नवीन लेखन...

गोष्ट_जगातल्या_सर्वकालीन_सर्वोत्कृष्ट_सिनेमाची

मित्रहो तुमच्या मते जगातला आजवरचा सर्वोत्तम सिनेमा कोणता असावा ? विचारात पडलात ना? चला आपण एक प्राथमिक यादी काढूत.. Godfather, Shawshank Redemption, 12 Angry Men, Schindler’s List, Vertigo , Casablanca
Pulp Fiction, Life is Beautiful, Bicycle Thieves, Rashoman, Pather Panchali…
बाप रे..!! नाही नाही… हे सिनेमाचे नाव नाहीये. फक्त वरील यादी करतानाची ही माझी झालेली अवघड स्तिथी आहे.
खरंच आहे. ..
जिथे सर्वोत्तम दहा सिनेमांची यादीच बनवणे मुळात अवघड, तिथे सर्वकालिक सर्वोत्तम सिनेमा ठरवणे किती अवघड ना?
आपल्यापैकी प्रत्येकाचे आवडते चित्रपट वेगवेगळे असतील..शंकाच नाही. या विषयावर उहापोह करताना सहजीच सामोरे येणारे काही प्रश्न असे आहेत..
सर्वोत्तम सिनेमा ठरवण्याचे निकष काय? हे ठरवणार कोण? १८९१ साली आलेल्या जगातल्या पहिल्या चलचित्र सिनेमाची तुलना २०२१ साली आलेल्या अलिकडच्या सिनेमाशी कशी होउ शकेल, व ती सफरचंदाशी सफरचंद (apple to apple) अशी तुलना होउ शकेल का?
काल सुसंगत, सिनेमाच्या तंत्रात होत गेलेले बदल, प्रगती,वेग लक्षात घेउन, हा सिनेमाचा १३० वर्षांचा कालखंड time lapse या तंत्राने आकुंचन (shrink) करुन पाहिला तर आपल्याला आजवरचा सर्वोत्तम सिनेमा सापडेल का? माझ्या मते, हो…!!
मी माझ्या परिने तो शोध घेतला व मला माझ्यासाठी तरी याचे उत्तर मिळाले..
कठल्याही टॉप १०० सिनेमांच्या यादीत हमखास पहिल्या दहात असणारा, rotten tomatoes च्या tomato meter वर चक्क ९९ चा स्कोअर असणारा (दोन वर्ष आधी पर्यंत तो १०० होता), १९४० च्या दशकापासून, प्रत्येक दशकातील पत्रकार, फिल्ममेकर आणि सिने रसिक यांना घेउन केलेल्या प्रत्येक महत्वाच्या survey मधे ज्या सिनेमाने कायमच आपली वर्णी ला्वलीय आणि १९४१ मधे प्रदर्शित होउनही आज ८० वर्षांनीही तितकाच relevant आहे तो हा सिनेमा म्हणजे
Citizen_Kane
होय..सिटीझन केन हा सर्वकालिक सर्वोत्तम सिनेमा का आहे हे आपण अगदी विस्ताराने पाहणार आहोत. लेख थोडा मोठा आहे. तेंव्हा सवड काढूनच वाचायला घ्या ही विनंती.
पार्श्वभूमी
‘सिटीझन केन’ हा सिनेमा जगप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक ऑर्सन वेलेस (Orson Welles) याचा पहिला सिनेमा, जो त्याने वयाच्या केवळ पंचविसाव्या वर्षी बनवला होता. ऑर्सनने त्याआधीच रेडिओवर खूप प्रसिद्धी मिळवली होती. याचे कारण सुप्रसिद्ध लेखक H G Wells यांच्या The war of the world’s या नावाच्या कादंबरीचे रेडिओवर नाट्य रुपांतर करुन ऑर्सन ने १९३८ मधे आपल्या सहका-यां समवेत ते ब्रॉडवे वर सादर केले आणि त्या रेडिओ-शो ला जबरदस्त प्रसिद्धी मिळाली. त्याचे ह्या यशामुळे लागलीच त्याला हॉलीवूडच्या त्यावेळच्या स्टुडिओज कडून सिनेमा बनवण्यासाठी ऑफर येउ लागल्या. १९३९ मधे त्याने RKO Pictures या स्टुडियो बरोबर contract केला व अशा त-हेने सिटीझन केन ची मुहुर्तमेढ रोवली गेली.
‘मला हवा तसाच व मला हव्या त्या कलाकारांना घेउनच मी हा सिनेमा बनवेन तरच मी ह्या कॉन्ट्रैक्टवर सही करतो’ ही ऑर्सन ने घातलेली अट स्टुडिओ व निर्मात्यांनी मान्य केली होती, जी त्या काळी हॉलीवूडमधे बरीच दुर्मिळ घटना होती. त्या प्रमाणे ऑर्सनला या सिनेमासाठी पूर्ण मुभा (free hand) मिळाला, ज्याचा त्याने पूर्ण फायदा घेतला व आपल्या स्वप्नातल्या कलाकृतीला सत्यात साकार केले.
सिटीझन केन मधील मुख्य व्यक्तिरेखा चार्ल्स फॉस्टर केन (Charles Foster Kane) ही अमेरिकेतील त्या काळातील वृतपत्रांच्या राज्यातील मोठे प्रस्थ, विल्यम हर्स्ट (William Randolf Hearst) याच्या आयुष्यावर आधारीत होते हे एक उघड गुपीत होते, जरी स्वतः ऑर्सनने या गोष्टीचे सुरवातीला अनेक वर्षे खंडन केले होते. विल्यम हर्स्टनी १८८७ मधे न्युयार्क मधे फक्त एका वृतपत्राने सुरवात करुन काही वर्षातच अमेरिकेच्या प्रत्येक शहरातून एक अशी तब्बल तीस वृतपत्रे, अनेक नियत कालिके व काही रेडिओ स्टेशन असा आपला अफाट पसारा वाढवला. तो राजकारणातही सक्रीय होता. चार्ल्स केन ही व्यक्तीरेखा बरीचशी विल्यम हर्स्ट शी साम्य सांगणारी असल्याने हर्स्टला या सिनेमाच्या विषयाची कुणकुण लागताच, हा सिनेमा बनू नये यासाठी त्याने बरेच प्रयत्न केले, ऑर्सन वर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा बराच दबाव आणला. पण या दबावासमोर न झुकता ऑर्सन ने १९४० मधे या सिनेमाचे शूट पूर्ण केले व १९४१ मधे दुस-या महायुद्धाच्या छायेत (तोवर अमेरिका युद्धात उतरली नव्हती) हा सिनेमा प्रदर्शित केला.
हर्स्ट ने व त्याच्या सहकारी पत्रकारांनी दबाव आणल्याने वृतपत्रांमधून, रेडिओवरुन या सिनेमाला कसलीच प्रसिद्धी मिळू शकली नाही. त्यामुळे या सिनेमाला अमेरिकेत माफकच यश मिळू शकले व सिनेमा लवकरच सिनेमागृहांमधून व लोकांच्या मनातूनही नाहीसा झाला. युरोपमधे युद्ध सुरु असल्याने तिकडे तो सिनेमा पोहोचणे व रिलीज होणे शक्यच नव्हते. पण या सिनेमाने अमेरिकन समिक्षकांच्या मनामधे मात्र घर केले व जिथे होइल तिथे या सिनेमा बद्दल चर्चा घडवून आणणे या समिक्षकांनी चालू ठेवले.
१९४६ साली युद्ध संपले व अखेर हा सिनेमा युरोपात पोहोचला. त्यावेळी नवशिक्या असलेले (पण नंतर मोठे नाव झालेले) फ्रेंच फिल्म समिक्षक आंद्रे बझीन यांनी या सिनेमाच्या प्रिमीयरनंतर एक on the spot समिक्षात्मक भाषण या सिनेमावर केले. त्यांनी या भाषणातून हा सिनेमा म्हणजे विश्व सिनेमासाठी एक turning point असल्याचे ठासून सांगितले. पुढे १९४७ मधे बझीन ने ‘The Technique of Citizen Kane’ हा त्यांचा आता जगप्रसिद्ध असलेला समिक्षणपर लेख लिहीला व सिटीझन केन ला जगभरातील समिक्षक व चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम केले. ‘सिटीझन केन’ ची हवा फ्रान्स मधून सुरवात होउन पूर्ण युरोपभर वाहु लागली. पुढे अनेक वर्ष बझीन ने सिटीझन केन बद्दल प्रत्येक फिल्म विषयक चर्चासत्रात त्याच्या फिल्म मेकिंग स्टाईलची उदाहरणे दिली. हा एक वेगळी वाट चोखाळणारा (path breaking) सिनेमा असल्याचे सप्रमाण सिद्ध केले.
अमेरिकेत मात्र सिटीझन केन चे पुनरुज्जीवन व्हायला १९५६ साल उजाडले. आंद्रे बझीन च्या लिखानाचे पडसाद अमेरिकेतही उमटू लागले. एंड्र्यु सैरिस (Andrew Sarris) या अमेरिकन समिक्षकाने १९५६ साली या सिनेमावर लेख लिहून ‘जगातला सर्वोत्कृष्ठ सिनेमा’ म्हणून याची नोंद केली व अमेरिकन जनता या सिनेमा बाबत जागृत झाली.
त्या दरम्यान विल्यम हर्स्ट चे १९५१ मधे निधन झाले होते. त्यामुळे सिटीझन केन पुन्हा नव्याने अमेरिका व युरोपमधे रिलीज करण्यात आला व यावेळी मात्र समिक्षकांबरोबरच सिनेमाला लोकांचे भरभरुन प्रेम मिळाले.
पुढे अनेक दशके समिक्षक, प्रेक्षक व फिल्म मेकर्स यांच्याकडून जितक्यांदा म्हणून सर्वोत्तम सिनेमांबाबत कल (survey) घेण्यात आला..त्या प्रत्त्येकात ‘सिटीझन केन’ला वर्षानुवर्षे, दशकानु दशके, नेहमीच वरच्या श्रेणीत पहिल्या दोन किंवा तीन क्रमांकात स्थान मिळत आलय..तब्बल आठ दशके. इतकी वर्षे रसिकांच्या व समिक्षकांच्याही मनावर अधिराज्य करावे असे काय होते या सिनेमात?
चला पाहुया…
कथानक
झैनाडू (Xanadu) या आपल्या राजमहालासम प्रासादात, खंगलेल्या, थकलेल्या अवस्थेत वयोवृद्ध चार्ल्स फॉस्टर केन अखेरचा श्वास घेतो. त्याच्या हातात असलेले स्नो ग्लोब (आतमधे बर्फाचा आभास निर्माण करणारा काचेचा चेंडू) त्याच्या हातातून पडून घरंगळत जाउन फुटतो.
मरताना त्याच्या ओठांवर दोन रहस्यमय शब्द असतात ‘रोज बड’ (Rose Bud). वर्तमानपत्राच्या विश्वातला एके काळचा राजा होता केन. अगदी ‘मिडीया मोगल’ म्हणावा असा. त्याच्या मृत्युनंतर त्याच सा-या वर्तमानपत्रातून ही बातमी झळकते. सिनेमात यानंतर विल्यम केनच्या आयुष्यावर एक न्यूजरिल दाखवली जाते. (आपल्याकडे पूर्वी सिनेमा आधी दाखवायचे तशी) या मधे केनच्या आयुष्याची वाटचाल व त्याच्या आयुष्याला कलाटणी देणा-या घटनांची उकल केली जाते. या न्यूजरिल मधे केनच्या आयुष्याचा धावता आढावा घेतला जातो.
आयुष्यभर आपल्या वर्तमानपत्रातून सनसनाटी बातम्या (sensesationalism) देत आपल्या दैनिकांचे खप वाढवणा-या चार्लसचा स्वतःचा मृत्यु देखील तितकाच सनसनाटी असतो. एकतर त्याने जे मनस्वी आयुष्य व्यतित केले तेच मुळात कोणत्याही सामान्य व्याखेत बसणारे नव्हते.
आपल्या आयुष्यात त्याने त्याला जे पटले तेच केले, त्याला हवे ते सर्व मिळवले. त्याने आयुष्यभर गोळा केलेली प्रचंड संपत्ती. हजारो दुर्मिळ पुतळे, कलात्मक वस्तू, उच्च जातीचे घोडे, प्राणी संग्रहालय बनू शकेल असे शेकडो प्रकारचे प्राणी आणि सर्वात कडी म्हणजे शेकडो एकर इस्टेटीवर उभे असलेले त्याचे वैभवी निवास स्थान, झैनाडू.
हे सर्व वैभव असणारा केन, शेवटी त्याच्या या अंतीम क्षणी मात्र एकटाच होता. त्याच्याबरोबर आपले म्हणावे असे कोणीच नव्हते. फक्त त्याच्या ओठावर त्या शेवटच्या क्षणी ते शब्द होते..’रोज बड.’ केनच्या या शेवटच्या शब्दाचा अर्थ काय असावा यावर बरीच चर्चा होत होती. त्यामुळे न्युजरिल बनवणारे संपादक त्यांच्याकडील सर्वात हुशार संशोधक पत्रकार (investigative journalist) जेरी थॉमसन वर ही जबाबदारी सोपवतात. ‘रोज बड’ या शब्दाचा छडा लावण्याच्या कामगिरीवर जेरी थॉमसन निघतो.
खरे तर केनचे आयुष्य हे उघडे पुस्तक असते. प्रेक्षक म्हणून आपल्यालाही त्याच्या आयुष्यात ‘काय’ घडलय हे आधीच त्या न्यूजरील मधून कळालेले असतेच. पण ते तसे ‘का’ घडले याचा उलगडा आपल्याला जेरी थॉमसन च्या ‘रोज बड’ चा अर्थ शोधण्याच्या या प्रवासात ह़ोत जातो.
जेरी सर्वात आधी केनच्या दुस-या बायकोशी, सुजन एलेक्जेंडर केनशी (Susan Alexander Kane) बोलायचा प्रयत्न करतो. पण ती पूर्णपणे दारुच्या आहारी गेलेली असते व त्याला धुडकावून लावते. जेरी मग केनच्या संपत्तीचा पहिला ट्रस्टी वॉल्टर थैचर (Walter Thatcher) च्या आत्मचरित्रात्मक लिखानाचा अभ्यास करतो. नंतर तो केनचा बिझनेस मैनेजर बन्सटीन(Bernstein) याच्याशी सविस्तर बोलतो. त्यानंतर तो केनचा लहाणपणापासूनचा परम मित्र, जेड लेलैंड (Jed Leland), जो मध्यंतरी तात्विक मुद्दयांवरुन केनपासून दुरावलेला असतो, त्याला शोधून त्याच्याशी आपल्या मित्राच्या आयुष्याविषयी बोलतो. सरते शेवटी सुजनलाही तो बोलायला तयार करतो व ती देखील केनशी लग्न करुन त्याला सोडून जाईपर्यंतचा इतिहास जेरीला सांगते. या सर्व मुलाखतींमधून व अभ्यासातून चार्ल्स फॉस्टर केन या अवलिया व्यक्तिमत्वाचा उलगडा आपल्याला हळूहळू होउ लागतो. वेगवेगळे तुकडे जोडत जसे एखादे मुल कोडे (jig saw puzzle) सोडवते, तद्वतच जेरी ‘रोज बड’ या केनच्या शेवटच्या शब्दांचे कोडे सोडवण्यासाठी हे तुकडे जोडत राहतो. जेरीच्या या प्रवासात आपल्यासमोर चार्ल्स केनचा जिवनपट अलगद उलगड जातो.
केनच्या लहाणपणी तो एका खेड्यात आपल्या आई वडिलांबरोबर खूप आनंदात रहात असतो. पण अचानक या कुटुंबाचे भाग्य बदलुन जाते व त्यामुळे छोट्या चार्ली केनचे आयुष्य देखील. चार्लीच्या आईला, मेरी केनला, एका तारण म्हणून मिळालेल्या जमीनीत खणताना तिथे सोने सापडू लागते व ती जमीन ख-या सोन्याची खाण असल्याचे सिद्ध होते. गरिबीचे व अशिक्षीतपणाचे चटके खाल्लेली मेरी मग मोठा निर्णय घेते. न्यू यॉर्कमधे लोकांच्या इस्टेटी सांभाळणारा वॉल्टर थैचरला गावी बोलवून ती त्याच्या बरोबर एक करार करते व या सोन्याच्या खाणीचा एक ट्रस्ट बनवते, जी थैचरची कंपनी पाहणार असते, चार्ली पंचवीस वर्षांचा होइपर्यंत. चार्लीला न्यु यॉर्क ला घेउन जाणे, त्याचा सांभाळ, शिक्षण व पंचविसाव्या वर्षी ट्रस्ट त्याच्या नावे करणे असे त्या करारात लिहीलेले असते. ज्यावेळी चार्लीच्या आयुष्याचा असा सौदा घरात होत असतो तेंव्हा चार्ली मात्र या सा-या गोष्टींपासून अजाण, बाहेर पडणा-या बर्फात आपल्या बर्फाच्या घसरगाडी (sled) बरोबर खेळत असतो. चार्लीची आई त्याला थैचर बरोबर पाठवू लागते तेंव्हा त्याच हातातल्या घसरगाडीने तो थैचरवर चक्क हल्ला करतो कारण त्याला त्याच्या आई वडिलांसोबत तिथेच गावी रहायचे असते. पण शेवटी आई चा हट्ट व थैचर च्या समजावणीने चार्ली आईला गावीच मागे सोडून न्यु यॉर्कला निघून जातो.
शिकून मोठा झालेला पंचवीस वर्षांचा चार्लस न्यूयॉर्कला परत येतो तेच एक वर्तमानपत्र चालवण्याच्या ध्यास घेउन. आपल्या ताब्यात आलेल्या आपल्या इस्टेटीच्या पैशाचा पहिलाच वापर तो एक वर्तमानपत्र खरेदी करुन करतो..आगदी थैचरच्या मर्जी विरुद्ध. या कामी त्याला पाठबळ मिळते ते दोन खास लोकांचे, एक त्याचा शाळा कॉलेज पासूनचा मित्र जेड लेलैंड व दुसरा, त्याचा वैयक्तिक बिजनेस मैनेजर, बन्सटीन. या दोघांच्या सहका-याने तो हे वृतपत्र चालवू लागतो व लवकरच सनसनाटी बातम्यांनी (yellow journalism) आपले वर्तमानपत्र आघाडीवर नेतो. आपल्या वर्तमानपत्राचा विस्तार पूर्ण अमेरिकेत करणे यावर तो आपले पूर्ण लक्ष केंद्रित करतो. आपल्या मिळालेल्या इस्टेटीचा त्याने असा वापर करावा हे थैचरला पटत नाही, त्यांच्यात वाद होतात व थैचर त्याच्या ट्र्स्ट मधून बाजूला होतो.
दरम्यान चार्लीच्या जीवनात एमिली नॉर्टन चे आगमन होते, जी विद्यमान राष्ट्राध्यक्षांची भाची असते. तिच्याशी लग्न झाल्यावर सत्तेच्या जवळिकीचा फायदा अलगदपणे घेत आपल्या वर्तमानपत्रांचा विस्तार तो देशभर करतो. त्यातुनच त्याच्या राजकीय महत्वाकांक्षाही जागा होतात. चार्ली आपल्या वर्तमानपत्राचा वापर करुन आपले राजकारणातले स्थान उंचावत नेतो, ते इतके की काही वर्षातच तो गव्हर्नर होण्याच्या शर्यतीत असतो.
दरम्यान अचानक एके रात्री त्याची भेट सुजन अलेक्जेंडर या मुलीशी होती. सुजन एक उदयोन्मुख, होतकरु ऑपेरा गायिका असते. चार्ली खरंतर आता मध्य वयात असतो. दहा एक वर्षाचा मुलगा असतो त्याला. पण या वयात जी चूक पुरुष करतात ती चार्लीदेखील करतो. तो सुजनच्या आवाजाच्या आणि नकळत तिच्या प्रेमात पडतो. या प्रेमात तो इतका वहावतो की त्याच्या गव्हर्नरच्या निवडणूकीच्या तोंडावर त्याचा प्रतिस्पर्धी हे बिंग फोडतो. सुजनला सोडायचं व निवडणूकीतून माघार घ्यायची हे दोन पर्याय त्याची बायको एमिला व त्याचा प्रतिस्पर्धी जिम गेटीस त्याला देतो. याने त्याचा संसार व त्याची अब्रुचे होणारे धिंडवडे, दोन्ही वाचणार असते. पण चार्ली हा अतिशय अहंकारी माणूस असतो. लोक त्याच्यावर प्रेम करतात, त्याला समजून घेतील या भ्रमात तो दोन्ही गोष्टींना नकार देतो. जिम गेटीस त्याचे सुजन बरोबरचे प्रकरण छापून आणतो आणि त्याचा तोच परिणाम होतो ज्याची एमिलीला भिती असते. लोकांना हे त्याचे प्रेम प्रकरण पसंत पडत नाही. आधी आघाडीवर असूनही तो गव्हर्नर ची ती निवडणूक हरतो. एमिली आपल्या मुलाला घेउन निघून जाते. तो पुढे निवडणूकीला कधीच उभा रहात नाही. त्याची राजकिय कारकिर्द तिथेच संपते.
यथावकाश एमिली व त्याचा घटस्फोट होतो. पंधरा दिवसात तो सुजन बरोबर दुसरे लग्न करुन मोकळा होतो. आपल्या हट्टाला पेटून मग तो सुजनला मोठी ऑपेरा सिंगर बनवायच्या पाठी लागतो. हे फक्त एवढ्यासाठीच की त्याला जगाला दाखवायचे असते की ज्या सुजन साठी मी माझी पहिली बायको, राजकारणातली कारकिर्द, व प्रतिष्ठा पणाला लावली तो माझा निर्णय बरोबरच होता. पण सुजनच्या गायकीला मर्यादा असतात. तिला शिकवणारे संगित शिक्षक वारंवार त्याला सांगतात की तिच्यात तो स्पार्क नाही. पण चार्ली बधत नाही. उलट सुजनच्या पहिल्या शो साठी तो एक नवीन प्रेक्षागृह बांधतो. खूप प्रयत्न करुनही पहिल्याच कार्यक्रमात सुजनच्या मर्यादा उघडया पडतात. त्याचा स्वतःचा मित्र जेड त्या कार्यक्रमाचे नकारात्मक समिक्षण, वर्तमानपत्राच्या त्यांच्या ऑफिसमधे लिहीत असतो. चार्ली तिथे पोहोचून जेडला कामावरुन काढून टाकतो, पण परत मी माझ्या तत्वांशी किती प्रामाणिक आहे हे दाखवण्याच्या नादात तेच नकारात्मक समिक्षण स्वतःच पूर्ण करतो व स्वतःच्याच वर्तमानपत्रात जेडच्याच नावाने छापतो. एकिकडे तो त्याचा बालमित्र जेडला गमावून बसतो, शिवाय सुजन बरोबरच्या त्याच्या संबंधांनाही ग्रहण लागण्याची ती सुरवात असते. त्याच्या हट्टापायी सुजन अऑपेरामधे गात राहते, पण पहिल्याच कार्यक्रमात मिळालेल्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे ती भेदरुन जाते. तिला आत्मविश्वास परत कधीच गवसत नाही व तिचे शो आणखी खराब होत राहतात. शेवटी ती या सा-या नैराश्यातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते व चार्ली नाइलाजाने तिला गाणे थांबवायला परवानगी देतो.
दरम्यान तो आपल्या अलोट संपत्तीचे स्मारक म्हणून काही वर्षात त्याचा राजप्रासाद, झैनाडू (Xanadu) बांधून पूर्ण करतो. तो सुजनला घेउन आता तिथेच राहू लागतो. जगातली सर्व सुखे, शेकडो नोकरचाकर तिथे दिमतीला असतात, पण न्युयॉर्क च्या जीवनाची सवय असलेली सुजन काही महिन्यातच तिथल्या त्या भकास आयुष्याला कंटाळते.
ती चार्लीला न्युयॉर्क ला परत चलण्यासाठी आधी विनंती व नंतर हट्ट करु लागते. पण परत एकदा चार्लीचा अहंकार आडवा येतो. तो परत जायला नकार देतो. शेवटी एक दिवस सुजनला जेंव्हा लक्षात येते की चार्ली स्वतःच्या अतिव प्रेमात आहे व तिचे तिथले अस्तित्व हे फक्त त्याच्यासाठी त्याच्या अहंकाराचा एक भाग आहे, त्यादिवशी मात्र ती त्याला सोडून निघून जाते. तिचे असे तोंडावर निघून जाणे चार्लीच्या मनाला भयंकर लागते व तो रागाने बेभान होत तिच्या बेडरुमची तोडफोड करतो, सगळी बेडरुम अस्ताव्यस्त करतो. फक्त त्याने तिला भेट म्हणून दिलेली तो काचेचा चेंडू, तो स्नो-ग्लोब, मात्र शांतपणे उचलतो व तिथून बाहेर पडतो. तो तिथून जाताना, सारे नोकर चाकर, जे बाहेर घाबरुन उभे असतात, ते त्याला पुटपुटताना ऐकतात तोच शब्द ..’रोज बड’.
काही दिवसांनी चार्ली जग सोडून जातो तेंव्हा हाच स्नो ग्लोब त्याच्या हातून पडून फुटतो, व तेच शब्द त्याच्या तोंडी असतात.. ‘रोज बड’.
#काळाच्या_पुढे_असणारा_सिनेमा
सिटीझन केन हा आठ दशकांनंतरही आजही सिने अभ्यासक, समिक्षक व सामान्य प्रेक्षक यांना का भूरळ घालतो याची काही प्रमुख कारणे आहेत..
१. पटकथा लेखनातील नवा प्रवाह
सुरवात-मध्य-शेवट या धोपट (linear chronological style of narration) मार्गाने जाणा-या सिनेमा ऐवजी, आधी सिनेमाचा शेवट दाखवून मग फ्लैशबैक व्दारे सिनेमा मधील मुख्य व्यक्तीरेखेचा जिवन प्रवास दाखवणे, अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीचे सादरीकरण, मुख्य व्यक्तिरेखेला वेगवेगळ्या व्यक्तींच्या नजरेतून (point of view) दाखवत ते बरोबर की चूक अशी कमेंट न करता ते प्रेक्षकांच्यावर सोडणे असे अनेक क्रांतिकारी बदल या सिनेमात पहिल्यांदाच घडले होते. पटकथा लेखनातील हे अतिशय महत्वाचा बदल करण्याचे धाडस या सिनेमाचे पटकथा लेखक हर्मन मैंकिविक्झ (Herman Mankiewicz) व स्वतः ऑर्सन वेलेस यांनी या सिनेमात दाखवले. यासाठी त्यांना पटकथा लेखनाचे (एकमेव) ऑस्कर मिळाले. अर्थात हे इतके complex narrative, व्यवस्थित साकारेल हे पाहण्याचे काम एडिटर रॉबर्ट वाईज (Robert Wise) यांनी ज्या प्रामाणिकपणे केले त्याला सलाम. त्या काळी हे शिवधनुष्य पेलने धाडसाचे होते. ऑस्कर नॉमिनेशन मिळूनही रॉबर्ट वाइजच्या पदरी मात्र ते पडले नाही.
२. कैमेरा हाताळणी तंत्रातले अमुलाग्र बदल
सिन टेकिंग मधे काही क्रांतिकारी बदल सिनेमाटोग्राफर ग्रेग टोलांडने (Greg Tolland) या सिनेमासाठी केले. टोलांडने अशा काही गोष्टींचा विचार या सिनेमात १९४० साली केला असेल, तर तो माणूस किती दूरदृष्टीचा(visionary) असेल हे आपण समजून जावं.
त्याचे हे खास टेक्नीक्स काय होते ते पाहूयात
Deep or Pan focus :
With pan-focus, the camera, like the human eye, sees an entire panorama at once, with everything clear and lifelike. आज हे तंत्र प्रचंड वापरात असले तरी त्याकाळी खूप नवीन होते व खूप अभावाने वापरले जायचे. दृश्यात अग्रभूमी (foreground), पार्श्वभूमी (background) व दोन्हीच्या मधील गोष्टी या सर्व एकाच वेळी शार्प फोकस मधे असतात. त्यपूर्वी foreground किंवा background यापैकी एकच काही focus मधे असे. Deep focus चा अतिशय सुंदर वापर, सादरीकरण उठावदार करण्यासाठी ऑर्सन वेलेसने टोलैंड कडून या सिनेमासाठी करुन घेतला.
Extremely low angle :
सिनेमात एखाद्या पात्राची भव्यता दाखवण्यसाठी, उठावदार करण्यासाठी low angle camera वापरण्याची पद्धत रुढ आहे. (शोले मधे गब्बरच्या एंट्रीला द्वारका द्वीवेचा यांनी लावलेला low angle लक्षात आहे का?). टोलैंड ने सिटीझन केन मधे extreme low angle चा इतका सफाइदार वापर केलाय की त्या त्या व्यक्तिरेखेला सादर करताना ऑर्सनला त्याचा जबरदस्त फायदा मिळाला. सिनेमातील काही संघर्षाचे सीन, चार्लीच्या आयुष्यातील भव्यता दाखवणारे काही सीन अशा ठिकठिकाणी low angle camera टोलैंड ने कमाल वापरलाय.
याशिवाय अगदी शेवटच्या सिन मधे चार्ल्सच्या त्या सर्व कलात्मक पुतळ्यांच्या व वस्तुंच्या कलेक्शनवरुन कैमेरा वरुन फिरत फिरत (gliding camera shot) शेवटपर्यंत जातो तेंव्हा फक्त त्या सीनमधून ऑर्सन व टोलैंड आपल्याला एकाचवेळी त्यातली भव्यता व जीवनाचा फोलपणा दाखवण्यात व ठसवण्यात यशस्वी होतात.
टोलैंडच्या कैमेरा ऑर्सन वेलेस साठी किती महत्वाचा होता हे यावरुन दिसतं की सिनेमाच्या पाट्यांमधे (credits) त्याने टोलैंड ला स्वतःबरोबर स्थान दिले. Great gesture.
पण एवढे जबरदस्त काम करुन देखील academy ने टोलैंडलाही ऑस्कर दिला नाही. दुर्दैव..ऑस्करचे.
३. ध्वनी (sound) मधील प्रयोग
ऑर्सन वेलेस हा मूळ रेडिओ च्या प्रांतातून आल्याने त्याने सिनेमात ध्वनी विभागात देखील अनेक प्रयोग केले.
Overlapping dialogues, ( एकमेकांना छेदणारे संवाद फेक) Sound perspectives for creating illusion of distances (दुरुन व जवळून येणा-या आवाजातील सुक्ष्म फरक) हे असे काही रेडियोमधे वापरले जाणारे प्रयोग त्याने या सिनेमात वापरुन ध्वनी मधे एक वेगळाच इफेक्ट मिळवला.
सेट मेकींग असो किंवा मेकअप, सगळ्याच प्रांतात हा सिनेमा अभ्यासायला तुम्हाला खूप काही पुरवतो. चार्ल्सच्या जिवनाचा (तरुणपण ते मृत्यु) चाळीस एक वर्षाचा काळ दाखवताना प्रकाश योजना, सेट्समधील कालानुरुप बदल, व सर्वात मुख्य म्हणजे कलाकारांच्या वयाप्रमाणे चेह-यातील बदल देखील इतक्या खुबीने केले आहेत की तरुण चार्ल्सच्या भूमिकेतला देखना ऑर्सन नंतर म्हातारा होतो ते त्याचे म्हातारे होणे (ageing) नैसर्गिक वाटते. इतके कमालीचे काम मेकअप वर देखील झालय या सिनेमात.
सरते शेवटी कलाकारांची निवड देखील ऑर्सन वेलेस ने अशी केलीय की सगळेच आपल्या भूमिकांमधे फिट बसलेत. बहुतेक कलाकार रेडिओ,नाटक या पार्श्वभूमीतून येउन देखील त्यांच्या अभिनयात कुठेही लाउडपणा किंवा कृत्रीमपणा आलेला नाही हे या सिनेमाचे मोठे विशेष आहे.
रोजबड_चे_रहस्य
चार्ल्स फॉस्टर केनच्या तोंडचे शेवटचे शब्द ‘रोज बड’ याचा अर्थ काय हे जेरी थॉमसन ला सापडते का ह्या प्रश्नाचे उत्तर अर्थातच मी देणार नाही.
रोज बड…
केनच्या आयुष्यातील एखाद्या स्त्रीचे नाव असेल का?
त्याने लहाणपणी सोडलेल्या गावाचे नाव असेल का?
त्याच्या पूर्ण न होउ शकलेल्या स्वप्नाची आठवण असेल का?
या प्रश्नांची उत्त्तरे मिळवण्यासाठी प्रत्येक ख-या सिनेप्रेमिने आयुष्यात एकदा तरी हा सिनेमा पाहणे आवश्यक आहे.
अब्जाधीश असणारा चार्लस फॉस्टर केन आपल्या सर्व संपत्तीला मागे सारुन केवळ एक स्नो ग्लोब हाती ठेउन मरुन जातो त्यावेळी त्या शेवटच्या क्षणी त्याला कशाची आठवण झाली असेल बरं? काय स्मरतो माणूस नेमकं त्या क्षणी?
कशाचा खेद, कशाची खंत करीत तो जीव कुडीतून उडून जातो हो?
मित्रहो…
‘रोज बड’ काय होतं याचा उलगडा सिनेमाच्या त्या अगदी शेवटच्या फ्रेममधे होतो..तेंव्हा मात्र पहिल्यांदाच चार्ली केन साठी तुमचं हृदय भरुन येतं. एक आवंढा गळयात येतो..
अन तुम्ही माझ्यासारखे जरासे भावनीक असाल तर…
एखादा अश्रु देखील डोळ्यातून नकळत निसटून जातो..
ते एकदा तरी अनुभवायला हवं मात्र…!!
-सुनिल_गोबुरे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..