नवीन लेखन...

एकाकी लढा

 

आपला समाज कुटुंबरचनेचा पुरस्कार करतो. सर्वसाधारणपणे दोन-तीन पिढ्या एकत्र रहात असलेली कुटुंबे दिसतात. विस्तारामुळे कुटुंब विभक्त झाली तरी नाती दृढ राहतात. वेळप्रसंगी एक होतात मदतीसाठी, सांत्वनासाठी वा आनंद साजरा करण्यासाठी. असे असले तरी याला अपवाद सापडतात. अशीच एक घटना माझ्या मनाला अस्वस्थ करणारी ठरली.

दोन वर्षापूर्वीचा काळ. एका नात्यातील व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ‘वैकुंठ’ ला गेलो होतो. नंबर येईपर्यंत आम्ही थांबलो होतो. जमलेले लोक विविध गटात विभागले होते. कोण कुठल्या ग्रुपबरोबर आहे हे वेळ आल्यावरच समजत होते. अशा गर्दीतून वाट काढत एक ऍम्ब्युलन्स आली. कर्मचार्‍यांनी स्ट्रेचर उतरवले. एक वयस्कर जोडपे स्ट्रेचर जवळ उभे राहिले. बराच वेळ गेला. त्या जोडप्याजवळ आणखी कोणी आल्याचे, बोलल्याचे दिसले नाही. ते जोडपे पंचाहत्तरीच्या पुढील वयाचे होते. आम्ही तिघेजण त्यांचे जवळ गेलो. त्यांना विचारले, ‘तुम्ही कोणाची वाट पाहताय का?’ त्यांनी नकारार्थी मान हलवली. पहिला संवाद इथेच संपला.

नंबर लागल्यामुळे आमचा ग्रुप पुढे सरकला. विधी सुरु झाले. ह्या जोडप्याच्या गटात कोणाचीच भर पडली नाही. आता वेळ असल्याने अधीक बोलणे झाले. त्या जोडप्यानेही न टाळता उत्तरे दिली. स्ट्रेचर पुढे सरकविण्यास मदत करू लागलो तर गृहस्थांनी नकार दिला, म्हणाले ‘इथले तीन कर्मचारी व मी सर्व काही करू.’ या वयस्कांसोबत याप्रसंगी कोणीही नसावे याचे आश्चर्य वाटले. आतापर्यंत आम्ही टाळत असलेला प्रश्न शेवटी विचारावा लागला.

‘तुम्ही कोणाच्या अंत्यसंस्कारासाठी आला आहात?’

‘मुलाच्या.’

‘तुमच्या कुटुंबातील कोणीच कसे नाही?’

‘आम्ही तिघेच होतो. आता मुलगा आजारपणाने गेला.’

‘नातेवाईक नाही का आले कोणी?’

‘आमच्याशी कोणी नाती ठेवली नाहीत. ओळखीचेही कोणी नाही’.

काही वेळाने आम्हाला तेथून निघावे लागले.

दहा दिवसांनंतर – ओंकारेश्वरला दहाव्यासाठी गेलो. दहा दिवसांपूर्वीचा प्रसंग डोळ्यापुढे क्षणात तरळला. इतक्यात ते वयस्क जोडपेही आले. पुन्हा केवळ दोघेच जण. मागची भेट त्यांना आठवत होती. काही प्रश्नोत्तरे झाली.

‘आजपण तुम्ही दोघेच आलात का?’

अनेक वर्षांपासून त्यांची अशीच परिस्थिती असल्याचे कळले. थोडे सविस्तर उत्तर मिळाले.

‘माझी धाकटी मुलगी अकरा वर्षापूर्वी गेली. नंतर सून व आता मुलगा गेला. नातवंडं नाहीत. सुनेचं माहेर मागे पडलं. आम्हा दोघांकडच्यांनी आम्हाला वाळीत टाकलं आहे. आम्हाला याची सवय झाली आहे आता.’

ते गृहस्थ तुळस, माका व फुलं विकणार्‍याकडे गेले. विकणार्‍याने विचारले,

‘किती लोकांसाठी देऊ, 20, 30?’

‘दोघांसाठी.’

फूलवाला चकित झाला. दहाव्याला दोनच जण आल्याचे त्याने पहिल्यांदाच पाहिले असे तो नंतर आम्हाला म्हणाला. ज्यांना हे कळले ते आश्चर्य व्यक्त करीत होते. या घटनेनंतर मनात प्रश्नांचे मोहोळ उठले.

‘आयुष्यात कोणी किती काळ लढायचे याला काही मर्यादा आहेत का?’

‘काय अर्थ उरला होता या जोडप्याच्या रिटायरमेंटला आणि वानप्रस्थाला?’

’काय फळ मिळालं यांना कुटुंब व्यवस्था पाळून?’

’त्यांच्या या एकाकी अवस्थेला ते स्वतः, नातेवाईक व शेजारी-आप्त यापैकी कोण किती कारण होते?’

माझ्यासारख्या त्रयस्थाला याची उत्तरं कशी कळणार? पण एवढे कळले की असाही ‘एकाकी लढा’ देत जगत आहेत माणसे.

— रविंद्रनाथ गांगल 

 

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 32 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..