नवीन लेखन...

दिग्दर्शक, निर्माते किरण शांताराम

दिग्दर्शक, निर्माते किरण शांताराम यांचा जन्म २६ जून १९४३ रोजी झाला.

किरण शांताराम हे भारतीय चित्रपटसृष्टीतील श्रेष्ठ दिग्दर्शक व्ही. शांताराम यांचे चिरंजीव होत. १९५९ साली एस.एस.सी. झाल्यावर किरण शांताराम यांनी व्ही. शांताराम यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपटक्षेत्रातली उमेदवारी सुरू केली.

१९६१ सालच्या ‘नवरंग’या चित्रपटापासून दिग्दर्शन विभागात शांतारामबापूंचे साहाय्यक म्हणून किरण शांताराम काम करू लागले ते १९८० पर्यंत. त्यांनी सेहरा (१९६३), गीत गाया पत्थरोने (१९६५), इये मराठीचिये नगरी (१९६६), बुंद जो बन गई मोती (१९६८), जल बीन मछली (१९७१), पिंजरा (१९७२), पिंजरा (१९७३), झुंज (१९७६), चानी (१९७७) या चित्रपटांत शांतारामबापूंचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.

३१ डिसेंबर १९६६ साली त्यांचा विवाह झाला. १९७५ साली साहाय्यक दिग्दर्शक झाल्यावर शांतारामबापूंनी त्यांना दिग्दर्शनाची संधी दिली. १९७६ साली जगदीश खेबुडकरांचे संवाद व गीते आणि राम कदम यांचे संगीत असलेला ‘झुंज’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला.

१९८८ साली व्ही. शांताराम प्रॉडक्शनच्या युवा विभागासाठी त्यांनी ‘अशी ही बनवाबनवी’ या सचिन दिग्दर्शित विनोदी चित्रपटाची निर्मिती केली. तो कमालीचा यशस्वी झाला. नंतर १९८९ साली गिरीश घाणेकर दिग्दर्शित ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ या चित्रपटाची निर्मिती केली. १९९० साली शांतारामबापूंचे निधन झाले. त्यामुळे शांतारामबापूंनी उभे केलेले साम्राज्य सांभाळण्याची जबाबदारी किरण शांताराम यांच्यावर आली. साहाजिकच त्यांना निर्मितीकडे लक्ष देणे जमेना. रेकॉर्डिंग स्टुडिओ, राजकमल स्टुडिओ, व्ही. शांताराम फाऊंडेशन, प्लाझा थिएटर, सिल्व्हर स्क्रीन एक्स्चेंज या सर्व संस्थांचा कार्यभार किरण शांताराम यांनी समर्थपणे सांभाळला. याच काळात किरण शांताराम मुंबईतील अग्रगण्य फिल्म सोसायटी ‘प्रभात चित्र मंडळ’च्या संपर्कात आले आणि चित्रपट संस्कृतीचा वारसा त्यांच्या लक्षात आला. त्यातूनच १९९७ साली मुंबई महानगराचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी ‘मुंबई अकादमी ऑफ मुव्हिंग इमेजेस’ (मामी) हा न्यास स्थापन केला. या संस्थेचे सचिव या नात्याने महोत्सवाची धुरा त्यांनी सांभाळली. नंतर हा महोत्सव ‘रिलायन्स’कडे देण्यात आला.

महाराष्ट्र शासनाने २००१ साली त्यांची मुंबईचे नगरपाल म्हणून नियुक्ती केली गेली. वर्षभरात त्यांनी उत्तम कामगिरी केल्याने या पदाच्या इतिहासात प्रथमच २००२ मध्ये दुसऱ्या वर्षीही त्यांची नियुक्ती करण्यात आली. या काळात मुंबई महानगरासाठी एखादा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करावा, या उद्देशाने देशातला पहिला ‘थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ सुरू केला. या महोत्सवाने १६ वर्षे पूर्ण केली आहेत.

चित्रपट निर्मिती पेक्षाही चित्रपट संस्कृतीप्रसार हे किरण शांताराम यांचे उद्दिष्ट आहे. प्रभात चित्र मंडळ, फेडरेशन महाराष्ट्र चॅप्टर, एशियन फिल्म फाऊंडेशन इ. संस्थांमध्ये सध्या ते कार्यरत आहेत. शिवाय त्यांनी ‘शांतारामा’हे मराठी ‘व्ही. शांतारामांचे जीवन चरित्र’ १९८६ साली प्रथम प्रकाशित केले. नंतर त्याच ‘शांतारामा’ या पुस्तकाची हिंदी आवृत्ती त्यांनी १९८७ साली प्रकाशित केली. मराठी चित्रपट सृष्टीला १०० वर्षे पूर्ण झाली त्या निमित्त त्यांनी २०१४ साली ‘शतक महोत्सवी चित्रसंपदा’ (मराठी चित्रपटांचा इतिहास १९१३ – २०१३) हे पुस्तक प्रकाशित केले. तसेच २०१७ साली त्यांचे द. भा. सामंत लिखित ‘चंदेरी स्मृतिचित्रे’ हे पुस्तकसुद्धा प्रकाशित झाले. मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. त्यातलाच एक उपक्रम म्हणजे त्यांनी सुरू केलेली http://marathifilmdata.com ही वेबसाईट. या दीड वर्षात या वेबसाईटला अडीच लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आलेले असून ही वेबसाईट रोजच्या मराठी चित्रपटसृष्टीबद्दलच्या अपडेट्स आपल्याला देत असते.

सध्या किरण शांताराम हे व्ही. शांताराम चलतचित्र शास्त्रीय अनुसंधान आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान, प्रभात चित्र मंडळ, एशियन फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष तसेच फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया, द फिल्म & टेलीव्हिजन प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया लिमिटेड आणि मेंबर ऑफ एक्सिक्युटीव कौंसीलऑफ विश्व भारती युनिवर्सिटी, शान्तिनिकेन यांचे कार्यकारी अधिकारी, तसेच पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशन (इंडिया) आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..