नवीन लेखन...

दहा मिनिटं..

 

माणूस हा नेहमी सुखाच्या शोधात असतो. जरा कुठं मनासारखं घडलं नाही तर त्याची चिडचिड होते. माझंही तसंच झालं होतं. तसा मी सुखवस्तू होतो, मात्र ताणतणावाने मानसिक तोल ढळला की, मला सगळं काही सोडून हिमालयात निघून जावं, असं वाटत असे. तशी नुकतीच माझी चाळीशी उलटली होती. बायको, मुलं, फ्लॅट, नोकरी, गाडी अशा मध्यमवर्गीयाला जीवनावश्यक असलेल्या सर्व गोष्टी माझ्याकडे होत्या. फक्त मन सैरभैर झालेलं होतं…

शेवटी मी वर्तमानपत्रातील एका समुपदेशन केंद्राची जाहिरात वाचली आणि त्याची वेळ घेतली. रविवारी मी समुपदेशकाच्या आॅफिसवर पोहोचलो. त्याला माझा प्राॅब्लेम सांगितला. त्यानं त्याच्या चार आकडी फी ची मला स्पष्ट कल्पना दिली. चर्चेनंतर त्यानं मला एक फाॅर्म भरायला दिला व सांगितले की, ‘या फाॅर्ममधील लिहिलेल्या नावांच्या व्यक्तींपुढे पुढच्या रविवारी तुम्ही फक्त दहा-दहा मिनिटं बसायचं आणि त्याच्याशी स्वतःची तुलना करायची.’

त्या फाॅर्ममध्ये दहा रकाने होते. प्रत्येकाच्या पुढे त्यांचा संपर्क लिहायला सांगितला होता. फाॅर्म भरुन देण्यासाठी मी हातात पेन घेतले. पहिला रकाना होता पत्नीचा. त्या रकान्यात तिचे नाव लिहिले. दुसरा रकाना होता, तुमचा कोणी ओळखीचा बेवडा आहे का? असल्यास त्याचे नाव. मी माझ्या एका जुन्या मित्राचे नाव लिहिले. तिसरा रकाना होता कोणत्या साधू-संन्याशाशी तुमचा संपर्क आहे का? मी तिथे ‘नाही’ म्हणून लिहिले. चौथा रकाना होता, राजकारणी, पुढारीशी संपर्क आहे का? आमच्या वाॅर्डातील नगरसेवक माझा परिचित होता, त्याचं नाव मी लिहिलं. पाचवा रकाना विमा एजंटसाठी होता. मी ज्याच्याकडून पाॅलिसी काढली होती, त्याचं नाव तिथं लिहिलं. सहावा रकाना, व्यापारी मित्रासाठी होता. मी माझ्या राजस्थानी मित्राचे नाव लिहिले. सातवा रकाना, शिक्षकासाठी होता. मी माझ्या सरांचं नाव तिथं लिहिलं. आठवा रकाना, कामगारासाठी होता. तिथं माझ्या पूर्वीच्या आॅफिसबाॅयचं नाव लिहिलं. नववा रकाना, सैनिकासाठी होता. मी आमच्या सोसायटीतील कर्नल जाधव यांचं नाव लिहिलं. दहावा रकाना, जिवलग दोन मित्रांच्यासाठी होता. मी त्यांची नावं लिहिली.

भरलेला फाॅर्म मी त्या समुपदेशकाच्या हातात दिला. त्याने त्यावर नजर टाकली व म्हणाला, ‘साधूची व्यवस्था मी करतो. तुम्ही पुढच्या रविवारी पत्नीसह, या सर्वांना भेटायला नक्की या.’

रविवारी मी दहा वाजता पत्नीसह त्या समुपदेशकाच्या आॅफिसवर पोहोचलो. त्याने आमचे स्वागत केले. मला शेजारच्या केबिनमध्ये बसायला सांगून तो म्हणाला, ‘प्रत्येक व्यक्तीसाठी मी तुम्हाला फक्त दहा मिनिटे देणार आहे. त्या दहा मिनिटात तुम्ही समोरच्या व्यक्तीशी तुलना करुन स्वतःच्या सद्यस्थितीचा विचार करायचा आहे. तुम्हाला त्यांच्यापेक्षा तुम्ही स्वतःच ग्रेट वाटत असाल तर तुम्हाला हिमालयात पाठविण्याची व्यवस्था मी स्वतःहून करेन!’

मी शेजारच्या केबिनमध्ये जाऊन बसलो. पहिल्यांदा पत्नी समोर येऊन बसली. मी विचार करु लागलो, लग्न झाल्यापासून गेल्या दहा वर्षांत हिनं किती खस्ता खाल्ल्या. जीवनातील चढ-उतारात भक्कम साथ दिली. तरीही नेहमी हसतमुख राहिली. हिच्या पुढे माझ्या अडचणी नगण्यच आहेत.

दुसरी व्यक्ती, माझा बेवडा मित्र समोर येऊन बसला. आजही त्याने सकाळीच घेतलेली असावी. तो म्हणाला, ‘मित्रा, खरं सुख या सोनेरी द्रवात आहे. ते घेतल्यानंतर आपणच आपले राजे असतो. मला कालची, आजची व उद्याचीही चिंता नाही. मी गेले पंचवीस वर्षे त्याला पहात होतो, तो तस्साच, एकटा राहिला होता. त्याच्यापेक्षा मी शतपटीने सुखी होतो.

तिसरी व्यक्ती, साधू माझ्यासमोर येऊन बसला. त्याने थोडक्यात त्याचा जीवनप्रवास सांगितला. त्याला कोणत्याही गोष्टीचा मोह नव्हता. त्याची निरपेक्ष वृत्ती पाहून मला माझं सर्वस्व त्याला दान द्यावं असं वाटू लागलं. पण मी तर संसारी होतो, माझ्या जबाबदारीतून मला मुक्त होणे शक्य नव्हते.

चौथी व्यक्ती, राजकारणी होती. माझा परिचित नगरसेवक समोर बसला होता. त्याला मी गेले वीस वर्ष पहात होतो. सायकलीवरुन फिरणारा हा कार्यकर्ता आज नगरसेवक होऊन चार परदेशी गाड्या, दोन बंगल्यांचा मालक होता. माझ्यासमोरच तो फोनवर लाख, कोटींची भाषा करीत होता. बारावीच्या परीक्षेला दोनदा बसलेला, आज भाऊसाहेब झाला होता. माझी फर्स्ट क्लासची डिग्री त्याच्या बारावीपुढे शून्य होती.

पाचवी व्यक्ती, विमा एजंट होती. मी त्याच्याकडून पूर्वी एक पाॅलिसी घेतली होती. आज तो मला नवीन पाॅलिसीबद्दल पटवून देत होता की, माझ्या मृत्यूनंतर माझ्या वारसाला कशी भरघोस रक्कम मिळेल. मला तर आत्ताचं जीवन, सुखानं जगायचं होतं.

सहावी व्यक्ती, माझा राजस्थानी व्यापारी मित्र होता. त्याने लहानपणी वडिलांबरोबर येऊन आज चार दुकानं थाटली होती. डोक्यात सतत गुणाकाराचीच गणितं करणारा तो मित्र अहोरात्र व्यापारात गुंतला होता. पैसा हेच त्याचं ध्येय होतं. माझ्या पुरेशा पगारात, मी सुखी होतो.

सातवी व्यक्ती, माझे शिक्षक होते. गेल्या पंचवीस वर्षांत त्यांच्यात काहीही बदल झालेला नव्हता. अखंड ज्ञानदानाचं पुण्य त्यांच्या पदरी होतं. त्यांना पाहून मला पुन्हा एकदा विद्यार्थी व्हावं असं वाटलं.

आठवी व्यक्ती, पूर्वी माझ्या आॅफिसमध्ये काम करणारा आॅफिसबाॅय होता. नंतर त्याने अनेक ठिकाणी कष्टाची कामं केली, मात्र कुठेही जास्त काळ टिकला नाही. त्यानं केले एवढे काबाडकष्ट मी कधीही करु शकलो नसतो. माझा समज होता, मीच खूप कष्ट करतो..

नववी व्यक्ती, कर्नल जाधव होती. ते देशासाठी दोन युद्धात लढले होते. समर्पण कशाला म्हणतात ते त्यांच्या छातीवरील मेडल्सवरुन कळत होतं. त्यांच्या पासंगालाही मी पुरणारा नव्हतो.

दहावी व्यक्ती, माझे जिगरी दोस्त होते. माझ्या जीवनातील ते आनंदाचे झाड होते, मी माझ्या सर्व चिंता यांच्या सहवासात विसरुन जायचो. आपण स्वर्गसुख ज्याला म्हणतो, ते अशा मैत्रीतच असतं.

मी केबिनमधून बाहेर आलो व समुपदेशकाच्या समोर बसलो. त्याला काहीही बोलू न देता मीच म्हणालो, ‘सर, आज माझे डोळे उघडले, मी स्वतःचाच विचार करीत होतो. समाजातील या अनेक प्रकारच्या व्यक्तींपेक्षा मी नक्कीच सुखी आहे. यापुढे मला जर कधी ताणतणाव आला तर मी माझ्या मित्रांसोबत सुखदुःखाच्या गोष्टी करेन, मात्र हिमालयात कधीच जाणार नाही….’

© – सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४

या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत
२३-५-२१

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 370 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..