नवीन लेखन...

समाजसेवा आणि भुतदया

थंडी खूपच पडली होती. संध्याकाळच्या वेळेस तर बाहेर पडणे शक्यच नव्हते. घरांतील बाहेरची कामे सकाळीच उरकून टाकण्याची आता सवयच झाली होती. गेले दोन महिने थंडीने कहरच केला होता. भाजी आणण्यासाठी सुद्धा उन्हाच्या वेळेत जाणे भाग पडत होते. एकतर अशा कडाक्याच्या थंडीत उन्हात चालायला मजा येते. दुपारच्या वेळेस तर रहदारीही कमी असते. त्यामुळे जरा आजूबाजूला नजर ही टाकता येते.

अलिकडे रस्त्यांची कामे चालू आहेत त्यामुळे रस्त्याच्या बाजूने रस्त्यावर काम करणारे मजूर लोक छोट्या प्लास्टीकच्या कापडाच्या झोपड्या बांधून रहात आहेत. दुपारची वेळ असल्यामुळे ज्या लोकांना कामावर जाणे शक्य नव्हते ते लोक म्हणजे वयस्कर मंडळी, आजारी माणसे, लहान मुले तिथेच होती. त्यांच्या झोपड्या लहान असल्यामुळे काही लोक फुटपाथवरच गप्पा मारीत बसले होते. तर काही मंडळी ‘हे विश्व ची माझे घर’ ह्या विचाराने ‘भूमि’ ची गादी आणि ‘नभा’ चे छप्पर करुन वामकुक्षी घेत होते. लहान – लहान शेंबडी मुले मातीन भरलेल्या हाता-पायांनी, कोणाची छाती उघडी तर कोणाची पाठ उघडी, जणू थंडी हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नसावा अशी इकडे तिकडे धावत खेळत होती. आजूबाजूला रस्त्यावर फिरणारी कुत्री आणि त्यांची पिल्ले, झोपडी बाहेर भांडे पडलेले दिसले कि त्यात तोंड टाकून काही खायला मिळते का याचा शोध घेत होती.

रस्त्यावर माझ्या सारखी चालणारी माणसे ही दिसत होती. मधून-मधून सायकल वर ट्यूशन साठी जाणारी मुले सुद्धा नजरेस पडत होती. एकंदरीत रस्त्यावर शांतता होती.

तेवढ्यात पाठीमागे ‘कर्कश’ ब्रेक लावून गाडी थांबल्याचा आवाज झाला. क्षणभर वाटले रस्त्यावर खेळणारे एखादे पोर गाडीखाली आले की काय? आम्ही रस्त्यावरून चालणारी सगळीच मंडळी सुद्धा पायांना ब्रेक लागल्यासारखे थांबलो.

तिन (३) मोठ्या महागड्या गाड्या एका पाठोपाठ एक येवून थांबल्या. पुढच्या गाडीतून काही तरणीताठी ‘जिम’ मध्ये जावून सशक्त, धष्टपुष्ठ अंगकाठी कमावलेली मुले पटापट उड्या मारीत उतरली. अगदी मागच्या गाडीतून नोकरवजा काही माणसे उतरली. आम्ही रस्त्यावरुन चालणारी माणसे, झोपड्यातील मागे पुढे पळणारी मुले आणि शांततेने वामकुक्षी घेणारी माणसे जागेवरच उभे राहून चकित नजरेने बघत होतो.

“ हा काय प्रकार आहे? ” रस्त्यावरच्या कुत्र्यांनी भुंकत भुंकत त्या लोकांच्या जवळपास जाण्याची हिंमत केली होती.

पुढच्या गाडीतली दोन मुले धावत धावत मधल्या गाडीजवळ गेली. गाडीचे दवाजे उघडून उभी राहिली. आतमधून महागड्या साड्या परिधान केलेल्या दोन तरुणी त्यांच्या साड्यांना गाडीच्या पत्र्याची थोडीशी सुद्धा धूळ लागणार नाही ह्याची पूर्ण दक्षता घेत हळूच उतरल्या. पुढच्या दरवाजातून एक प्रौढ स्त्री, संपूर्ण पांढरे केस, बेडौल शरीर पांढरी स्वच्छ सीफॉनची महागडी साडी, पायात चकाकणाऱ्या पण सपाट टाचेच्या चपला, एका तरुणाचा आधार घेत उतरली. अगदी मागच्या गाडीतून उतरलेल्या माणसाने धावत धावत येवून त्या बाईंना चालण्यासाठी ‘वॉकर’ आणला आणि त्या बाईंच्या पुढे ठेवला. आणि ती स्त्री त्या वॉकरच्या आणि नोकराच्या आधाराने फुटपाथवर चढून उभी राहिली.

तेवढ्या वेळात दोघा नोकरांनी गाडीच्या डिकीतून मोठी-मोठी तिन-चार पार्सल काढून फूटपाथवर ठेवली आणि पटापट पार्सल फोडली. त्यातून एक एक पिशवी काढून त्या प्रौढ स्त्रीच्या हातात देत होते. मग त्या बाई त्या दोन तरुणींच्या हातात देत होत्या आणि या तरुण स्त्रीया प्रत्येक झोपडी जवळ जावून तिथल्या लोकांना आणि मुलांना देत होत्या आणि ही माणसे आणि मुले त्या वस्तु हातात घेवून सवय असल्यासाराखी त्यांना नमस्कार करत होते. हे इतके पटापट होत होते की सहाजिकच काय प्रकार आहे हे कुतुहलाने बघणाऱ्यांची संख्या वाढत होती.

तेवढ्यात भुर्रकन एक मोटार सायकल आली. पाठीच्या सीटवर बसलेला माणूस उतरला. धावत धावत त्यांच्या जवळ गेला. ‘क्लिक क्लिक’ एका पाठोपाठ एक फोटो काढत सुटला. हा सगळा प्रकार असा घडत होता जणू त्याची ‘रिहर्सल’ (रंगीत तालीम) करुन तयारी केली असावी. हे सगळे इतके अनपेक्षीत आणि थोड्या वेळात घडले की आम्हा रस्त्यावरच्या माणसांच्या काय घडतय हे लक्षात येण्यापूर्वीच ते लोक आपले काम आटोपून जसे भरधाव आले होते तसेच भरधाव निघून ही गेले.

काही मुलांनी, माणसांनी पार्सल उघडून टाकली. त्यात छान-छान ‘ब्लॅकेंटस’ होती. ती ब्लॅकेंटस बघून त्या मुलांचे डोळे चमकायला लागले. थंडी तर खूप होतीच काहींनी तर स्वतःला त्यात गुरफटून घेतले. ते बघून मनात विचार आला की किती ‘दयावान’ लोक होती स्वतःकडे असले तरी परमार्थ करण्याची वृत्ती फारच कमी लोकांची असते.

तितक्यात बाजूला चालणारे कोणीतरी सगळयांना ऐकू जाईल इतक्या जोरात बोलले, “आपल्या देशांत लोकांना ‘दिखावा’ (Show) करायची सवयच असते.”

“काही उपयोग नाही ह्या लोकांना मदत करुन ” – दुसरे गृहस्थ.

“संध्याकाळी येवून बघा हीच ब्लॅकेंटस अर्ध्या किंमतीत विकतील. ”

– एक बाई म्हणाली “ते काय हो, उद्या पेपरात फोटो बघा तेवढ्या साठीच तर हे सगळे नाटक. ” अजून एक शेरा.

हे सगळे एकून एक तरुण मुलगा खूपच चिडला आणि म्हणाला, आमच्या हिंदूस्थानात कोणी चांगले काम केले तर त्याला चांगले म्हणणे सुद्धा लोकांना जमत नाही. अरे तुम्ही निदान त्यांच्या शेकोटीसाठी लाकडे देण्याचा तरी प्रयत्न करा. कुठल्याही कामाला वाईट म्हणणे सोपे आहे.”

तशी बाकीची मंडळी नाईलाजास्तव चुप झाली.

प्रत्येकाने आपला रस्ता चुपचाप पकडला आणि निघून गेले. मी घरी परत आले संध्याकाळी सगळी कामे आटोपली. तरी त्या लोकांचे बोलणे डोक्यातून जात नव्हते. संध्याकाळी एवढ्या थंडीत मुद्दाम त्या बाजूला फिरत फिरत गेलो. मला बघायचे होते खरेच “त्या ब्लॅकेंटसचे काय होते? ” “अर्ध्या किंमतीत विकले जाते कां? ”

चालता चालता ब्लॅकेंटस विकणारे तर कोणी दिसले नाही. पण जे दृष्य पाहिले त्याने मात्र मनांत विचारांचे काहूर माजवले. दोन लहान मुले ती ब्लॅकेंटस अंगावर घेवून झोपडी बाहेर झोपली होती. त्या मुलांना त्याच्या ‘उबी’ ची किती जाणीव होती हे माहिती नाही. पण त्यांना ती मनापासून आवडली असावीत. ती दोघे एकमेकाकडे बघून डोक्यावर ब्लॅकेंटस घेवून खेळत होती. एकदा डोक्यावर ओढून घ्यायची, मग त्यातून डोके बाहेर काढून एकमेकांकडे बघून खूप हसायची. परत डोक्यावर ओढून घ्यायची. खूप खूष होऊन खेळात रंगून गेली होती. त्यांच्या आजूबाजूला दोन – तीन कुत्र्याची पिल्ले घुटमळत होती. त्या मुलांनी अर्धवट खाऊन सोडलेले अन्न एका थाळीत पडले होते. त्याच थाळीत तोंड घालून त्या कुत्र्यांच्या पिल्लांनी ते खाल्ले. मग एक पिल्लू त्यांची ब्लॅकेटस आपल्या दातांनी ओढून स्वतःच्या अंगावर घेण्याचा प्रयत्न करत होते. जणू त्या मुलांच्या प्रत्येक गोष्टीत स्वतःचा Share घेण्याची त्या पिल्लांना सवयच असावी. पण ती दोनही मुले आपल्या खेळात इतकी मग्न होती की त्यांना ते पिल्लु त्यांची ब्लॅकेंटस त्यांच्या अंगावरून ओढून घेत आहेत याची जाणीव सुद्धा होत नव्हती.

शेवटी एक पिल्लाने जरा रडण्याचा ‘किरकिरा’ आवाज केला. तो आवाज एकून मात्र एक मुलगा ब्लॅकेंटमधून बाहेर आला. त्याने त्या कुत्र्याच्या पिल्लाला हातात धरले. आणि आपल्या बरोबर नविन कोऱ्या ब्लॅकेंटमध्ये गुंडाळून घेतले. आणि परत त्या मुलांचा खेळ चालू झाला. गंमत म्हणजे ते कुत्र्यांचे पिल्लू गुपचुप ब्लॅकेटच्या उबीत झोपून त्या मुलांकडे बघत होते. जसे काही त्या ‘मुलांचा खेळ’ आणि नविन ‘ब्लॅकेंटची उब’ ह्याची ते पिल्लु खुप मजा घेत होते.

बराच वेळ आम्हीही त्यांच्या ह्या खेळाची मजा घेत होतो. आणि विसरूनच गेले होते की, “अरे, मी तर इथे ब्लॅकेंटसची विक्री बघायला आले होते. परत एक नजर रस्त्यावर फिरवली. पण कुठेही अर्ध्या किंमतीत ब्लॅकेंट विकताना कोणीही नजरेस पडले नाही. कुतुहल मात्र एका गोष्टीचे जरुर वाटत होते. त्या लहान मुलाने त्या पिल्लाच्या रडणाऱ्या किरकिऱ्या आवाजावरुन त्या पिल्लाला ब्लॅकेंट ची ‘उब’ हवी आहे. हे कसे ओळखले होते आणि ते ब्लॅकेंट नविन आहे, ते पिल्लु खराब करेल असा कसलाही विचार न करता त्याने ते पिल्लाला उचलून घेवून आपल्या बरोबर ब्लॅकेंट मध्ये घेवून झोपला होता. एखादया मुक्या प्राण्याचे मन इतक्या लहान वयात समजणे काही साधी गोष्ट नव्हती.

आम्हाला थंडीत उघड्या खेळणाऱ्या मुलांना बघून त्यांना गरम कपड्यांची गरज आहे हे समजले नाही. आणि कोणी तरी असे गरम कपडे मागितले असते. तर कदाचित बहुतांशी लोकांनी त्याल ‘भिकारी’ म्हटले असते. आणि जुने वस्त्र देण्याचे सुद्धा कष्ट घेतले नसते.

त्या ही पेक्षा कहर होता ज्यांनी त्यांना गरम वस्त्र देण्याचा प्रयास केला होता त्यांची आम्ही ‘थट्टा उडवली होती. अशा विचित्र मनुष्य स्वभावाचीच खर तर लाज वाटत होती.

लाजेने मान खाली घालून निघून परत फिरलो पण नकळत माझी नजर आजुबाजुला एखादा मोटार सायकल वरच्या फोटोग्राफर ला शोधत होती. जर तो दिसला असता तर त्याला जरूर सांगितले असते, “अरे सकाळी ‘समाजसेवेचा’ फोटो काढलास आता ‘भुतदयेचा’ पण एक फोटो काढ.

पण तो काही दिसला नाही. आणि दिसणार ही नव्हता कारण सकाळी त्याल कोणी बोलाविले होते. आत्ता कोण बोलवणार होते?

मीच आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे दृष्य टिपण्याचा प्रयत्न केला. ते करतांना बघूनही बाजूने जाणारी माणसे माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होती. त्यांच्या नजरेत ” काय वेडी बाई आहे इथे कसला फोटो काढत असेल? ” असा भाव नक्कीच होता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..