नवीन लेखन...

कॉन्ट्रॅक्ट (कथा)

 

बघता बघता २०१९ चं साल सरून २०२० च्या जानेवारी महिन्याचं स्वागत धुमधडाक्यात झालं व्हतं. हिवाळा सुरू व्हवून जवळपास दोन एक महिने उलाटले व्हते..आता कुठं पहाटंला थंडीची चाहूल अंगावरलं पांघरून वढून घ्यायला सांगत व्हती.. गावातले झाडं झुडपं मरगळ झटकाया लागले व्हते. पिकल्या पानाचा सडा पडत व्हता… गावचा शिवारही याच्यातून सुटला नव्हता.. सुगीचे दिस सरले व्हते.. हिरवंगार रान मोकळं झालं व्हतं.. तरी बी एखाद्या वावरात पसरून ठिवल्याला हिरवा शालू मनाला भुरळ घालीत व्हता..बांधावरल्या आंब्याच्या झाडावर केसरी रंगाचे तुरे पानामागून डोकं वर करून बघाया लागले व्हते.. घराच्या वट्टयावर आन् देवळाच्या पायरीवर म्हतारे कोतारे उन्हाला बसू लागले व्हते.. एखाद्या झाडावरलं पान गळून पडता पडता त्यास्नी दिसलं म्हणजी कव्हा तरी आपून बी आसंच गळून पडणार म्हणून तरुणपणाच्या आठवणी काढीत उगा मातीवर रेघा मारीत व्हते..

सक्रातीच्या तिळगुळाची गोडी तोंडात गडप झाली व्हती.. दिस तिळातिळानं मोठा व्हवू लागला व्हता.. शिमग्यानं बी सांगावा धाडला व्हता.. व्हळीचा लाल, पिवळा, हिरवा , निळा रंग पिचकाऱ्या भरून भरून आंगावर पडला व्हता… कोणाच्या बी ध्यानीमनी नसताना आवचित काळा रंग आंगावर पडला व्हता.. आनंदानं फुलावाणी दिसणारी तोंड काळजीनं काळवंडली व्हती.. काय तर म्हणं चीन मधून करुना नावाचा रोग आलाय.. त्याच्यावर आजून औषध सापाडलं नव्हतं.. समदं जग काळजीच्या काळ्या डोहात बुडालं व्हतं..

रोजच्या पेपराच्या पहिल्या पानाला करूनाचा इळखा पडला व्हता.. टी.व्ही वर दर दिसाला चीनमंदी करुनानं मेल्याल्या माणसाची दिसणारी आकडेवारी काळजाचा ठोका चुकवित व्हती.. जगात कोणत्या देशात करुना घुसलाय आन् दिवसागणिक किती माणसाचा जीव घेतलाय याचे आकडे ऐकून उरात धडकी भरली व्हती.. गारठा आल्या पावलानी परत गेला व्हता. चैत्रपालवीच्या कवळ्या पानाचा हिरवा पदर झाडाच्या डोक्यावर साजरा दिसत आसला तरी बी वैशाखाच्या उन्हाचे चटके बसू लागले व्हते…

सरकारचा आदेश निघाला.. देशाच्या पंतपरधानानं सवता टीव्ही वर येऊन १८ तारखीपासून पुढं दोन आठवडे कोणी बी कामाबिगर घराबाहेर निघायचं न्हाई.. घोळका करून उभं राहायचं न्हाई..घोळक्यानं कुठं जायचं न्हाई का यायचं न्हाई.. बाहीर जाताना तोंडावर कापडाची पट्टी म्हणजी मास्क का काय ते बांधूनच जायाचं.. आसं सांगितलं..

गावातले जुने खोडं..पटकी,कालरा, हागवण,गवर, हिवताप झालंच तर देवीचा रोग पाहिल्याचं सांगत व्हते.. त्या वख्ताला बी ढिगानं माणसं मेल्याचं सांगत व्हते.. कोणाला जाळलं व्हतं तर कोणाला पुरल व्हतं.. एखाद्याला मुठमाती देऊन दोन चार घटका भरत्यात तव्हार कोणाची ना कोणाची तिरडी बांधाया लागत व्हती.. आसं सांगता सांगता डोळ्यातल्या पाण्याला वाट मोकळी करून देत व्हते..पण आता ह्यो कलीयुगातल्या पापाचा नवा रोग आलाय.. आसं म्हणून नव्या पिढीच्या पापाचा पाढा वाचून दावीत व्हते…कलीयुगात माणसाच्या वागण्याला धरबंध राह्यला न्हाई.. म्हणून रोज नवं नवं पाप घडतंय.. तेच पाप नव्या नव्या रूपानं माणसाचा जीव घ्याया लागलंय..

म्हणता म्हणता मार्च महिन्यातल्या पंधरा दिसाची मुदत संपली.. आन् सरकारनं पुढल्या पंधरा दिसाची बंदी घातली.. पंधरा पंधरा दिस करता करता सहा महिने सरले.. शहरातले चाकरी करणारे आन् गावाकडं शेतात राबणारे आपल्याच घरात कैदी म्हणून जगत व्हते..एक एक दिस पार पाडण्यापायी धाप लागत व्हती. पाडवा, नागपंचमी, गणपती, दसरा , दिवाळी सण कव्हा आले आन् गेले ते समाजलंच नव्हतं.. महिन्याकाठी सण साजरा करणा-या देशाला हे मरणासारखं व्हतं…शाळा,देवळं, कारखाने , हाफिसं समदं बंद झालं व्हतं.औषधाची दुकानं आन् दवाखाने तेवढे चालू व्हते. कितीक चाकरमान्यांनी गावची वाट धरली..पण जायाचं कसं..? बस, रेल्वे बंद झाली व्हती.. मग चालत चालत..गाव गाठलं.. कोणाला रस्त्यावरंच करूनानं गाठलं व्हतं..जे गावाला पोहोचले त्यास्नी गावकऱ्यांनी गावात यायची बंदी घातली.. आगीतून निघून फुफाट्यात पडल्यावाणी झालं.. मग गावाबाहेर न्हाई तर रानातच खोप घालून संवसार मांडला..

घरातला दाणादुनका आन् हातातली शिल्लक दिसामाजी संपली व्हती.. अशात सरकारी आदेश आला..समद्यानी घरातूनच काम करायचं.. खुडूक कोंबडीवाणी एकाजागी बसून हापिसातल्या चाकरमान्यांची काम सुरू झाली.. दिसभर एकाजागी बसून मान पाठ एक व्हत व्हती..पण कराया तर लागणारच व्हतं..

पोपटराव पवाराचं बी काम येगळं नव्हतं.. दोन पो-ही, म्हतारे आई-बाप आन् नवरा बायकू आसं सहा माणसाचं खटलं व्हतं.. थोरली पोर अर्चना कालीजात आन् धाकली मनीषा बारावीला शिकत व्हती..पो-हीला लेकावाणी लहानाचं मोठं केलं व्हतं.. जगरहाटी परमाण वंशाला दिवा नव्हता पण जे हाय त्याच्यातच सुखानं जगायचं हा त्याचा नेम व्हता.. रोजंदारीचं कामं मिळत नव्हतं.. घरात बसल्या बसल्या तंबाखू मळायची एवढं एकच काम उरलं व्हतं..एक दिस सकाळी थोरली पोर अर्चना म्हणली..

“आप्पा… मी पण घरातूनच काम करायचं ठरवलं आहे..”

“घरातूनच.. आगं त्वा तर आजून शिकतीय्.. सगळे काम धंदे बंद पडल्यात .. त्वा आणि घरात बसून काय काम करणार ? उगा आपलं काय पण बोलतीय.”

“अहो खरंच आप्पा.. खूप सोप्पं काम आहे.. लॅपटॉप नुसता पडून आहे त्याचा काही तरी उपयोग करायला पाहिजे.. “

“व्हय..पर.. सोप्ं आसं कोणतं काम हाय आन् ते बी घरात बसून..”

“काही नाही हो आप्पा.. फक्त टायपिंगचं काम आहे. कंपनी आपल्याला टायपिंगचं काम देते. तेवढं टाईप करुन द्यायचं.. एक पेज टाईप करायचे ८० रुपये मिळतात..”

“पेज ..म्हणजी..वाईच मला जरा नीट उलगडा करुन सांग..”
“परदेशातील म्हणजे अमेरिकेतली कंपनी आहे.. त्यांना पुस्तकं छापायची असतात किंवा जुनी चांगली पुस्तकं जपायची असतात.. ते त्यांना टाईप करुन पाहिजे असतं..एका पेजला म्हणजे एका पानाला एक डॉलर..एका डॉलरला आपल्या देशात ८० रुपये मिळतात..”
“एका पानाला ८० रुपये म्हणजे लईच भारी हाय.. पण ती कंपनी आमेरिकात , तू भारतात ..मग कसं जमायचं..?”

“अहो आप्पा.. त्यांनी आपल्या देशातल्या “ इझी मनी “ नावाच्या कंपनीशी करार केलेला आहे.. म्हणजे आपल्याला काम आपल्या देशातली कंपनीच देणार.. दिवसाला बसल्या बसल्या दहा पानं टाईप करुन दिले तरी आठशे रुपये मिळतात.. “
“मग तर चिंताच मिटली म्हणायची..महिन्याला घरबसल्या पाच पंचवीस हजार रुपये सहज मिळतील..”
“हो आप्पा..झालंच तर मनीला पण शिकवीन.. मने करशील का गं..?
“हो करील की.. पण माझे पैसे मी कुणालाच देणार नाही.. कबूल असेल तर करते नाही तर ..मी नाही करणार मनीषा म्हणाली..”

“आप्पा.. घरात लहान असल्याचा असा फायदा होतो बघा.. कोणतीही जबाबदारी घ्यायचं बंधन नाही.. मनाला वाटलं तर केलं नाही तर नाही म्हणून हात झटकून मोकळं व्हायचं..”

“जाऊ दे गं.. लहान हाय ती आजून”
“आप्पा..! अहो तिचं लग्न झालं तरी तुम्ही लहानच म्हणाल..”
“आगं मग खोटं हाय का काय..? आन् पोरं किती बी मोठे झाले तरी ते आई-बापाला लहानंच आसत्यात..”
“बरं..ते सोडा कामाचं बोलू.. हां तर ते काम करायचं असेल तर तिथं नाव नोंदणी करावी लागते.. “
“आगं मग कर की.. हाय काय एवढं..”

“तसं नसतं आप्पा.. नाव नोंदणी करण्यासाठी मला एक पान टाईप करुन पाठवावे लागेल.. ते जर त्यांना पसंद पडलं तर मग नाव नोंदणी करुन कामाला सुरुवात करायची..”
“मी पण करणार.. मनीषा म्हणाली”
“चल गं..जा.. माझं मी करीन.. तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे..”
“आप्पा .. तुम्ही सांगा ना दिदीला..”
“काही नको.. म्हणे आप्पा तुम्ही सांगा..कधी कोणतं जबाबदारीचं काम सांगितलं की तुझी नकारघंटा वाजली म्हणून समजायचं.. आप्पांच्या लाडानं आळशी झालीय तू.. काहीही झालं की आप्पांच्या मागे लपायचं.. झालं..”
“आप्पा ‌.. माझ्या कामाचे जे पैसे मिळतील ते मला दिदीच्या लग्नासाठी जमा करायचे आहेत.. म्हणून मी कुणाला देणार नाही असं म्हटलंय..”
मनीषाचं बोलणं ऐकून .. पोपटरावांचं मन भरून आलं.. लेकीच्या तोंडावरुन मायेचा हात फिरवला.. म्हणले..
“दिदे.. आगं माझी मनी मोठी झालीय की.. कोण म्हणतं तिला जिम्मेदारीची जाण न्हाई.. दोन दिसामागं पाव्हण्यांचा फोन आलता.. तुळशीचं लगीन झाल्यावर एक बारीला बैठक करून लग्नाची तारीख धरू म्हणत व्हते..”
“आप्पा.. मला वाटतं की लग्नाचा विचार एक वर्षानंतर केला तर बरं होईल.. आता बाहेर काय चाललंय त्यांना माहित नाही का? थोडं सबूरीनं घ्या म्हणावं..”
“आगं आसं काय करती? पोराकडची माणसं हायेत..त्यास्नी आसं बोलता येत न्हाई“
“का नाही बोलता येत..? माणसंच आहेत ना ? आणि असं काही असेल तर मग मला लग्नाबद्दल विचार करावा लागेल.. लग्नाला पैसे लागतात म्हणावं.. यावर्षी अडचण आहे असं सांगा.. आणि तुम्हाला जमत नसेल तर मी बोलते त्यांच्याशी..”
“म्हणजी.. काय म्हणायचं काय हाय तुला..?”
“आप्पा दिदी बरोबर बोलतेय.. आता तर सुपारीच फुटलीय ना.. आता काही बोलता येत नसेल तर मग पुढे कसं होणार..?”
“मने..ss त्वा बी लागली का तिच्या व्हय ला व्हय म्हणाया.. आग पोरगं शिकल्यालं हाये.. घरदार चांगलं हाये.. पोरीच्या बापाला थोडं नमतं घ्यावा लागतंय.. सुपारी फुटली म्हणजी कमी नसतंय..”
“त्यांचा मुलगा शिकलेला आहे आणि माझी दिदी अडाणी आहे की काय ?.. अजून वर्षभर थांबा.. हे बाहेरचं वातावरण शांत झालं आणि पहिल्या सारखं सगळं सुरळीत झालं तर .. तुम्ही बघा दिदीला कुठेही वीस पंचवीस हजारांची नोकरी सहज मिळेल..”
“ ए..येडाबाई.. त्वा जरा दमाने घेतलं तर बरं व्हईल.. लेकीच्या बापाचं मन तुला न्हाई कळायचं.. तुझं लगीन आपून निवांत करु.. पर दिदीचं लगीन सुखासुखी पार पडू दे..”
“आप्पा.. तो लग्नाचा विषय जरा बाजूला ठेवू.. मने तू जरा गप्प बस.. हां तर मी काय म्हणत होते.. मी टायपिंग करून पाठवलेलं त्यांनी पास केलं‌ की मग सर्व पर्सनल डिटेल्स आणि बॅंक अकाउंटचे डिटेल्स अपलोड करावे लागतील..”
“दिदे ..! तुला काय करायचं आसंन ते कर.. मला ते बाकीचं काय बी समजत न्हाई.. तुझं तू बघून घे..”
“आप्पा.. अहो अगोदर नीट ऐकून तरी घ्या.. मला आणि मनीला बॅंकेत अकाउंट उघडायला लागेल .. हजार रुपये लागतील.. पाचशे पाचशे रुपये भरून दोघींचीही अकाउंट उघडते..”
“बरं..बरं..तुला जव्हा करायचं आसंन तव्हा पैशे घेऊन जा..”

वैशालीने आप्पांची परवानगी मिळाल्या बरोबर एक सॅम्पल पेज डाउनलोड केलं.. टाईप करुन पुन्हा अपलोड केलं..”You have successfully uploaded Your documents.. We shall get back to you soon “ चा मेसेज आला .. वैशाली आणि मनीषाला आपण आई-वडिलांना थोडाफार हातभार लावू शकलो तर बरं होईल असं वाटत होतं..

“मने.. चल स्वयंपाक करायला हवा.. मी कणीक मळते..तू भाजी निवडून दे..”
“हो..देते.. पण दीदी..आई कधी येणार गं..तिला मामाकडे जाऊन एक महिना झालाय..”
“मग होऊ दे की.. तुला तुझ्या आईची आठवण येते तशी तिला पण तिच्या आई-वडिलांना भेटावं वाटलं म्हणून गेलीय.. आजीला बरं नाहीय.. म्हणून थांबलीय.. आणि हो.. तू तिला फोन करून कधी येणार म्हणून त्रास देऊन नको.. आजीला बरं वाटलं की येईल ती..”

अर्चनाने सॅम्पल पेज अपलोड करून दोन दिवस झाले होते.. अजून काहीच उत्तर आले नव्हते.. तिने आठवण करून देणारा एक मेल पाठवला..उत्तराची वाट बघण्याशिवाय ती काहीही करू शकत नव्हती..

दुसऱ्या दिवशी मनीषाला. घेऊन ती बॅंकेत जायला निघाली. रस्त्यावर पोलीसांचा बंदोबस्त तैनात होता.. पोलीसांनी दोघींना थांबवलं..
“बोला मॅडम .. कुठं निघालीय स्वारी..? सगळीकडे बंद असताना तुम्हाला काही वेगळं सांगायला पाहिजे की काय?”
“सर मी बॅंकेत जातेय.. महत्वाचं काम आहे.. “
“सगळे घरात बसलेत ते काय बिनकामाचे आहेत का ?”
“सर प्लीज समजून घ्या.. घरात बसून दिवस कसे काढावे लागतात तुम्हाला माहित आहे..” वर्क फ्रॉम होम “ ची नवी नोकरी मिळाली आहे.. बॅंक अकाउंट डिटेल्स द्यायचे आहेत.. सर प्लीज.. आम्ही जाऊन अर्धा तासात लगेच परत येतो..”

“प्रश्न तास अर्धा तासाचा नाही.. घराबाहेर निघायचं नाही असा आदेश आहे की नाही..म ss ग .. चला ..जा घरी..”
पोलिसांच्या समोर त्यांचं काहीही चाललं नाही.. तेव्हा दोघीही नाईलाजाने घरी परतल्या.. त्यांचा त्रासिक चेहरा पाहून पोपटराव म्हणाले..
“काय झालं गं.. त्वांड का उतारलंय ?”
“ बॅंकेत जात होतो.. त्या ढेरपोट्यानं जाऊच दिलं नाही..” मनीषा रागात म्हणाली..
“मने.. एवढं रागं भराया काय झालंय.. आन् कोण ढेरपोट्या..?”
“आप्पा अहो.. पोलीसांनी अडवलं होतं..म्हणाले बाहेर पडायचं नाही असा आदेश आहे..”.
“आसं..हाय व्हय..मने आसं एवढ्या तेवढ्या गोष्टीवर राग धरून कसं चालंन.. थोडं डोस्क शांत ठिवाया शीक..”
“अहो आप्पा पण आम्ही त्याला सांगितलं.. नवीन नोकरी मिळाली आहे.. बॅंकेत खातं उघडण्यासाठी जात आहोत.. पण त्यानं काही एक ऐकलं नाही.. जाऊ दिलं आसतं तर त्याच्या बापाचं काय नुकसान झालं असतं ?”
“मने.. आसं बोलू न्हाई ..आगं त्यास्नी बी वर जबाब द्यावा लागतोय.. त्यांचं काम हाय.. जबाबदारी आसतीय.. आपून बी समजून घेतलं पायजे..”
“मग तो का नाही समजून घेत.. घरात बसून तो जेवायला देणार आहे का ?”
“बरं.. आता शांत बसा.. म्या उद्या सकाळी बघतो.. करतो काही तरी..”

सकाळी पोपटराव बॅंकेत जायला बाहेर पडले.. गावातल्या दवाखान्या जवळ त्यास्नी सरपंच दिसले.. त्यांच्या संगं चार पाच पांढ-या कपड्यातले माणसं उभे व्हते.. शेजारी एक गाडी बी उभी व्हती.. पोपटरावला पाहून एक पोलिस वराडला.

“ए..! शहाण्या.. व्हय मागं..तुला काय येगळं सांगाया पायजे व्हयं रं..”
तव्हा सरपंचानं पोपटरावला पाह्यलं.. म्हणले..
“ओ.. पोपटराव.. या इकडं या.. कुठं निघाले सकाळी सकाळी..?”
पोपटराव सरपंचाकडं जाऊन म्हणले..
“राम राम..पाव्हणे कोण हायेत ?
“पाव्हणे… सरपंच हासून म्हणले.. तुम्ही वळाखलं न्हाई यांना..?”
“न्हाई… आवं समद्याच्या तोंडाला पट्ट्या हायेत.. कसं वळखायचं..आता गावातलं माणूस रोजच्या पाहण्यातलं आसतंय.. बोलणं, चालणं , आंगकाठी बघून वळख पटतीय.. पर..”
“पोपटराव.. बरोबर हाय तुमचं.. हे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे थोरात साहेब हायेत.. गावा गावात फिरून करूनाची माहिती घेत्यात… दवाखान्यात यवस्था कशी हाये ते पाहत्यात.. गावात एक “आरोग्य मित्र “ गट तयार करून लोकांना करूनाची माहिती करून द्यायची आणि कोणाला लागन झाली तर काय करायचं ते सांगत व्हते.. पोपटराव तुम्ही व्हणार का आरोग्य मित्र..?
“आवं.. व्हणार का म्हणून काय इचारताय.. गावासाठी आपून कव्हा बी मागं हटणार न्हाई..”
“झालं तर मग..आजून चार पाच जण गोळा करायची जिम्मेदारी तुमची..बघा साहेब..आशे हायेत आमचे गावकरी.. उठ म्हणलं का उठायचं आन् बस म्हणलं का बसायचं.. पोपटराव तुम्ही संध्याकाळी मला भेटा… आता म्या साहेबास्नी निरोप देतो..”
“साहेब.. पण तेवढं हवालदारास्नी सांगा की , मला बॅंकेत जायाचं हाय.. सोडा मला..”
“ शिंदे… यांना जाऊ द्या.. आणि पुन्हा यांना अडवू नका.. जायचं असेल तिकडे जाऊ द्या.. कामाचा माणूस आहे..” साहेबांनी सांगितलं..
पोपटराव बॅंकेत गेले.. खातं उघडण्यासाठी अर्चनाने दिलेले फॉर्म मॅनेजरला दिले..त्यांनी दुसऱ्या माणसाकडे पाठवलं.. त्यानं फॉर्म नीट पाहिल्यावर दोन दिवसांनी येऊन अकाउंट नंबर घेऊन जायला सांगितलं.. तेव्हा पोपटराव म्हणाले..
“साहेब .. फोनवर द्या की अकाउंट नंबर.. पोलिस येऊ देत न्हाईत..”
“अहो.. पवार साहेब.. अकाउंट उघडल्यानंतर सुरूवातीला पाचशे रुपये भरावे लागतील.. मगच नंबर देता येईल..”
“बरं मग आसं करता का.. म्या हजार रुपये तुमच्याकडं देतो. दोन दिसानी तुमचं तुम्ही भरून घ्या.. आन् फोनवर नंबर कळवा..”
“साहेब आम्हाला असे कुणाचे पैसे घेता येत नाहीत.. आणि समजा घेतले आणि दोन दिवसांनी मी घेतलेच नाही असं म्हणालो तर..”
“आसं..व्हणार न्हाई आसा इश्वास हाये साहेब.. आवं दिसभर लाखांचा खेळ करणारे तुम्ही.. हजार रुपयांसाठी बेइमानी करणार न्हाई.. ठावं हाये मला..”

“हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला..पण तसं नाही करता येत.. या तुम्ही दोन दिवसांनी.. पोलिसांनी अडवले तर फोन लावून साहेबांशी बोलायला सांगा..”

हो नाही करता करता पोपटरावांचा नाईलाज झाला.. घरी आल्यावर अर्चनाला म्हणले..
“फारम देऊन आलोय.. दोन दिसांनी नंबर मिळंन. तव्हा समक्ष जाऊन पैशे भराया लागतील.. जाशील ना?”
“पण तुम्हाला पोलिसांनी जाऊन कसं दिलं?”
“आगं सरपंच भेटले व्हते.. जिल्ह्याचे एक साहेब बी भेटले.. म्या त्यास्नी आसं ना आसं काम हाय सांगितल्यावर ते पोलिसाला म्हणले…जाऊ द्या.. कामाचा माणूस हाये.. मग काय.. जाऊन आलो..”
“बरं झालं बाई.. मला तर खूप टेन्शन आलं होतं.. “

अर्चनाने दिवसभर दहा वेळा मेल चेक केला पण अजून काहीही उत्तर आलं नव्हतं.. काय झालं असेल.. काही चुकीची माहिती तर भरली नसेल ना अशी शंका आल्याने तिने पुन्हा सर्व डिटेल्स चेक केले ‌‌ .. सर्व काही बरोबर होतं.. पण मग अजून उत्तर का आलं नाही.. तिला काळजी वाटत होती.. काम मिळेल की नाही..असा विचार करता करता दिवस संपला.. रात्र संपली… रात्रभर तिला झोप लागलीच नव्हती..‌एक संधी आहे पण ती तरी मिळेल की नाही.. सगळीकडे कामधंदा बंद झालाय.. सासरच्या लोकांनी तुळशीच्या लग्नानंतर लग्नाची तारीख धरायची असं ठरवलंय.. कसं होणार.. आप्पा कसं करतील सगळं.. हे कामाच काही झालं नाही तर मग त्या माणसांना सरळ एक वर्ष थांबण्यासाठी सांगायचं.. ऐकलं तर ठीक.. नाही ऐकलं तर सरळ नकार द्यायचा.. त्यांना त्यांचा मार्ग मोकळा करून द्यायचा..

सकाळी उठल्यावर तिचं डोकं दुखायला लागलं होतं… डोळ्यांची आग होत होती.. मनी मात्र बिनधास्त झोपली होती..तिनं आवरून चहा घेतला.. आजी आजोबा उठले होते.. त्यांनाही चहा दिला.. पण आप्पा कुठं दिसत नव्हते.. सकाळी सकाळी कुठे गेले असतील कुणास ठाऊक.. तिनं आजीला विचारलं..

“आज्जे.. आप्पा कुठं गेलेत सकाळी सकाळी.. काही सांगून गेले आहेत का..?”
“काय सांगितलं न्हाई गं पोरी..पर सकाळी सरपंचाचा कोणीतरी बाप्या आला व्हता.. त्याच्यासंगच गेला वाटतं..”
“आप्पा पण कधी कधी असं का करतात काही कळत नाही.. जायचं तर सांगून जायला काय होतंय.. बाहेर काय चाललंय.. थोडं तरी लक्षात घ्यायला नको का ..?”
“आगं.. सरपंचाकडं गेला आसंन म्हणजी काही कामासाठी गेला आसंन गं बाई.. आशी तगतग करू न्हाई.. माणूस घराबाहीर गेलं म्हणजी ते सुखरूप परत येऊ दे म्हणून देवाला हात जोडावं.. त्याचं नाव घेऊन वाईट वंगाळ बोलू न्हाई.. कव्हा तरी बोलाफुलाची गाठ पडली म्हणजी लई पस्तावा व्हतो..त्वा मनीला उठीव.. आन् काम आवरून घे.. न्हाई तर सरपंचाला फोन करून इचार..”.

“मने.. अगं.. उठ गं.. किती झोपशील.? काही काळजी आहे की नाही ?”
आप्पा सकाळी सकाळी न सांगता कुठे गेले असतील याचा अर्चना विचार करीत होती.. सरपंचाला फोन करून विचारावं म्हणून तिनं फोन घेतला.. पण फोन बंद झाला होता.. तिनं तो चालू करण्याचा प्रयत्न केला पण तो चालू झालाच नाही.. बॅटरी संपली असेल म्हणून तिनं फोन चार्जिंगला लावला.. खरंच बॅटरी संपली होती.. तेव्हा ती मनीषाला म्हणाली..

“मने .. तुला किती वेळा सांगायचं फोन बॅटरी संपेपर्यंत वापरत जाऊ नको .. बरं संपल्यावर चार्जिंगला लावायला काय होतंय..! इतका निष्काळजीपणा बरा नाही.. अगं एखादा अर्जंट कॉल करायचा असेल तर काय करायचं…?”

“सॉरी..दिदी.. पुन्हा नाही होणार..मी लक्षात ठेवीन..”
“बस्.. सॉरी म्हटलं की संपलं..जा आता पटकन आवरून घे “
आणि इतक्यात फोन वाजला.. अर्चनानं बघितलं फोन तिच्या मामाचा होता..
“हॅलो..मामा मी अर्चना बोलतेय..”
“आगं..दिदे.. म्या आप्पा हाय..”
“अहो.आप्पा तुम्ही तिकडे का गेलाय?..मी सकाळपासून काळजी करतेय.. काही सांगितलं नाही .. काही नाही..”
“आगं.. दिदे..शांत व्हय जरा.. तुझ्या आजीची तब्ब्येत जास्त झालीय.. तुझ्या मामानं रातच्याला फोन केला व्हता..पण आपला फोन बंद व्हता.. सकाळी सरपंचाला फोन करून सांगितलं.. तव्हा समाजलं.. आन् म्या लगूलग इकडं निघून आलोय..”
“आप्पा .. आजी.. कशी आहे आता..?”
“काय सांगता येत न्हाई.. जाईल का राहिल ते देवालाच ठावं हाय.. फोन चालू करून ठीव.. तसं काही झालं तर परत फोन करतो.. ठिवतो आता..”

आप्पांनी फोन कट केला.. अर्चना डोकं धरून बसली.. काय करायचं काही समजत नव्हतं.. डोळे पाणावले होते.. मनाला आवर घालून तिनं मेलचं काही उत्तर आलंय का पहावं म्हणून लॅपटॉप चालू केला.. दोन नवीन मेल दिसले.. एक बॅंकेत अकाउंट ओपन झाल्याचा आणि दुसरा

“इझी मनी “ कंपनीचा.. तिने तो ओपन केला.. तिने टाईप करुन पाठवलेले सॅम्पल पेज योग्य असल्याचे कळविण्यात आले होते.. पुढील काम सुरू करण्यापूर्वी कंपनीच्या नियमानुसार पर्सनल डिटेल्स, बॅंक डिटेल्स , एक फोटो आणि सही स्कॅन करून दोन दिवसांत सबमिट करण्यास सांगितलं होतं.. त्यांनंतर कंपनीतर्फे लॉग-इन आयडी आणि पासवर्ड देण्यात येईल असे कळविण्यात आले होते.. चला बरं झालं.. असं म्हणून तिनं सुटका झाल्याचा नि: श्वास सोडला.. उठून तोंडावर पाणी मारलं..

मनीषाची आंघोळ झाली होती.. तिला अर्चनाने आजीची तब्ब्येत जास्त बिघडल्यामुळे आप्पा तिकडे गेल्याचं सांगितलं.. कंपनीचा मेल आल्याचं सुद्धा सांगितलं..म्हणाली..

“मने.. तू चहा घे आणि माझे सर्व डिटेल्स स्कॅन करून ठेव.. तोपर्यंत मी नाश्त्याला पोहे बनवते.. “
“ए..! दिदी.. मला नाही आवडत ते पोहे.. तुला माहित आहे ना..”

“मने.. घरात तू एकटी नाही आहेस.. आजी आजोबा पण आहेत.. त्यांचा विचार करायला हवा की नको?”
“मग ठीक.. आहे.. मला मॅगी बनवून दे..”
“मने..तू म्हणजे ना.. वैताग आहेस..तुला काय पाहिजे ते तुझं तू बनवून घे… मला बॅंकेत जायचं आहे…”

आजची सकाळ अर्चनासाठी थोडी त्रासदायकच ठरली होती.. घाईगडबडीत कसं तरी ती बॅंकेत जायला निघाली.. नेहमीप्रमाणे पोलिसांनी अडवले.. तेव्हा तिने पोपटराव पवारांची मुलगी असून बॅंकेत जात असल्याचे सांगितले.. आज मात्र तिला पोलिसांनी जाऊ दिले.. बॅंकेत जाऊन तिने पैसे भरून पास बुक , चेक बुक घेतले.. सगळं काम पूर्ण करून ती अर्धा पाऊण तासात घरी आली..मनीषाने नाश्ता करून जेवणाची तयारी करून ठेवली होती.. ते पाहून तिला बरं वाटलं.. तोंडावर पाणी मारून ती म्हणाली..

“मने.. सगळ्या डॉक्युमेंट्स स्कॅन केल्या असतील तर चल ये इकडे.. सगळे डिटेल्स अपलोड कसे करायचे ते बघून घे.. तुझे डिटेल्स तुलाच अपलोड करायचे आहेत.. “

मनीषा काहीच बोलली नाही.. तेव्हा अर्चना तिला म्हणाली..
“अगं..अशी गप्प का.. चल ये लवकर..”
मनीषा आली. तिच्या डोळ्यात पाणी पाहून अर्चना म्हणाली..
“काय झालं गं.. डोळ्यात पाणी का..मी बोलल्याचं वाईट वाटलं का.. की अजून काही घोटाळा करून ठेवलाय..?”
“दिदी..!” म्हणून मनीषा तिच्या गळ्यात पडून रडू लागली..तिच्या पाठीवरून हात फिरवीत अर्चना म्हणाली ..
“अगं.. असं काय करतेस.. काय झालंय ते तरी सांगशील का ?”
“दिदी.. आप्पांचा फोन आला होता.. आपली आजी… गेली..”

अर्चनाच्या काळजात धस्सं झालं.. डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या.. पोरींना रडताना पाहून आजी आजोबा आले.. आजी म्हणाली..
“ए..पोरीनो..काय झालं गं.. रडाया का लागल्यात ?”
अर्चनाने तिला घडलेली घटना सांगितली.. आजी आजोबा दोघेही गप्प झाले.. पोरींना जवळ घेतलं.. आजोबा म्हणाले..
“आरचे.. देवानं ज्याला जेवढं आविष्य दिलंय तेवढंच जगता येतंय.. आज ना उद्या कव्हा तरी परतेकाला जावंच लागतंय.. कोणी मागं… कोणी पुढं.. तुझ्या बापाला फोन लावून दे.. म्या बोलतो त्याच्याशी..”

अर्चनाने फोन लावला.. पण फोन उचलला गेला नाही..ती आजोबांना म्हणाली..
“बाबा .. मामा फोन उचलत नाही..”

“बरं..राहू दे.. दवाखान्यात हायेत का घरी हायेत कोणाला ठावं.. थोडा येळ थांब.. तिकडून काही फोन येतोय का पाहू.. “
तासभर उलटून गेला तरी फोन आला नव्हता.. तिने पुन्हा एकदा फोन लावला.. यावेळी मात्र फोन बंद असल्याचा मेसेज आला.. तिचा अगदी नाईलाज झाला.. काहीही करता येत नव्हतं.. दुपारी तिला आठवण झाली..आज सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत.. मनावर दगड ठेवून ती उठली.. लॅपटॉप चालू केला.. पंधरा वीस मिनिटांत सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्या.. भावनांच्या विश्वावर कर्तव्याने कुरघोडी केली होती.. आजी आजोबांना जेवण द्यायचे होते.. शांतपणे तिनं जेवण तयार केलं.. आजी आजोबांना जेवण वाढलं.. आजोबा म्हणाले..

“आगं..पोरी..तोंडात घास तरी जाईल का.. तिकडून काही फोन पण येईना झालंय..”
“बाबा.. तरीही तुम्ही जेवून घ्या.. उगाच आणि तुम्हाला काही त्रास व्हायला नको..”
संध्याकाळचे पाच वाजले होते.. उन्हं उतरली होती.. वातावरणात एक नि: शब्द उदासपण भरलं होतं.. आणि फोनची घंटी वाजली.. फोन

मामाचा होता.. तिने फोन घेतला..
“हॅलो..”
“हां..दिदे.. आम्ही आताच दवाखान्यातून आलोय.. पुढलं समदं कराया येळ लागंन.. मला यायला उशीर व्हईल.. आई आन् बाबाला जेवण दिलं का न्हाई..?”
“आप्पा.. जेवण दिलं होतं पण ते जेवले नाही… मी बाबांना फोन देते तुम्हीच सांगा.. “ आसं म्हणून तिनं आजोबांना फोन दिला..

“हां.. दादा.. म्या आप्पा बोलतोय.. मला यायला उशीर व्हईल.. आर्ची म्हणली तुम्ही आजून जेवले न्हाई..तुमचे औषधं चालू हायेत.. जेवून घ्या.. उगा आणि काही त्रास झाला मग काय करायचं..? तुम्ही जेवा .. पोरींना बी जेवायला सांगा..आता उपाशी राहून काही व्हणार न्हाई.. आन् इकडं कोणाला येता बी येणार न्हाई… ठिवतो..

अनपेक्षितपणे एक दिवस आला.. मनावर आघात करून डोळ्यात अश्रू देऊन गेला.. ज्या आजीच्या हाताने चिऊकाऊचा घास भरवला होता तिचं शेवटच्या क्षणी तोंडही पाहता आलं नव्हतं.. आईला धीर देताना तिचे डोळे पुसता आले नव्हते.. माणसाने माणसांसाठी बनविलेल्या कायद्यांनी चारी वाटा रोखून धरल्या होत्या.. तिथं भावना कवडीमोल ठरल्या होत्या.. मध्यान्ह रात्री उशिराने आप्पा घरी परतला.. पोरींना, आईबापाला धीर देऊन दिवस उजडायच्या आत पुन्हा परत गेला..
दोन तीन दिवस असेच गेले.. आप्पानं अर्चनाला विचारलं..

“दिदे.. तुझ्या त्या कामाचं काय झालं..? काही व्हणार हाये का न्हाई..?”
“आप्पा सगळे डिटेल्स पाठवले होते..पण दोन तीन दिवसांत तिकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही.. “
“बघून..घे.. काही झालं तर बरं व्हईल.”
“ठीक आहे.. बघते वेळ मिळाल्यावर..”
“आगं.. तुला येळ नसंन तर मनीला जमत आसंन तर तिला सांग..काही तरी लवकर झालं तर बरं व्हईल.. पुढले दिस लई आडचणीचं आसतील आसं वाटाया लागलंय.. “
“बरं… बघते मी..”

तिने हातातलं काम बाजूला ठेवून लॅपटॉप चालू केला.. मेल आला होता.. सर्व डिटेल्स योग्य असल्याचे कळविण्यात आले होते.. लॉग-इन आयडी आणि एक टेम्पोररी पासवर्ड देण्यात आला होता.. लॉग-इन केल्यानंतर पासवर्ड बदलण्यास सांगितले होते.. पुढील कामाचे पाच पेज पाठविण्यात आले होते.. पहिला हप्ता रोज पाच पेज देण्यात येतील असं सांगून ते रोजच्या रोज टाईप करुन द्यायचे होते.. ती म्हणाली..
“आप्पा काम तर मिळालंय.. पण आजीच्या अचानक जाण्याने खूप टेन्शन आलंय.. काम पूर्ण करून देता येईल की नाही .. शंका आहे..”
“दिदे.. आवचित माणूस गेल्याचं दुख समद्यास्नी व्हतंय.. पण जलम आन् मरणावर कोणाचं काही बी चालत न्हाई.. उरावर दगड ठिवून पुढं चालाया लागतंय.. त्वा त्या कामाकडं ध्यान दे.. बाकीचं घरातलं मनी आन् म्या बघतो.. “

अर्चनाने लॉग-इन करून पासवर्ड बदलला.. तास दीड तासात पाचही पेज टाईप केले.. सबमिट करण्यापूर्वी एकदा चेक केले.. कुठं काही चुकलेला दिसलं नाही.. म्हणून पाचही पेज सबमिट केले…

अर्चनाला कंपनी कडून रोज पाच पेज पाठविण्यात येत होते.. ती तास दोन तासात टाइप करून सबमिट करीत होती.. आठवडा उलटून गेला.. आणि मोबाईल वर एक दिवस बॅंकेचा मेसेज आला..२८०० रुपये खात्यात जमा झाले होते.. रोज पाच प्रमाणे एकूण पस्तीस पेज चे २८०० रुपये मिळाले होते.. पोपटराव सासूच्या तेराव्याला गेले होते.. संध्याकाळी परत आल्यावर अर्चनाने त्यांना २८०० रुपये मिळाल्याचे सांगितले..
“दिदे.. आगं.. चांगलं काम हाय की हे.. बरं झालं त्वा मनावर घेतलं.. म्हणून झालं.. पण मग ते कंपनीवाले रोज पाचंच पानं का देत्यात ? निदान वीस पंचवीस तरी द्या की म्हणावं.. म्हणजी दोघींचे मिळून रोजचे चाळीस एक पानं तरी व्हतील.. दिदे.. रोज चाळीस पानं केले तर महिन्यांकाठी किती पैसे मिळतील ?”

“अं…रोज चाळीस म्हणजे..तीस दिवसांचे बाराशे पेज.. म्हणजे जवळपास ९६ सजार होतील..”
“अरे.. व्वा..! म्हणजी तीन चार महिन्यांत तुझ्या लग्नापुरते सहज जमा व्हतील.. तुम्ही दोघी बी कामाला लागा.. आजी आन् म्या मिळून घरातलं समदं काम करतो.. तुम्ही दोघी काय बी करू नका.”.

“अहो आप्पा.. मी घरातलं काम करून सुद्धा तेवढे पेज टाइप करू शकते . तुम्ही अजिबात काळजी करू नका..”
“बघ.. तुला जमंल तसं कर..पण तशी काय आडचण वाटली तर लगेच मला सांग.. घरातलं जे काही काम आसंन ते म्या करीन..”

दुसऱ्या हप्त्यात कंपनीने रोज दहा पेज पाठवले.. अर्चनाने ते रोजच्या रोज टाइप करून सबमिट केले.. या हप्त्यात सत्तर पेजचे ५६०० रुपये मिळाले.. आजीच्या जाण्याचं दुःख हळूहळू कमी होऊ लागलं होतं.. तिसऱ्या हप्त्यात रोज वीस पेज पाठविण्यात आले होते.. अर्चना सकाळी लवकर उठून घरातलं रोजचं काम आवरून घेत होती.. दहा अकरा वाजता बसून चार पाच तासात काम पूर्ण करून सबमिट करीत होती.. घरात बसून मिळणारं काम आणि त्यातून मिळालेल्या पैशामुळे घर पहिल्या सारखं हसतं खेळतं झालं होतं.. तिसऱ्या आणि चौथ्या हप्त्यात तिला प्रत्येक हप्त्याला अकरा हजार दोनशे रुपये मिळाले होते.. याप्रमाणे एका महिन्यात जवळपास तीस हजार रुपये मिळाले होते…

पोपटरावांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.. लेकीच्या लग्नाला आता काय बी आडचण येणार न्हाई आसं वाटू लागलं.. पाव्हण्यासंग बैठक करायला मनाची तयारी झाली व्हती.. पोरीची आई आन् मामा आले म्हणजी समद्याला बसवून एकडाव चर्चा करायची मग पाव्हण्यास्नी निरोप द्यायचा आसं ठरीवलं..

या महिन्याचा एक हप्ता संपायला आला होता.. ती रोज वाट बघायची.. आज तरी काम मिळेल.. म्हणून पुन्हा पुन्हा लॉग-इन करुन पहात होती..पण अर्चनाला कंपनीनं काहीच काम दिलं नव्हतं..उभारी घेतलेल्या मनाला पुन्हा काळजीनं घेरलं होतं.. ती अशीच नाराज होऊन बसलेली पाहून पोपटराव म्हणाले..

“दिदे.. काय झालं गं.. आसं त्वांड का उतारलंय..?”
“आप्पा .. या हप्त्यात कंपनीनं काहीच काम दिलं नाही..”
“आगं..मग फोन करून इचार की त्यास्नी . आसं डोकं धरून बसल्यावर काम मिळंन का..?”
“आप्पा.. कंपनीचं काम फक्त मेलवर होत असतं.. कंपनी कुणालाही फोन नंबर देत नाही…”
“मग तर आवघड काम हाय.. आशी कशी कंपनी हाये ही..?”
तेवढ्यात फोनची घंटी वाजली.. फोन तिच्या मामाचा होता.. तिने फोन घेतला..
“हॅलो.. हां मामा.. बोला… काय..? उद्या येताय..? आई पण येणार आहे ना..?..हो ठीक आहे मामा.. मी वाट पाहाते..”
“काय झालं गं दिदे..तुझी आई येतीय का?”

“हो आप्पा.. मामा आईला घेऊन उद्या दुपारपर्यंत येतो म्हणाले..”
दुस-या दिवशी सकाळी अर्चनाने नेहमी प्रमाणे कंपनीच्या साईटवर लॉग-इन केलं.. वीस पेजचं काम आलं होतं.. आई यायच्या अगोदर पटकन काम उरकून घ्यावं म्हणून ती म्हणाली…

“मने.. आज तू घरातल्या कामाचं बघ.. कंपनीने वीस पेज पाठवले आहेत.. आई आणि मामा आल्यावर मला वेळ मिळणार नाही.. ते यायच्या अगोदर मला काम संपवायचं आहे.. “

मनीषा हो म्हणाली.. दोघी आपापल्या कामाला लागल्या.. मेव्हणा सासूबाई वारल्यावर पहिल्यांदाच येतोय , त्याच्यासाठी काही तरी गोडधोड जेवण करावं म्हणून पोपटराव गावात गेले.. सामान घेऊन आले. .. दुपारपर्यंत येणारा मेव्हणा पार पाच वाजता आला.. तोपर्यंत अर्चनाने तिचं काम संपवलं होतं.

जवळपास दोन अडीच महिन्यांनी अर्चना आणि मनीषा आईला भेटली होती… आजीची आठवण काढून पुन्हा रडारड झाली.. थोड्या वेळानं सर्वांनी आपापले डोळे पुसले.. एकमेकांना धीर दिला.. मनीषाने सर्वांना चहा दिला.. मग पुन्हा इकडचं तिकडचं बोलणं झालं.. दिवस मावळला होता .. तेव्हा पाव्हणे म्हणाले..

“दाजी.. बरं मग द्या रजा मला..निघतो आता..”
“आवं.. आसं काय करताय.. आजच्या रातीला मुक्काम करा.. तुमच्या तोंडाचा कडूपणा काढू द्या.. सकाळी जावा.. अर्चनाच्या पाव्हण्यांचा महिना दीड महिना आदुगर फोन आला व्हता.. तुळशीचं लगीन झाल्यावर .. लग्नाची तारीख धरायची म्हणत व्हते.. थोडं निवांत बसून चर्चा करु.. तुमच्यासाठी थांबलो व्हतो..”
“बरं.. ठीक हाय.. आमच्या आर्चूच्या लग्नाचं बोलायचं म्हणजी थांबायलाच लागंन.. “
रात्री जेवणं झाल्यावर सगळे बसले.. चर्चा सुरू झाली..
“हां दाजी.. बोला.. तुळशीचं लगीन आठ दहा दिसावर आलंय.. आपली तयारी किती हाये.?”
“तयारी तशी म्हणायला काहीच न्हाई.. पण करू काही तरी.. सक्रातीच्या नंतरची तारीख धरली तर काही तरी करता येईल..”
“दाजी.. लगीन हाय.. एकदा तारीख धरल्यावर मागं फिरता येणार न्हाई.. थोडीफार मदत म्या पण करील.. आईच्या आजारपणात बराच खर्च झालायं..”

“मामा.. तू फक्त माझ्या मागे उभा रहा.. बाकीचं आम्ही बघून घेऊ..”
“आसं नसतंय गं दिदे.. तुला न्हाई कळायचं ते..”

सगळ्या बोलण्यातून सक्रातीच्या नंतरच बैठक करून लग्नाची तारीख धरायची आसं ठरलं..

दुसऱ्या दिवशी कंपनीकडून अर्चनाने पाठविलेल्या डॉक्युमेंट्स मध्ये चुका आढळल्यामुळे परत पाठविण्यात येत आहेत असं सांगितलं होतं.. तिने सर्व डॉक्युमेंट्स डाउनलोड करून पुन्हा तपासून पाहिले.. कुठेही काही चूक झाली नव्हती.. तिने सर्वच्या सर्व वीस पेज पुन्हा टाइप करून सबमिट केले.. आतापर्यंत असं कधीच झालं नव्हतं.. मग यावेळी असं काय झालं तिला समजलं नव्हतं…पण जाऊ दे असेल काही म्हणून तिने दुर्लक्ष केलं…

चार दिवस पुन्हा तिला काम देण्यात आलं नव्हतं.. पुन्हा एक मेल आला..तेच अगोदरचे डॉक्युमेंट्स दोषपूर्ण असल्याने परत पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.. आता मात्र तिचं डोकं गरगरायला लागलं होतं.. सर्व डॉक्युमेंट्स पुन्हा नव्याने टाइप करून सबमिट केले होते.. तरीही दोषपूर्ण कसे असू शकतात… तिने मनीषाला घडलेली घटना सांगितली.. तेव्हा ती म्हणाली..

“दिदे.. आपण दुसऱ्या लॅपटॉप वर टाइप करून पाठवू.. मी माझ्या मैत्रिणीचा लॅपटॉप घेऊन येते.. “
“अगं..पण ते पोलिस तुला जाऊ देणार नाही..”
“मग आपण आप्पांना आणायला सांगू..”

पोपटरावांनी लॅपटॉप आणून दिला.. अर्चनाने पुन्हा सगळे पेज टाइप करून सबमिट केले.. पण चार दिवसांनीं पुन्हा एकदा सर्व डॉक्युमेंट्स परत करण्यात आले.. यावेळी परत पाठविण्याचे कारण मात्र वेगळे दिले होते.. आपण आपले काम पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या लॅपटॉपचा वापर केला असून कंपनीच्या नियमानुसार आपण दोषी आढळून आले आहेत.. आपणास कळविण्यात येते की आपले काम पूर्ण करण्यासाठी आपल्या नियमीत लॅपटॉपचाच वापर करावा असं सुचविण्यात आले होते…

काय करावं.. तिला काही सुचत नव्हतं.. कंटाळून तिने पुन्हा एकदा तिच्या लॅपटॉपवर सर्व पेज टाइप करून सबमिट केले.. आता तरी केलेलं काम स्वीकारलं जाईल असं तिला वाटलं होतं.. पण दुसऱ्याच दिवशी.. पुन्हा मेल आला.. केलेलं काम दोषपूर्ण असल्याने परत पाठविण्यात येत असून.. काळजीपूर्वक काम पूर्ण करून ताबडतोब सबमिट करण्यास सांगितलं होतं…

अर्चना पार वैतागून गेली होती.. म्हणून तिने आता नको ते काम.. म्हणून दुर्लक्ष केले.. नुसतं चुकलंय चुकलंय असं कारण सांगून परत पाठवत आहेत.. काय चुकलंय ते मात्र सांगत नाहीत.. एकदा दोनदा चूक होऊ शकते.. पण पुन्हा सर्व डॉक्युमेंट्स टाइप करूनही काय चुकतंय.. त्यापेक्षा ते कामच नको म्हणून तिने विषय सोडून दिला..

चार दिवस असेच गेले आणि पुन्हा मेल आला.. आपण आपले काम वेळेत पूर्ण करून दिले नसल्याने कंपनीचं नुकसान होत आहे.. देण्यात आलेलं काम लवकरात लवकर पूर्ण करून देण्यासाठी सुचविण्यात आले होते..

अर्चनाला आता या सगळ्या गोष्टींचा वैताग आणि कंटाळा आला होता.. म्हणून तिनं..लक्षच द्यायचं नाही असं ठरवलं.. आज सकाळपासून आजोबांना बरं वाटत नव्हतं.. आप्पा त्यांना डॉक्टर कडे जाऊ या म्हणाले पण काही नाही.. मामूली ताप आणि खोकला आहे .. दोन दिवसात बरं वाटेल असं सांगून डॉक्टरकडे जायला नको म्हटलं होतं..

पण आजोबांचा खोकला आणि ताप वाढतच गेला.. शेवटी आप्पांनी त्यांना जबरदस्तीने दवाखान्यात नेलं.. तिथं त्यांची करोना चाचणी करण्यात आली.. प्राथमिक तपासणीत करोनाची लागन झाल्याची निदान झाल्याने त्यांना दवाखान्यातच अॅडमिट करून घेतलं..
पुन्हा एकदा घरात नैराश्य पसरलं.. पोपटराव वडिलांना भेटायला दवाखान्यात गेले होते.. अडीअडचणीला धावपळ नको म्हणून त्यांनी फोन बरोबर घेतला होता.. दवाखान्याच्या दारात पाय ठेवला आणि फोनची घंटी वाजली… त्यांनी फोन घेतला..

“हॅलो.. हां.. पोपटराव बोलतोय.. “
“हॅलो मी अर्चना पवारशी बोलू शकतो का?”
“व्हय.. म्या तिचा बाप बोलतोय.. अर्चना माझी मुलगी हाय.. “
“ठीक आहे पोपटरावजी.. अर्चनाला फोन देता का.. ?“
“साहेब.. म्या आता दवाखान्यात हाये..घरी गेल्यावर फोन करतो..”
“ठीक आहे.. पण विसरू नका..अर्जंट काम आहे”

फोन ठेवला होता.. अर्चनाच्या कामाबद्दल काही तरी काम असेल म्हणून ते लगेच परत आले.. घरी येऊन त्यांनी अर्चनाला निरोप दिला.. अर्चनानं फोन लावला..

“हॅलो सर.. मी अर्चना पवार बोलतेय..”.
“हा़.. हॅलो अर्चनाजी मी इझी मनी कंपनीतर्फे त्यांचा वकील आनंद शर्मा बोलतोय.. तुम्हाला कंपनीने जे काम दिले होते ते तुम्ही वेळेत पूर्ण करून दिले नसल्याने कंपनीचं आर्थिक नुकसान झाले आहे.. आणि म्हणून कंपनी कॉन्ट्रॅक्टच्या अटी शर्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्यावर भारतीय दंड संहिता कलम ४२० म्हणजे कंपनीची फसवणूक केल्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यात येईल..”

“अहो.. सर पण ते काम तीन वेळा पूर्ण करून दिले होते.. मग माझं काय चुकलं..?”

“मॅडम.. कंपनीने तुम्हाला ते काम बिनचूक पूर्ण करून देण्यासाठी वारंवार सांगितले होतं पण तुम्ही कंपनीला कोणतीही सूचना न देता काम स्वतः च्या जबाबदारीवर थांबवले आहे.. त्यामुळे सगळ्यात अगोदर कंपनीनं तुम्हाला जे पेमेंट केलं आहे ते ताबडतोब परत करा..”

“अहो..सर पण ते पैसे कंपनीने काम वेळेत पूर्ण केले होते म्हणून दिले आहेत..ते का म्हणून परत करायचे..?”

“हे बघा अर्चना मॅडम तुम्हाला कंपनीने कॉन्ट्रॅक्टची कॉपी पाठवली आहे.. ती एकदा वाचून बघा.. आणि उगाच वादविवाद न करता ते पैसे ताबडतोब परत करा.. ठीक आहे.. मी उद्या परत फोन करतो..”

पोपटरावांनी अर्चनाचं बोलणं ऐकलं होतं.. ते म्हणाले..
“काय झालं गं दिदे..?”

“आप्पा .. कंपनीच्या वकीलाचा फोन होता..काम वेळेत पूर्ण केले नाही म्हणून पैसे परत करा म्हणतात.. नाही तर कायदेशीर कारवाई करू अशी धमकी दिली आहे..”

“ए..बाई.. लेकरा परत देऊन टाक त्याचे पैशे.. इकडं बाबा दवाखान्यात पडलाय.. आणि एक डोक्याला ताप नको.. देऊन टाक ते पैसे.. आपून काम केलंच न्हाई आसं समजायचं..”

“आहो.. आप्पा.. पण असं कसं…?”
“दिदे.. का आणि कसं याचा इचार नको करू.. देऊन टाक ते पैशे.. तीस हजारांनं काय माडी बांधून व्हणार हाये का.. ?”.
अर्चनाचा नाईलाज झाला.. तिने पैसे परत केले.. जाऊ दे आप्पा म्हणतात तसं उगाच डोक्याला ताप नको… असा विचार करून ..विषय संपला म्हणून सोडून दिला..

आजोबांना दवाखान्यात अॅडमिट करून आठ दहा दिवस झाले होते.. तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती.. घरातल्या सगळ्यांना आजोबांचं काय होईल म्हणून काळजी लागली होती.. आणि पुन्हा एकदा वकीलाचा फोन आला…

“हॅलो … अर्चनाजी मी आनंद शर्मा बोलतोय..”

“सर.. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पैसे परत केले आहेत..”
“हो ..ते बरं झालं.. मॅडम पण तुम्ही कंपनीला कोणतीही सूचना न देता काम थांबवल्यामुळे कंपनीचं आर्थिक नुकसान झालं आहे.. तुम्ही एक

महिन्यात जवळपास तीस हजार रुपयांचे काम केले होते.. बरोबर..?”
“हो सर.. “

“तर सरासरी महिना तीस हजार रुपये प्रमाणे एक वर्षाचे जवळपास तीन लाख साठ हजार रुपये.. आणि त्याच्यावर १८ टक्के व्याज.. म्हणजे.. जवळपास ६५ हजार .. असे एकूण चार लाख पंचवीस हजार रुपये शिवाय माझी फी पन्नास हजार रुपये.. असं एकूण पावणेपाच लाख रुपयांचं कंपनीचं नुकसान झालं आहे.. ज्याची तुम्हाला ताबडतोब भरपाई करायची आहे..”

“अहो.. सर.. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व पैसे मी परत केले आहेत.. मग हे आणि काय..?”

“हे पहा अर्चनाजी हे सर्व कंपनी कॉन्ट्रॅक्टच्या अटी आणि शर्ती मध्ये नमूद केले आहे.. आणि तुम्ही ते मान्य केले आहे.. “

“सर कोणतं कॉन्ट्रॅक्ट आणि कोणत्या अटी मला काही माहित नाही.. कंपनीने जे पैसे दिले होते ते मी परत केले.. बस्.. विषय संपला..”

“मॅडम .. समजून घ्या असा विषय संपत नसतो.. तुमच्यावर दिल्ली विभागाच्या लालपहाडी पोलिस ठाण्यात कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. त्याची कॉपी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मेल आयडीवर आणि स्पीडपोस्टने पाठवली आहे.. बघून घ्या आणि काय करायचं ते मला लवकर कळवा.. तुमची इच्छा असल्यास मी कंपनीला तडजोडीसाठी विनंती करील..बघा विचार करा आणि तुमचा निर्णय मला दोन दिवसात कळवा.. नाही तर संबंधित पोलिस ठाण्याकडून तुम्हाला अटक करण्यात येईल..”

अर्चनाचं डोकं गरगरायला लागलं होतं.. ती डोकं धरून खाली बसली.. अंगाला दरदरून घाम फुटला होता.. तिच्या आईनं तिला पाणी दिलं.. पण तिला चक्कर आली होती.. ती जागेवरच खाली पडली.. आईनं तिला आपल्या हाताचा आधार देऊन सावरलं होतं.. तोंडावर पाणी मारलं.. थोड्या वेळाने ती शुद्धीवर आली..

पोपटराव दवाखान्यातून घरी आल्यावर त्यांना सगळा प्रकार समजला.. काही तरी भयंकर घडणार म्हणून ते सुद्धा घाबरले.. म्हणले..
“एक तर बाबाला आराम पडंना झालाय.. पाव्हण्यांचा कव्हा बी फोन येईल.. खिशात पैशे न्हाईत..पाच लाख रुपये आणायचे कुठून.. पैशे न्हाई दिले आन् खरंच पोलिस आले तर समदीकडं बदनामी व्हईल.. ही सगळी भानगड पाव्हण्यांच्या कानावर गेली आन् उद्या त्यांनी संबंध तोडले तर..त्वांड दावाया जागा मिळायची न्हाई… “

“आवं.. थोडं शांतपणानं इचार करा.. न्हाई तर तिच्या मामाच्या कानावर घाला.. त्यो करीन काही तरी..”.

“नको.. तुम्ही समदे कुणाकडं एक सबूद बी बोलू नका..पाहू उद्या .. काही तरी करायाच लागंन..”.

रात्री कुणीही जेवलं नव्हतं.. झोप लागली नव्हती.. सकाळी पोपटराव उठून दवाखान्यात गेले.. तिकडची इचारपूस करून थेट सरपंचाकडं गेले..

सकाळी सकाळी पोपटरावला पाहून म्हणले..

“या.. पोपटराव.. काय म्हणतीय बाबाची तब्बेत..”

“सरपंच.. बाबाचं काय खरं न्हाई.. सगळीकडून पीडा घरात घुसलीय.. कामधंदा न्हाई.. हातची शिल्लक पार आटलीय.. पार जीव द्यायची पाळी आलीय..”

“पोपटराव.. आवं समदीकडं तीच त-हा हाये.. च्यामायला त्या चीन्याच्या.. काय बी करत्यात आन् काय बी खात्यात.. यांच्या करणीचे भोग आख्ख्या जगाला भोगाया लागले हायेत..”

“सरपंच.. माझं एक काम करा… मला पाच लाखाची गरज हाये.. कसंही करून माझी गरज भागवा.. न्हाई तर आता जीव द्यायला लागंन..”
“आवं… पोपटराव आसं वाईट वंगाळ बोलू नका.. येळ आलीय.. याच्यातून बाहेर कसं पडायचं त्याचा इचार करा..”

“सरपंच…याच्यातुन तुम्हीच माझी सोडवणूक करु शकतात.. वावर गहाण ठिवा न्हाई तर इकात घ्या.. जे पटंण ते करा..पण मला वाचवा..”
“पोपटराव.. एक काम करा.. म्या तीन एक लाखाची मदत करतो… वावर इकायचं मनातून काढून टाका.. आवं एकदा इकल्यावर परत घेता येत न्हाई..”

“आवं.. पण तुमचे पैशे कव्हा परत मिळतील आता मला काय बी सांगता येणार न्हाई.. आसं करा.. तुम्ही वावर गहाण घ्या.. आता व्हईल तेवढे पैशे द्या.. बाकीचे महिन्यानं द्या…”

सरपंचाकडून तीन लाख रुपये घेऊन पोपटराव घरी आले.. अर्चनाला म्हणले..वकीलाला फोन लावून दे.. तिनं फोन लावून आप्पाकडं दिला…

“हॅलो.. वकील साहेब म्या पोपटराव बोलतोय..”

“बोला.. बोला.. पोपटराव.. “

“साहेब.. तुम्ही अर्चनाला जी रक्कम सांगितलीय.. तेवढी न्हाई देता येणार.. म्या गरीब शेतकरी हाये.. बापाला करुना झालाय.. त्यो दवाखान्यात आडमिट हाय.. साहेब तुमच्या पाया पडतो.. साहेब काही तरी कमी करा.. दया करा साहेब.. पोरीचं काय चुकलं मला समजत न्हाई.. तरी बी म्या तुमची माफी मागतो.. तुमच्या पोरीवाणी हाय.. लेकराची चूक पदरात घाला.. म्या तुमचे उपकार जलमभर इसारणार न्हाई…” बोलता बोलता पोपटरावचा हुंदका फुटला..

“पोपटराव… पोपटराव.. ऐका ऐका.. रडू नका.. मी तुमच्यासाठी करतो काही तरी.. ऐका.. जर रक्कम तुम्ही आज उद्या भरणार असतील तर माझी फी आणि व्याज माफ करू शकतो…”

“साहेब.. ते समदे कापून किती व्हतील तेवढं सांगा ना..”

“पोपटराव…माझी फी पन्नास हजार आणि व्याजाचे पासष्ट हजार असे एकूण एक लाख पंधरा हजार कमी होतील.. म्हणजे उरलेले तीन लाख साठ हजार रुपये हजार रुपये भरावे लागतील..”

“साहेब.. आता हे तीन लाख साठ हजार रुपये कशे काय झाले मला काय बी समजत न्हाई.. साहेब .. एक काम करा… म्या तीन लाख रुपये देतो..तेवढे घ्या आन् इषय मिटवून टाका.. गरीबावर दया करा साहेब.. याच्या उपर एक रूपया बी ज्यादा देता येणार न्हाई.. “

“अं..ss.. चला मी प्रयत्न करून बघतो..पण तीन लाख रुपये आजच्या आज भरले तरच मला कंपनीला काही सांगता येईल..”
“व्हयं.. आजच भरतो साहेब…”

पोपटराव तडक बॅंकेत गेले.. तीन लाख रुपये भरुन.. वकील साहेबांना फोन करून सांगितलं… आणि.. सुटकेचा निःश्वास टाकला…पोरीची आब्रू वाचली .. पाव्हण्यांच्या हाता पाया पडून लगीन एक वरसासाठी पुढं करायला सांगू..आसा इचार करून देवाला हात जोडले..

–- राजेश जगताप 

राजेश जगताप
About राजेश जगताप 5 Articles
मी एक नवोदित लेखक आहे. माझ्या कथा नियमितपणे "बोलती पुस्तके by Patil sir" या युट्यूब चॅनल वर ऑडिओ स्वरूपात सादर केल्या जातात.. माझे " विळखा The Trap " आणि " आनंदी " हे दोन कथासंग्रह प्रस्तावित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..