‘जिंदगी’ एक रेस है रफ्तार के सिवा कुछ नही. आपल्या सगळ्यांची जगण्याची ही एक पध्दतीच झाली आहे. आयुष्यभर या रेस बरोबर आपण धावतच असतो. आला दिवस गेला दिवस रुटीनच्या नावाने फक्त जगतच असतो. काही कारणांनी या रुटीनमध्ये जेव्हा खंड पडतो किंवा बदल होतो तेव्हा लक्षात येते की अरे त्या रेस बरोबर आपण धावत पळत कुठपर्यंत पुढे निघून आलो. असेच काही या सुट्टी संपवून शाळेसाठी बाहेर गावाहून घरी परत आलेल्या मुलांना पाहून वाटते. संध्याकाळी सोसायटीच्या गार्डन मध्ये कंटाळून एकटीच बसले होते. कधीतरी तरुण पिढी प्रमाणे आपल्यालाही स्पेसची जरूर वाटते ना. आजुबाजूला गंमत बघत होते. जून महिना संपत आला होता. खेळायला येणारी लहान मुले एकमेकांना भेटून खूष होत होती. त्यांच्याकडे बघून लक्षात येत होते की बरीचशी मुले सुट्या संपवून घरी परत आली असावीत आणि एकमेकांना खूप दिवसांनी भेटत असावीत. त्यांच्या हावभावावरुन असे जाणवत होते की यांना खेळण्यापेक्षा सुट्टीतल्या गंमती जमती परस्परांना शेअर करण्याचा उत्साह जास्त होता.
त्यांचा हा आनंद आणि उत्साह बघून नकळत स्वतःचे लहानपण आठवले. आपल्या मनाच्या वेगाला काही मर्यादा तर नसतेच. ते क्षणार्धात आपल्याला कुठल्या कुठे घेऊन पोहचते.
लहानपणी वार्षिक परीक्षा संपली की रिझल्टच्या ऐवजी सुट्टीकडेच लक्ष जास्त असायचे. आजी आजोबांकडे जाण्याची खूप घाई. त्यावेळेस आजी आजोबांचे घर म्हणजे एक मध्यवर्ती ठिकाण होते. सुट्टी लागली की सगळ्या मावश्या, मामा तिथे महिनाभर येणारच. तशीच परिस्थीती काकांकडे. मामाकडे तर पाच मावश्या आणि तीन मामा आणि सगळ्यांची मुले. भरपूर गोतावळा आणि वयाने ही सगळीजणे आम्ही आजुबाजूचीच होतो. त्यामुळे भरपूर गोंधळ, आरडा ओरडा, भांडणे, बाप रे भयंकर धुडगूस होता. आता सगळे आठवले की असे वाटते आपल्या आजी आजोबांनी हे सगळे कसे सहन केले असेल? त्यांना कधी स्पेसची जरुरी पडली नसेल का?
अलिकडेच चार पाच पाव्हणे मंडळी आली की आमची प्रथम स्पयंपाकवाली बाई शोधण्याची मोहिम सुरु होते. कामवाल्या बाईला ञास नको. पाणी कमी पडायला नको म्हणून डिस्पोजेबल भांडी घेऊन येतो. त्या काळी असा काहीही प्रकार नव्हता. घरात जमलेली सगळी मंडळी आपआपली कामे करायची. सगळ्या बायका मिळून स्वयंपाक करायच्या. त्यामुळे अतिशय चविष्ट पदार्थ खायला मिळत होते. सकाळचा नाश्ता तर कित्येक वेळा जुन्या वर्तमान पत्रांच्या कागदांवरही होत होता. प्रत्येक जण स्वतःला शक्य होईल ते काम आनंदाने करुन टाकायचा. मग सगळे मिळून कुठे बगीचात जाणे किंवा सर्कसला जाणे महिनाभरात एखादा सिनेमा तर नक्कीच. फारच गंमत होती.
सुट्टी संपत आली की फार वाईट वाटायचे. शाळा सुरू होणार त्या विचाराने मन थोडे दुःखी होत असे. पण बाबा खूप दिवसांनी भेटतील याचा आनंद पण असायचा. त्यांना काही आमच्या बरोबर सुट्टी मिळायची नाही.
मैत्रीणींना भेटण्याची पण तर उत्सकता होतीच ना. कदाचित त्या काळी आम्ही पण या लहान मुलांसारखेच एकमेकांना भेटत असणार. अशाच सुट्टीतील गमती जमती परस्परांशी शेअर करत असणार ते सगळे किती आनंददायी असेल हे मला त्या निरागस मुलांकडे बघून खरंच खूप जाणवले.
घरी आल्यावर शाळेची तयारी जोरदार सुरू. नवीन पुस्तके, नवीन वह्या, विकत आणण्याची खूप घाई. एकदा वह्या पुस्तके हातात आली की त्यांना कव्हर घालायची. त्यावर नाव लिहायची एकदम जोरदार प्रोग्रॅम होता. त्या काळी नव्या वह्या पुस्तकांना एक ठराविक असा उग्र वास यायचा.
‘सरस’ किंवा ‘गोंदा’ चा असावा बहुतेक. पण अजूनही तो वास आठवला की वाटते तो आजही आपल्या आजुबाजूला आहे. पण नवीन टेक्नॉलॉजी मध्ये तो ‘वास’ कुठेतरी ‘ हरवून’ गेला.
‘जून’ महिना म्हणजे नवीन वस्तु हक्काने मिळविण्याचा महिना. नवीन दप्तर, नवीन पाण्याचीच बाटली, नवीन डबा, नवीन बूट आणि जून महिना म्हणजे पावसाचे दिवस त्यामुळे नवीन रेनकोट नवीन वस्तूंची बहार असायची. दुकानातूनही प्रचंड गर्दी. धक्काबुक्कीत शिरुन स्वतःला आवडेल ती वस्तू मिळविणे काही सोपे काम नव्हते. पण त्याची ही एक वेगळीच मजा होती.
नवीन युनिफॉर्म हा तर वेळेवर मिळविणे म्हणजे फारच मोठे दिव्य होते. दरजी (शिंपी) लोकांची तर जणू ती दुसरी दिवाळीच. त्या काळी आतासारखी खूप अद्ययावत शिलाई मशीन्स तर नव्हतीच. तरीही ते दरजी लोक सगळ्या मुलांचे कपडे वेळेवर कसे देत होते हे तर त्यांनाच बिचाऱ्यांना माहित. त्या दरज्याचे तर सारे खानदान दिवस रात्र त्या दुकानांवर तुटून पडत असत. कोणी ‘हात – सिलाई’ करे तर कोणी ‘काज – बटण ‘ तर कोणी ‘इस्त्री’. आजही ते दृश्य डोळ्यांसमोर जसेच्या तसे उभे रहाते. पण त्या काळी या सगळ्याचा अर्थ समजण्या एवढी बुध्दीही नव्हती आणि वयही नव्हते. फक्त माझे कपडे वेळेवर पाहिजे. शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन युनिफॉर्म पाहिजे. एकदा मात्र तो शिवून हातात आला की शाळा सुरु होण्याची वाट बघत होतो.
मग तो शाळेचा पहिला दिवस. नवीन वर्ग, नवीन टीचर्स, नवीन विषय, काही नवीन मुलांचे चेहरे, त्यामध्ये सुध्दा खूप दिवसाने भेटणारे जुने मित्र मैत्रीणी. पहिल्या दिवशी तर हे सगळे बघण्यातच अर्धा दिवस निघून जायचा.
आनंद आणि उत्साह यांचे जोरदार प्रदर्शन असायचे. मग कोण कुठे बसणार? जुन्या मैत्रीणी सोबत बसायला जागा मिळावी आणि ती पण वर्गात पुढच्या बेंचवर असावी यासाठी होणारी ‘धडपड’, आणि सगळ्यात लाडका अतिशय ओळखीचा हवाहवासा वाटणारा शाळा सुटताना होणारा घंटानाद काय मजेशीर होते ते सगळे…आज शाळा सोडून कमीत कमी चाळीस वर्षे तर झालीच. शाळा संपली. कॉलेज सुरू झाले ते ही पूर्ण झाले. मग कोणी नोकरीला लागले कोणी आमच्यासारखे संसाराला लागले. मधल्या वर्षात मुलांच्या शाळा, त्यांच्या सुट्या तीच सगळी नवीन वस्तूंची खरेदी तेच सगळे रुटीन होते. पण कधीही हे सगळे आपले लहानपणाचे दिवस आठवण्याइतके सुंदर आहे असे जाणवले पण नाही.
आज निवांतपणाने बसले होते आणि अचानक ही मुले समोर आली आणि त्यांच्या गमती जमती बघता बघता नकळत जुन्या दिवसात निघून गेले आणि ते किती सुंदर आणि मजेशीर होते याची जाणीव झाली.
लहानपणीच्या या मृदु आणि कोमल आठवणी मनाच्या कुठल्या कोपऱ्यात इतकी वर्षे कशा दडून बसल्या असतील याचाच विचार करत बसले.
असे वाटत होते काही क्षण नुसतेच एकटे शांतपणे बसून परत त्या ‘लहानपणात’ जावे. कारण लहान होऊन शाळेत जाणे तर शक्य नाही मग या ‘आठवणी’ ही सही खरे तर आपण जेव्हा वयाच्या साठीला येतो तेव्हा आपल्याकडे आठवणीचे एक मोठे वजनदार पोटले तयार झालेले असते. यात जीवनातील कठोर सत्य सांगणाऱ्या गोष्टी जास्त असतात असेच मला नेहमी वाटत होते. पण आज कुठेतरी मनात अशी जाणीव झाली की तसेच काही नाही. आजवर चालत आलेल्या या जोरदार ‘रफ्तार’ असलेल्या रुटीन मध्येही शोधल्या तर अशा सुंदर सुंदर मनाला आनंद देणाऱ्या आठवणीही असतीलच. आपण त्या रुटीन मधले सौंदर्य शोधण्याऐवजी त्याला आयुष्याच्या रहाटगाडग्याचा एक भाग असे समजूनच जगत आलोय.
आहेत ना या सुट्टीच्या आणि शाळेच्या पहिल्या दिवसांच्या आठवणी सुंदर? आणि मला खात्री आहे की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात हे दिवस नक्कीच आले असतील.
आणि…..
या शाळेच्या पहिल्या दिवशी जर जोरदार पाऊस आला असेल आणि नवीन रेनकोट घरी विसरला असेल तर छत्री डोक्यावर धरून हातात रेनकोट घट्ट पकडून शाळेसमोर आपली वाट बघत असणारे आई बाबा ही कुठेतरी या आठवणींच्या पोटल्यात नक्कीच असतील.


Leave a Reply