नवीन लेखन...

दोन घडीचा डाव

पक्षाघाताने त्रस्त झालेल्या एका वृद्धाला कोलकत्यातील एक व्यावसायिक, प्रदीप कुंडलियाने पाहिले.. त्याने रामायण रोडवरील, आपल्या जनक बिल्डिंगमधील एका फ्लॅटमध्ये त्याची रहाण्याची व्यवस्था केली. त्या वृद्धाच्या सेवेसाठी, सागर चौधरी नावाच्या तरुण मुलाची नेमणूक केली. ही गोष्ट आहे २००० मधली.. २००१ साली त्या वृद्धाचे निधन झाले.. आज त्या घटनेला एकवीस वर्षे होऊन गेली.. तरीदेखील अजूनही ज्याचं लग्न झालेलं नाही तो, सागर चौधरी आपल्या पित्यासमान त्या वृद्धाचा, दरवर्षी ४ जानेवारीला थाटामाटात वाढदिवस साजरा करतो आहे.. तो वृद्ध म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून, एकेकाळी राजा, महाराजा, राजकुमार व नवाबाची भूमिका साकारणारे प्रदीप कुमार होते!!

४ जानेवारी १९२५ साली, शीतल बटावली उर्फ प्रदीप कुमार यांचा कोलकता येथे जन्म झाला. त्यांना लहानपणापासूनच अभिनेता होण्याची महत्त्वाकांक्षा होती. नाटकांमधून काम करताना त्यांना निर्माते, देवकी बोस यांनी पाहिलं. त्यांना पहिला चित्रपट मिळाला, तो ‘अलखनंदा’.. हा चित्रपट काही यशस्वी झाला नाही.. दुसरा चित्रपट, ‘भल्ली नाय’ हा मात्र रौप्यमहोत्सवी झाला..

वयाच्या तेविसाव्या वर्षी, प्रदीप कुमार यांनी मुंबई गाठली व कॅमेरामनचे सहायक म्हणून ते काम करु लागले. ४९ ते ५२ या चार वर्षांत उर्दु व हिंदी भाषेवर त्यांनी प्रभुत्व मिळविले. १९५२ साली त्यांचा ‘आनंदमठ’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला व हिंदी चित्रपटसृष्टीला, एक देखणा नायक मिळाला!!

एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्त्व राजकुमार, राजा किंवा नवाबाच्या भूमिकेला तंतोतंत जुळावं, हे फक्त प्रदीप कुमार यांच्याच बाबतीत शक्य झालं. त्यांनी नायकाच्या, वीस वर्षांच्या कारकिर्दीत आठ चित्रपट मीना कुमारी व सात चित्रपट मधुबाला सोबत केलेले आहेत.. याशिवाय बीना राय, नर्गिस, आशा पारेख, वैजयंती माला अशा अनेक नायिकाही होत्याच.

‘अनारकली’ या चित्रपटातील ‘ये जिंदगी उसीकी है…’ या सुमधुर गीताने लताला अजरामर केलेले आहे.. वैजयंती माला सोबतचा ‘नागिन’ चित्रपट, त्याकाळी गीतांसाठी गाजला.. त्यातील शेवटची दोन रिळं, ही रंगीत होती. ‘जागते रहो’ मधील प्रदीप कुमार यांची भूमिका लक्षवेधी होती. ‘घुंघट’ या चित्रपटात त्यांच्यासारखेच ‘लकी’ असलेले, भारत भूषण सोबत होते. ‘ताजमहल’ हा बीना राय सोबतचा चित्रपट त्यातील सुमधुर गीतांइतकाच, अप्रतिम होता. १९४१ साली प्रदर्शित झालेल्या ‘चित्रलेखा’चा रिमेक १९६४ साली झाला. हा चित्रपट भव्य सेट्स व मातब्बर कलाकारांमुळे नेत्रदीपक ठरला. नर्गिस सोबतचा ‘रात और दिन’ हा नायक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी चरित्र अभिनेत्याच्या भूमिका केल्या..

सफेद झूठ, खट्टा मिठा, क्रांती, रजिया सुलतान अशा चित्रपटांतून कामं करता करता त्यांनी ‘पुराना मंदिर’ सारख्या, बी ग्रेड चित्रपटातही किरकोळ भूमिका केल्या. शेवटच्या ‘आखरी बाजी’ या १९८९ मधील चित्रपटानंतर त्यांनी चित्रपटात कामं करणं थांबवलं..

त्यानंतर त्यांची परिस्थिती हलाखीची झाली. तीन मुली व एक मुलगा, चौघेही आपापल्या संसारात रमलेले होते. जेव्हा प्रदीप कुमार यांना पक्षाघाताचा झटका आला.. तेव्हा त्यांच्या कोणत्याही मुलांनी लक्ष दिले नाही. परिणामी त्यांची अवस्था दयनीय झाली. कोलकता येथील एक व्यावसायिकाने त्यांना रहायला जागा दिली. शुश्रुषेसाठी एका तरुणाला ठेवलं.. तेव्हा त्यांचे शेवटचे काही दिवस बरे गेले..

त्यांच्या मुलांशी, त्यांचे संबंध कसे होते हे माहीत नाही मात्र शत्रुवरही अशी वेळ, कधीही येऊ नये.. असं मनापासून वाटतं..

पूर्वी रविवारच्या दूरदर्शनवरील ‘रंगोली’ कार्यक्रमात जुन्या गाण्यांमध्ये, एखादं प्रदीप कुमारचं अप्रतिम गाणं पहायला मिळायचं. अनेक सुंदर नायिकांबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल, या अभिनेत्याचा हेवा वाटायचा.. आज यु ट्युबवर, ‘अनारकली’ असो वा ‘ताजमहल’, आपण सहज पाहू शकतोय.. मात्र या कलाकाराचा उत्तरार्ध इतका वाईट झाला असेल, असं कधीच वाटलं नव्हतं…

खरंच हे जीवन म्हणजे, ‘दोन घडीचा डाव’ आहे… ह्यालाच ‘जीवन’ ऐसे नाव!

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

२७-६-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..