(भारताचे एक उत्कृष्ठ अष्टपैलू मराठमोळे क्रिकेटपटू “दत्तू फडकर” यांची १२-१२-२०२५ रोजी जन्मशताब्दी पूर्ण होतेय. त्यानिमित्ताने त्यांना मानवंदना म्हणून, त्यांच्यावर २०२३ च्या “शिवतेज” दिवाळी अंकात लिहिलेला लेख आपणांसमोर सादर)
कपिलदेव हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला सर्वोत्कृष्ट महान अष्टपैलू खेळाडू मानला जातो, आणि त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली कामगिरी ही मान्यता सिद्धही करते. परंतु कपिलच्या ३० वर्षं आधी भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर असा एक तारा चमकून गेला, ज्याने काही काळ आपल्या जबरदस्त अष्टपैलू कामगिरीने क्रिकेटजगताला आपली नोंद घ्यायला लावली. हा मराठमोळा तारा म्हणजे १२ डिसेंबर १९२५ ला जन्मलेला कोल्हापूरचा रांगडा गडी ‘दत्तात्रय गजानन ‘उर्फ’ दत्तू फडकर’.
दत्तू फडकर यांचा जन्म कोल्हापूरचा असला तरी त्यांचे बालपण आणि सारे शिक्षण मुंबईतच झाले. मुंबईच्या ‘रॉबर्ट मनी हायस्कुल’मध्ये फडकर यांचे शालेय शिक्षण झाले. तेथील क्रीडाशिक्षकाच्या प्रोत्साहनाने ते क्रिकेटकडे वळले. वयाच्या १० व्या वर्षी आंतरशालेय सामन्यातील फडकर यांच्या १५६ धावांनी सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आणि वरच्या स्तराचे क्रिकेट खेळण्याच्या दृष्टीने त्यांचा प्रवास सुरू झाला. पुढे १९४१ साली एल्फिस्टन कॉलेजला गेल्यावर (येथूनच त्यांनी पुढे बी.ए. ची पदवी मिळवली) त्यांना होमी वजिफदार यांच्याकडून क्रिकेटचे चांगले मार्गदर्शन मिळाले. याच काळात त्यांचे रूपांतर एका देखण्या, दणकट, तरण्याबांड, सहाफूटी युवकात झाले. आपल्या महाविद्यालयीन स्पर्धेच्या पदार्पणाच्या सामन्यातच त्यांनी २७४ धावा फटकाविल्या. कॉलेजमधील सातत्यपूर्ण कामगिरीने त्यांची मुंबई विद्यापीठाच्या संघात निवड झाली. या काळात ते मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज, दोन्ही बाजूला चेंडू स्विंग आणि कट करू शकणारे मध्यमगती गोलंदाज आणि भरवशाचे क्षेत्ररक्षक, अश्या प्रकारचे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून नावारूपाला आले. तसेच त्याकाळी भारतातील बहुतेक खेळपट्ट्या या फिरकी गोलंदाजीला अनुकूल असल्याने, त्यांनी ऑफ-स्पिन गोलंदाजीची कलाही आत्मसात केली. विद्यापीठाकरिता देखील सामने गाजवल्याने त्यांची १७ व्या वर्षीच मुंबईसाठी रणजी करंडक स्पर्धेत निवड झाली. ५-६ वर्षे मुंबईसाठी चमकदार कामगिरी केल्याने १९४७-४८ च्या भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच ऐतिहासिक ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फडकर यांची निवड भारताच्या राष्ट्रीय संघात करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे कोणतेही दडपण न घेता फडकरांनी आपल्या बिनधास्त पण दर्जेदार खेळाचे दर्शन या दौऱ्यात घडवले. यातील पदार्पणाच्या सिडनी येथील कसोटी सामन्यात फडकर यांना आठव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. तेव्हा त्यांनी संघास गरज असतांना ५१ धावा काढल्या आणि गोलंदाजीत १४ धावांच्या मोबदल्यात ३ गडी बाद केले. मेलबर्न येथील दुसऱ्या कसोटीत ५५ नाबाद धावा काढतानाच २ गडी बाद केले. पुढील ऍडलेड येथील सामन्यात फडकर यांना साहव्या क्रमांकावर फलंदाजीस पाठविण्यात आले. तेव्हा विजय हजारेंसह खेळतांना १८८ धावांची महत्त्वाची भागीदारी केली आणि १२३ धावा फटकावत पहिले शतकही ठोकले. मेलबर्न येथील चौथ्या कसोटीत परत एक नाबाद अर्धशतक फटकावले. या मोसमात खेळल्या गेलेल्या चारही सामन्यात दत्तू फडकर यांनी किमान ५० धावा तरी काढल्या आणि ८ बळी मिळवले. फलंदाजीतील त्यांची कामगिरी होती ती लिंडवॉल, मिलर, जॉन्सन आणि टोशॅक या जगातल्या सर्वात प्रभावी गोलंदाजांविरुद्ध. तर गोलंदाजी करताना त्यांचा सामना होता तो ब्रॅडमन, हार्वे, बार्न्स, मॉरिस, हॅसेट अश्या जगातल्या सर्वात बलशाली फलंदाजांच्या फळीशी. या दौऱ्याच्या अखेरीस ‘फिंगल्टन’सारख्या अनेक ऑस्ट्रेलियन समीक्षकांनी फडकरना भारताचा भावी आधारस्तंभ असल्याची प्रशस्ती दिली.
त्यापुढील मायदेशातील १९४८-४९ च्या वेस्ट इंडिज आणि १९५१-५२ च्या इंग्लंडच्या दौऱ्यात फडकरनी अष्टपैलू कामगिरीचा धडाका कायम ठेवला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्यांनी ४ कसोटीत २४० धावा केल्या आणि १४ बळी मिळवले. भारताच्या कसोटी इतिहासातल्या पहिल्या विजयातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. मद्रास (चेन्नई) येथील ती पाचवी कसोटी पंकज रॉय आणि पॉली उम्रीगर यांची शतके आणि विनू मांकडच्या १२ विकेट्ससाठी स्मरणात आहे. पण इंग्लंडचा सलामीवीर फ्रँक लॉसनला कसोटीच्या पहिल्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये परतवून फडकरांनी दिलेला धक्का इंग्लंडचे मनोबल तोडणारा ठरला. भारताच्या एकमेव डावात त्यांनी केलेल्या ६१ धावांच्या खेळीने आणि पॉली उम्रीगर सोबत केलेल्या शतकी भागीदारीमुळे भारताला धावांचा डोंगर रचता आला. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात फडकरनी पुन्हा एकदा १९१ धावांनी पिछाडीवर असलेल्या इंग्लंडचे मनोधैर्य खच्ची करताना लॉसनला अवघ्या ७ धावांवर बाद केले आणि भारताच्या ऐतिहासिक विजयाचा पाया रचला. याच मालिकेत फडकर यांच्या सर्वोत्तम अष्टपैलू कामगिरीचे साक्षीदार कोलकाताचे ईडन गार्डन्स हे मैदान राहिले आहे. तेथील मालिकेतील तिसऱ्या सामन्यात फडकरनी इंग्लंडच्या ३४२ धावांसमोर भारताच्या पहिल्या ५ विकेट अवघ्या १४४ धावांत गमावल्या असताना, ११५ धावा करत भारताचा डाव सावरला आणि नंतर इंग्लंडच्या ४ महत्त्वाच्या विकेट्सही घेतल्या. त्यामुळे ही कसोटी अनिर्णित राखण्यात भारताला यश आले.
यानंतरचा १९५२ सालचा इंग्लंड दौरा मात्र भारतासाठी दु:स्वप्नासारखा ठरला. विजय हजारे आणि विनू मंकड वगळता इतर सारे भारतीय खेळाडू त्या दौऱ्यावर अपयशी ठरले ज्यात फडकरांचाही समावेश होता. मात्र लिडस् येथील एका कसोटीत भारताची ‘४ बाद 0′ अशी दारुण परिस्थिती झाली असताना फडकरनी अर्धशतक करत आणि कप्तान हजारेंसोबत शतकी भागीदारी रचत भारताची थोडीपार लाज राखली. पण हे एक प्रदर्शन वगळता त्यांची कामगिरी निराशाजनक ठरली. फडकरांना जणू दृष्ट लागली आणि त्यांचा सूर हरवला. त्यानंतर १९५८ पर्यन्त ते आणखी सहा मालिका खेळले परंतु त्यांच्या खेळात पूर्वीची चमक दिसली नाही. या काळात त्यांची केवळ २ अर्धशतके झाली आणि एकदाच ते डावात ५ बळी मिळवू शकले. ते आपला अखेरचा कसोटी सामना १९५८-५९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळले. १९५२ च्या इंग्लंड दौऱ्यात सूर हरवण्यासाठी त्यांनी ‘आल्फ ग्रोव्हर’ क्रिकेट अकादमीमध्ये घेतलेले प्रशिक्षण कारणीभूत असल्याचे बोलले जाते. ही अकादमी विश्वविख्यात असली तरी तेथे मार्गदर्शन करताना फडकरांच्या नैसर्गिक शैलीला मुरड घालून तांत्रिक बाबींवर जोर देण्याचा प्रयत्न झाल्याने त्यांची लय बिघडल्याचे मानले जाते.
फडकर यांनी कारकिर्दीमध्ये ३१ कसोटी सामन्यांत ३२.३४ च्या सरासरीने १२२९ धावा केल्या त्यामध्ये २ शतके आणि ८ अर्धशतके होती. त्यांनी कसोटीमध्ये ३६ च्या सरासरीने ६२ विकेट्सही घेतल्या, ज्यामध्ये डावात ५ बळी तीन वेळा होते. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील त्यांची आकडेवारी तर लाजवाब आहे. १३३ सामन्यामध्ये ५,३७७ धावा केल्या त्यामध्ये ८ शतके आणि २९ अर्धशतके होती. तसेच २२.०४ च्या सरासरीने ४६६ विकेट्स घेतल्या. या रांगड्या खेळाडूने एकदा संघासाठी कठोर मनोनिग्रहाचाही परिचय दिला. १९५१-५२ मध्ये कोलकाता कसोटी सामना चालू असताना, त्यांच्या पत्नीला प्रसूतीत मृत जुळी बाळे झाल्याचे तारेने समजले. पण संघ अडचणीत सापडलेला असल्याने त्यांनी सामना अर्धवट सोडून घरी जाण्याचे नाकारले. आपल्या झुंजार खेळीने त्यांनी भारतीय संघाला अवघड परिस्थितीतून बाहेर काढले आणि संघासाठी सामना वाचवला. बाद होऊन तंबूत परतल्यानंतरच त्यांनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. वैयक्तिक दु:खाला बाजूला सारून त्यांनी संघ व देशासाठी दिलेल्या या कर्तव्यनिष्ठेने, त्यांना क्रिकेटरसिकांच्या मनात कायमचे आदर व प्रेम मिळवून दिले. फडकर नेहमी संघासाठी खेळण्याच्या इर्श्येने क्रिडांगणावर उतरत असल्यामुळे त्यांनी वैयक्तिक पराक्रमाकडे फारसे लक्ष्य दिले नाही. त्यांच्या या दिलदार वृत्तीच्या खेळामुळे प्रेक्षक त्यांच्यावर खूश असत. त्यांच्या संघभावनेचा आणि उमद्या प्रवृत्तीचा विशेष उल्लेख स्वर्गीय ‘सर फ्रँक वॉरेल’ यांनीही केलेला आढळतो.
निवृत्तीनंतरही फडकर सतत क्रिकेटशी निगडीत राहिले. उभरत्या खेळाडूंना ते मार्गदर्शन व प्रशिक्षण देत असत. १९७० च्या दशकात ते भारतीय क्रिकेटच्या निवड समितीवर होते. त्याचप्रमाणे काही काळ त्यांनी रेल्वे तसेच ‘टाटा सन्स’ कंपनीमध्ये कामही केले. आयुष्याच्या उत्तरार्धात ते कोलकत्यामध्ये स्थायिक झाले. तेथे पत्नीसमवेत लहान मुलांसाठी त्यांनी ‘सनी प्रिपेरेटरी स्कुल’ नावाची बालवाडी सुरु केली. इंग्लंडच्या ‘एम.सी.सी.’ने त्यांना १९६८ साली लाईफ-मेंबरशिप देऊन खेळातील त्यांच्या योगदानाचा विशेष गौरव केला. २०१२ साली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इतर सात महान क्रिकेटपटूंसह त्यांना ‘भारतीय क्रिकेटमधील सर्वात महत्त्वपूर्ण योगदानासाठी’ मरणोत्तर विशेष पुरस्काराने गौरवान्वित केले. कारण त्याआधी बरीच वर्षे म्हणजे १७ मार्च १९८५ रोजी मेंदूच्या विकाराने फडकर यांचे चेन्नई येथे निधन झाले होते.
भारतीय क्रिकेटच्या प्रारंभीच्या काळात आपल्या दर्जेदार, दिलखुलास अष्टपैलू खेळाने देशाचा आणि महाराष्ट्राचा झेंडा जागतिक पटलावर डौलाने फडकवणाऱ्या कोल्हापूरच्या या सुपुत्राला मानाचा मुजरा!!
- गुरुप्रसाद दि पणदूरकर (मुंबई)


Leave a Reply