नवीन लेखन...

नाटककार स. पां. जोशी

ठाणे रंगयात्रामधील डॉ. सुधीर मोंडकर यांचा लेख.


शिक्षक, मुद्रक, पत्रकार, कवी, नाटककार, संस्थापक, समाजसेवक, प्रचारक असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून मुंबईकर, ठाणेकर गेली आठ दशके स. पां. जोशी यांना ओळखत होते. त्यांची जन्मभूमी कुलाबा (आता ‘रायगड’) जिल्हा. प्राथमिक शिक्षण तेथे झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला आले. तेथे आचार्य अत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली एस्.टी.सी. झाल्यावर ‘कोकण शिक्षण संस्थेच्या’ पनवेलमधील मुद्रण तंत्रज्ञान अभ्यासक्रमाची धुरा स्वतच्या खांद्यावर घेतली. तेथे मुद्रणकलेत पारंगत होत इतरांना ती शिकवली. 1937 च्या सुमारास ठाण्यात समर्थ मुद्रणालयामध्ये काम करत असतानाच, तेथील मो. ह. विद्यालयात ‘मुद्रण तंत्रज्ञान’ हा विषय ते शाळकरी मुलांना शिकवू लागले. पुढे याच शाळेच्या खुल्या नाट्यगृहात आपल्या मराठी नाटकांचे प्रयोग होणार आहेत याची सपांना कल्पना नसेल. ‘सन्मित्र’ दैनिकांचे संपादक म्हणून सपांची ओळख ठाणेकरांना होण्यास 1949 साल उजाडावे लागले. त्यावर्षी सपांचा ‘भाऊबीज’ काव्यसंग्रह प्रकाशित झाला.

1950 साली सानेगुरुजींच्या निधनानंतर, सानेगुरुजी स्मारकाच्या हालचाली सुरू झाल्या. त्यावेळी सपांमधील नाटककार जागा झाला. गुरुजींच्या ‘आंतरभारती’ संकल्पनेवर आधारित ‘जीवनकला’ या सपांनी लिहिलेल्या नाटकाचा प्रथम प्रयोग डोंबिवलीच्या स. पां. जोशी विद्यालयाच्या प्रांगणात 9 जानेवारी 1951 रोजी झाला. याच नाटकाचा दुसरा प्रयोग 11 फेब्रुवारी 1951 रोजी झाला. त्यावेळी ‘नवशक्तिकार’ प्रभाकर पाध्ये यांच्या हस्ते नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या नाटकास आचार्य अत्र्यांची प्रस्तावना लाभली होती. शं. दि. डोंगरे कृत हिंदी अनुवादाचे प्रकाशन ऑक्टोबर 1951 मध्ये झाले.

ध्येयवादी पत्रकाराच्या जीवनावर आधारित ‘संदेश’ हे सपांचे दुसरे नाटक. मराठी पत्रकार परिषदेच्या कोल्हापूर येथील 12व्या अधिवेशनाचे अध्यक्ष प्रभाकर पाध्ये यांच्या हस्ते सपांच्या याही नाटकाचे प्रकाशन झाले. या संगीत नाटकास पत्रकार श्री. शं. नवरे यांची प्रस्तावना लाभली होती. या नाटकाचा प्रथम प्रयोग न्यू हायस्कूल, कल्याण या शाळेच्या विद्यार्थ्यांनी केला. या नाटकाचा व्यावसायिक प्रयोग 15 जून 1952 रोजी दादरच्या छबिलदास शाळेच्या सभागृहात अच्युतराव कोल्हटकर स्मृतिदिनी अनंत हरी गद्रे यांच्या उपस्थितीत झाला. या प्रयोगास अनंत काणेकर, अप्पा पेंडसे, वि. कृ. जोशी, के. गो. अक्षीकर, द. वि. सोमण, स. वि. कुळकर्णी, शिवराम जोशी अशा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. बाळ माटे यांचे संगीत दिग्दर्शन लाभलेल्या या प्रयोगात पद्मा कोरगावकर, बबन गोखले, नाना भोर, मामा शेंडे, भागवत आदी कलाकारांनी काम केले होते. वि. रा. परांजपे यांनी दिग्दर्शित केलेला या नाटकाचा प्रयोग 1953 साली सादर झाला.

संगीत ‘कलाकार’ या चित्रकार दाम्पत्याच्या जीवनावर आधारित सपांच्या तिसऱ्या नाटकाचा प्रथम प्रयोग 26 मार्च 1954 रोजी ठाण्यात प्रगती मंडळाने कृषिप्रदर्शनात सादर केला गेला. मोरोपंत सहस्त्रबुद्धे दिग्दर्शित नाटकात त्यांच्यासोबत गोविंद केळकर, मोरोपंत जोशी, पद्मा कोरगावकर, आशा परांजपे हे कलाकार होते.

एप्रिल 1954 मध्ये झालेल्या 37व्या नाट्यसंमेलनातील ठरावानुसार ‘5 नोव्हेंबर’ 1954 मध्ये सपांच्या अध्यक्षतेखाली वि.रा. परांजपे यांच्या सहयोगाने ठाण्यात रंगभूमी दिन पहिल्यांदाच साजरा झाला.

1956च्या रंगभूमी दिनानिमित्ताने तीन दिवस नामहोत्सव ठाण्यात झाला. त्यात ‘ठाणे मराठी नाट्य संघाच्या’ प्रतिष्ठापनाचे सुतोवाच झाले. 23 जुलै 1956 रोजी टिळक जन्मशताब्दी निमित्ताने ‘संदेश’ नाटकाचा प्रयोग झाला. नाट्यसंघाची पहिली सभा सपांच्या अध्यक्षतेखाली झाली. 10 नोव्हेंबर 1956 रोजी झालेल्या नाट्यमहोत्सवात नटवर्य दत्तोपंत आंग्रे यांचा सत्कार झाला. पुढे याच नाट्यसंघाचे रुपांतर ‘मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखा’ यामध्ये 1 ऑक्टोबर 1959 रोजी झाला. म्हणजे ‘ठाणे मराठी नाट्यसंघ’ हा मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचा पूर्वज ठरला.

1982च्या सुमारास महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले या समाजसुधारक दाम्पत्याच्या जीवनावर आधारित ‘मायबाप’ नाटक लिहिण्यासाठी सपांनी लेखणी उचलली. या त्यांच्या चौथ्या नाटकाचा प्रथम प्रयोग 14 ऑगस्ट 1983 रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे झाला. सखाराम भावे दिग्दर्शित या नाटकात वसंत खरे (जोतिबा) व मंजिरी देव (सावित्रीबाई) यांच्या प्रधान भूमिका होत्या. त्यांच्या साथीला माधुरी भागवत, अरुण वैद्य, विलास भणगे, गजेंद्र गोडकर, हरिश्चंद्र राणे, सुधाकर केळकर, रमेश भिडे, हणमंत नलगे, सुधीर आठवले हे कलाकार होते. काही प्रयोगात ‘जोतिबाची’ भूमिका श्रीराम देव व गजेंद्र गोडकर तर ‘सावित्री’च्या भूमिकेत होत्या उमा आवटे पुजारी. 11 नोव्हेंबर 1984 रोजी हे नाटक पुस्तकरूपाने ‘महात्मा फुले स्मारक समिती’तर्फे प्रकाशित झाले. सदर प्रयोगास बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते. या नाटकाचा रौप्य महोत्सव झाल्यावर हे नाटक नभोवाणीवर सादर झाले. 21 फेब्रुवारी 1987 रोजी दूरदर्शनवरही सादर झाले.

1987 साली सपांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित ‘सिंहगर्जना’ हे नाटक लिहिले. या नाटकात श्रीराम देव, शशी जोशी, गोविंद केळकर, वसंत केळकर, प्रवीण जोशी, माधुरी भागवत हे कलाकार होते. रंगमंचीय प्रयोगानंतर 30 सप्टेंबर 1987 रोजी ‘सिंहगर्जना’चा प्रयोग दूरदर्शनवर सादर झाला.

तालमीच्या वेळी कलाकारांआधी हजर राहणे, वेशभूषा, केशभूषा, साधन-सामग्री यांच्यावर देखरेख करणे, कलावंतांच्या खाण्या-पिण्यासाठी जातीने लगबग करणे, यातून सपांचा साधेपणा व विलक्षण नाट्यप्रेम दिसले. स. पां. जोशींची ही नाट्य कारकीर्द ठाण्यातील नाट्यविश्वात सुमारे चार दशके व्यापून राहिली होती. तिचे स्मरण ठाण्यातील नाट्यसंमेलनासारख्या महत्त्वाच्या क्षणी मराठी नाट्यरसिकांना होणे स्वाभाविक आहे.

— डॉ. सुधीर मोंडकर – 9869575594

(साभार – ठाणे रंगयात्रा २०१६)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..