नवीन लेखन...

नाट्यनिर्माते संतोष कोचरेकर

संतोष कोचरेकर यांचा जन्म ५ एप्रिल १९५५ रोजी झाला.

संतोष कोचरेकर यांच्या नाट्यसृष्टीतील कारकीर्दीला गेल्या वर्षी पूर्ण झाली.

‘संतोष, कसेही कर आणि एक गाढव घेऊन ये’… वडिल नाना कोचरेकर (नारायण धर्माजी कोचरेकर) यांनी फर्मान सोडले. संतोष कोचरेकर यांनी आजुबाजूला खूप शोधाशोध केली आणि कसेबसे एका माणसाकडून गाढव भाड्याने मिळवले. नानांनी त्या गाढवाला बाशिंग बांधले, मुंडावळ्या बांधल्या. सोबत वाजंत्री घेतली. माइक संतोष यांच्या हातात होता. ‘आज रात्रौ थिएटरमध्ये बघायला या, गाढवाचं लग्न. आहेराचा दर ३ रुपये, २ रुपये’. मालवणमधील लोक टकामका पाहू लागले. युक्ती सफल झाली आणि संध्याकाळी नाटकाचा प्रयोग हाऊसफुल्ल झाला. ‘महाराष्ट्र रंगभूमी’ या संस्थेची मुहुर्तमेढ तिथे रोवली गेली. ही गोष्ट १९७०च्या दरम्यानची. तेव्हा शालेय विद्यार्थी असलेल्या संतोष कोचरेकर यांचे नाट्यक्षेत्रात पाऊल पडले ते तेव्हाच. नाट्यक्षेत्रातील छोटी-मोठी कामे करीत ते नाट्यनिर्माते बनले. नाना कोचरेकर तेव्हा काँट्रॅक्टने नाटकाचे शो घ्यायचे. संस्थेतर्फे नाटके सादर करताना नाना संतोष यांना मदतीला घ्यायचे. त्यामुळे नाटकाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते. उपरोल्लेखित प्रसंग आहे मालवणातील. तेव्हा नानांनी तिथे ‘गाढवाचे लग्न’चा शो लावला होता. पुढे १९७३ साली ‘श्यामची आई’ हे नाटक संस्थेने रंगभूमीवर आणले. त्यावेळी या नाटकाचे २०० हून अधिक प्रयोग झाले होते. नाटकाला चांगले बुकिंग झाले, तर संतोष कोचरेकर यांना त्यावेळी ५ रुपये नाइट मिळायची. ‘एकच प्याला’च्या एका प्रयोगात मास्टर दत्ताराम यांनी तळीरामाची भूमिका केली. तेव्हा त्यांना प्रॉम्टिंग करण्याचे काम संतोष यांनी केले होते. खुर्च्यांची व्यवस्था करण्यापासून प्रॉम्टिंगपर्यंत नानाविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या संतोष यांच्या रक्तात नाटक भिनत गेले. दादरच्या किंग जॉर्ज शाळेचे ते विद्यार्थी. जेमतेम एक वर्ष कॉलेजला गेल्यानंतर त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. नोकरी करायची नाही हे सुरुवातीलाच मनाशी पक्के केले होते. त्यामुळे अनेक छोटे-मोठे व्यवसाय त्यांनी करून पाहिले. १९७६ साली लालबागमध्ये पहिल्यांदा २४ फूट उंच गणेशमूर्ती आणण्यात आली होती. गणेशगल्लीमध्ये त्यांनी त्या गणपतीच्या फोटोंची विक्री केली. शहाळी विकणे, दिवाळीच्या सणाला कंदिल विकणे, टेम्पो चालविणे, केटरिंग असे अनेक व्यवसाय त्यांनी केले. पण, कोचरेकर यांचा जीव खऱ्या अर्थाने रमला तो रंगभूमीवरच. नाटकावर प्रचंड प्रेम असलेल्या कोचरेकर यांनी नाट्यनिर्मितीत नाव कमावले. वडिलांच्या नाटकांपासून नाट्यक्षेत्रात कार्यरत असल्याने त्यातल्या खाचाखोचा त्यांना ठाऊक झाल्या होत्या. त्यातून ते पुढे नाटकांचे व्यवस्थापन करू लागले. यशवंतराव चव्हाण सेंटरचे प्रमुख व्यवस्थापक विजय देसाई यांच्याकडे काम करायला त्यांनी सुरुवात केली. १९८० मध्ये ‘डबल गेम’ या नाटकाचे सहनिर्माता आणि व्यवस्थापन अशी दुहेरी जबाबदारी त्यांनी सांभाळली. भक्ती बर्वे, सुहास पळशीकर हे कलाकार या नाटकात प्रमुख भूमिकेत होते. या नाटकाचे सुमारे ३०० प्रयोग झाले. पुढे लेखिका-दिग्दर्शक सई परांजपे यांच्याशी त्यांची भेट झाली. ‘माझा खेळ मांडू दे’ या आपल्या नाटकासाठी सई यांनी व्यवस्थापक म्हणून संतोष कोचरेकरांची नेमणूक केली. त्यानंतर सई यांच्या ‘माझा खेळ…’, ‘धिकताम’, ‘पुन्हा शेजारी’चे दिल्लीमध्ये खूप काँट्रॅक्ट शो झाले. त्याचे संपूर्ण व्यवस्थापन कोचरेकर यांनी केले होते. हळूहळू नाट्यक्षेत्रात त्यांचा चांगला जम बसू लागला. पुढे विनय आपटे यांच्या ‘अफलातून’ नाटकाचे व्यवस्थापन संतोष कोचरेकर यांनी सांभाळले.

विनय आपटे यांची ‘गणरंग’ आणि महाराष्ट्र रंगभूमी या दोन्ही संस्थांनी मिळून अनेक नाटके रंगभूमीवर आणली. प्र.ल. मयेकरांचे ‘रानभूल’ हे त्यांचे पहिले नाटक. त्यावेळी एकदा सिनेमागृहांचा काही दिवस संप होता. पेपरमध्ये आलेली ही छोटी बातमी नेमकी संतोष यांनी वाचली. ती वाचल्यावर त्यांचे डोळे लकाकले. त्यांनी लगेचच मुंबईतील बहुतांश नाट्यगृहांच्या तारखांचे नाटकाच्या प्रयोगांसाठी बुकिंग करून टाकले आणि सर्व प्रयोग हाऊसफुल्ल झाले. ‘कुसम मनोहर लेले’, ‘अभिनेत्री’, ‘सवाल अंधाराचा’, ‘तुमचा मुलगा करतोय काय?’, ‘सत्ताधीश’ अशी एकापेक्षा एक दर्जेदार नाटके त्यांनी रंगभूमीवर आणली आणि त्यापैकी बहुतांश नाटकांनी ‘हाऊसफुल्ल’चे फलक मिरवले. ‘शुभ बोले तो नारायण’ ही कोचरेकर यांची पहिली स्वतंत्र नाट्यनिर्मिती. परंतु, त्यांच्या नाट्यकारकिर्दीत मैलाचा दगड ठरले ते ‘मिस्टर नामदेव म्हणे’ हे नाटक. मराठी माणसांच्या हक्कांविषयी बोलणाऱ्या, अजित भुरे दिग्दर्शित ‘मिस्टर नामदेव म्हणे’ला तुफान लोकप्रियता मिळाली. तेव्हा शिवसेनेत असलेल्या राज ठाकरे यांनी तब्बल ९ वेळा हे नाटक पाहिले होते. त्यावर्षी शिवसेनेच्या वर्धापनदिनी एका प्रसिद्ध नाटकाचा ठरलेला प्रयोग रद्द करून त्याऐवजी ‘मिस्टर नामदेव..’चा प्रयोग दणक्यात पार पडला. खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी कोचरेकर यांची पाठ थोपटली. या नाटकाचे सुमारे ३२५ हून अधिक प्रयोग झाले. कुणाकडूनही वित्तपुरवठा न घेता, स्वत:चे पैसे घालून निर्मिती करणारा नाट्यनिर्माता अशी कोचरेकर यांची नाट्यसृष्टीत ख्याती आहे. मयेकर आवडते लेखक असल्याने, कोचरेकर यांनी प्रामुख्याने त्यांची अधिकाधिक नाटके रंगभूमीवर आणली. ‘ती तिचा दादला आणि मधला’, ‘गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या’, ‘माझा बाप डोक्याला ताप’, ‘जास्वंदी’, ‘काय डेंजर वारा सुटलाय’, ‘कुसुम मनोहर लेले’ ही त्यांची नाटकेही यशस्वी ठरली.

हाडाचे कार्यकर्ते असलेल्या कोचरेकर यांनी नाट्यनिर्माता संघाचे कोषाध्यक्ष म्हणून सलग पाच वर्षे काम पाहिले. यशवंत नाट्यमंदिराचे काम निधीअभावी थांबले असताना कोचरेकर यांनी पुढाकार घेऊन नाट्यपरिषदेला निर्माता संघातर्फे २० लाखांची मदत तातडीने मिळवून दिली होती. नाटकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या संतोष कोचरेकर यांचा सुमारे २५ वर्षे अखिल भारतीय नाट्यपरिषदेशी घनिष्ठ संबंध होता.

— हर्षल मळेकर.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..