नवीन लेखन...

गण्या परत येतो तेव्हा…

`आम्ही साहित्यिक’ फेसबुक ग्रुपवरील लेखक गणेश भंडारी यांनी लिहिलेला हा विडंबनात्मक लेख. मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी  शेअर केला आहे. 


२०५० सालातली गोष्ट

मंगळावर राहायला गेल्यापासून प्रथमच म्हणजे तब्बल ३६ वर्षांनी मी माझ्या पृथ्वीवरील घरी काही दिवसांसाठी भेट देण्यासाठी आलो होतो. २०१४ च्या दरम्यान पृथ्वीवरील धूसर भवितव्य व नव्या जागी राहायला जाण्याच्या ओढीने पहिल्याच तुकडीबरोबर मंगळावरील वसाहतीमध्ये राहायला आलो होतो. पृथ्वीचा एवढा उबग आला होता, की मंगळावर राहायला गेल्यापासून पृथ्वीवरील घटनांची खबरबातही घ्यावीशी वाटली नाही. त्यामुळे मध्यंतरीच्या काळातील पृथ्वीवरील घडामोडींविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होतो.

तर मंगळावरील शिवाजीनगर स्पेस स्टेशनवरून गावाकडे येण्यासाठी जिओ एअरलाईन्सच्या विमानात बसलो. थेट गावापर्यंत जाणारे विमान उपलब्ध नसल्याने अहमदनगरपर्यंतचे तिकीट काढले. सुमारे ३६ तासांच्या प्रवासानंतर नगरच्या माळीवाडा एअर स्टँडवर पोचलो. तेथून गावाकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य हवाई परिवहन महामंडळाच्या चार वाजताच्या लाल विमानात बसलो. हे विमान रात्री आमच्या गावाशेजारीलच गाढवटेक एअर बेसवर मुक्कामाला असते असे कळले. त्यामुळे निवांत प्रवासविषयी निर्धास्त होतो.

लाल विमानाने माळीवाडा स्टँडवरून टेकऑफ केल्यावर व स्टेट बँक चौकात उभे असलेले प्रवासी दोरीने वर ओढून घेतल्यावर पाच मिनिटांनी विमानाचा कंडक्टर ‘तिकीट… तिकीट…’ करीत आला.
“एक भालगाव द्या”
“हे घ्या, सुट्टे पैसे उतरताना घ्या.”
माझे तिकीट काढून झाले. कंडक्टर माझ्या शेजारच्या माणसाकडे वळला. त्या माणसाने खिशातून झटकन कसलेतरी कार्ड काढून कंडक्टरला दाखवले. कंडक्टर कार्ड पाहून तिकीट न देताच पुढच्या प्रवाश्याकडे वळला. हा प्रकार पाहून माझी उत्सुकता चाळवली गेली. न राहवून त्या शेजाऱ्याला विचारलेच,
“भाऊ, कसले कार्ड हो हे?”
“स्वातंत्र्य सैनिक.”
हे ऐकून मी आणखी गोंधळात पडलो. तो माणूस फार तर पंचावन्न वर्षांचा वाटत होता. म्हणजे माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहानच! माझी बघण्यात तर काही चूक होत नाहीय ना असे वाटून मी चष्मा काढून पुन्हा एकदा त्याला बारकाईने न्याहाळले. होय, पंचावन्नच! फार तर छप्पन…
“काय हो साहेब, असे काय बघताय माझ्याकडे?”
“भाऊ, तुमचे वय फारतर पंचावन्न असावे…”
“बरोबर ओळखलंत की!”
“म्हणजे तुमचा जन्म १९९५ चा.”
“बरोबर.”
“मग हे स्वातंत्र्यसैनिक वगैरे…”
आता तो माझ्याकडे भलत्याच विचित्र नजरेने पाहू लागला.
“नवीन दिसताय साहेब इथे.”
“हो. तसा मूळचा इथलाच, पण गेल्या छत्तीस वर्षांपासून मंगळावर राहतोय.”
“तरीच! अहो मी २०१९ च्या लढ्यातला स्वातंत्र्यसैनिक. दोन वर्षांपूर्वी जितेंद्र सोढी महाराज गादीवर आल्यापासून त्यांनी आम्हाला स्वातंत्र्यसैनिक म्हणून जाहीर केलंय.”
“२०१९? २०१९ चा कसला स्वातंत्र्यलढा? कोणापासून स्वातंत्र्य? आणि हे जितेंद्र सोढी महाराज कोण?”

हे ध्यान लैच खुळचट दिसतंय अशा काहीशा नजरेनं माझ्याकडे पाहत तो सुरू झाला,
“साहेब, हिंदुस्थानात जन्म घेऊन मायभूचा जाज्वल्य इतिहास इतक्या लवकर विसरलात? कृतघ्न साले! थू तुमच्या जीवनावर!”
“अहो भाऊ, सांगितलं ना, छत्तीस वर्षांनी पृथ्वीवर आलोय. मधल्या काळात काय काय घडलं खरंच काही कल्पना नाही हो. आता भेटलाच आहात तर तुम्हीच सांगा न सविस्तर. तसेही तुमच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकाकडून ऐकायला मजा येईल.”
हे ऐकल्यावर तो जरा उत्साहात आला.
“ऐका. २०१९ साली म्हणजे शके १९४१ मध्ये आपल्या हिंदुस्थानला मागासलेल्या, जुलमी लोकशाही राज्यकर्त्यांपासून स्वातंत्र्य मिळालं. ७२ वर्षांच्या जुलमी लोकशाही राजवटीत पिचून निघाल्यावर अनंतकोटी ब्रह्मांडनायक गजेंद्रराजे सोढीजी महाराजांनी अथक परिश्रम करून लोकशाही राजवट मोडून काढली. सोढी राजवंशाची स्थापना केली आणि हिंदुस्थानचे भाग्य उजळले.”
“हो, मी पृथ्वी सोडता सोडता २०१४ मध्ये गजेंद्र सोढीचे सरकार निवडून आले होते, अंधुकसे आठवतेय…”
“खामोश! गजेंद्रराजे महाराजांचा एकेरी उल्लेख? जीभ तोडून हातात देईन! देशद्रोही साले!”
त्याचा रुद्रावतार बघून मी चपापलोच.
“माफ करा भाऊ, पुन्हा ही चूक होणार नाही. त्यांनी कसे स्वातंत्र्य मिळवून दिले, पुढे काय झाले, तुम्ही लढ्यात कसा सहभाग घेतला हेही सांगा.”
“ठीक आहे, पहिली वेळ म्हणून माफ करतोय. तर पुढे ऐका. १९४७ साली हिंदुस्थानला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्याचे तुम्हाला माहीत असेलच.पण त्यावेळी मिळालेले स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य नव्हते. महान राष्ट्रीय संघटना आणि आमचा प्रेरणास्रोत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रखर लढा देऊन, अनेक हालअपेष्टा व प्रसंगी तुरुंगवास सोसून, अनेक प्राणांची आहुती देऊन इंग्रजांना हुसकावून लावले. आता आपल्या देशाला बरे दिवस येतील असे वाटत असतानाच काँग्रेस नामक तद्दन देशद्रोही संघटनेने- त्यांचा देशद्रोह काय वर्णू साहेब? या तोंडाने बोलवत नाही.अहो त्या काँग्रेसच्या माणसांनी जेव्हा संघ स्वातंत्र्यासाठी लढत होता तेव्हा इंग्रजांना साह्य करावे? त्यांना गुप्त माहिती पुरवावी? शिक्षा होऊ नये म्हणून माफीनामे लिहावेत? त्यांचे पाय चाटावेत? भयंकर! हां, तर कुठे होतो- हा, तर तिकडे इंग्रज निघून गेले आणि इकडे काँग्रेसने सत्ता बळकावली. देशात लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समाजवादी स्वरूपाची भिकार राजवट सुरू केली.”
“तुम्ही भलतेच काहीतरी सांगताय हो! काँग्रेसच्या लोकांनी किती त्याग वगैरे करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. प्रागतिक लोकशाही व धर्मनिरपेक्षतेची मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. मी शाळेत शिकलोय हे सगळं. तुम्ही वेगळाच काहीतरी इतिहास सांगताय.”
“तुमचं शिक्षण २०१४ च्या आधीचं ना? मग बरोबर! अहो तो त्यांच्या सोयीने लिहिलेला इतिहास! त्यात ते त्यांच्या राजवटीला महान वगैरे म्हणणारच ना? पण सोढी महाराजांची राजवट आल्यानंतर त्यांनी खरा इतिहास शिकवायला सुरुवात केली. तोच मी तुम्हाला सांगतोय.”
मी सर्द!

“अच्छा अच्छा! सोढी महाराजांनी कसं साध्य केलं लोकशाहीपासून स्वातंत्र्य?”
“गजेंद्रराजे खूप चतुर! मोठ्या बुद्धीकौशल्याने त्यांनी हे काम केलं. काट्याने काटा काढण्याची नीती वापरली त्यांनी. लोकशाहीच्याच निवडणुकीच्या रस्त्याने संसदेत शिरले. त्यांचा धर्मनिरपेक्षता व लोकशाहीविरुद्धचा संघर्ष खरे पाहिले तर त्याच्या कितीतरी पूर्वीपासून सुरू झालेला, पण त्यांच्या संसद प्रवेशानंतर या संघर्षाला धार आली. सर्व शक्तीनिशी त्यांनी लोकशाहीच्या वेगवेगळ्या संस्थांविरुद्ध युद्ध पुकारले. एकेक करून संसद, रिझर्व्ह बँक, सीबीआय, सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, यूपीएससी हे किल्ले नेस्तनाबूत केले. रिझर्व्ह बँकेसाठी त्यांनी वापरलेली नोटबंदीची खेळी जागतिक इतिहासात अजरामर झाली आहे. यात त्यांना संयुक्त राष्ट्रे, नाणेनिधी, मानवाधिकार आयोग यांसारख्या परकीय शक्तींकडून विरोध झालाच, पण त्याचबरोबर हिंदुस्थानातीलच अनेक लोकशाहीवादी देशद्रोह्यांचा सामना करावा लागला. पण हा विरोध मोडून काढण्यासाठी सोढीजी एकटे नव्हते. त्यात त्यांना साह्य करण्यासाठी आमच्यासारख्या लोकांची मोठी फौज त्यांनी व त्यांच्या मार्गदर्शकांनी उभारली होती. देशद्रोही लोक आम्हाला ‘ट्रोल’ म्हणून हिणवायचे. पण आम्ही डगमगलो नाही. फळाची अपेक्षा न ठेवता, अगदी चाळीस पैसे मिळाले तरी तेवढ्या मोबदल्यावर आम्ही शत्रूवर तुटून पडायचो. कधी घरची पर्वा केली नाही. सोढीजींच्या प्रत्येक कृत्यामागील देशभक्ती लोकांपर्यंत पोचवायचो. प्रसंगी शिव्या आणि मारही सहन करायचो. या सगळ्या महान कार्यांत आम्ही आमचे शिक्षण, रोजगार, प्रतिष्ठा यांसारख्या शूद्र गोष्टींना तिलांजली दिली. त्याचे फळ सोढी राजवंशाच्या रूपाने आज दिसते आहे. अंतिम लढा २०१९ ला झाला. त्यावर्षी जुन्या लोकशाहीच्या बुरसटलेल्या रुढीप्रमाणे निवडणूक नावाचा तमाशा होणार होता. पण सोढीजींनी निग्रहाने त्यावर बंदी घातली व लोकशाहीवर निर्णायक घाव घातला. त्याच लढ्यातील आम्ही सैनिक! पुढच्या काही वर्षांत लोकशाहीवादी, समाजवादी, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष अशा प्रकारच्या लोकांच्या रूपाने देशाला लागलेली कीड नष्ट करण्यात आली. ”

“मघाशी तुम्ही सोढी राजवंशाचा उल्लेख केलात. पण माझ्या माहितीप्रमाणे गजेंद्रराजेंना मुलबाळ नव्हते ना? मग?”
“किती हो भोळे तुम्ही! अहो मुलबाळ नाही असे मुद्दाम शत्रूंना चकवण्यासाठी जाहीर केले होते. जसोदाराणींविषयी तरी २०१४ पूर्वी किती लोकांना माहीत होते? तसेच हे! त्यांना धर्मेंद्र नावाचा मुलगा होता, तेच प्रसिद्ध धर्मेंद्र महाराज. त्यांनी पुढे २०३० ते २०४८ असे १८ वर्षे राज्य केले व आता त्यांचे पुत्र जितेंद्रराजे राज्य करताहेत.”

“पण काय हो, लोकशाहीच्या काळात देश किती पुढे गेला. मोठमोठी धरणे, प्रचंड कारखाने, हरितक्रांती, इसरोची दैदिप्यमान कामगिरी, जीडीपीत झालेली मोठी वाढ, अणूउर्जासंपन्नता, रोजगार हमी आणि अन्नसुरक्षेसारख्या महत्वाकांक्षी योजना…”
“बस बस! समजली तुमची अक्कल! या सगळ्या फडतूस गोष्टींना तुम्ही विकास म्हणता? हे देशाचे पुढे जाणे समजता? धन्य आहे! अहो, अमेरिकेचंच उदाहरण घ्या. त्याच काळात अमेरिकेत भैताड पंप नावाचा राज्यकर्ता होऊन गेला. त्यानेही सोढीजींच्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न केला, पण पुरेशा कणखरपणाच्या अभावी त्याला तेथील लोकशाहीवादी लोकांपुढे माघार घ्यावी लागली. परिणामी अमेरिका आजही कुठे सूर्यावर यान पाठव, शनीवर वस्ती कर, जनतेच्या आरोग्यावर खर्च कर, अणुऊर्जेत संशोधन कर असल्या फालतू गोष्टींत गुंतून पडली आहे.”
“हा विकास नाही? मग तुमच्या सोढी महाराजांनी कोणता विकास केला ते सांगा.”
“तुम्ही आता गावाकडे गेल्यावर एक दिवस मुद्दाम जवळपासची दहापाच गावे पहा. प्रत्येक गावात तुम्हाला एकतारी भव्य पुतळा दिसेल. बहुतांश प्रत्येक चौकात मंदिर हमखास दिसेल. झालेच तर गोमातेच्या संरक्षणासाठी ठिकठिकाणी चौक्या दिसतील. ही मंदिरे, या चौक्या, हे पुतळे यांच्याद्वारे प्रचंड रोजगार निर्माण झाला आहे. त्याचबरोबर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला रेशनवर पुरेशा प्रमाणात गांजा पुरवला जातो. त्यामुळे देशातील जनतेने एक वेगळीच अध्यात्मिक उंची गाठली आहे. विविध कामांसाठी लागणाऱ्या वस्त्रांचे-काकडा, ध्वज-पताका, देवांची विविध वस्त्रे यांचे उत्पादन घेणारे कारखाने उभारण्यात आले आहेत. आणखी काय विकास हवा?”
“ग्रेटच! पण लोकांचे दारिद्र्य, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, सुशिक्षितांची बेरोजगारी, धार्मिक दंगे, निरक्षरता यांकडेही लक्ष देता की नाही?”
“छ्या! असल्या फालतू गोष्टीकडे लक्ष देण्याचे काय कारण? यात वेळ घालवला तर मंदिरे कधी बांधायची? पुतळे कधी उभारायचे? शहरांची, रस्त्यांची नावे कधी बदलायची? धार्मिक दंगे म्हणाल, तर ते करायला दुसऱ्या धर्माचे लोक हवेत ना देशात? ब्रम्हदेशाचा आदर्श घेऊन कधीच हाकलून दिलंय त्यांना! आणि बरं का, आता तुम्ही आपले म्हणून सल्ला देतो, एवढे प्रश्न विचारायचे नाहीत हं राज्यकर्त्यांना! नाहीतर तुमचा आवाज कायमचा बंद व्हायचा!”
“असं असं! पण काय हो, एवढे पुतळे उभारले तरी कुणाचे?”
“आपल्याकडे महान व्यक्तींची काय कमी आहे का? त्यांचेच हे पुतळे.”
“तरी?”
“सगळ्यात जास्त पुतळे आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक महात्मा गांधींचे!”
“काय??? गांधीजी संघाचे संस्थापक?”
“साहेब तुमचा इतिहास कच्चा आहे, नवीन इतिहास बारकाईने वाचा. गांधीजी जाज्वल्य हिंदू धर्माभिमानी होते. ते स्वतःस सनातनी हिंदू म्हणवून घेत.”
“बरं, आणखी कुणाचे पुतळे?”
“गांधीजींचा काँग्रेसच्या नथुराम गोडसेने खून केल्यावर सरसंघचालक बनलेले सरदार वल्लभभाई पटेल, संघाचे बंगालचे कार्यवाह सुभाषचंद्र बोस, पंजाबचे कार्यवाह भगतसिंग, मनुस्मृतीचे गाढे अभ्यासक व ज्यांचे हिंदुस्थानभर मनुस्मृतीचा कायदा लागू करण्याचे स्वप्न होते असे आंबेडकर, तसेच नेहरूंचेही पुतळे आहेत काही ठिकाणी”
“नेहरू तर पक्के काँग्रेसी, लोकशाहीवादी. त्यांचे पुतळे?”
“येडे का खुळे? नेहरू संघाच्या प्रयागराज शाखेचे शाखाप्रमुख होते.”

“बरं, पुतळ्याचे सोडा. हिंदुस्थानचे शेजारी देशांशी संबंध कसे आहेत?”
“उत्तम! काश्मीर प्रश्न केव्हाच मिटला.”
“मिटला? कसा?”
“आंब्याच्या अढीत एखादा नासका आंबा असल्यावर तो आपण दूर करतो ना, तसाच काश्मीर पाकिस्तानला देऊन टाकला. बात खतम!”
“बाकीच्या देशांशी…”
“सगळ्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. मग ते द्रविडनाडू असो, खलिस्तान असो, नागभूमी असो वा इतर कोणी.”

“आपली विविधता, तसेच देशाची एकता जपली जातेय ना या राजवटीत?”
“अगदी छान प्रकारे जपली जातेय साहेब! आता देशातील लोकांच्या उत्पन्नातच किती विविधता राखली गेलीय पहा ना! आज देशात बंबानीसारखे अजस्त्र संपत्ती असणारेही काही लोक आहेत, त्याचबरोबर ज्यांना रोजच्या भाकरीचेही वांधे असेही लोकसंख्येच्या जवळपास ४५-५०% लोक आहेत. दुसरीही एक विविधता आहे. पूर्वी शेतकरी फाशी घेऊन किंवा औषध पिऊन आत्महत्या करायचा. आता त्याच्या आत्महत्येच्या साधनंतही विविधता साधली गेलीय. विविध जातींना मिळणाऱ्या वागणुकीतही विविधता आहे. एकतेचं म्हणाल, तर सर्वांचा आवाज अगदी सारख्या प्रमाणात दाबला गेलाय. बाकीच्या धर्मांचे लोक हाकलून दिल्याने धर्मातही एकता आलीय आणि ही एकता दुसरा धर्म आचार पाहणाऱ्याचं दमण करून टिकवली जाते आहे.”

“भाऊ, एक विचारू? या राजवटीत तुमच्या म्हणण्याला काही किंमत आहे काय हो?”
“आम्ही आमचे मत द्यावेच कशाला? निर्णय घेण्यास सोढीराज समर्थ आहेत. तसेही गांजाच्या नियमित पुरवठ्याने आमच्यात काही विचार वगैरे करण्याची क्षमताही नाहीय. दुसरे म्हणजे भलते दुसाहस आम्ही करीत नाही.”
“पण एक नागरिक या नात्याने तुमचा स्वाभिमान, प्रतिष्ठा, मानवी मूल्ये…”
“ओ साहेब, जरा आम्हाला समजेल असे बोला की. हे स्वाभिमान, मानवी मूल्ये वगैरे काय भानगडी असतात?”

आता या नवीन राजवटीतील विकास पाहून माझे डोके गरगरायला लागले. मी डोळे गच्च मिटून घेतले. मला असे विचारमग्न पाहून शेजारच्या भाऊंनी विचारले,
“काय मग, मस्तच ना नवीन राजवट?”
“हो… हो!”
“तर मग बोला जोरात,
सोढी महाराज की-”
“जय!”

एक जोरदार लाथ कमरेवर बसली. मागोमाग आवाज आला,
“काय रे गण्या, झोपेत काय ओरडतोस असा? उठ आता. पार उन्हं अली तोंडावर तरी पसरलेला! दूध काय तुझा बाप आणून देईल का?

— गणेश भंडारी
`आम्ही साहित्यिक’ फेसबुक ग्रुपवरुन.

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..