नवीन लेखन...

एकेक दिवा वाटू या !

आपण शेवटचे दमदार हस्तांदोलन कधी केले आहे, आठवतंय? आणि हो, दुसऱ्याला शेवटची घट्ट, उबदार मिठी उसासून कधी मारलीय? म्हटलं तर या छोट्या, नगण्य गोष्टी -इतरवेळी त्यांच्याकडे सहसा लक्षही दिले जात नाही. पण अचानक या क्षुल्लक भासणाऱ्या “सहवासाचे” आवर्तन महत्वाचे ठरले आहे. या “ना स्पर्श” कोरोना पर्वात आपल्याला खिळखिळे करण्याचे सामर्थ्य आहे, हे आत्ता आत्ता लक्षात येऊ लागले आहे. सुरुवातीचे कुतूहल, नंतरचे असहाय भय आणि आताची बेछूट बेपर्वाई हे आपल्याच लोलकाचे रंग आहेत, यावर सहजी विश्वास बसत नाहीए. कोरोनाने आपल्या व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक  पर्यावरणावर, भावना- विश्वावर केलेले हे अतिक्रमण उखडून तर टाकायला हवेच, पण त्यासाठी सगळेच कितपत उध्वस्त झाले आहेत आणि आपल्या जवळच्या भात्यात कोणते बाण आहेत, त्याचा या टप्प्यावर पाठपुरावा करू या.

एकीकडे स्वतःला अथवा स्वतःच्या कुटुंबियांना कोरोना होऊ नये म्हणून पराकोटीची काळजी घेणे, त्याचबरोबर त्याचे जे दृश्यादृश्य बरेवाईट परिणाम आपल्या भवतालावर होत आहेत त्याचीही नोंद घेणे हे तसे जिकिरीचे होते सर्वसामान्यांसाठी!

शासकीय पातळीवर आणि आरोग्य संस्थांनी सुद्धा सतत कोरोनाचा प्रादुर्भाव आणि (लस नसल्याने) रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यावर भर दिला, मात्र त्यांत मानस- शास्त्रीय कोन काहीसा दुर्लक्षित राहिला. समस्या दोन स्वरूपाच्या असतात- दीर्घकालीन, जुनाट ( उदा रक्तदाब, पोटदुखी, अर्धशिशी, मधुमेह ) आणि तात्कालिक (उदा हृदयविकार, छातीत दुखणे ). स्वाभाविकपणे आपण तात्कालिक समस्यांवर आधी आणि तातडीने लक्ष केंद्रित करतो आणि त्या आटोक्यात याव्यात म्हणून उपचार करतो. दीर्घकालीन समस्या सवयीच्या झालेल्या असतात, त्यांचे रोजच्या जगण्यावर तितकेसे परिणाम होत नाहीत.

मला वाटतं – कोरोना आपण तात्कालिक समस्या मानली आणि त्यावर तातडीने लक्ष केंद्रित करून तो आवाक्यात यावा, मृत्यूदर कमी व्हावा यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज केली. मनाच्या व्याधी जुनाट असतात, दिसत नाहीत म्हणून त्याकडे थोडे नंतर बघू या असाही आपण अग्रक्रमाचा विषय बनवला. तशीही वर्तनावर भर देण्याची आपली सामाजिक परंपरा आहे कारण ते बाह्य असतं, सगळ्यांना दिसतं म्हणून ते तातडीने दुरुस्त व्हावे यासाठी सगळी धडपड करतो. भावना आणि विचार तसे अंतर्गत घटक – ते उघडकीला न आणण्याची आपण शक्यतो खबरदारी घेतो. सगळं “आतल्या आत ‘ ठेवायची धडपड करतो. कोरोनाने अशा सगळ्या भाकितांना “उघड “केलं आहे आणि त्यांच्यावरच्या उपचारांची निकडही अधोरेखित केली आहे.

पूर्वी स्पर्शाला तितकसं महत्व आपण अजाणतेपणी देत नसू पण अचानक त्याकडे माध्यमांचं लक्ष वेधलं गेलं आणि स्पर्शभान “प्रकाशात “आलं. शास्त्रात स्पर्श कधीच दुर्लक्षिला नव्हता पण त्याची अनुपस्थिती आता आपल्याला इजा करते आहे हेही आकलन कोरोनाने दिलं. स्पर्श हा आजार पसरविणाऱ्या पेशींशी लढा देतो आणि हळुवार स्पर्शाने “कॉर्टिसॉल” ची मात्रा घटते. हा अंतःस्राव रोगप्रतिकारक संवेदनांना इजा पोहोचवीत असतो आणि नैराश्याला दूर करण्यात स्पर्शाचे स्थान प्रभावी असते, हे आता संशोधनाने सिद्ध झालं आहे. पाठीवर प्रेमाने मारलेली प्रेरणादायी थाप कुसुमाग्रजांच्या भाषेत पुन्हा लढायला सिद्ध करते, यशस्वी बालकाला अधिक शिखरे गाठण्यास प्रवृत्त करते आणि एखाद्या आजारी नातेवाईकास ” मी आहे हं ” अशी ऊब पुरवते. पती -पत्नीच्या आलिंगनात किंवा चालताना नुसते हातात हात घेण्यात ताण -तणाव कमी करण्याचे सामर्थ्य असते. या शास्त्रीय गोष्टींकडे आमचे कधी लक्षच गेले नाही. आणि कोरोनाने हे अस्त्रच आमच्या हातून काढून घेतले. ज्यावेळी स्पर्श माध्यमातून आपण सबळ व्यक्त होऊ शकलो असतो, नेमके त्याचवेळी आपण निःशस्त्र असावे यासारखी उपरोधिक घटना ती कोणती? अर्थात याबाबतीत कुटुंबियांसमवेत घरात राहणारी मंडळी अधिक भाग्यवान! एकटेपण लादलेल्या मंडळींना मात्र चालणे (जमिनीस स्पर्शाचा सुखद अनुभव), योग (शरीराला मसाज) हेच मार्ग अवलंबणे भाग आहे.

अगदी युद्धकाळातही स्पर्श अस्तित्वात असतोच किंवा एडस च्या ऐन भरातही स्पर्श कधी वर्ज्य नव्हता. स्पर्शाने आपला राग शमतो म्हणून तर भांडणात आपण सहेतुकपणे भांडणाऱ्या व्यक्तींना दूर करतो. स्पर्श दुरावे मिटवतो, दऱ्या बुजवतो. स्पर्शाने चांगले वाटते, हे सांगायला शात्रज्ञांची गरज नाही. आपला जन्मच मुळी त्यासाठी झालाय. पण आता स्पर्शाची उणीव शब्दांनी भरून काढता येईल कां? कोरोना काळात याचाही अभ्यास केला गेला. असं आढळलं की दूरध्वनींची संख्या वाढली आणि संभाषणाचा कालावधीही! त्यात अधिक खुलेपण आले (फक्त खुशालीच्या चौकशीच्या पल्याड जाऊन) आणि लपवाछपवी कमी झाली. कदाचित परत केव्हा भेटू, माहित नाही मग फोनवरील गप्पा वाढवू या. हा वेगळा स्पर्श तर नाही ना? स्पर्शाची देहबोलीला अभिप्रेत असलेली व्याख्या कोरोनाने नव्याने उभारली. हा सकारात्मक बदलच म्हणावा लागेल.

कोरोनाने जागतिक पातळीवरील मानसिक अनारोग्याच्या अभ्यासाला चालना दिली आहे. बऱ्याच देशांमधील आकडेवारी भयावह आहे. सुदैवाने आपल्या भारतीयांच्या अज्ञानात सुख आहे. आपण तसे गंभीर अध्ययन सुरूच केलेले नाही. फारतर हेल्प लाईन पर्यंत आपली मजल गेली आहे पण त्यांना मिळणारे प्रतिसाद चिंताजनक आहेत. किती जणांना सावरण्याची गरज आहे हे वास्तव थोडंफार आता समोर येतंय.

जागतिक आरोग्य संघटनेने इशारे दिले आहेत पण आपल्या आसपास होणारी मोडतोड अधिक बोलकी आहे. भारतीय समाज तीन घटकात विभागला तर हे अधिक सुस्पष्ट होईल-

१) लहान मुले– शाळा बंद! मित्र-मंडळीत हुंदडणे बंद! बागा बंद! सण -समारंभ मर्यादीत! ऑनलाईन वर्गांचे बंधन – त्याच्याशी जुळवून घेताना होणारी फरफट! तांत्रिक साधनांचा अभाव (स्मार्ट फोन, वाय-फाय इ.) साहाजिकच त्यांचा कंटाळा, व्यक्त होता न येणे यामुळे वाढलेली चीडचीड, दूरदर्शनच्या पडद्याला चिकटून राहणे हे घरोघरीचे सामाईक दृश्य. कोरोना बाबत अनभिज्ञता पण कानांवर तोच विषय अखंड आदळणे. काय करावं त्यांनी आणि आपणाला काय करता येईल ज्यायोगे काहीतरी निचरा होईल?

२) प्रौढ किंवा वृद्ध व्यक्ती – फिरणे नाही, सध्या थोडी सवलत मिळाल्याने मुखपट्टी लावून का होईना प्रभातफेरी (मॉर्निंग वॉक) सुरु झालीय, गप्पांचे कट्टे रिकामे, एकत्र येऊन छोटेमोठे समारंभ साजरे करणे बंद, वयामुळे (आणि कोरोनाचा अधिक धोका असल्याने) घरच्यांकडून प्रेमापोटी होणारी कोंडी. त्यांत जिवलगांच्या प्रकृतीची काळजी आणि अधून-मधून येऊन धडकणाऱ्या सुहृदांच्या मृत्यूचे वृत्त! झोप उडवायला या हळव्या कातर वयात एवढे पुरेसे! अशा बंधनांमुळे सगळं समजत असूनही प्रौढ व्यक्ती एकतर घुम्या झाल्या आहेत किंवा चिडचिड्या.

३) तरुण– इथे आर्थिक ओढाताण, नोकरी जाण्याची भीती, घरगाडा चालविण्याची जबाबदारी, घरून काम असेल तर त्याचे स्वतंत्र ताण. इतरांना, विशेषतः घरच्यांना सांगायची सोय नाही, अन्यथा त्यांना होणारा त्रास वाढेल. व्यायाम बंद, हिंडणे बंद, हॉटेलातील पार्ट्या बंद, प्रवासावर बंधने, सतत बदलणारे नियम आणि इशारे! सगळीकडून तुंबल्यासारखी परिस्थिती. मग निचरा करण्याचा सोपा मार्ग म्हणजे ओटीटी (ओव्हर द टॉप) व्यासपीठ. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार आणि बरंच काही. त्यावरील कोणतेही सामाजिक भान न पाळणाऱ्या हिंसा, अश्लीलता यांनी बरबटलेल्या वेबसीरीज हेच करमणुकीचे (?) साधन. याचा होऊ शकणारा किंवा आधीच झालेला परिणाम (निद्रानाश, हिंसक दृश्यांचा नकळत होणारा उद्रेक) याकडे दुर्लक्ष करणे!

अंतर भान (सामाजिक अंतर), घरात बंदिस्त राहणे (लॉक डाउन उर्फ क्षेत्रसंन्यास), चोवीस तास कानावर आदळणाऱ्या कोरोनाच्या भयावह बातम्या (रोजचे रुग्ण आणि रोजचे कोरोना -मृत्यू आकडे), भविष्याबद्दलची अनिश्चितता (बस, रेल्वे, शाळा इ. कधी सुरु होणार ) या साऱ्याच घटकांचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम याचाही अभ्यास होणे महत्वाचे होते, पण  तिकडे फारसे कोणी वळले नाही. फार फार तर घर “बसल्या” काम करणाऱ्यांचा अभ्यास झाला, काही सर्वेक्षणे झाली आणि चिंता वाढविणारी आकडेवारीही जाहीर झाली. त्याहीपुढे जाऊन जे आधीच मानसिक अनारोग्याचे रुग्ण आहेत (वैफल्य, निराशा आदींनी ग्रस्त ) त्यांच्यावर कोरोनाचा काय घातक प्रभाव पडू शकेल याकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही. अशा साऱ्यांना मदतीचा हात आणि आधार देणे अत्यावश्यक आहे.

हे तर मान्य केलेच पाहिजे की अशी महामारी आपण यापूर्वी कधी अनुभवली नव्हती. याचा अर्थ आपण सुसज्ज असू नये असा नक्कीच होत नाही. आहे त्या आयुधांनिशी आपण मैदानात उतरायलाच हवे. विषाणूपासून प्रतिबंधात्मक स्वरक्षण आणि तरीही संसर्ग झालाच तर मनोबलाच्या आधारे त्याला तोंड देणे, पराभूत करणे आणि रणांगणावरून विजयी होऊन परतणे एवढे किमान अपेक्षित!

कोरोनाने असे सहकार्याचे सेतू बांधायला शिकवले तर मदतीचे बंध अधिक घट्ट रुजतील आणि प्रत्येक घरातील, खोलीतील, मनातील शांततेला सहनशक्तीचे परिमाण मिळेल. मनाची सैरभैर कमी होईल आणि दुखणे सुसह्य होईल. एका शास्त्रीय जर्नलने एक उदबोधक प्रयोग केला- २००३ साली कॅनडाच्या असंख्य शहरांमध्ये पसरलेल्या सार्सच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध म्हणून विलगीकरण करण्यात आलेले होते त्याचा संदर्भ कोरोनाच्या परिणामांच्या अभ्यासासाठी घेतला. (अर्थात सार्सचा परिणाम इतका सर्वव्यापी आणि भयावह नव्हता, पण ही एक समांतर घटना म्हणून याकडे पाहायला हवे). त्यावरून आपण काही अंदाज बांधू शकतो-

१) विलगीकरण – दहा पेक्षा अधिक दिवस विलगीकरण ज्यांच्या वाट्याला आले, त्यांना ताण -तणावांचा त्रास झाला. आपण तर सुरुवातीला चौदा दिवस विलगीकरण रूढ केले होते, पण साधारण दहा दिवसांनी आपले मनोधैर्य खचायला सुरुवात होते. त्यामुळे कालावधी अधिक वाढवला तर समस्या अधिक गहन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

२) संसर्गाची अतार्किक भीती – कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मुखपट्टी (मास्क) वापरणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर राखणे इ. सोपे आणि अमलात येण्याजोगे मार्ग सुरुवातीपासून ठासून सांगण्यात आले. पण जसजसा प्रादुर्भाव वाढू लागला तसतसे मानवी मन अतार्किक विचारांच्या कच्छपी लागून भीतीने व्यापले जाण्याला सुरुवात होते. मग माहितीची शहानिशा न करताच आपण हळूहळू भयग्रस्त होतो. अशावेळी नको तितकी काळजी घेण्याकडे साहजिकच कल वाढतो. खातो त्या अन्नावर, हाती येणाऱ्या वृत्तपत्रावर, आणि पाळीव प्राण्यांवरही मन शंका घ्यायला सुरुवात करते.

३) कंटाळा आणि हताश होणे – हा एक सर्वसामान्य भावनिक प्रतिसाद असतो. सामाजिक बंधांवर नियंत्रण (भेटी गाठी नाही, समारंभ नाही, चित्रपट किंवा नाटक अशी एकत्र, समूहाची करमणूक नाही, दूरदर्शनवरील मालिकांच्या जुन्या व बघितलेल्याच भागांचे प्रक्षेपण), ओसाड रस्ते, बागा किंवा सहलींवर निर्बंध आणि कायम घरात स्थानबद्ध या सगळ्या गोष्टी लवकरच कंटाळ्याला निमंत्रण देतात. याच्याशी लढा देता येतो, पण जसजसा कालावधी वाढत जातो, अनिश्चितता वाढत जाते तसतसे नकळत हताश व्हायला होते. हालचालींवर बंधने, जीवनशैली आक्रसलेली मग भावनांचा निचरा कसा होणार? शासनाकडे अथवा प्रशासनाकडेही याची ठाम उत्तरे नाहीत.

४) मूलभूत गरजा आणि अंदाधुंद खरेदी – मॅस्लो ची मूलभूत गरजांची एक प्रसिद्ध संकल्पना आहे. पण मन त्या पिरॅमिडच्या पायऱ्यांनी चढत वर जात नाही. अशा महामारीच्या काळात मनोवस्था इतकी नाजूक झालेली असते की आवेगी खरेदीकडे, मागचा -पुढचा विचार न करता झपाट्याने काहीतरी विकत घेण्याकडे (मग त्याची गरज असो वा नसो) कल वाढतो. एखादी गोष्ट अपुरी पडली तर, संपली तर, बाजारात तिचा पुरवठा थांबला तर अशा विचारांनी मेंदू मग अनावश्यक बिस्किटे घ्या, भाजीचा साठा करून ठेवा अशा सूचना द्यायला सुरुवात करतो. दुकानदाराने कितीही समजावले तरी मन ऐकत नाही.

५) अविश्वास – सतत आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवले जाते आहे, आपल्याला आवश्यक ती माहिती दिली जात नाही, संसर्गाचे योग्य ते चित्र संबंधितांकडून मिळत नाही अशी मनाची ठेवण व्हायला सुरुवात होते. सरकारी अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील अग्रगण्य, राजकारणी आणि इतर अधिकृत स्रोतांवरचा विश्वास उडायला सुरुवात होते. त्यांत समाज माध्यमांवर नको तितके विसंबून राहण्याची सवय जडल्याने, तेथील सगळंच पटायला लागतं. अशा ठिकाणांवरून मिळालेल्या माहितीची ना खातरजमा केली जात ना ती तपासून बघितली जात! डोळे मिटून विश्वास ठेवायची प्रवृत्ती बस्तान बसवते. स्व घोषित तज्ञ अधिक गोंधळ उडवितात. चुकीची अथवा अर्धवट माहिती अधिक धोकेदायक असते, त्यांवर विसंबून राहणे त्याहून धोक्याचे!  एका क्षणानंतर विश्वास उडून जातो. हेही स्वाभाविक आहे. वर उल्लेखलेल्या २००३ च्या सार्स प्रादुर्भावात असे निदर्शनास आले होते की विविध यंत्रणांचा आपापसात समन्वय नाही, काहीवेळी परस्परविरोधी माहिती देण्यात आली होती, मग साहजिकच विश्वासाचा प्रश्न येतो. इथे तर एका अज्ञात विषाणूशी पहिल्यांदाच सामना करायचा आहे, त्याच्याबद्दल अधिकृत माहितीचा (लक्षणे, प्रतिबंधात्मक औषधोपचार) अभाव आहे, अशावेळी साहजिकच तज्ञ ताज्या अनुभवांवर आधारित आणि आवश्यक तितकीच माहिती सादर करतात. मग अफवांना ऊत येतो, कोणाचेही वाक्य संदर्भाविना प्रसारित केले जाते (अशावेळी शहानिशा होतेच असे नाही), त्याचा शेंडा – बुडखा बघितला जात नाही. मग कट -कारस्थानांच्या विचारसरणी मांडल्या जातात, त्यावर विश्वास ठेवला जावा अशी अपेक्षा केली जाते. हे सारंच मदत करण्याऐवजी वाटेतील अडथळा बनतं.

६) मानसिक अनारोग्य आणि सह रुग्णता (को -मॉर्बिडीटी) – आधीपासून मानसिक आरोग्याच्या समस्या असलेल्यांचा उल्लेख वर आलेला आहे. त्यांना शक्यतो एकटे ठेवू नये, सतत कोणीतरी आसपास असलेले बरे अन्यथा त्यांच्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता असते. त्यांना शारीरिक आणि मानसिक आधाराची गरज असते. तसेच ज्यांना आधीचे काही आजार असतील (मधुमेह, रक्तदाब इ.) – याला सह रुग्णता म्हणतात. त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.

७) (अत्यंत वाईट शत्रू) नकारात्मक विचार – कोरोनाचा सगळ्यात वाईट आणि स्वाभाविक परिणाम म्हणजे मनात उगवणारे नकारात्मक विचार! हे बरेचसे निरीक्षणातून, बाह्य परिणामांमधून वस्तीला आलेले असतात. “मन चिंती ते वैरी ना चिंती” अशी आपल्याकडे म्हण आहेच. हे सर्वसामान्यांच्या बाबतीत अपरिहार्य असते. या विचारांमध्ये भीती बरोबरच, खूप काहीतरी वाईट होईलच अशा संभावना असतात. उदा. – माझे जवळचे कोणीतरी या आजाराला बळी पडेल, माझी नोकरी जाईल, अर्थव्यवस्था कोलमडेल, मलाच संसर्ग होईल.

यातून लवकरात लवकर बाहेर निघणे अत्यावश्यक असते अन्यथा खाईत पडण्याला निमंत्रण देण्यासारखे असते.

या विचारसरणीमुळे मदत तर होत नाहीच, पण मन गोंधळात पडते आणि त्याचे खच्चीकरण होऊ शकते. म्हणूनच स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि त्याहीपेक्षा मानस शास्त्रीय दृष्ट्या सक्षम राहणे हेच आपल्या हाती असते.

संकटकाळी शांत राहणे, नातेबंध बळकट करणे आणि आपण सगळे या घडीला एकत्र राहणे हेच जास्त श्रेयस्कर!

वरील विवेचनावरून कोरोनाने घातलेला धुमाकूळ आणि दिलेला इशारा यांचे गांभीर्य पुरेसे लक्षात येईल. आता आलेल्या या परिस्थितीला तोंड देण्यासाठी व्यक्तिगत आणि कुटुंब स्तरावर काय करता येईल हे बघणे उचित ठरेल.

कोरोना उद्रेकाने आपले डोळे उघडणारे धडे दिलेले आहेत, एवढे नक्की. स्वतःचा स्वभाव आणि कृती यांचा नव्याने आराखडा आखण्याची सूचना (धमकी शब्द अधिक संयुक्तिक ठरला असता पण तो टाळलेला बरा) दिलेली आहे. चुकांची पुनरावृत्ती टाळणे, दुसऱ्यांप्रती अधिक करुणा, अधिक प्रेम, अधिक काळजी घेणे आता बंधनकारक झालं आहे. मागील शतकातील १९१८ चा स्पॅनिश फ्लू, दोन जागतिक महायुद्धे हे सारेच आपल्यासाठी संदेश होते. हिंसा आणि नैसर्गिक आपत्ती यांच्या आघातांनी मानवजातच नव्हे तर निसर्गही डळमळीत होतो याचे पुरेसे अनुभव आपल्या गाठीला आहेत. दरवेळी आपण सुधारण्याच्या आणाभाका घेतो पण “ये रे माझ्या मागल्या ” सारख्या चक्रात गुरफटतो. ही घडी वेगळी आहे म्हणून आमचे संकल्पही वेगळे आहेत याचा पुनरुच्चार आताच केलेला बरा, कारण दरवेळी संधी मिळेलच असे नाही.

श्रद्धा आणि प्रार्थना या दोन अध्यात्मिक आयुधांनी आपण याही परिस्थितीतून तरून जाऊ शकू. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्या सर्वांमध्ये अमर्याद क्षमता आहेत, त्या सुप्तावस्थेतील उर्जेला जाग आणणे फक्त बाकी आहे आणि ते आपल्याच हाती असते.

आंतरिक सामंजस्याला भावबळ देणे म्हणजे प्रार्थना! प्रामाणिक प्रार्थना जगण्याला शांत करते. प्रार्थनेने आतले कोलाहल स्थिरावतात. प्रार्थना म्हणजे काही ऐहिक मागणे नसून, आपल्याजवळ जे आहे त्याची ती कृतज्ञ नोंद असते. श्रद्धा मनाशी असहकार पुकारते. मनाच्या सूचनांविरुद्ध जाऊन, त्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करायला शिकवते. कोरोना दरम्यानच्या काळात झालेल्या आघातांनी विदीर्ण झालेल्या मनोधैर्याला श्रद्धा पुनःस्थापित करते. पडलेल्या अनेक अनुत्तरित प्रश्नांकडे बघायला नवी, खंबीर नजर देते. आपण जगायला का आलो आहोत या प्रश्नाचा सामना कसा करायचा आणि जीवनाचा सर्वोत्कृष्ट बिंदू कसा शोधायचा याची सांगड श्रद्धा घालते.  कोरोनाची शिकवण आपल्यासमवेत दीर्घकालीन राहावी असे वाटत असेल तर खालील गोष्टी पाळणे इष्ट-

१) आपण जे करतोय त्यात आनंद शोधावा.

२) आयुष्य म्हणजे भावनांचे नियमन!

३) इतरांशी अवाजवी तुलना करून स्वतःच्या ध्येयापासून दूर न जाणे

४) सर्वांशी समत्व भाव ठेवणे म्हणजे गंड किंवा खंत राहणार नाही.

५) ज्ञान आणि कृतीमध्ये समन्वय साधणे. कोणालाही वरचढ होऊ न देणे

६) कर्तव्यापासून पलायन न करणे

७) वैश्विक कायदेकानून पाळणे आणि त्यावर श्रद्धा ठेवणे. निसर्ग आपल्यापेक्षा अधिक “शहाणा” आहे हे मान्य करून त्यावर कुरघोडी न करणे

८) आपल्या स्थिर आत्म्याशी अनुसंधान बांधता यावे म्हणून ध्यान साधना करणे

९) प्रयत्न आणि कष्ट यांच्या सामंजस्यातून उमलणाऱ्या अंतःस्फूर्तीवर विसंबून राहणे.

या महामारीने मानवाला स्वनियमनाचे महत्व समजावले आहे, किमान गरजांसमवेत जगता येते याचे प्रत्यंतर आणून दिले आहे, आयुष्यात कशाला महत्व द्यायचे, याचे मार्गदर्शन कदाचित या निमित्ताने मिळाले आहे. भविष्याच्या पेटाऱ्यात काय आहे, माहित नाही. दिवाळीनंतर दुसऱ्या लाटेची वदंता आहे, २०२१ मध्ये लस आपल्या वाट्याला येणार आहे. सध्याच्या अनुभवाच्या गाठोड्याच्या आधारे आपण तरून जाऊ. आत्ता, याक्षणी आपण आसपासच्या पीडितांना शक्य ती मदत देऊन उभे करू या.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..