नवीन लेखन...

एव्हरग्रीन गाणे – “जाने कहा गये वो दिन”

आयुष्यात होणारा बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. चेंज इज इनव्हिटेबल. आयुष्यात वेगवेगळे प्रसंग येतात; तसेच मित्र, दोस्तमंडळी, नातेवाईक, प्रेमिका,प्रियकर, पती/पत्नी, मुले आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. जीवनपट पुढे जात राहातो, आपण वृद्धत्वा कडे वाटचाल करत राहातो. केव्हा तरी जुन्या आठवणी जाग्या होतात. लहानपणीचे खेळ, सवंगडी-दोस्त, मित्र-मैत्रिणी, कठीण प्रसंग, नको वाटणार्या आणि ठुसठुसणार्या आठवणी, सुखाचे सोहळे, दुःखाचे डोंगर …ह्यांच्या आठवणी दाटून येतात. कधी कधी सुखाचे असोत अथवा दु:खाचे, ते क्षण पुन्हा  जगावेसे वाटतात. ते दिवस अथवा ते क्षण पुन्हा जगायला मिळाले तर त्यावेळी केलेल्या चुका सुधारायची एक संधी घेऊन नव्याने आयुष्य सुरु  करावेसे वाटू लागते. माणसाला जुने दिवस कसे हि असले तरी चांगले वाटतात. अशा वेळी जुन्या दिवसाच्या आठवणी जागवणारे “जाने कहा गये वो दिन” हे गाणे कानात रुंजी घालू लागते.

एकदा आठवणी जाग्या झाल्या की वारुळातून बाहेर येणाऱ्या मुंग्या जशा एका पाठोपाठ बाहेर येतात तशा मनाच्या वारुळातून बाहेर येऊ लागतात.. त्या वेळी जिवलग असणारे शाळा कॉलेज मधले मित्र आठवतात – ज्यांची वाट बघण्यात आपण डोळे शिणवले होते – कदाचित त्याने आपली जर्नल/वही  नेली असेल आणि सांगितल्या दिवशी आणली नसेल आणि नेमके दोन दिवसांनी आपली व्हायवा असणार होती; मग काय  – कासावीस होऊन त्याच्या वाटे कडे डोळे लावून त्याची वाट पाहिलेले क्षण आठवतात. त्यावेळी साधे लँडलाईन फोन न्हवते त्यामुळे मोबाईल तर दूरची गोष्ट. तो मित्र फक्त शिवाजी पार्क ला अशोक ऑइल मिल च्या आसपास राहातो  एवढीच त्रोटक माहिती असायची. पण तो ती वही / जर्नल घेऊन आल्यानंतर भांड्यात पडलेला आपला जीव आठवून आपण आता नकळत सुस्कारा सोडतो. कधी कधी  मित्रांच्या चौकडीतला एखादा चार दिवस आला नाही तरी त्याच्या विना चुकलेले क्षण आठवा. त्यावेळी ते मित्र एवढे जवळचे वाटायचे कि आपण त्यांच्या शिवाय जगू शकणार नाही असे वाटायचे. पुढे शाळा सोडली – कॉलेज ही पूर्ण  झाले; काळ पुढे जात राहातो. नोकरी लागते. नोकरीत नवे सहकारी जोडले जातात. शाळा – कॉलेज प्रमाणेच नोकरीतही काही मित्र जिवलग बनतात, काही टिकतात आणि काही आपापल्या वाटेने निघून जातात. ज्यांच्या शिवाय जगण्यात “राम” वाटत न्हवता असे जिवलग मित्र आपापल्या वाटेने निघून गेले.  आज ते मित्र कुठे आहेत? ते त्यांच्या आयुष्यात त्यांचे जीवन जगत आहेत. त्यांना पण जुने दिवस आठवत असतील का? बहुधा ते पण कधी अशाच जुन्या आठवणी काढत असतील.

एखादा जुना मित्र “गेट – टूगेदर” करण्याची टूम काढतो आणि वेळात वेळ काढून मग सर्व जुने दोस्त भेटतात. त्यावेळी कोण कसा होता इथपासून आता कोण काय करतो पर्यंत आढावा घेतला जातो. “अरे रम्या कसा शांत होता त्यावेळी आणि आता किती बोल्ड आणि स्मार्ट झालाय?” किंवा ” गिरीश किती उचापत्या होतास त्यावेळी आणि आता असा कसा शांत झालायस” ह्या सारखी चर्चा सुरु होते. गप्पा पूर्ण व्हायला काढलेला वेळ पुरत  नाही. नसलेल्या आणि न आलेल्या मित्रांच्या आठवणी जागवल्या जातात. आणि हमखास ह्यावेळी “जाने कहा गये वो दिन ” गाण्याची आठवण होते – न्हवे ते अशा प्रसंगी गायले जाते. आपलेच जुने दोस्त, सहकारी, मित्र – मैत्रिणी बर्याच दिवसांनी भेटल्यावर काही जणांशी सूर इतका चांगला जुळतो की मधला काळ गेलाच नाही असे वाटते तर काही वेळा काही जणांशी एक प्रकारचा “परकेपणा” वाटू लागतो. “हाच का तो, ज्याला पाहिल्याशिवाय / भेटल्याशिवाय एके काळी चैन पडत न्हवती आपल्याला” असे वाटते  आणि आज इतक्या वर्षाच्या ओढीने भेटल्यावरसुद्धा  हा परकेपणा का आलाय?” असा एक गूढ प्रश्न मनात उभा राहातो. सुनील गावस्कर ने ७० च्या दशका मध्ये विविध भारती वर “जयमाला” सादर केली होती त्यामध्ये त्याचे मित्र करसन घावरी, ब्रिजेश पटेल आणि एकनाथ सोलकर ह्यांचा  उल्लेख करून त्यांच्या  आठवणी खातीर “जाने कहा गये वो दिन” हे गाणे लावले होते.

केवळ मित्रच नाही तर जवळच्या नातेवाईकांच्या आठवणींनी पण मनुष्य जेव्हा कासावीस होतो आणि त्याच्या सोबत व्यतीत केलेल्या दिवसांची सय काढतो त्यावेळी हे गाणे आठ्वतेच आठवते. जीवनाच्या उत्तरार्धात जोडीदार अथवा साथीदार सोडून गेल्याने जाणवणारा एकटेपणा ह्या गाण्यात ” साया ही अपने साथ था, साया ही अपने साथ हैं ” म्हणून व्यक्त झाला आहे. राज कपूर क्रिएटिव्ह कलावंत होता. शंकर जयकिशन ने ह्या गाण्याची ट्यून केली होती. ” श्री ४२०” हा जुना चित्रपट पहा; बर्याच सीन मध्ये बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून अशा ट्यून वाजवलेल्या आहेत ज्यावर राज कपूर ने गाणी लिहून घेतली आणि त्याच्या पुढील चित्रपटात ती वापरली. “जाने कहा गये वो दिन” ची ट्यून पण “श्री ४२०” मध्ये पाश्र्वसंगीत म्हणून वापरलेली आहे. त्या  जुन्या ट्यून वर “जाने कहा गये वो दिन” हे गाणे राज कपूर ने लिहून घेतले आणि ते त्याने “मेरा नाम जोकर” चित्रपटात प्रसंगानुरूप योग्य रीतीने चित्रित केले आणि वापरले.

हे गाणे तुम्हाला तुमच्या त्या खास जुन्या दिवसात घेऊन जाते. तुमच्या आठवणी जाग्या करते. मनाच्या आतल्या संवेदना हलवून सोडते. जुने दिवस वाईट असले किंवा चांगले असले तरी “हरवलेले” असतात आणि जे हरवलेले असते त्याची चुटपुट आणि ओढ तितकीच तीव्र असते. त्या चुटपुटीची आणि तीव्रतेची जाणीव ह्या एव्हरग्रीन गाण्यात भरलेली आहे.

— प्रकाश दिगंबर सावंत 

प्रकाश दिगंबर सावंत
About प्रकाश दिगंबर सावंत 11 Articles
विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी. जन्म मुंबई चा. प्रवासाची आवड. विक्री विभागात अधिकारी असल्याने देश विदेशात प्रवासाची संधी प्राप्त. प्रवासादरम्यान लोकांचा स्वभाव आणि लोक परंपरा जवळून पाहण्याची संधी. सध्या मुक्काम पुण्यात. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. इतिहास, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..