नवीन लेखन...

क्रिकेटच्या ऐश्वर्या

‘क्रिकेटच्या ऐश्वर्या‘ हे विदर्भाच्या माजी महिला क्रिकेटपटू ‘नीता चापले‘ यांचे भारतीय महिला क्रिकेट आणि महिला खेळाडूंच्या संघर्षावर प्रकाश टाकणारे एक अत्यंत प्रेरणादायी पुस्तक आहे. ग्रंथाली प्रकाशनने हे पुस्तक नोव्हेंबेर २०१६ मध्ये प्रकाशित केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.

लेखिका नीता चापले या स्वतः ९० च्या दशकातील एक उत्कृष्ट राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू राहिल्या आहेत. (शिवाय आत्ता त्या पॉवरलिफ्टिंग आणि जलतरण या क्रीडाप्रकारांत पन्नाशी उलटल्यावर वरिष्ठ गटांत राष्ट्रीय स्तरांवर पदके मिळवत आहेत). हे पुस्तक लिहिण्यामागे एक भावनिक आणि दुःखद कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. त्यांची मुलगी ‘ऐश्वर्या’ हिच्या अकाली जाण्याने झालेल्या अपरिमित दुःखातून सावरण्यासाठी त्यांनी या पुस्तकाचे लेखन केले. स्वदुःखाचे रूपांतर एका विधायक आणि सकारात्मक ऊर्जेत कसे करता येते, याचे हे पुस्तक उत्तम दाखला आहे.

ज्या काळात महिला क्रिकेटला भारतात आजच्या सारखी लोकप्रियता, ग्लॅमर आणि आर्थिक स्थैर्य नव्हते, अशा काळात नीता चापले यांनी क्रिकेट खेळ आपलासा मानला आणि मैदानावर गाजवले. महिला क्रिकेट आपल्या देशात बाल्यावस्थेत असतानाचा भारतीय महिला क्रिकेटपटूंचा आणि आपला वैयक्तिक संघर्ष यांची चांगली सांगड घालत लिहिलेले पुस्तक वाचकाला बरेच काही देऊन जाते. अनेक महिला क्रिकेट खेळाडूंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचे नाव करण्याच्या जिद्दीच्या अनेक कहाण्या प्रेरक आहेत. भारतातल्या महिला क्रिकेटसाठी मोठे योगदान देणाऱ्या महेंद्रकुमार शर्मा, प्रेमलाकाकी चव्हाण, नरेंद्र निकम या व्यक्तींच्या थोरपणाबद्दल माहिती होते.

हल्लीहल्लीपर्यंत पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या क्रिकेट खेळात, महिला खेळाडूंना करावी लागणारी कसरत, सुविधांचा अभाव आणि समाजाचा विपरीत दृष्टिकोन यांबरोबर द्यावा लागणारा लढा याबाबत अनेक कट्टर क्रिकेटप्रेमीदेखील अनभिज्ञ असतील. लेखिकेने त्याविषयी पुस्तकात फोडलेली वाचा क्रीडाप्रेमींचे अज्ञान दूर करते. अतिशय सोप्या भाषेत नीताजींनी महिला क्रिकेटचा प्रवास आणि महिला खेळाडूंच्या मानसिक व शारीरिक संघर्षाचा आलेख अतिशय वेधक पद्धतीने मांडला आहे.

लेखिकेने लिहीलेल्या डायना एडल्जी, शांता रंगस्वामी, शुभांगी कुलकर्णी, मिथाली राज यांसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंबद्दल क्रिकेटप्रेमींना बऱ्यापैकी माहीत असते. पण कमल सावंत, चंदाराणी कांबळे, कौकब काझी, प्रीती श्रीनिवासन यांसारख्या अपरिचित, उपेक्षित खेळाडूंच्या मेहनत, जिद्द, दृढनिश्चय आणि संघर्षाच्या कथा विस्मयचकित करून सोडतात.

लेखिकेची दिवंगत (१७ वर्षीय) कन्या ‘ऐश्वर्या’ हिची कहाणी मनाला चटका लावून जाते. अष्टपैलू गुणवत्ता असणारी ही कन्या तिच्या लहान वयातील प्रगल्भतेने थक्क करून सोडते. शेवटी ‘जो आवडतो सर्वांना तोची आवडी देवाला’ (पण इथे खूपच लवकर) असे म्हणून मनाचे समाधान करावेसे वाटते. हे पुस्तक केवळ क्रीडाप्रेमींसाठीच नाही तर आयुष्यात जिद्दीने काहीतरी करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक अ-पर्यायी (Must Read) पुस्तक आहे यात शंकाच नाही. खेळामध्ये येणारे अपयश आणि वैयक्तिक आयुष्यातील संकटे या दोन्ही आघाड्यांवर कसे लढायचे, याचे उत्तम मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते. चोखंदळ वाचकांनी जरूर याचा आनंद घ्यावा.

[ लेखिकेविषयी – सौ नीता नितीन चापले. इंग्रजी साहित्यात पदवी. माजी विदर्भ क्रिकेटपटू. क्रिकेट अकादमी चालवणाऱ्या पहिल्या महिला. मुले, मुली, वंचित गटातील मुलं, अपंग खेळाडू यांना क्रिकेट प्रशिक्षण. अजित वाडेकरांच्या अपंगांसाठीच्या क्रिकेट संघटनेशी संबंधित. दुबई येथून आयसीसीची ‘लेवल १’ कोचिंग परीक्षा उत्तीर्ण. ४७ व्या वर्षी पॉवरलिफ्टिंग शिकून दोन वर्षांत नॅशनल अवॉर्ड. ५१ व्या वर्षी स्विमिंग शिकून हल्लीच नॅशनल सिनियर अवॉर्ड. टेडेक्स वक्ता, लेखिका, ब्लॉगर. एका ‘विशेष’ मुलाची आई व गृहिणी.]

  • गुरुप्रसाद दि पणदूरकर (मुंबई)
Avatar
About गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर 41 Articles
माजी बँकर, मुक्त लेखक. विविध संकेतस्थळे, दिवाळी अंकांतून क्रिकेटविषयक, बँकिंगसंबंधी, अर्थविषयक व व्यक्तिचित्रणात्मक लेखन. विशिष्ट संकल्पनांवर आधारित शब्दकोडी रचण्याचा छंद. या शब्दकोड्यांना अनेक दिवाळी अंक, हिंदुस्थान पोस्ट साप्ताहिक यांमधून प्रसिद्धी. मराठी साहित्य, खेळ (विशेषत: क्रिकेट), भारतीय इतिहास यांमध्ये विशेष रुची.
Contact: Twitter

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..