नवीन लेखन...

देव ‘जिप्सी’द्वारी भेटला..

रात्रीतून अख्या जगाची भ्रमंती करुन पुन्हा पू्र्व क्षितीजावर उगवणारा आपला ‘मित्र’ आपल्यासाठी काय घेऊन येईल त्याचा नेम नाही. कधी आनंद, कधी निराशा, तर कधी आशा पल्लवीत करणारी एखादी घटना असं काहीही असो, पण ते कालचं नसतं येवढं मात्र नक्की. त्यात काहीतरी नवीन मिळवून वा वजा करुन तो घेऊनच तो येत असतो. ते नवीन आनंद देणारंच असतं. काहीवेळा दु:ख वजा करणारही असतं, तर काहीवेळा कालच्याच परिस्थितीकडे नव्या नजरेनं कसं पाहावं याची दृष्टी देणारंही असतं..

नोकरीचा धोपट मार्ग सोडून लेखनाच्या क्षेत्रातच मुशाफिरी करायची मी ठरवली त्यानंतर तर हे त्याचं माझ्यासाठी दररोज नव्यानं काहीतरी घेऊन येणं मी दररोज अनुभवतोय..! कधी एखादी नवीन कल्पना सुचते, तर कधी एखादा वेगळाच विषय सुचतो. कधी लिखाण आवडल्याचं सांगणारा दूरवरून एखादा अनपेक्षीत फोन येतो, तर काही चुकलं असेल तर तसं सांगणाराही प्रत्यक्ष येऊन भेटतो..नवीन व्यक्ती तर कितीतरी भेटत असतात आणि माझ्या आयुष्याच्या बेरजेत सामील होत असतात..!

कालचा दिवसंही असाच उजाडला. सकाळीच मोबाईलवर एक मेसेज आलेला पाहिला. ‘मी पुण्याहून मुंबंईला येतोय, माझा नंबर अमुक अमुक आहे. जमलं तर फोन कर, कधीतरी भेटायचं आहे..’ मी आधी चष्मा आणि मग डोळे पुन्हा पुन्हा चोळून मेसेज पुन्हा पुन्हा पाहिला. मेसेज करणारांचं नांव पुन्हा पुन्हा तपासलं. माझा विश्वासच बसेना. बायकांची नजर तेज, त्यातही नवऱ्याच्या मोबाईलवर येणाऱ्या मेसेजेसबद्दल तर अधिक तेज, म्हणून हिला दाखवला. तिनेही तेच नांव सांगितलं. मी काही काळ ब्लॅंक झालो. मला क्षणभर कळेनाच की काय करावं म्हणून..! मेसेज होताच तश्या वजनदार व्यक्ती कडून आलेला. म्हणजे देवाने भक्ताला ‘भेटूया का’ असं अनपेक्षीतपणे विचारलं, तर भक्ताची जी काय अवस्था होईल ना, नेमकी तिच माझी अवस्था काल सकाळी तो मेसेज आणि त्याहीपेक्षा मेसेज पाठवणाराचं नांव वाचून झाली होती..

मेसेज माझ्या देवाचाच होता. मेसेज मराठीतल्या एका प्रसिद्ध लेखकाचा होता. लेखक (अर्थात, कोणत्याही कलेच्या माध्यमातून व्यक्त होणारी कुणीही व्यक्ती.) माझ्यासाठी साक्षात देवच. गदा-शंख-चक्रधारी असा कथेतला आपल्या भाळी काहीतरी अगम्य लिहिणारा ‘भाळ’लेखक आणि जगण्याचं सुत्र वाचता येण्यासारख्या शब्दांतून पांढऱ्या कागदावर उलगडून दाखवणारा हाडा-मांसाचा कथा-लेखक, असे दोघंजण मला जर कधी एकदम रस्त्यात भेटले, तर मी आधी लेखकाचं दर्शन घेईन आणि त्यातून वेळ मिळालाच तर मग शिष्टाचार म्हणून ‘भाळ’लेखकाची विचारपूस करेन. अर्थात पहिला मला भेटणं जवळपास अशक्यच..! कारण कथेतल्या देवाच्या मागे जावं असं फारसं कधी वाटलं नाही. ‘वाईट वागणाराला देवबाप्पा नरकात पाठवतो’ हे लहानपणी ऐकलेलं वाक्य, मोठं झाल्यावर ‘वाईट वागणाराला देवबाप्पा स्वर्गात पाठवतो’ इतक्या विरुद्ध अर्थानं खरं होताना अनुभवून, कथेतल्या देवावरचा विश्वास साफ उडाला. कथा-लेखकावरचा माझा विश्वास मात्र दिसेंदिवस वाढत चालला आहे.

नशिब लिहिणाराची चिकित्सा करण्याची सोय नाही. म्हणजे त्याचं काहीच म्हणणं नसावं, पण स्वत:ला त्याचे भक्त म्हणवणारे तसं करु देत नाहीत. कागदावर लिहिणाऱ्याची मात्र चिकित्सा होऊ शकते. त्याच्याशी वाद-संवाद होऊ शकतो. नशिब लिहिणारा आंधळं करतो, कागदावर लिहिणारा-त्याचं लिहिलेलं पटो वा न पटो-दृष्टी देत असतो. तेहेतीस कोटी देवापेक्षाही याचे अवतार कितीतरी अधिक आहेत आणि ते किती आहेत हे आपण ठरवायचं असतं. उदा. एकाच पु.ल.चे विनोदी लेखक, नाट्यकार, संगितकार ते जगावं कसं आणि का ते सांगणारे तत्वज्ञानी असे कितीतरी अवतार आहेत. आपल्याला भावेल त्या अवताराची आराधना करावी. ही परंपरा अगदी पुरातन काळापासूनची आहे. म्हणून मी लेखक-कवी-कलावंत यांना पुराणकथांतल्या देवापेक्षा वरचं मानतो. असाच एक देव मला भेटू इच्छित होता. माझा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता..!!

तो मेसेज होता मराठीतले प्रसिद्ध लेखक श्री. वसंत वसंत लिमये यांचा. ‘लाॅक ग्रिफिन’ आणि ‘विश्वस्त’ ह्या दोन रहस्य-थ्रिलर कादंबऱ्यांतून चोखंदळ मराठी वाचकांच्या घरात आणि मनात पोहेचलेले श्री. वसंत वसंत लिमये यांची काल माझी भेट झाली. अगदी ठरवून झाली.

श्री. वसंत लिमये यांची पुस्तकं वाच असं मला माझा आणखी एक कलावंत मित्र अमरजीत आमले याने बजावून सांगितलं होतं. अगदी वाॅर्निंगच दिली होती म्हणा. तुला काही तरी भन्नाट, भवतालाचं भान विसरून मन खिळवून ठेवणारं काही वाचायचं असेल, तर या दोन कादंबऱ्या वाच, असं दर भेटीत अमर मला आवर्जून सांगायचा. मला ‘लाॅक ग्रिफिन’ काही मिळाली नाही, पण ‘विश्वस्त’ माझ्याकडे आहे. मी अद्याप ती वाचायला सुरुवात केलेली नाही हे मात्र खरं.

श्री. वसंत वसंत लिमये यांचं मला लेखक म्हणून आकर्षण तर होतंच, पण त्यांच्या वैशिष्यपूर्ण नांवाविषयीही आकर्षण होतंच. या पूर्वी असं नांव इंग्लंड-स्पेन आदी देशांच्या राजांविषयीच वाचलेली आठवत होती. म्हणजे पहिला जाॅर्ज-दुसरा जाॅर्ज असं. मराठीत हे नांव पहिल्यांदाच वाचलं होतं आणि तेंव्हापासून ते मनात अगदी फिट्ट बसलं होतं. असं नांव धारण करणारी व्यक्ती, अंगात काहीतरी वेगळे गुण धारण करणारी असणारच याबद्दल शंका नव्हती. काल त्यांच्या भेटीत माझा अंदाज बराचसा खरा ठरला..त्यांनी त्यांच्या नांवामागची कथा तपशिलवार उलगडूनही सांगितली.

मला वसंतराव लेखक म्हणून माहिती. पण ते आय.आय.टी.चे इंजिनिअर आहेत हे माहित नव्हतं. मला आवडणारे बहुतेक लेखक आय.आय.टी.तून शिकून बाहेर पडले होते. चेतन भगत, अच्युत गोडबोले ही तर सर्वांच्या माहितीची नांवं. यावरून आय.आय.टी.त मशिनींच्या इंजिनिअरींगबरोबरच शब्दांचं इंजिनिअरींगही शिकवत असावेत असा माझा आपला ग्रह झाला आहे. वसंतरावांना भेटून तो अधिक घट्ट झाला.

पहिल्यापासून दऱ्या-खोऱ्यात फिरण्याची होस असलेले वसंतराव आजही तसेच आहे. जेमतेम पाच-सहा वर्ष नोकरी केली आणि नंतर मात्र सर्ववेळ आपल्या गिर्यारोहणाच्या छंदासाठी दिला. मग या छंदातून मिळणारा आनंद, मिळालेले अनुभव आपल्या मित्रांसाोबत लिहून शेअर करु लागले व ते पुढे कधीतरी ‘महानगर’चे निखिल वागळे यांच्या नजरेस आले व त्या लेखनाची मालिका ‘महानगर’मधे छापून आली. ‘लोकसत्ता’चे तत्कालीन संपादक कुमार केतकर यांनी पुढे वसंतरावांची दीर्घ कथा प्रसिद्ध केली. हे दोन्ही प्रयत्न वाचकांना प्रचंड आवडले. नंतर ‘ग्रंथाली’च्या दिनकर गांगलांनी त्यावर ‘धुंद स्वच्छंद’ हे पुस्तक प्रकाशित केलं. ते ही दणक्यात संपलं. आणि मग लिहिण्याची स्वच्छंद धुदी चढू लागली. पुढे ग्रंथालीनेच ‘लाॅक ग्रिफिन’ प्रसिद्ध केली आणि पुन्हा काही वर्षांनी दिलीप माजगांवकरांच्या ‘राजहंस’ने ‘विश्वस्त’ प्रसिद्ध केली. या दोन्ही पुस्तकांच्या पाच-पाच आवृत्त्या निघाल्या (एक आवृत्ती हजार पुस्तकांची असते). सह्याद्री ते हिमालय येवढ्या दीर्घ पल्ल्यात केलेल्या भटकंतीतून वसंतरांवांच्या मनात घर केलेल्या गुढाचा स्पर्श या दोन्ही कादंबऱ्यांच्या कथावस्तूंमागे आहे..

तासाभराच्या आमच्या भेटीत मला उलगडलेले वसंतराव मी माझ्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वसंतरावांच्या अंगी आणखीही काही कला आहेत. ते व्यव्स्थापनाचं प्रशिक्षण देतात व ते प्रशिक्षण त्यांना डोंगर दऱ्यांतून केलेल्या भटकंतीच्या, गिर्यारोहणाच्या अनुभववार आधारीत असतं. या विषयवावर ते व्याख्यानही देतात. नाना कळा आहेत त्यांच्या अंगी. परंतु अत्यंत दिलखुलास असलेल्या या व्यक्तीमत्वातलं मला सर्वात जास्त काय आवडलं असेल, तर त्यांची भटकंती. कारण मी हा त्याच पंथातला. माझी झेप व पल्ला मुंबईच्या परिघातला, तर वसंतरावव पार सह्याद्रीपासून ते हिमालयाला गवसणी घालणारे. आमच्या क्षमतेत जमीन-अस्मानाचा फरक असला तरी आमचा पिंड एकच.

आमची कालची भेट झाली, ती शिवाजी पार्कातल्या ‘जिप्सी’त. वसंतरावांच्या आणि माझ्या भेटीला एका लिमयांचं ‘जिप्सी’. साक्षी असावं, हा केवळ योगायोग मानायला मी तयार नाही. हा संकेत आहे. देव असाच साक्षात्कार देत असतो ना?

-@नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..