नवीन लेखन...

गणेशपञ्चरत्नम् – मराठी अर्थासह

श्री आदि शंकराचार्य विरचित गणेशपञ्चरत्नम् – मराठी अर्थासह

आदि शंकराचार्यांनी रचलेल्या या श्री गणेशाच्या स्तुतीपर स्तोत्रात पाच श्लोक आहेत. सहावा फलश्रुतीचा आहे. यातील श्लोकांचे / चरणांचे विविध अभ्यासकांनी वेगवेगळे अर्थ लावलेले दिसतात.

गणपतीच्या हातात मोदक असतो व तो त्याला खूप आवडतो. त्याचे स्वतःचे स्वरूप आनंदमय असून तो इतरांच्या जीवनात मोद (हर्ष) निर्माण करतो म्हणून त्याने मोदक हातात घेतला आहे. विलासिलोकरंजक या शब्दावरून ‘ गणराज रंगी नाचतो ’ या गाण्याची आठवण आल्याशिवाय रहाणार नाही. ‘इभदैत्य’ या शब्दाचा अर्थ गजासुर असा घेण्याऐवजी कामक्रोधादि षड्रिपू यांना महाभयंकर राक्षस कल्पून गजानन त्यांचा नाश करतो असाही घेतला आहे. गणपतीच्या संदर्भात गज हा शब्द नेहेमी येतो. काही अभ्यासकांनी ‘गज’ हा ‘जग’ च्या उलटा आहे, म्हणून सगुण साकार ‘जगा’च्या विपरीत ‘गज’ निर्गुण निराकार असे मानून गजेश्वर म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म असा अर्थ घेतला आहे. वैश्विक पातळीवर सर्व देवी देवतांना ईश्वर महेश्वरांना गण म्हणतात. त्या सर्वांवर गणेशाचा अधिकार चालत असल्याने त्याला गणेश्वर असे नाव आहे.

आचार्यांनी या गूढार्थगर्भ स्तोत्राची रचना पंचचामर या वृत्तात (ज रा ज रा ज गा) केली आहे.


मुदाकरात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकं
कलाधरावतंसकं विलासिलोकरक्षकम् ।
अनायकैकनायकं विनाशितेभदैत्यकं
नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् ॥१॥

मराठी- आनंदाने हातात मोदक धरलेल्या, भक्तांना नित्य मुक्ती देणा-या, ज्याच्या शिरावर चंद्र विराजमान आहे, स्वर्गलोकाचे रक्षण (रंजन) करणारा, ज्याच्यावर कोणाचीही सत्ता चालत नाही, जो विश्वाचा एकमेव नायक आहे, ज्याने गजासुराचा वध केला, शरण येणा-या (भक्ता) चे दैन्य तात्काळ नष्ट करणा-या विनायकाला मी नमस्कार करतो.

धरी सहर्ष मोदका, सदैव मोक्ष दायका
शशी विराज मस्तका नि स्वर्गलोक रंजका ।
गजासुरास घातका नि एकमेव नायका
भक्त पाप हारका प्रणाम त्या विनायका ॥ १


नतेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं
नमत्सुरारिनिर्जरं नताधिकापदुद्धरम् ।
सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं
महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम् ॥२॥

मराठी- जे शरण नाहीत त्यांच्या बाबतीत अत्यंत भीतिदायक, नवीन (उगवत्या) सूर्याप्रमाणे तेज असलेल्या, दानव आणि देव ज्याला नमस्कार करतात, शरण आलेल्यांची संकटांपासून मुक्तता करणारा, देवांचा देव, वैभवाचा अधिपती, गजांचा स्वामी, गणांचा प्रमुख, महान देव अशा अत्यंत श्रेष्ठा (गजानना) ला मी नित्य शरण जातो.

टीप- या श्लोकाच्या दुस-या ओळीच्या पूर्वार्धाचा(नमत्सुरारिनिर्जरं) अर्थ ‘अरि’ (१. शत्रू २. एकनिष्ठ, निष्ठावान,दास,भक्त,धार्मिक प्रवृत्तीचा,) व निर्जर (देव, चिरतरुण, संपूर्ण नष्ट करणे) या शब्दांचा विचार करता विविध प्रकारे लावता येईल. (धार्मिक प्रवृत्तीच्या व्यक्ती व देव ज्याला नमस्कार करतात व जो चिरतरुण आहे) किंवा (देवांच्या शत्रूंचा म्हणजे दानवांचा जो संपूर्ण नाश करतो).

महा कराल उद्धटा, प्रभा जशी रवी नवा
करी लगेच विघ्नमुक्त भक्त, नष्ट दानवां ।
सुरेश्वरा निधीश्वरा गजेश्वरा गणेश्वरा
महेश्वरापदी सदैव श्रेष्ठ घेत आसरा ॥ २


समस्तलोकशंकरं निरस्तदैत्यकुञ्जरं
दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरम् ।
कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं
मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् ॥३॥

मराठी- सर्व जगाचे कल्याण करणा-या, हत्तीसारख्या बलाढ्य राक्षसांस ठार करणा-या, स्थूल पोट   असणा-या, उदात्त, श्रेष्ठ गजाचे मुख असलेल्या, अविनाशी, भक्तांवर कृपा करणा-या, त्यांच्या अपराधांना क्षमा करणा-या, सर्वांना आनंद देणा-या, उपासकांना यश देणा-या, नमस्कार करणा-या भक्तांच्या मनीच्या इच्छा पूर्ण करणा-या तेजस्वी (गणेशा)ला मी नमस्कार करतो.

बलाढ्य दानवां वधी, भले करी जगी जनां
विशाल मध्य, नित्य श्रेष्ठ उत्तमा गजानना ।
उपासकांवरी दया क्षमा नि मोद मानसा
यशप्रदा प्रणाम इष्टदायकास तेजसा ॥ ३

टीप- ‘दर’ या शब्दाचा अर्थ नाभी, मध्य, किंवा केंद्रबिंदू. याच शब्दाचा घट्ट किंवा मजबूत असा घेऊन दरेतर म्हणजे लवचिक किंवा परिवर्तनीय असे उदर असाही अर्थ लावलेला दिसतो. अथर्वशीर्षातील वर्णनानुसार गणपतीचे स्थान मूलाधार चक्र असले तरी आपल्या शरीरातील सात चक्रांपैकी तिसरे       (दहा पाकळ्या असणारे) नाभी चक्र हे नाभीच्या मागे असते आणि ते आपल्याला पूर्ण समाधान आणि समाधानाची भावना देते. हा बिंदू सोडून शरीर मध्याचा इतर भाग विशाल आहे असाही ‘दरेतर’ चा अर्थ घेता येईल.


अकिंचनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं
पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणम् ।
प्रपञ्चनाशभीषणं धनंजयादिभूषणम्
कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् ॥४॥

मराठी- ज्यांच्याकडे काहीही नाही अशा दरिद्री जनांच्या व्यथा निवारण करणा-या, प्राचीन ग्रंथांचा वर्ण्य विषय असणा-या, त्रिपुरारी शंकराचा ज्येष्ठ पुत्र असलेल्या, देवांच्या शत्रूंच्या गर्वाचा चोथा करणा-या, जगरहाटीच्या विनाशक प्रलयाचे वेळी भयानक होणा-या, धनंजय नामक अग्नी ज्याचे भूषण आहे, गंडस्थलावरून मदस्राव होत असलेल्या हत्तीप्रमाणे असलेल्या, अशा प्राचीन गजाननाचे मी पूजन करतो.

वर्ण्य पुस्तकां पुराण, दीन दैन्य वारितो
पुत्र थोरला हरास, दैत्य माज हारितो ।
जगान्त काळि जो भयाण, अग्नि दागिना जया
मदें भिजे जसे कपोल, पूजितो गजास त्या ॥ ४

टीप- काही अभ्यासकांनी या श्लोकाच्या दुस-या चरणातील पुरारिपूर्वनंदनचा अर्थ शंकराचा ज्येष्ठ पुत्र या ऐवजी शंकराच्या अगोदरपासून आस्तित्वात असणारे आनंद तत्त्व असा घेतला आहे तर, तिस-या चरणाचा अर्थ  ‘प्रपंचनाश’ व ‘धनंजय’ या शब्दांच्या अर्थानुसार विविध प्रकारे लावलेला दिसतो. प्रपंच याचा सामान्य अर्थ ‘जगरहाटी’ ऐवजी ‘प्र – पंच’ अशी फोड करून पंचमहाभूते व त्यांच्या (भासमान) विनाशाचे काळी (प्रलय काळी) भयाण रूप धारण करणारा असा केला आहे. तथापि प्रलयात पंचमहाभूतेही नष्ट होतात असे मानणे अवघड आहे. आपल्या शरीरात पंचप्राण (प्राण, अपान, व्यान, उदान,समान) व पाच उपप्राण (नाग,कूर्म,ककल,देवदत्त व धनंजय) असतात. धनंजय या शब्दाचे विविध अर्थ अग्नी, शरीर पचन/वृद्धी साठी आवश्यक मस्तकात वास करणारा (उपप्राण) वायू, नाग रूपातील राक्षस, असे आहेत. त्यानुसार शरीर वृद्धीचे कार्य करणारा वायू किंवा नागरूपातील राक्षस ज्याचे भूषण आहे असाही अर्थ होऊ शकेल. कपोलदान याचा अर्थ काहींनी हत्तीच्या गंडस्थळावरून वाहणारा मदस्राव तर काहींनी हत्तीच्या सोंडेवर सोडलेले शोभिवंत वस्त्र असा घेतला आहे.


नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजं
अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तरायकृन्तनम् ।
हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां
तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम् ॥५॥

मराठी- ज्याच्या दातांची शोभा अलौकिक व सुंदर आहे, जो यमाचाही शेवट करणा-या शंकराचा पुत्र आहे, ज्याचे स्वरूप सामान्य चिंतनाच्या पलिकडे आहे, जो अनंत आहे, (भक्तांच्या जीवनातील) अडथळ्यांचे जो तुकडे करून टाकतो, जो सदैव योगी जनांच्या चित्ती वास करतो, ज्याला एक दात आहे, अशा (गजानना) चे मी नेहेमी चिंतन करतो.

अतीव साजिरी प्रभा रदा सुता शिवाचिया
असे स्वरूप चिंतनापल्याड, अंत ना जया ।
बिघाड छाटितो वसे सदा मनात योगिया
सदैव चिंतितो मनात दात एकची जया ॥ ५


महागणेशपञ्चरत्नमादरेण योऽन्वहं
प्रजल्पति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम् ।
अरोगतामदोषतां सुसाहितीं सुपुत्रतां
समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोऽचिरात् ॥६॥

मराठी- महागणपतीचे हे पाच श्लोकांचे स्तोत्र जो रोज सकाळी गजाननाला मनी आठवून आदरपूर्वक म्हणतो,त्याला निरामय,निर्दोष,सुयोग्य साधनांनी युक्त, सुस्वभावी पुत्र यांच्यासह अष्टभूतीनी युक्त जीवन लवकरच प्राप्त होतात.

सकाळचे मनी स्मरून रोज स्तोत्र गातसे
गणेश पाच श्लोक आदरे तयास होतसे
सुशील पुत्र, रोगमुक्त, दोषमुक्त जीवनी
विनाविलंब प्राप्त अष्टभूति युक्त साधनी ॥ ६॥

टीप- अष्टभूती या शब्दाने मानवी जीवनात विविध आघाड्यांवर मिळणारे यश, समृद्धि,सुस्थिती, भरभराट,शक्ती,अधिकार,ऐश्वर्य,सन्मान,इत्यादी गोष्टी दर्शविल्या जातात.

। इति श्री गणेश पंचरत्नम् समाप्तम् ।

***************

— धनंजय बोरकर
९८३३०७७०९१

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

4 Comments on गणेशपञ्चरत्नम् – मराठी अर्थासह

  1. खूपच सुंदर आहे. पण ह्यावेळी अर्चनाने गायलेले इथे दिले नाही ते पण दिले तर खूपच छान होईल. आपण घेत असलेल्या मेहनतीचे व छन्दाचे खूप कौतुक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..