नवीन लेखन...

द्विशतक महोत्सव

एव्हाना मी दोनशे कार्यक्रमाच्या जवळ पोहोचलो होतो. दोनशेव्या जाहीर पोस्ट केली. मुक्काम कार्यक्रमाची आखणी आम्ही जोरात सुरू एक हजारच्या वाटेवरचा पुढचा मैलाचा दगड जवळ आला होता. या प्रोजेक्टची आखणी करीत असतानाचे भाऊंचे शब्द आठवले. ‘या हजार कार्यक्रमांसाठी बराच मोठा कालावधी लागेल. आज तुझ्याबरोबर आहेत ती माणसे कदाचित एवढा काळ असणार नाहीत.’ आज दोनशेव्या कार्यक्रमाच्या आखणीच्या वेळीच बरोबर भाऊ नव्हते. इतकेच काय पण प्रियांकाही नव्हती. कारण शर्वरी फारच लहान होती. या कार्यक्रमाच्या आयोजनात माझी काकू दीपा जोशी आणि माझा जवळचा मित्र महेश वर्दे, तसेच माझा चुलतभाऊ नितीन जोशी यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले. आमचे स्वर-मंचचे वादक कलाकार मित्र होतेच. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री श्री. जावेद खान यांना कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. जावेद खान माझ्या गझलचे चाहते होते. त्यांनी आनंदाने या कार्यक्रमासाठी ठाण्याला येण्याचे मान्य केले. अनेक मान्यवर कलाकार आणि विविध पक्षांचे राजकीय नेते कार्यक्रमासाठी येणार होते.

माननीय मंत्रीमहोदय येणार असल्याने पोलिस बंदोबस्तापासूनच सर्व जय्यत तयारी आम्ही केली. प्रत्येक माणसाप्रमाणेच प्रत्येक कार्यक्रम स्वतःचे नशीब घेऊन येतो. आपण कितीही तयारी आणि प्रयत्न केले तरी कार्यक्रमाच्या दिवशी काय घडणार ही डोर नेहमीच ‘उपरवालेके हाथ में’ असते, याचा एक वस्तुपाठच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला मिळाला. ठाणे जिल्ह्याचे शिवसेनाप्रमुख श्री. आनंद दिघे यांनी मला बोलावून घेतले आणि स्पष्टपणे सांगितले की, एका राजकीय वादामुळे गृहनिर्माण मंत्री श्री. जावेद खान यांना आम्ही ठाणे शहरात प्रवेश करू देणार नाही. त्यांनी मला समजावले की त्यांचा विरोध माझ्या कार्यक्रमाला नाही, पण कार्यक्रमाच्या अध्यक्षांना आहे. मी काळजीत पडलो. माझ्या अडचणी वाढतच गेल्या. ९ जानेवारी १९९३ हा कार्यक्रमाचा दिवस उजाडला आणि मुंबईत मोठे बॉम्बस्फोट आणि दंगे सुरू झाले. सर्व प्रकारची वाहतूक बंद झाली. त्यामुळे मंत्री जावेदखान आणि इतर कोणीही कलाकार कार्यक्रमाला येऊ शकत नाही, असा फोन करू लागले. सुदैवाने ठाण्यात काही गडबड नव्हती. वाईटातून चांगले हे घडले की संपूर्ण दिवस या तणावपूर्ण वातावरणामुळे ठाणेकर कंटाळून गेले होते. त्यांना मनोरंजनाची आवश्यकताच होती. त्यामुळे कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांची भरपूर उपस्थिती लाभली. तसेच डॉ. वा.ना. बेडेकर, आमदार वसंतराव डावखरे, महापौर अशोक राऊळ, शिवसेनानेते प्रकाश परांजपे, विनोदी लेखक वि. आ. बुवा, शशिकांत कोनकर इत्यादी मान्यवरांच्या साक्षीने माझा द्विशतक महोत्सवी कार्यक्रम संपन्न झाला. गेले अनेक दिवस आयोजनाची मेहनत आणि तणावपूर्ण वातावरणात गेल्यामुळे आम्ही सगळेच थकून गेलो होतो. त्यामुळे पुढील काही दिवस पूर्ण विश्रांती घेतली.

त्या सुमारास पुरस्कृत जाहीर कार्यक्रमांचा जमाना सुरू होत होता. काही कंपन्या आपल्या जाहिरातीसाठी किंवा व्यावसायिक फायद्यासाठी काही जाहीर कार्यक्रम करू लागल्या. कलाकारांचे मानधन कंपनी देत असे आणि रसिकांसाठी हे कार्यक्रम विनामूल्य असत. अर्थातच सुरुवातीला प्रथितयश कलाकारांचेच कार्यक्रम या प्रकारात होत असत. दोनशे जाहीर कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर आपणही या क्षेत्रात प्रयत्न करावे असे मला वाटू लागले. माझा आत्तापर्यंतचा अनुभव होता की, आपण शंभर टक्के प्रयत्न केल्यानंतर आपल्याला निश्चित यश मिळते. फक्त ते किती टक्के आणि किती लवकर हे नशिबावर अवलंबून असते. बरेच प्रयत्न केल्यानंतर माझा मित्र महेश वर्दे याच्या मदतीने गॉडफ्रे फिलीप्सच्या अधिकाऱ्यांबरोबर काही मिटींग्ज झाल्या. याच कंपनीच्या श्री. बेंद्रे या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. गॉडफ्रे फिलीप्स आणि सुमन मॉटेल्स यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे दोन कार्यक्रम मला मिळाले. यातील पहिल्या गझलचा कार्यक्रम सुमन मॉटेल्स, खोपोली येथे सादर केला. दुसरा कायर्यक्रम सुमन मॉटेल्स पाचगणी येथे झाला.

एव्हाना कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम सुरू केल्यानंतर दोन वर्षे पूर्ण होत आली होती. गेली दोन वर्षे मी फक्त कंपनी चालवली नव्हती, तर तिचे कामही वाढवले होते. लिक्वीड सोपबरोबरच रंगनिर्मितीत मदत करणारी काही रसायने आम्ही बनवायला लागलो. त्यासाठी बरीच मागणी येऊ शकेल, असा माझा अंदाज होता. संपूर्ण भारतभर हिंडून अनेक रंग कंपन्यांपर्यंत मी पोहोचलो. माझा अंदाज खरा ठरला. आमचा व्यापार अनेक पटींनी वाढला. त्यामुळे कंपनीचे कामगार व कर्मचारी वाढले. एकूणच कंपनीचा व्याप वाढला. माझा संपूर्ण दिवस ऑफिसातच जाऊ लागला. मिळणारे वाढीव पैसे मी शेअर मार्केट आणि रिअल इस्टेटमध्ये नियमितपणे इन्व्हेस्ट करत होतो. सगळे छान चालले होते. पण आता कंपनी, गुंतवणूक आणि गाण्याचे कार्यक्रम अशा तीन आघाड्यांवर मला लढावे लागत होते. कामाचा ताण बराच असायचा, पण मी सगळे झेपवत होतो. ते वयच असे असते, की कितीही जबाबदाऱ्या तुम्ही मनाच्या हिंमतीवर पेलवू शकता. या काळात केवळ पाच तासांच्या झोपेवर मी काही वर्षे काम केले. कारण मला पक्के ठाऊक होते, की मुक्काम पोस्ट एक हजार प्रोजेक्टसाठी मला मोकळा वेळ आणि पैसा नंतरच्या काळात हवा आहे. त्याची तजवीज या काही वर्षात होणार होती. एक मात्र झाले की, त्या काळात कार्यक्रमांची संख्या थोडी कमी झाली. पण नंतर होणाऱ्या मोठ्या फायद्यासाठी थोडे फार नुकसान सहन करावे लागतेच. दुसरा महत्त्वाचा भाग असा होता की, १९७८ पासून सुरू झालेली हिंदी-ऊर्दू गझलची लाट आता उतरणीला लागली होती. गझलच्या कार्यक्रमांची संख्या कमी होत होती. मराठी चित्रपटांची संख्या कमी होत होती. त्यामुळे गाणीही कमी रेकॉर्ड होत होती. कारण चित्रपट व्यवसायावर टीव्ही चॅनल्सने आक्रमण सुरू केले होते. त्यामुळे गाणीही कमी रेकॉर्ड होत होती. पण… टीव्ही चॅनल्स फार वाढलेले नव्हते. त्यामुळे तिथेही फार काम नव्हते. मी फक्त व्यावसायिक गायक असतो तर तो काळ थोडा कठीण होता. सुदैवाने माझ्याकडे कंपनी व इन्व्हेस्टमेंटस् असल्यामुळे मला व्यावसायिक काळजी नव्हती. पण कलाकार म्हणून मात्र एक हजार कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी बरेच जास्त कष्ट करावे लागणार होते.

-अनिरुद्ध जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..