नवीन लेखन...

‘दामू, साने गुरुजींचा धडपडणारा मुलगा’ – पुस्तक परिचय

लेखिका सौ आशा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या “दामू , साने गुरुजींचा धडपडणारा मुलगा” या पुस्तकाचा परिचय करुन दिला आहे सौ वासंती गोखले यांनी.


हे पुस्तक आशाताई कुलकर्णी यांनी २०१८  मध्येच मला सप्रेम भेट म्हणून दिले होते. त्यावेळी मी ते पुस्तक वाचून काढले होते, पण पंधरा दिवसांपूर्वी ते पुस्तक मी वाचू लागले आणि त्यातला सखोल आणि सुयोग्य अर्थ, खरेपणा मला जाणवू  लागला. हा धडपडणारा विद्यार्थी म्हणजे, तरुण वयातच भारावून जाऊन, देश आणि लोक सेवाकार्यात झोकून देणारा ‘दामोदर बळवंत कुलकर्णी”,  म्हणजेच साने गुरुजींचा दामू !  ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’  हा त्यांचा सामाजिक कार्याचा गाभाच आणि मूलतत्वच  होते.

असे हे पुस्तक ठाण्याच्या ‘सर्वश्री प्रकाशन’ ने, प्रकाशित केले असून, मुखपृष्ठ विलेपार्ल्याचे श्री विवेक वैद्य, यांनी अत्यंत आकर्षकपणे आणि अचूक रीतीने चितारले आहे. त्याची पहिली आवृत्ती डिसेंबर २०१३  मध्ये प्रकाशित झाली असून, दुसरी आवृत्ती प्रसिद्धीच्या वाटेवरती प्रतीक्षेत ,  मार्गावर आहे.  गेल्या दोन वर्षांच्या ‘लॉक डाऊन’ च्या काळात व्यत्यय आल्यामुळे,  याचे प्रकाशन काही काळ स्थगित झाले होते.

विशेष म्हणजे त्यांनी हे पुस्तक आपली ‘आई अर्थात मामी’  तसेच आईसारखीच माया करणाऱ्या ‘बेबीताई’ ना अर्पण केले आहे.  ११४  पानांचे हे पुस्तक,  जनसेवेचा वारसा लाभलेल्या आणि समाजसेवेचे व्रत निष्ठापूर्वक चालवणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्या, त्यांची कन्या आशा कुलकर्णी यांनी लिहिले आहे.  मामांनी हुंडाविरोधी चळवळ अतिशय सक्षम पणे उभारली आणि आज त्यांची कन्या हुंडा विरोधी चळवळीचे सामाजिक कार्य तितक्याच जोमाने करत आहे.  पुस्तकाला प्रस्तावना प्रसिद्ध लेखक मधु मंगेश कर्णिक यांनी अत्यंत उत्कटपणे लिहिली आहे. सर्वस्वी  प्रकाशन’ च्या सौ ऋतुजा राजेश पोवळे, यांनी दामू नावाच्या झंजावताला अभिवादन करताना,  “स्वातंत्र्यसेनानी मामा साहेब कुलकर्णी, ही पूज्य साने गुरुजींच्या शिकवणी च्या ज्योतीतून पेटलेली अशीच एक मशाल” अशा शब्दात  वर्णन केले आहे .

पुस्तकात एकूण आठ प्रकरणे असून, त्यात ‘दामूचे’ बालपण, शालेय जीवन आणि साने गुरुजींचा सहवास,  स्वातंत्र्यलढा,  सहजीवन, तसेच कौटुंबिक, व्यावसायिक, सामाजिक जीवनातील चढ उतारांचा आलेख अत्यंत प्रामाणिकपणे सादर केला आहे. त्यांनी बालपणी भोगलेल्या यातना, दुःखे त्याचप्रमाणे जवळच्या प्रिय व्यक्तींचा वियोग यांचाही  आपल्याला परिचय होतो.

दामूचा जन्म ५ डिसेंबर १९१३  रोजी झाला. पण तो दीड  वर्षांचा असतानाच त्याचा आईचे निधन झाले व मोठा भाऊ  विहिरीत पडून मृत्यू पावला. त्यामुळे  मातृसुख आणि बंधुप्रेम त्याला कधीच मिळाले नाही. त्याच्या तीन बहिणीतील सीतामाईचा तो लाडका भाऊ होता. आईविना पोरकी मुले म्हणून ती आजोळी राहिली. पण मामीने मात्र सदैव या भावंडांचा छळच केला. एक दिवस मामीने तर ‘दामूचे’ हात पाय दोरीने बांधून वऱ्हांड्यात   बाकाखाली झोपावयास लावले. वडील नेमके त्याच वेळी भेटायला गेल्यामुळे,  त्यांचे हाल न पहावल्यामुळे त्यांनी दामूला अमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये घातले. वार लावून जेवणे, ‘नाही मिळाले तर उपास आहेच’. नंतर गोखले गुरुजींच्या शिफारसीमुळे छात्रालयात दामूला प्रवेश मिळाला. त्यावेळी त्याच्यावर सोपविलेल्या भोजन गृहाच्या व्यवस्थेची जबाबदारी तो चोखपणे पहात असे. अशा तऱ्हेने कौटुंबिक जिव्हाळ्याविना खडतर आयुष्य त्याला बालपणीच नशिबी आले होते.  प्रताप हायस्कूलच्या छात्रालयापासून पुढे साने गुरुजींचा प्रदीर्घ सहवास, १९२८  पासून १९५०  पर्यंत त्याला लाभला.

‘दामू’ ला, साने गुरुजींचा धडपड करणारा पडणारा मुलगा किंवा ‘मानसपुत्र’ असे म्हटले जायचे याचे कारण म्हणजे, दामूने केलेले अथक परिश्रम, सर्वस्वाचे दान आणि निस्पृहपणे केलेली जनसेवा होय !  काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनाच्या वेळी दामू -बावीस तेवीस वर्षांचा तरुण मुलगा होता. अधिवेशनाच्या काळात सर्व स्वच्छतेची जबाबदारी त्यांनी स्वीकारली, याचे कारण, गुरुजींची शिकवण,  “सेवा धर्म हा श्रेष्ठ धर्म” हीच होय.  अमळनेरला जेव्हा गुरुजींचे वास्तव्य असे तेव्हा ते दामोदरच्या घरीच असे.

१९३१ – ३२ मध्ये सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जेंव्हा सानेगुरुजी भूमिगत होत असत  तेंव्हा सुद्धा वेष पालटून रात्री-अपरात्री दामूच्या घरी येत, रात्रभर पलंगाखाली झोपत आणि सकाळी उठल्यावर निघून जात. इतका त्यांचा दामूवर विश्वास आणि भरवसा होता.

‘स्वातंत्र्यसैनिक दामोदर बळवंत तथा मामासाहेब कुलकर्णी’ चौक

१९५७ साली भारतीय स्वातंत्र्याला जेंव्हा दहा वर्षे पूर्ण झाली त्या निमित्त मोजक्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करावयाचा असे सरकारने ठरविले. त्यात ‘दामूचे’, म्हणजेच मामांचे’ नाव होते. मोरारजी देसाई यांनी त्यांना बोलावून  “J. V.P. D” स्कीम मध्ये ३५०० चौरस फुटांचा प्लॉट देऊ केला. पण साने गुरुजींच्या संस्कारांमुळे क्षणाचाही विलंब न करता तो स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. असे होते गुरुजींचे ‘दामू’ वरचे संस्कार.,  साधी राहणी, उच्च विचारसरणी,  उच्च-नीच असा कुठलाच भेदभाव नाही, दुसऱ्यांना मान द्यायचा’’ अश्या प्रकारच्या साने गुरुजींच्या झालेल्या उत्कृष्ट संस्कारांमुळे, दामूचे  जीवन उजळले आणि दामूने हेच संस्कार  मुक्तहस्ताने समाजात पेरले. .

दामू चा अर्थात दामोदर कुलकर्णी यांचा विवाह मैनावती श्रीधर मुजुमदार यांच्याशी ७ मे  १९३९  रोजी झाला. ६७ – ६८  वर्षांचा ‘राधा दामोदर’ यांचा सहजीवनाचा प्रवास. अनेक कठीण प्रसंग आले, पण तरीही एकमेकांना धीर देत ही दोघे, इतरांना करता येईल तितके सहाय्य करत जगले. कौटुंबिक जीवनात त्यांनी आपल्या सर्व जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या. त्यांनी पुण्याच्या बजाज ऑटो, जोगेश्वरीच्या प्रीमियर पेपर मिल्स लिमिटेड अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या, उच्च पदावर नोकऱ्या केल्या. पण  ‘एसटी महामंडळ’ आणि त्यांची स्वतंत्र  बँक यांच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. एसटीच्या वाहन चालकांना ‘वेळी-अवेळी’ ड्यूटी करावी लागत असल्यामुळे त्यांची खाण्या-पिण्याची, जेवणाची आबाळ टाळण्यासाठी कॅन्टीनची त्यांनी व्यवस्था सुरु केली. माफक दारात  त्यांच्या खाण्यापिण्याची सोय झाली. अगदी आजसुद्धा ही योजना अस्तित्वात आहे हे विशेष.  मॅनेजमेंटचे विद्यार्थी त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी सदैव येत असत. इंग्रजीवरील प्रभुत्व, उत्कृष्ट वक्तृत्व आणि दातृत्व या गुणांमुळेच त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळाले. पुस्तकातील पान नंबर ६६ , ६७  मध्ये वाचकांना कल्पना यावी यासाठी केवळ चार फोटो त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यसासाठी समाविष्ट करण्यात आले आहेत.

लसीकरणाची मोहीम, प्रवासी संघटनेचे कार्यकारणी सदस्य, पार्ले- अंधेरी टेलीफोन ग्राहक संघटनेचे अध्यक्ष,  क्लीन सिटी कॅम्पेन अशा सारख्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.   संगीतावर तर त्यांचे गाढे प्रेम होते आणि म्हणूनच बालगंधर्व संगीत सभेची स्थापना त्यांनी केली. माणिक वर्मा, बिस्मिल्ला खान यांची शहनाई, मल्लिकार्जुन मन्सूर, शिवकुमार शर्मा, वसंतराव देशपांडे, सुहासिनी मुळगावकर अशोक रानडे , गानहिरा – हिराबाई बडोदेकर, सरस्वती रानडे, व.पु. काळे, यशवंत देव, भीमसेन जोशी अशा अनेक दिग्गज संगीतकारांचे आणि साहित्यिकांचे कार्यक्रम त्यांनी रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे आटोकाट , यशस्वी प्रयत्न केले.

व्याख्यान माला, परिसंवाद, ‘भित्तिचित्रे, ‘पथ नाट्य’ अशा विविध प्रयोगांतून त्यांनी हुंडा विरोधी चळवळ सतत जागृत ठेवली. त्यांच्या कामाचा आवाका पाहून त्यांच्या कार्याचा गौरव  म्हणून   सरकारनी, ‘जस्टीस ऑफ पीस’, (JP) हा किताब त्यांना बहाल केला गेला.  मुख्य म्हणजे हुंडाविरोधी चळवळीचा हा वारसा त्यांची कन्या आशा कुलकर्णी ( या पुस्तकाची लेखिका) यांनी तितक्याच जोमाने आणि उत्साहाने चालू ठेवले आहे. त्यांचा देह, त्यांच्या इच्छेनुसार,  निधनानंतर ‘जे,जे. हॉस्पिटलला दान करण्यात आला.

‘भावसुमनांजली’  या प्रकरणात ( पृष्ठ क्रमांक, ९३  ते ११४ )  डॉक्टर स्नेहलता देशमुख, माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ, डॉक्टर रमेश प्रभू, मुंबईचे माजी महापौर,  प्राध्यापक डॉक्टर माळी (माजी कुलगुरू जळगाव” अशा दिग्गज व्यक्तींनी, तसेच त्यांचे नातलग आणि परिचित यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. सुंदर सोप्या भाषेत आणि मोजक्या शब्दांमध्ये ‘आशाताईंनी’ एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्या समोर चितारले आहे. तसेच, १५ ऑगस्ट १९१३च्या स्वतंत्रदिनी, ‘स्वातंत्र्यसैनिक दामोदर बळवंत तथा मामासाहेब कुलकर्णी’ चौक उभारून विले पार्ल्याच्या रहिवाश्यानी त्यांना कायम स्वरूपाची श्रद्धांजली अर्पण केली आहे.

नैतिक मूल्यांची जपणूक करताना, ‘दामोदर कुलकर्णीं’ सारख्या आदर्श व्यक्तींचा परिचय  पाठ्य पुस्तकांमध्ये समाविष्ट केला पाहिजे. तरुण पिढीपुढे असे आदर्श ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे,  नाहीतर काळाच्या ओघात हे सर्व वाहून जाईल असं वाटतं.

— वासंती गोखले
१४/१०/२०२१

लेखकाचे नाव :
VASANTI ANIL GOKHALE
लेखकाचा ई-मेल :
vasantigokhale@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..