मुंबईहून दुबई आणि दुबईहून ऑस्ट्रिया मधील व्हिएन्ना साठी फ्लाईट पकडली होती. युरोप मध्ये उन्हाळा सुरु होता तरीपण व्हिएन्नाला लँडिंग करताना विमानाच्या खिडकीतून बाहेर बघितल्यावर जिकडे तिकडे हिरवगार आणि लुसलुशीत गवत दिसत होतं. बाहेरच तापमान 12 डिग्री असल्याची माहिती पायलट ने टॅक्सी वे वर असताना दिली. व्हिएन्ना विमानतळावरून तासाभराच्या आतच इटलीतील कटानिया या शहरासाठी दुसरं विमान पकडायचे होतं. धावतपळत गेट नंबरची चौकशी करून गेट च्या दिशेने धावत सुटलो होतो. बोर्डिंग पास दाखवताना लगेज बॅग्स दुबई ते व्हिएन्ना विमानावरून कटानियाच्या विमानात ट्रान्सफर झालंय का ते कन्फर्म करून विमानात बसलो. विंडो सीट असल्याने ऑस्ट्रियाच्या सुंदर राजधानीचे हवाई दर्शन घडले.
तासाभरात कटानिया एअरपोर्टवर उतरण्यासाठी विमान खाली येण्यास सुरुवात झाली होती. बाहेर पाहिलं तर विमान खाली खाली येत होतं. बाहेरचे डोंगर हिरव्यागार झाडं पानांनी अत्यंत देखणे दिसत होते. पहिले मला वाटलं की माझ्या बाजूलाच डोंगर आहेत पण दुसऱ्या बाजूच्या खीडकीबाहेर सुद्धा डोंगर दिसत होते. अलिबागच्या कार्ले खिंडीतून एस टी बस मुंबई कडे जाताना जशी वळणं घेत घेत खिंड उतरत असते नेमकं तसंच कटानिया विमानतळावर विमान रन वे कडे वळणं घेत घेत अप्रोच करत होत. उतरल्यानंतर बॅगेज आणि कस्टम क्लीयरन्स होऊन बाहेर पडलो. कंपनीचा एजंट हातात नावाची पाटी घेऊन वाट बघत होता. त्याच्या गाडीत बसलो आणि संता पनाजिया नावाच्या बंदरावर जिथे जहाज उभं होतो तिकडे निघालो. रस्त्याने जाताना गाडी ताशी 100 km पेक्षा जास्त वेगाने जवळपास दीड तास पळत होती. कुठेही खड्डा नाही की ट्राफिक नाही. युरोप मध्ये 150 km प्रवासासाठी फक्त दीड तास पुरेसा आहे याची अनुभवासह खात्री पटली. बरं दीडशे किलोमीटर मध्ये एकही टोल नाका लागला नाही हे अजून एक नवल वाटलं. पोर्टच्या सर्व फॉर्मलिटीज पूर्ण करून अँकर वर उभ्या असलेल्या जहाजापर्यंत छोट्या बोटने पोचवण्यात आले. एम. टी. म्हणजेच मोटार टँकर टी. सी. ग्लायसनर असे जहाजाचे नाव होत. जहाज सुमारे पाच वर्षपेक्षा थोड जास्त जुने होते. पण जहाजावर आजपर्यंत काम करणाऱ्या सर्व अधिकारी आणि खालशांनी जहाजाची देखभाल अशी ठेवली होती की ज्यामुळे हे जहाज काही महिन्यांपूर्वीच बांधणी करून समुद्रात उतरवलं गेले आहे की काय असं वाटावं.
अकोमॉडेशन,डेक आणि सर्व मशिनरी एकदम नव्या कोऱ्या वाटत होत्या. जहाज संता पनाजीया वरून निघालं आणि भूमध्य समुद्रातील माल्टा या बेटाजवळ इंधन भरण्यासाठी थांबवलं. माल्टा वरून जहाज इस्तंबूल शहराजवळील तुझला या बंदरात जहाजाचा पाण्याखालील सर्वे आणि इंस्पेक्शन तसेच संपूर्ण जहाजाच्या रंगरंगोटी साठी जाणार असल्याने फक्त गरजेपुरते इंधन भरून पुढे निघालं. जहाज ज्या बंदरात जाणार होते तिथे पहिलेपासून तयारी करून ठेवली होती. जहाजाला तीन बाजूनी पूर्णपणे बंदिस्त आणि आत जायला तसेच बाहेर निघायला एका बाजूने गेट असलेल्या जहाजापेक्षा एका मोठ्या स्टीलच्या तरंगणाऱ्या बॉक्समध्ये घुसवण्यात आले. त्यानंतर त्याचे गेट बंद केले या बॉक्स ला असलेल्या रुंद भिंती या मोठ्या टाक्यांप्रमाणे होत्या त्यात पाणी भरले कि तो बॉक्स वजनामुळे खाली जायचा आणि पाणी उपसल्यावर वर तरंगायचा. हा स्टीलचा बॉक्स एवढा मोठा आणि प्रचंड होता की संपूर्ण जहाज त्याच्यावर आणून उभं केलं आणि त्या बॉक्स मधले पाणी उपसलं कि संपूर्ण जहाजाला घेऊन तो बॉक्स पाण्यावर तरंगायला लागायचा. जहाजाच्या खाली टेकू आणि सपोर्ट हे जहाजाच्या रचनेप्रमाणे ठेवले असल्याने जसजस स्टील बॉक्स मधले पाणी उपसले गेले तसंतस जहाज पाण्याच्या बाहेर येऊ लागलं. संपूर्ण जहाज पाण्याच्या बाहेर निघालं होत आमचं जहाज ड्राय डॉक मध्ये पाण्याच्या बाहेर व्यवस्थित उभं राहिलं होत. जहाज आईस क्लास असल्याने पुढील भागाचा आकार थोडासा गोल होता. ज्यामुळे गोठलेल्या समुद्रात हिम नगांशी टक्कर जरी झाली तरी जहाजाला नुकसान होऊ नये अशा प्रकारचं डिझाइन आणि मटेरियल वापरून जहाज बांधले गेले होते. जहाजाचा प्रोपेलर पाण्याच्या बाहेर बघितल्यावर एक महाकाय पंखा फिरायला एका तासाला 1000 लिटर पेक्षा जास्त इंधन लागतं यावर कोणालाही विश्वास लगेच विश्वास बसेल. नवीन रंगरंगोटी करून झाल्यावर जहाजाचा नाव बदलून यलो स्टार्स असे करण्यात आलं. मग आम्हा सर्वांची जॉईन झाल्यापासून टी. सी. ग्लायसनर आणि नाव बदलल्यापासून यलो स्टार्स अशा दोन नावांचे शिक्के आणि इतर सर्व कागदपत्र बनवण्यात आली. जहाजावर आता ड्राय डॉक मधील कामगार यायचे आम्ही तुर्कस्तान मधील इस्तंबूल शराजवळील तुझला या बंदरात होतो. मुस्लिम राष्ट्र असल्याने जहाजावर येणारे कामगार मुसलमानच होते जहाजावर आल्यावर काही कामगार तुटक्या फुटक्या इंग्रजीत यू इंडियन? आणि नंतर यू मुस्लिम? हे प्रश्न विचारायचे पण आमचा ज्युनियर इंजिनीयर सरदार होता त्याची दाढी बघून त्याला यू मुस्लिम? हा एकच प्रश्न विचारायचे. इस्तंबूल शहर लांब असल्याने तिकडे जाणे जमले नाही पण जहाज ड्राय डॉक मध्ये जवळपास पंधरा दिवस तरी होतं. एक दोन दिवसाआड शहरात जायचो तुर्कस्तानी लोकांची भाषा काही कळायची नाही आणि त्यांना आमची इंग्रजीसुद्धा कळायची नाही. आमचे जहाज ज्या भागात होत त्या भागाचा पत्ता आणि शहरात जाणाऱ्या व येणाऱ्या बस चे नंबर गेट वरच्या गार्ड कडून लिहून घेतले. शहरात दहा पैकी एक जण तरी तुटकं फुटकं इंग्रजी बोलणारा भेटायचा त्यामुळे जहाजावर न चुकता आणि हरवता परत पोचायचो.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरिन इंजिनीयर
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply