याच प्रेमात ती मुलगी पडते असं सोप्प कथानक होतं.कथेच्या अनुषंगाने मग ईतर पात्रांची निवड करण्याच्या कामात गण्या गुंतला.कॉलेजकुमारांच्या भुमिकांसाठी गण्यान आपल्याच वर्गातला बॉडीबिल्डर पद्माकर उर्फ पॅम्या,होस्टेलचा स्टायलिश चिकणा हिरो संज्या व तिडी मिडी चौथा घोडा असलेला रम्या यांची निवड केली तर हिरोईन नोकराला मिळणार म्हणुन तो रोल आपल्याकडेच ठेवला.बाकी प्रकाश योजना,साऊंड सिस्टीम, आणि वाद्यवृंद कॉलेजच पुरवणार होतं म्हणून मग गण्यानं सगळ्यांना आपापल्या भुमिका समजावून सांगितल्या.
आत्ता सर्व भुमिका वाटप झाल्या होत्या पण हिरोईनची भुमिका कोण करेल हे आणखी ठरलं नव्हतं.गण्यानं मुलींच्या होस्टेलच्या वार्या करायला सुरुवात केली.सर्वप्रथम गण्यान कॉलेजमधील ‘क्विन’टाईप वावरणार्या सुंदर मुलींना विचारून पाहिले.पण एकतर प्रेमकथा आणि कॉलेजातील टवाळखोर मुलांच्या टॉंटींगच्या भितीने सगळ्या मुलींनी त्याला नकार दिला.आत्ता कुणाला हिरोईन म्हणुन निवडावे या धर्मसंकटात गण्या पडला.खुप विचारात गण्या असाच खिन्नपणे कॉलेज कॅन्टीनमध्ये बसला होता.त्याने एक कट चहा ऑर्डर केला.तसं एका लुंगीवाल्या कळकट मद्रासी पोर्यानं कपाळावरचा घाम पुसत,“ य्ये लो आपकी च्चाय्य…..!” आसं म्हणतं गण्याच्या पुढ्यात चहा ठेवला.गण्यानं वलबट गिलासातला तो चहा ओठांना लावत एक घोट नरड्याखाली उतरवला.तेव्हड्यात त्याला त्याच्या शेजारीच राहणारी त्याची वर्ग मैत्रीण सौदामिनी सुभेदार समोरून येतांना दिसली.तिला बघताच गण्याच्या डोक्यात चक्र फिरायला लागले.तसं पाहिलं तर सौदामिनी सुभेदार काही दिसायला फारशी सुंदर नव्हती.थोडी अंगान स्थुल असणारी सौदामिनी सगळ्या कॉलेजात चष्मिश म्हणुन प्रसिध्द होती.वागायला थोडी वेंधळी असल्याने नेहमीच तिची फजीती व्हायची.बरं नाव सौदामिनी आणि ही बया एकदम मंद होती.नावाच्या अगदी विरुद्ध.कायमच कॉलेज कट्ट्यावर तिच्या वागण्यावर विनोद व्हायचे. तिला पाहताच गण्याच्या मनात आशेचे अंकुर फुलायला लागले.तसं पाहीलं तर शेजारी असुनसुद्धा दोघं कधी बोलायचे नाहीत.गण्यालाही ती फार काही आवडायची नाही.पण वेळेला शहानपण शिकवता येत नाही तसं गण्याच झालं होतं.आत्ता गण्या विचारात पडला होता की शेजारी असुनसुद्धा आपण कधी बोलत नाही तेंव्हा हिला कसं विचारावं की नाटकात काम करतेस का म्हणुन….! गण्या स्वतःच्याच तंद्रीत पडला. तेवढ्यात सौदामिनी त्याच्या जवळच्याचं टेबलावर येऊन बसली.गण्याची काही तिला बोलायची हिम्मत होत नव्हती.दोघं बसले त्या दरम्यानं केवळ एकाच खुर्चीच अंतर होतं पण गण्याला ते त्या क्षणी मैलो नं मैल दुरचं वाटत होतं.गण्यानं खुप विचार केला आणि मग मनाचा हिय्या करून तो तिला बोलायला उठला.पहिल्यांदा त्यानं तिच्या भोवताली दोन तीन चकरा मारल्या.देवाच नाव घेतलं अन मनाचा हिय्या करत शेवटी मगं अंगातलं सगळं बळ एकवटुन तो तिला एकदाचा म्हणालाच की,“एस्क्युज मी मिस सौदामिनी…..!”
तसं सौदामिनीने आपल्या नाकावरील चष्मा सावरत डोक्यावर भला मोठा प्रश्नचिन्ह उमटवत गण्याकड पाहील.प्रथम तर तिला विश्वासच बसला नाही की गण्या तिला बोलतोय म्हणुन..! मग तिनेही स्वतःला सावरत गण्याकडं बघत म्हटलं की,“ एस….आर यु आस्कींग मी समथिंग.”
“एस…एस…आय वॉन्ट टु टॉक टु यु…” गण्या एका दमात बोलला.
“येस….!” सौदामिनी म्हणाली.
तसं पाहिलं तर त्यांच कॉलेज हे एखाद्या खेड्यातील शाळेसारखच होतं.कॉलेज मधील मुलं आणि मुली फारच क्वचित प्रसंगी बोलत असत.शेजारी राहत असुन सुद्धा गण्या एवढ्या दिवसांनी तिला बोलला होता.याचं तिलाही आश्चर्य वाटलं होतं.तसं अडखळतच गण्या तिला म्हणाला,“ईफ यु डोन्ट माईन…ते कसं आहे ना आपल्या कॉलेजची गॅदरिंग घोषीत झाली आहे.या गॅदरिंगमध्ये मी आणि माझा चमु एक नाटक बसविणार आहोतं.आम्हाला सदरील नाटकामध्ये एका सुंदर हिरोईनची आवश्यकता आहे.तेंव्हा माझी तुला अशी विनंती आहे की तु आमच्या नाटकात हिरोईनचा रोल करावा.हुश्श्…..!”एकदाचा गण्या एका दमात बोलुन गेला.
“काय?” गण्याच्या या अनपेक्षीत प्रश्नाने सौदामिनी जवळ जवळ किंचाळलीच….! एकतर आयुष्यात तिला प्रथमच कुणी सुंदर म्हटलं होतं आणि दुसरं म्हणजे हिरोईनचा रोल होता.तस तर तिलाही सांस्कृतिक कार्यक्रमांत काम कराव असं वाटायच पण तिचा अवतार पाहून आणि वेंधळेपणामुळे कुणीच तिला कधीही सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विचारायच नाही.गण्यानं सौदामिनीला नाटकात काम करणार का असे विचारल्यामुळे तर तिला शॉकच बसला होता.काय बोलावं काय नाही या गोंधळात ती पडली होती.
सौदामिनीला असं गोंधळलेल पाहुन क्षणभर गण्याही गोंधळला.त्याला वाटलं की सौदामिनीला राग आला की काय म्हणुन.“हो….हो ते ठिक आहे…पण नाटकात काम करायच म्हणजे नेमका काय रोल असेल माझा?”
तिच्या या प्रश्नाने गोंधळलेला गण्या क्षणभरातच भानावर आला.
“तं…..तं…तसं… काही नाही….पण आपला वर्गमित्र शशी तिरळेच्या साहित्यावर आधारित ‘प्रेमपत्र’ नावाची एक अंकी नाटीका आहे.”
“काय शशी तिरळेच्या साहित्यावर….? त्याचं कुठलं साहित्य आहे? आणि नाटक आणि त्याच्या साहित्याचा काय संबंध.कॉलेज पुरवेल कि साहीत्य…! आणि हो मी नाटकात काम करणार असेल तर कुणाचे जुणे साहित्य परीधान करणार नाही.माझा साजाबाजा अन ड्रेसिंग मिच सलेक्ट करेनं.”
बोलता बोलता सौदामिनीने आपल्या अटीच सांगितल्या होत्या.तिच्या मते साहित्य म्हणजे नाटकासाठी वापरावयाची सामुग्रीच काय की….!
तिच्या ह्या साहित्याबद्दलच्या ज्ञानापुढे हसावं का रडावं हेच गण्याला समजत नव्हतं पण तरीही तिला समजण्याच्या सुरात तो तिला म्हणाला की,“कसं आहे ना सौदामिनी,एखाद नाटक जेंव्हा लिहीलं जातं ना तेंव्हा त्याला एक संहिता असते,हि संहिता जर अभिजात आणि सृजनशील असेल तर त्या कथेला एक वेगळीच उंची मिळते.नाटकासाठी मजबुत कथा-पटकथा पाहिजे असते.त्याच कथेवर त्या संपुर्ण नाटकाचे यश अपयश अवलंबुन असते.ती कथा म्हणजेच साहित्य.कथा,कविता,नाटक याला त्या त्या कवी,लेखक,नाटककाराचे साहित्य म्हणतातं.” गण्या सौदामिनीला इंप्रेस करण्यासाठी एखाद्या जाणकारासारखा आव आणुन सांगत होता.तर सौदामिनीलाही आजच साहित्य म्हणजे काय हे उमगले होते.गण्याची भाषा,त्याचे भाषेबद्दलचे ज्ञान,हे बघुन क्षणभर स्तिमित होऊन सौदामिनी गण्याकडेच बघत त्याचा एक एक शब्द ध्यान देऊन आपल्या मनाच्या गाभाऱ्यात टिपुन ठेवत होती.
महत्प्रयासाने गण्याने नाटकाचे नायक,नायीका,आणि इतर कलाकारांची निवड करण्याच दिव्य पार पाडल होतं.नाटकाच्या दोन तीन दृष्यांमध्ये नायीके सोबत तिच्या मैत्रिणीचा प्रवेश होता पण सौदामिनीच्या मैत्रिणीच्या भुमिकेसाठी कुणीही मुलगी तयार होत नव्हती.गण्याने विचार केला की तालीमिला सुरूवात करायचीय आणि वेळही कमी होता.परत एकदा एखाद्या नवीन मुलीला तयार करायचं म्हणजे दिव्यच होतं म्हणून मग गण्याने स्वतःमधील कलाकाराला वाव देण्याचं अण स्त्रिपात्री भुमिका साकारून सौदामिनीसोबतच ईतरांच्याही मनोराज्यावर अभियाचं राज्य गाजवायच हे मनोमन ठरवलं.तसही गण्याच्या नाटकातल्या प्रवेशावेळी त्या मैत्रिणीचा प्रवेश नव्हता.नायीकेच्या मैत्रीणीच्या भुमिकेचा तिढा सुटल्यानंतर सर्व टीमने ईतर सोपस्कार पार पाडून नाटकाच्या तालमिला सुरुवात केली.
ठरल्याप्रमाणे कॉलेजच्या नाट्यगृहामध्ये गण्या,शशी,पम्या,संज्या आणि रम्या जमले. सर्वजण आपापल्या भूमिकेच्या संवादांची घोकंपट्टी करण्यात व्यस्त होते.बराच वेळ झाला तरी अजून नाटकाची नायीका सौदामिनी आली नव्हती.सौदामिनीने नाटकात काम न करण्याचे मन बनवले की काय या शंकेने गण्याच्या मनात चलबिचल व्हायला लागली होती.गण्याने नाटकाच्या निमित्ताने सौदामिनीकडून तिच्या घरचा फोन नंबर घेतलेला होता.तिला वेळ लागतोय म्हणून अस्वस्थ झालेल्या गण्याने कॉलेजच्या फोनवरून तिच्या घरी फोन लावला.तस दुसर्याबाजुने एक राकट आणि कणखर आवाज ऐकू आला.
“हॅलो,हॅलो कोण?”
तिकडला आवाज ऐकला आणि आता काय बोलावं या संभ्रमात गण्या गोंधळून गेला तरीही तरीही कसं बस सावरत गण्या धांदरटपणाने म्हणाला,“ हॅलो हॅलो काका मी गणेश बोलतोय, शेजारच्या पवार मास्तरांचा मुलगा…!”
“मग…?” समोरच्या बाजुने आलेल्या राकट आणि रूक्ष आवाजाने गण्या गोंधळला.
“अं…अं …म…म…मंजे तसं नाही काका, आम्ही कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये नाटक बसवतोय त्यामध्ये आपली सौदामिनी नायीकेची भूमिका करतेय.”
“काय आपली सौदामिनी…?”
तसं गण्या चपापला.
“तं …तं….तसं नाही म्हणायचं काका मला…..!मं…मं… म्हणजे ते काय आहे ना…..सौदामिनी आज तालीम ला येणार होती.म्हणुन फोन लावला होता.स्वतःची जीभ स्वतःच्या दाताखाली चावत गण्या म्हटला.
“अरं काय ही नाटकं लावली… जरा अभ्यासाचं पहा चाललेत मोठे नाटकं करायलं…गण्या तुलं शेवटचं सांगतो आता यावेळी पोरीच्या हटृटापायी तिला परमीशन देतोय….पण ही शेवटची वेळ बर का… येते ती तिच्या मायसंग…. ठुय आता!”
“हो…हो….काका….!” गण्या असं बोलेपर्यंत समोरून खाडकन फोन ठेवल्याचा आवाज आला.
“हुश्य बुवा सुटलो एकदाचा…..!” गण्या स्वगतच म्हणाला.एवढ्यात ‘धाड धूम धडम्..!’ आवाज आला आणि सर्व मुलं आवाजाच्या दिशेने पळाली.नेहमीप्रमाणे वेंधळटपणानं सौदामिनीने तिथे उभ्या असलेल्या सायकली व गाड्यांना आपल्या स्कुटीची धडक मारली होती.सगळ्या गाड्या आणि सायकली आस्ताव्यस्त पडल्या होत्या.तिच्यासोबत आलेली तिची आईही गाडीवरून उडून समोर असलेल्या लाईटच्या खांबाला धडकली होती त्यामुळे एक भलं मोठ टेंगूळ तिच्या कपाळावर आलं होत.सहसा मुलींकडून कुठेही एक्सीडेंट झाला अथवा कुठे गाडी धडकली तर त्यांची चूक नसतेच.गण्याही याच नियमाला जागुण सोबतच्या पोरांवर डाफरायला लागला.“गाढवांनो, अकला पण नाहीत तुम्हाला…रस्त्यात गाड्या लावतात का रे…?”
खरं म्हणजे रस्त्यापासून पंधरा-सोळा फूट अंतरावर लावलेल्या गाड्या आणखी किती दूर लावायच्या होत्या हा सोबतच्या मुलांना प्रश्न पडला होता आणि विशेष म्हणजे गण्याची गाडीही त्या गाड्यांमध्ये होती.निसर्ग नियमाप्रमाणे मुली अथवा स्त्रियांना अपघात झाला की जसे सर्व मदतीला धावून येतात तसेच सर्व मुलं सौदामिनी आणि तिच्या आईला उठवायला धावून आले.
वाळवंटामध्ये ओॲसीस सापडावं तस गण्या आणि चमुला नाटकासाठी नायीका मिळाली होती.सौदामिनीच्या वडिलांनी सौदामिनीची आई तिच्या सोबतच तालीमिंना हजर राहणार या अटीवर सौदामिनीला नाटकामध्ये काम करायची परवानगी दिली होती.तसेही कॉलेजमधले वातावरण जरा कडक असल्यामुळे मुले मुली बोलत नसत.त्यामुळे सौदामिनी नाटकाला तयार झाली हेच खूप महत्त्वाचं होतं.सौदामिनी दिसायला जरी साधारण व वेंधळी असली तरी सुद्धा नाटकातील सर्व मुलांना आता ती आवडू लागली जो तो आपापल्या परीने सौदामिनी आणि तिच्या आईला खुश करण्याचा प्रयत्न करू लागले त्यांची बाडदास्त ठेवण्यात कुठेही कमी पडणार नाही याची ते दक्षता घ्यायचे.आजकाल तर गण्याच्या चमु मधील सर्व मुलं नेमकी टीप टॉप राहायला लागली होती.जो तो सौदामिनीला इम्प्रेस करायचा प्रयत्न करत होता.त्यातही शशी तिरळेला सौदामिनी जरा जास्त आवडायला लागली होती.त्यामुळे तो सौदामिनीच्या आईच्या फारच पुढे पुढे करायचा.सौदामिनी आणि तिची आई तालीमिला आल्या म्हणजे सर्व मुलं त्यांच्या चहा,नाश्ता,कोल्ड्रिंक्स आदिंची व्यवस्था करायचे.
एकदाची नाटकाच्या तालीमिला सुरुवात झाली.नायीकेची आई खुर्ची टाकून समोरच बसली होती.आपल्या करड्या नजरेने ती बारकाईने नाटकाचे बारकावे टिपत होती.नाटक जसजसे पुढे सरकत होते तसतसे नाईकेच्या आईच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. नाटकातील संवाद बोलतांना सौदामिनी तिच्या वेंधळ्या स्वभावाप्रमाणेच वेंधळटपणे अडखळत होती.हे बघून सौदामिनीची आई सौदामिनीवर चांगलीच भडकली आणि तिने नाटकातील नायीकेची भुमिका कशी करायची याची झलक दाखवत आपल्यातील अभिनय कलेच्या किड्याची खाज भागवली.एकदाची पहिली तालीम झाली आणि तात्काळ नायीकेच्या आईची सूचना आली की,“एवढी स्टॅंडर्ड मुलगी आणि ती एका नोकरासोबत का पळून जाते…? हे शोभत नाही.यामुळे नाटकामधली वास्तवता कुठेतरी हरवून जाते.” हे ऐकताच शशी तिरळेच्या पायाखालची जमीन सरकली त्याने कथेत छेडछाड करणार नाही या अटीवरच गण्याला कथा दिली होती.
“कुणी लिहिली आहे ही तद्दन भिकारडी कथा….!” सौदामिनीच्या आईचे हे जळजळीत शब्द कानावर पडले आणि कुणितरी आपल्या कानात तप्त लाव्हा ओतलाय की काय असे त्याला वाटले. आपल्या कथेतील न्यून दाखविल्यामुळे एक भला मोठा प्रश्नचिन्ह शशीच्या कपाळावर तयार झाला होता.त्याला ओशाळल्यासारखे होत होते.खरं म्हणजे आपल्या साहित्यामध्ये कोणी छेडछाड करावी हे तो सहनच करून घेऊ शकत नव्हता पण सौदामिनीची आई म्हणतेय म्हणजेच कथेत काहीतरी न्युन असावे असे त्याला वाटले.सौदामिनीच्या आईने कथेतील दाखविलेल्या न्युनपुढे शशीच्या अंगातील न्यूनगंड कुठल्या कुठे पळून गेला होता.तसा तो सौदामिनीच्या आईच्या समोर आला आणि म्हणाला,“व्वा खरंच आन्टी,तुम्हाच्या अंगातील अभिनय गुण तर आम्ही पाहिलेच परंतु तुम्हाला साहित्याचीसुध्दा एवढी जाण असेल असं वाटलं नव्हत….खरच तुम्ही म्हणजे ना एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहात बुवा….तुम्ही ईथे काय करताय? अहो तुमची खरी जागा बॉलीवुडमध्ये आहे….अहो खरं म्हणजे मी एवढा निष्णात लेखक असतांना माझ्या हातून ही चूक घडलीच कशी…. खूप खूप धन्यवाद आंटी माझ्या साहित्यातील न्यून तुम्ही उघडे पाडले त्यामुळे मी तुमचा खुप खुप आभारी आहे.”
शशीचा हेकेखोर स्वभाव माहित असल्यामुळे आणि त्याच्या वर्तनातील बदलामुळे गण्याला मात्र धक्काच बसला होता.ज्यावेळेस सौदामिनीच्या आईने शेवट बदलायला सांगितला होता त्यावेळेस खरं म्हणजे गण्याच्या पायाखालची वाळूच सरकली होती.नाटकात का होईना पण सौदामिनीच्या नायकाची भूमिका करायला मिळत असल्यामुळे तो खुशीत होता,पण शशीच्या अवसानघातामुळे आता त्याच्या स्वप्नावर पाणी फिरणार होते.शशी तर सारखा सौदामिनीच्या आईच्या मागेपुढेच गोंडा घोळायचा.सौदामिनीची आई हि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची असुन त्यांना अभिनयासोबतच साहित्यातलेही खूप काही कळते असं तो वारंवार त्यांच्यासमोर म्हणायचा.खरं म्हणजे सौदामिनीच्या आईला असलेली साहित्याची जाण ही सौदामिनीच्या ज्ञानासारखीच होती,पण सौदामिनीच्या वेंधळ्या सौंदर्याने घायाळ झालेला शशी सौदामिनी पर्यंत जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी सौदामिनीच्या आईला पटवायचा प्रयत्न करत होता.
“ऑंटी,आपण असं करूयात का आपल्या नाटकाची नायिका ही त्यातल्या सर्वात हुशार आणि करियरिस्टिक मुलासोबत पळून जाते ते दाखवुयात का?” शशीने सौदामिनीच्या आईकडे बघून प्रश्न केला.हा प्रश्न ऐकताच नाटकामध्ये अभ्यासू मुलाची भूमिका करणारा हाडकुळा रम्या भलताच खुश झाला होता.
“नाही,नाही अभ्यास करणारी आणि करियरिस्टिक मुलं अशी पळुन जाण्याच्या फंदात पडत नाहीत.ते काही वास्तव वाटणार नाही.” सौदामिनी च्या आईचे हे वाक्य कानावर पडले आणि क्षणार्धात रम्याच्या खुशीचा स्वप्नभंग झाला.परत एकदा गण्या,शशी,सौदामिनीची आई आणि नाटकामधील इतर पात्र मुलगी कुणासोबत पळून जाणार यावर खल करू लागले. तेवढ्यात गण्या म्हणाला,“आपण असं करूयात का लाजर्या मुलाची सोज्वळ भूमिका करणाऱ्या सरळ मार्गी मुलासोबत आपली नायीका पळून जाते हे दाखवुयात. वाटल्यास त्या सोज्वळ आणि सरळ मार्गी मुलाची भूमिका मी करतो.”
गण्याच्या या सूचनेमुळे शशी मनातल्या मनात खट्टू झाला होता.तो सौदामिनीच्या आईच्या चेहऱ्याकडे पाहत होता त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलत होते हे पाहून त्यांना गण्याची ही सूचना आवडते कि काय असे वाटल्याने आणि गण्याचा डाव उधळुन लावायचा या हेतुने तात्काळ शशीने सुचविले की,“नाही नाही सरळमार्गी आणि लाजरी बुजरी मुलं अशा फंदात पडतच नाहीत आणि लाजरा मुलगा एखाद्या मुलीला पळवून नेतो हे कदापिही वास्तव वाटत नाही.”
तेवढ्यात सौदामिनीची आई म्हणाली की,“कसं आहे ना,मुलींना स्टायलिश, बॉडी बिल्डर आणि हिरो टाईप छपरी मुल आवडतात.त्यामुळे आपल्या नाटकाची नायीका ही असल्या स्टायलिश, बॉडी बिल्डर आणि हिरो टाईप, छपरी मुलासोबत पळून जाते हे दाखविणे संयुक्तिक वाटेल आणि ते वास्तवाच्या जवळही असेल.” सौदामिनीच्या आईच्या सूचनेमुळे नाटकात टपोरी मुलाची भूमिका करणारा स्टायलिश बॉडी बिल्डर पम्या भलताच खुश झालता,पण सौदामिनीच्या आईने म्हटलेल्या छपरी शब्दामुळे तो खिन्नही झाला होता.सौदामिनीच्या आईला आपण छपरी वाटतोय म्हणून तो स्वतःच्याच मनाला खात होता. शेवटी एकदाचं सर्वांच्या सहमतीने नाटकाच्या शेवटी नायीका छपरी आणि टपोरी मुलासोबत पळून जाते… आणि इथेच नाटक संपते यावर सर्वांचे एक मत झालं.
सौदामिनीच्या आईने नाटकाचा शेवट किती सुंदर आणि प्रभावी केला हे त्यांना परत परत सांगताना त्यांची स्तुती करण्यात आणि लाळघोटेपणा करण्याच्या कामात शशी तिरळे व्यस्त होता. इकडे गण्या आणि संज्या मात्र पम्यावर जळफळत होते. अखेर सौदामिनीच्या आईने सांगितलेले बदल स्वीकारून पुढील काही दिवस नाटकाच्या तालिमी चालू राहिल्या.
गॅदरिंग ला चार ते पाच दिवसच राहिले होते त्यामुळे गण्या आणि त्याच्या चमुची धावपळ चांगलीच वाढली होती.एका दिवशी मुलांनी रंगीत तालीम घ्यायचं ठरवलं होतं.खरं म्हणजे गण्या हा नाटकाचा केवळ नामधारी दिग्दर्शक होता. खरं दिग्दर्शन तर सौदामिनीची आईच करत होती,परंतु त्या दिवशी घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असल्यामुळे सौदामिनीची आई काही तालिमीला येऊ शकणार नव्हती. आपल्यामुळे नाटकाच्या रंगीत तालिमीचा खोळंबा व्हायला नको म्हणून सौदामिनीने नाटकाच्या तालीमिला तिच्या वडिलांना आणलं होतं.सौदामिनीचे वडील म्हणजे चांगलेच सहा साडेसहा फूट उंचीचे धिप्पाड असं व्यक्तिमत्व होत.त्यांच्या डोळ्यावर जाड जाड भुवया होत्या तर जाडजुड दाढी मिशा आणि राकट चेहऱ्यामुळे समोरच्याला त्यांचा धाक वाटायचा.कुणीही त्यांना बघताच घाबरावे असे ते व्यक्तिमत्व होतं.इतकी वर्ष शेजारी राहून सुद्धा गण्याची त्यांना कधीही बोलायची हिंमत झाली नव्हती.शेवटी सौदामिनीच्या वडिलांच्या उपस्थितीत नाटकाच्या रंगीत तालिमीला सुरुवात झाली.सुरुवातीला सौदिमिनीच्या वडिलांच्या हजेरीमुळे सर्व मुलं थोडे बुजून गेले होते.सौदिमिनीच्या वडिलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या धाकाखाली ते त्यांचे संवाद बोलायला विसरत होते तर कुणाचा कधी प्रवेश आहे हे सांगण्यात गण्याचा गोंधळ उडत होता. मुलांची होणारी ही फटफजिती पाहून सौदामिनिच्या वडिलांनी मुलांना थोडं थोडं मार्गदर्शन करायला तर काही ठिकाणी अभिनय करून दाखवायला सुरुवात केली.त्यांच्याही अंगी अभिनयाचा किडा चांगलाच वळवळत होता हे त्यांच्या वागण्यावरून दिसत होतं.आज सौदामिनीच्या आईच्या दिग्दर्शनाऐवजी सौदामिनीच्या वडिलांच्या दिग्दर्शनाखाली नाटकाची तालीम होत होती.शशी तिरळे सुद्धा आता सौदामिनीच्या वडिलांच्या पुढे पुढे करत होता आपलं साहित्यिक ज्ञान आणि साहित्य,तो त्यांना दाखवण्याचा वारंवार प्रयत्न करत होता.या सगळ्यात गण्या कुठेच नव्हता तो केवळ नामधारी दिग्दर्शकच बनून राहिला होता.सौदामिनीच्या वडिलांच्या वागण्यानं गण्याच्या चमूतील कलाकारांची भीड आता बर्यापैकी कमी झाली होती आणि ते आता एकाग्रतेने तालिम करू लागले.जसजसे नाटक पुढे जात होते तस तसे सौदामिनीच्या वडिलांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलत होते.एकदाची रंगीत तालीम शेवटाला गेली आणि सौदामिनीच्या वडिलांच्या चेहऱ्यावरील भाव जास्तच तामसिक होत गेले.नाटकाचा शेवट पाहून अक्षरशः ते किंचाळलेच आणि म्हणाले,“कुण्या गाढवाने लिहिले हे नाटक….! अरे असं नाटक लिहीत असतात का…? तुमच्या नाटकातील नायीकेला काही संस्कार आहेत की नाही…! आं….एखाद्या छपरी मुलासोबत पळून जाते म्हणजे काय…? ते काही नाही….! माझी मुलगी असल्या छपरी मुलासोबत पळून जाणार व्हय….? अरे पाटलाची पोरगी हाय ती…. आणि ती असल्या टपोऱ्या सोबत पळून जाईल..? छे…छे…ते काही नाही नाटकाचा शेवट बदललाच पाहिजे…..!” हे ऐकून टपोरी मुलाचा रोल करणार्या पम्याचा चेहरा एकदम पडला.खरं म्हणजे पम्याला हीरोइन भेटत असल्यामुळे सगळेजण पम्यावर जळत होते,तर पम्या मात्र मनातल्या मनात खूप खुश होता.तोही आता सौदामिनीमध्ये गुरफटत चाललेला होता.
“तं…. तं..तं तसं नाही अंकल,ते काय आहे ना; आम्ही तर आधी वेगळाच शेवट करणार होतो परंतु अँटी म्हणल्या की ‘तो’ वास्तवाला धरून होणार नाही म्हणून मग आम्ही असा शेवट केला.” शशी म्हणाला.
“ते काय नाही… माझ्या मुलीला संस्कार दिलेत मी….! माझी मुलगी अशी कुण्याही ऐऱ्या गैर्या सोबत पळून जाणार नाही ती एखाद्या सुशिक्षित सोज्वळ, सुसंस्कृत व हुशार मुलासोबतच पळून जाईल…. बरोब्बर…? असाच शेवट झाला पाहिजे…!” सौदामिनीच्या वडिलांनी फर्मान सोडले.तसही त्यांच्या ह्या फर्मानावर अंमल करण्याशिवाय गाण्याच्या चमूकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता.परत एकदा नाटकामध्ये किरकोळ बदल करून गण्याच्या टीमने सौदामिनीच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार नव्याने एकदा नाटकाची तालीम केली.नवा शेवट बघून सौदामिनीचे वडील भलतेच खुश झाले होते,तर सोज्वळ आणि हुशार मुलाची भूमिका करणारा संज्याही भलताच खुश झाला होता.अशा पद्धतीने एकदाच्या नाटकाच्या तालीमी संपल्या आणि मग सर्व मुलं नाटकांमध्ये लागणारी सामुग्री गोळा करायच्या मागे लागले.
गण्या नाटकात नोकराच्या भूमिकेसोबतच दोन चार प्रसंगात नायीकेच्या मैत्रिणीची भूमिका सुद्धा वठवणार होता.मग त्याने बाजारातून केसांचा विग,मेकअपचे सामान इत्यादी खरेदी केले.नंतर तो महिलांच्या आंतरवस्त्राच्या दुकानाकडे जाऊ लागला.पण आता खरी गण्याची पंचायत सुरू झाली….आत मध्ये सगळ्या मुलीच मुली अथवा महिला होत्या.महिलेची भूमिका वास्तव वाटावी म्हणुन त्याला ब्रेसीयर विकत घ्यायचे होते परंतु दुकानांमधील महिलांची गर्दी बघून गण्याने तिथून काढता पाय घेतला.आता ब्रेसीयर विकत घेणे हा गण्या पुढील एक मोठा यक्षप्रश्न झाला होता.आता ब्रेसीयर कसं विकत घ्यायचं?…..गण्याला गहन प्रश्न पडला.अचानक त्याच्या डोक्यात विचार आला की,मागील काही दिवसांनी पासून सौदामिनी आपली चांगली मैत्रीण झालेली आहे.आपण या कामात तिचीच मदत घेतली तरं….! आणि मग गण्याने आपला मोर्चा कॉलेजकडे वळवला. योगायोगाने त्याला सौदामिनी समोरूनच येताना दिसली परंतु ती मैत्रीणींच्या घोळक्यात असल्यामुळे तिला कसं विचारावं असा यक्षप्रश्न गण्याला पडला.मग गण्याने नाटकातील सामुग्री संदर्भात सौदामिनीला बोलावं असं ठरवून त्याने मैत्रिणींनी घेरलेल्या सौदामिनीला आवाज दिला. कॉलेज मधील अतिशय शिस्तीच्या त्या वातावरणात मुलं आणि मुली यांना बोलण्याची फारशी परवानगी नव्हतीच. त्यामुळे गण्याने आवाज दिल्यानंतर सौदामिनीलाही थोडं अवघडल्यासारखंच झालं होतं.तरीही ती मैत्रीणींच्या घोळक्यातून बाहेर येत म्हणाली,“हं….काय म्हणतोस गणेश…!”
“ अ अं अं …सौदामिनी थोडसं बाजूला येतेस का…? मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं.” गण्या म्हणाला खरा पण गण्याच्या या बोलण्याने तिथल्या साऱ्या मुली गण्या आणि सौदामिनीकडे विचित्र नजरेने बघू लागल्या.गण्याच्या अशा बोलण्याने सौदामिनीलाही अवघडल्यासारखं झालं होतं. हे पाहून तत्काळ सावरत गण्या म्हणाला की,“अं…अं….तसं नाही मला तुझ्याशी नाटकातील सामुग्रीविषयी बोलायचं… चालेल ना…!”
“बोल की….!” सौदामिनी म्हटली तसं गण्या म्हटला की,“हं तसं नाही,पण मला इथं बोलता येणार नाही थोडं बाजूला ये ना.”
तसं थोडं बावरतच सौदामिनी थोडी बाजूला आली.सौदामिनीला बावरलेलं बघून तिला कसं विचारावं हा गहण प्रश्न गण्याला पडला होता.तरी मनाचा हिय्या करून, “सौदामिनी,मला मला ब्रेसीयर हवं होतं…मला घ्यायला मदत करशील का…?” खूप हिंमतीने आणि धडधडत्या काळजाने गण्या म्हटला.
“काय…?”जवळ जवळ किंचाळतच सौदामिनी गण्याला म्हणाली.हे बघून बाकीच्या मुलीही गण्याकडे विचित्र नजरेने बघत होत्या.आपल खूप काही चुकलं की काय ? असं गण्याला वाटलं आणि त्याला अपराध्यासारखं वाटू लागलं.तसं स्वतःला सावरत तो म्हणाला,“अगं नाटकांमध्ये मला तुझ्या मैत्रिणीचा रोल करायचा आहे ना,त्यासाठी ब्रेसियर हवाय.”
एव्हाना गण्याच्या या प्रश्नामुळे सौदामिनी लालबुंद पडली होती ती लाजुन लाजुन चूर झाली होती.
“श्शि्….बया…!” असं म्हटले आणि गण्याला काहीच न बोलता तिथून ती मुलींच्या घोळक्याकडे पळाली.तिला असे जातांना पाहून आपण फारच काही चुकीचं बोललोय असं गण्याला वाटु लागलं.सौदामिनी आपल्या पुढील हा प्रश्न सोडवेल याची गण्याला अपेक्षा होती परंतु सौदामिनीच्या वागण्यानंतर त्याची तीही अशा मावळली होती.
आता आंतरवस्त्र विकत घेणे हे गण्यासमोरील एक मोठं आव्हान झालं होतं.काय कराव या विचारातच कुठल्यातरी हिंदी सिनेमा मधील गाणं गुणगुणत गण्या कॉलेजच्या रस्त्याने चालला होता.तेवढ्यात त्याला समोरून नटवर येतांना दिसला.नटवरच चालण,बोलण आणि वागण यामुळे कॉलेजमध्ये सगळेच जणं त्याला बायल्या म्हणून चिडवायचे.तोही आपला एकटा एकटाच राहायचा.नटवरला पाहून गण्याच्या मनातील अशा पल्लवीत झाली. “ह्याला बायकांच्या तसल्या गोष्टींबाबत आणि नट्या पट्ट्याच्या चिंजांबाबत बरीच माहिती असेल.याची आपल्याला निश्चितच मदत होईल.” गण्या स्वगतच म्हणाला.लगेच त्यानं नटवरला आवाज दिला.
“ओय मर्दा….!”
नटवर आपल्याच धुंदीत चालत होता.त्यांनं काही गण्याच्या आवाजाकडे लक्ष दिले नाही.
“अरे..ओय मर्दा….!”
यावेळी नटवरने इकडे तिकडे पाहिले परंतु आसपास कुणीही न दिसल्यामुळे तो गण्याकडे बघुन म्हणाला,“बया…तुम्ही मला आवाज दिलाय व्हय…!”
“आरं व्हय रं मर्दा….तुलाच आवाज दिलाय म्या….!” गण्याच्या या शब्दांमुळे नटवर भलताच लाजला.त्यांनं आपल्या दोन्ही हातांनी चेहरा झाकत गण्यालं म्हटलं की,“या बया,मी काय तुम्हालं मर्द वाटते व्हयं….!”
“आरं मर्दा सारखा मर्द गडी तू आणिख तुलं मर्द नाही म्हणायचं तर काय म्हणायचं रं….बर ते राहु दे …ते कस आहे नं….माझं जरासं काम होतं तुझ्याकडे म्हणून आवाज दिला मर्दा…!” असं म्हटल्यानं नटवर खुश होईल अस गण्याला वाटलं होतं खरं,पण झालं उलटच….! एक हातं कमरेवर ठेवत,तोंडावर खोटा खोटा राग आणत आणि तोंडाचा मूर्का मारून एक हात गाण्याच्या दंडावर फिरवत नटवर गण्याला म्हणला,“गणेशराव तुमचं आण् असं काय काम काढलं म्हणायचं माझ्याकडं…बोला की..?”
तसं अंगचटीला आलेल्या नटवरला दूर सारत गण्या म्हणाला की,“हे बघ नटवर, मला ब्रेसियर घ्यायचंय.तू येतोस का माझ्यासोबत दुकानात?”
“बया,आण हे काय मंतासा वं गणेशराव….! तुम्हाला आणिख कशाला पाहिजे हो ते ब्रेऽशिय्यर…आं…मंजी तुम्ही बी आमच्यासारखेच का …आं !” एक विशिष्ट हेल अण् लय घेत नटवर म्हणला.
“अरं हे…ये फोकन्या,डोस्क्याचं दही करु नको …आरं मला ते नाटकासाठी पायजे…..आला मोठा शहाना…! येतोस का ते सांग…!” गण्या चिडुन बोलला खरं पण त्याचं हे बोलणं ऐकून नटवर मुळु मुळु रडायला लागला.आता हे काय त्यानं नवीनच नाटक लावलंय असं गण्याला वाटलं.हा रस्त्यानेही असेच नाटकं करेल आणि याला सांभाळता सांभाळता आपल्यालाच अवघड जाईल म्हणून गण्याने नटवरचा नाद सोडून दिला.आता आपणच दुकानात जाऊन अंतरवस्त्र खरेदी करायचे असं गण्यानं ठरवलं.
अंतर्वस्त्र खरेदीच्या मोहिमेवर निघालेल्या गण्याने सर्वप्रथम बाजारातून एक चक्कर मारली. महिलांचे अंतर्वस्त्र मिळणारी दुकानं हेरून त्यातल्या त्यात कमी गर्दी असलेल्या एका दुकानाकडे त्याने आपला मोर्चा वळवला.मोठ्या हिमतीने आणि काळजावर दगड ठेवून गण्या दुकानात शिरला.त्याला काउंटरवर आणि विक्रीला सगळीकडे महिलाच महिला दिसत होत्या. तरी दुकानात फारशी गर्दी नव्हती.मोजक्याच म्हणजे पाच-सहा महिलाच खरेदिला आल्या असतील. गण्याला हायसं वाटलं.तो एका सेल्सगर्लकडे गेला.तसं पाहिलं तर गण्या मनातून घाबरलेला होता,तरीही सर्व हिम्मत एकवटून तो त्या मुलीला म्हणाला,“एस्क्युज मी मॅडम मला ब्रेसीयर दाखवाल का…!”
“यस सर,मला साईज कळेल का सर…!” सेल्सगर्लने असे विचारताच गण्या संभ्रमात पडला. “मायझं,हे साईज फीयीजच पण लफडं असते का…?आत्ता काय कराव….?”
शेवटी काहीच कळत नसल्यानं गोंधळून गण्या त्या सेल्सगर्ल जवळ गेला आणि म्हणला,“मॅडम मला माझ्या साईजची ब्रेसीयर द्या.”
“काय….!” जवळजवळ ती सेल्सगर्ल किंचाळलीच.दुकानातील सर्व बाया आता गण्याकडे वेगळ्याच नजरेने बघू लागल्या.गण्याही गोंधळला.
“काय बाई… आजकाल पहाव ते नवलचं…! काय जमाना आला माय.दादले बी आता बायांचे कपडे घालायला लागलेत माय….या कलियुगात देव आजुन काय काय पाहायला लावते काय माहीत माय.”
तेवढ्यात त्याला माघुन कुणीतरी आवाज देत आहे हे जाणवले.त्याने माघे वळून पाहिले तर शेजारच्या कुलकर्णी काकू आपल्या कंबरेवर दोन्ही हात ठेवून गण्याकडे टक्क लावून पाहत उभ्या होत्या.त्यांना पाहताच गण्या थोडा चाचरला.
“काय रे गण्या कधीपासून चाललीत रं ही थेर…!” काकूंच्या या बोलण्याने गण्या आणखीनच गोंधळून गेला.
“अहो काकू….ओ….तसं काही नाही…ते…ते…ते तर आमच्या नाटकासाठी लागत होतं.आमच्या कॉलेजात नाटक आहे ना त्यासाठी पाहिजे.” गण्याच्या या स्पष्टीकरणावर सर्व बायांनी सुटकेचा निःश्वास टाकला.ती सेल्सगर्लही गालातल्या गालातच हसली आणि अंदाजाने गण्याला गण्याच्या साईजचा ब्रेसीयर दाखवू लागली.
एकदाची नाटकाची सामग्री खरेदी झाली होती.बाजारातून येतांना गाण्यानं चार-पाच संत्री विकत आणली होती.घरी येतात गण्याला त्याचे आई-वडील पायऱ्यांवरच बसलेले दिसले.त्यांना बघून न बघितल्यासारखं करत गण्या आपल्या अभ्यासाच्या खोलीकडे गेला.मागच्या काही दिवसापासून गण्याचं लक्षण काही ठीक दिसत नव्हतं.त्याची वेगळीच धावपळ चाललेली होती. अभ्यासाचं तर तो नावही काढत नव्हता,म्हणून मग त्याच्याशी बोलावं या विचाराने ते आज शाळेतुन लवकरच घरी आले होते.गण्याच्या आई-वडिलांनी आज त्याच्या अभ्यासाबद्दल आणि भविष्यातील करिअर बद्दल त्याच्याशी चर्चा करावी असं ठरवलं होतं.
आयत्या वेळेला परेशानी नको म्हणून गण्याने बाजारातून आणलेले ब्रेसीयर ट्राय करण्याचे ठरविलं. गण्या स्वतःच्या रूममध्ये जाऊन आरशासमोर उभा राहिला.त्यानं अंगावरील शर्ट काढलं आणि आरशासमोर उभं राहून ते ब्रेसियर स्वतःच्या अंगावर ट्राय करू लागला. सोबत आणलेल्या संत्र्यांचा वापर करून फिटिंग व्यवस्थित येते का ते बघु लागला.गण्याशी चर्चा करावी या हेतुने गण्याचे आई-वडील त्याच्या रूममध्ये आलते.गण्या आपल्या रूमचा दरवाजा लावायला विसरला होता.गण्या आपल्याच तंद्रीमध्ये आरशात बघत स्वतःच्या अंगावरील फिटिंग न्याहाळत होता.गण्याच्या आईने समोरचे दृश्य पाहिले आणि ती अक्षरशः किंचाळलीच. तिच्या आवाजाने गल्लीतील आजूबाजूचे शेजारीपाजारी धावत पळतच गण्याच्या घरी आले.गण्याचे बाबा एखाद्या पुतळ्यासारखे भिंतीच्या आधाराने स्तब्ध उभे होते,तर गण्याची आई स्वतःच्या छातीवर दोन्ही हातांनी बडवून घेत अश्रूंना मोकळी वाट करून देत होती.गाण्याच्या आई-बाबांनी गण्याला तसल्या अवतारात पाहिल्यानंतर त्यावर त्यांना स्पष्टीकरण द्यायच्या आधीच गण्याच्या आईच्या किंकाळी मुळे सगळे शेजारपाजारी जमा झालते.गण्याची चांगलीच पंचाईत झाली होती. संत्री टाकून घातलेले ब्रेसीयर,उर बडवत रडणारी आई, भिंतीला धरून पुतळ्यासारखे स्तब्ध उभे असलेले बाबा,रूमच्या मधोमध उभा असलेला गण्या,आणि त्याच्या घरात जमलेली शेजाऱ्या पाजाऱ्यांची गर्दी…..! गण्याचं चांगलच हसं झालं होतं.शेजारच्या बाया माणसांची नजर गण्याला टोचत होती.सगळेजण गण्याकडे एका विचित्र नजरेने पाहत होते.आपल्या भोवताल जमलेली गर्दी पाहून खरं म्हणजे गण्या चांगलाच हादरला होता परंतु तरीही त्यातून सावरत त्यांने सर्वांना सांगितले की,“अहो तुम्ही समजता तसं काही नाही आहे….हे सगळे जरी विचित्र वाटत असले तरी ही माझ्या कॉलेजमधल्या नाटकाची तयारी आहे.” गण्याचा असा खुलासा ऐकल्यानंतर मग मात्र गण्याच्या आई-वडिलांनी सुटकेचा निःश्वास टाकला.त्यांना हायस वाटलं.तर खमंग चर्चेच्या वासावर असणार्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचा मात्र हिरमोड झाला.
अखेर गॅदरिंगचा दिवस उजाडला.गण्या आणि त्याच्या चमुची एकच धावपळ सुरू झाली.नाटकाला गण्याचे आई-बाबा तर आले होतेच,तसच नाटकामध्ये नायीकेची भूमिका करणाऱ्या सौदामिनीचे आई-बाबा सुद्धा आपल्या मुलीचे कर्तुत्व बघायला आले होते.सौदामिनीचे आई वडील नाटकाच्या चमुला वारंवार सूचना देत होते व नको तिथे सारखे लुडबुड करत होते.हे काय गण्याच्या आई-वडिलांना पटत नव्हतं.त्यांनी गण्याला बोलवून त्याच्याकडून नाटकाची संहिता मागविली आणि मग तेही विंगेत जाऊन सौदामिनीच्या आई-बाबांच्या नाकावर टिच्चून आपल्या पद्धतीने त्या नाटकात लुडबुड करू लागले.आता मात्र दोन्ही शेजाऱ्यांत आपापल्या परीने नाटकात किती जास्त लुडबुड करता येते याची स्पर्धाच लागली होती.इकडे नाटकाची वेळ झाली आणि नाटकाला आलेले प्रेक्षक म्हणजेच कॉलेजमधली मुलं हुल्लडबाजी करायला लागली.ओरडण्याचे आणि शिट्ट्यांचे आवाज ऐकून सौदामिनीच्या तर अंगातील सर्व बळच निघून गेले होते.तिला नाटकातील एकही डायलॉग आठवत नव्हता.ती मख्खपणे खुर्चीवर बसली होती. तिची ही अवस्था पाहून टपोरी पम्या,लेखक शशी तिरळे,आणि अभ्यासू मुलाची भूमिका करणारा रम्या हे सगळेच मख्खपणे तिच्यासमोर बसले होते. नाटकाची घंटा झाली आणि सौदामिनी जागची हालत नाही हे पाहून सौदामिनीच्या वडिलांनी सौदामिनीच्या आईला मंचावर लोटले.नाटकाच्या तालीमिंना हजर राहिल्यामुळे नायीकेचे सर्व संवाद हे सौदामिनीच्या आईला मुखोद्गत होते तसेच ते तिच्या बाबांनाही अवगत होतेच.आता आपण सोज्वळ मुलाची पर्यायानं नायकाची भूमिका करावी या तयारीत सौदामिनीचे वडील असतांनाच जशी ही नायकाची एंट्री आली तसं गण्याच्या वडिलांनी स्टेजवर एंन्ट्री मारली.जात्याच शिक्षक असल्याने आणि अभिनयाची खूमखुमी असल्यामुळे नाटकाच्या ठिकाणी उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा फायदा उठवत गण्याचे वडील आपली अभिनयाची खुमखुमी भागवत होते.इकडे सौदामिनी गण्याने आणलेले संत्रे खात बसली होती.रंगमंचावर काय होतय याचा तिला मागमुसही नव्हता.अंतरवस्त्रात वापरण्यासाठी आणलेल्या संत्र्यांची अशी विल्हेवाट लागल्याने आयत्यावेळी आता गण्याची पंचायत झाली होती. गण्याची ही घालमेल पाहून मैत्रिणीच्या भूमिकेसाठी म्हणून हातात झाडू घेऊन गण्याची आई मंचावर अवतरली.तिला मंचावर बघताच गण्याच्या वडिलांची बोबडी वळु लागली आणि ते नायीकेच्या माघे लपायला लागले.हे बघून विनोद होत आहे असे वाटून प्रेक्षक खो खो हसू लागले. त्यांच्या या हसण्याने गण्याची आई आणखीच चेकाळली आणि ती गण्याच्या वडीलांमाघे पळू लागली. हा सर्व तमाशा बघून हातावर हात आपटत रागाने लालबुंद होऊन सौदामिनीच्या वडिलांनी मंचावर एन्ट्री मारली.आता फार गोंधळ होणार म्हणून गण्या मंचावर त्यांच्यासमोर पळायला लागला त्याची इकडून तिकडे अन तिकडून इकडे पळत नाटकाला सावरायची कसरत बघताना त्यातून विनोद निर्मिती होऊ लागली आणि प्रेक्षक पोट धरून खो खो हसू लागले.प्रेक्षकांना हसायलेले बघून गण्याच्या आईचा आणि सौदामिनीच्या वडिलांचा रागाचा पारा भलताच चढत होता कारण सौदामिनीची आई नायीकेची भूमिका करत होती आणि गण्याचे वडील नायकाची….! सौदामिनीच्या वडिलांनी रागातच गण्याच्या वडिलांच्या बखुटीला धरले आणि धाडकन त्यांना मंचावरच आपटले.तसे वेळेची नजाकत समजून सावरत पळत सौदामिनीच्या आईने,“अहो नका मारू माझ्या प्रियाला….” असं म्हणत ती त्यांना उठवायला लागली.हे बघून सौदामिनीच्या वडिलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी रागातच एक उडी मारली.त्यांच्या उडीबरोबरच मंचानं तळ गाठला.तेवढ्यात कुण्यातरी वात्रटानं विजपुरवठा खंडीत केला आणि एकच गोंधळ उडाला.मंचावर चाललेला हा गोंधळ पाहून इकडे प्रेक्षकांनीही हुल्लडबाजी करायला सुरुवात केली होती.
कॉलेजमधल्या शिपायांनी धावपळ करत तांत्रिक टीमच्या सहकार्याने वीजपुरवठा सुरळीत केला. मंचावरील लाईट लागले.मंचावरून नाटकाचे नायक आणि नायीका(पक्षी: गण्याचे वडील आणि सौदामिनीची आई) कुठेतरी गायब झाले होते,तर इकडे सौदामिनी आणि पम्याचा पत्ता नव्हता.मंच कोसळतांना कमरेत मुक्कामार लागल्याने रागाने फुत्कारत सौदामिनीचे वडील वेदनेने विव्हळत एका कोपऱ्यात पडले होते,तर गण्याची आई;त्या भंग पावलेल्या मंचावर एखाद्या जख्मी वाघिणीसारखी इकडून तिकडे चकरा मारत गण्याच्या वडीलांना शोधत होती.अशा पद्धतीने गण्याच्या नाटकाचा खेळ खंडोबा झाला.
दुसऱ्या दिवशी गण्या कॉलेजला आला असता प्रत्येक विद्यार्थी त्याच्याजवळ येत होता. कुचळपणे हसत गण्याची फिरकी घेत त्याच्या हातात हात देऊन त्याला म्हणत होते की,“व्वा, काय गणेश…काय अभिनय केलास मित्रा…. जबरदस्त हां….किप ईट अप….अमेझींग काम केलस हां…!”
© गोडाती बबनराव काळे,लातुर
9405807079
Leave a Reply