नवीन लेखन...

‘चोखोबा’ माझा गणपती!

‘गणपति’ ही देवता सर्वच संतांनी पूजनीय मानलेली आहे. जवळपास सर्वच संतांनी गणेशवंदना केलेली दिसते. पण गणपती आणि संत हा अनुबंध अनेक अर्थांनी विशेष वाटतो. केवळ संतांची गणेश वंदना पाहून नव्हे, तर संत आणि गणपती यांच्यामधील अद्वैताचं नातं प्रतीत होतं म्हणून.

‘चोखोबा माझा गणपती, राधाई महारीण सरस्वती’ असं तुकोबांच्या अभंगातील वचन आहे. अर्थात, हा अभंग गाथेत सापडत नाही, कारण तुकारामतात्या पडवळ यांनी विविध ठिकाणांहून मिळवलेल्या आणि प्रसिद्ध केलेल्या अभंगाच्या गाथेतील हा अभंग. या गाथेत जवळजवळ आठ हजार अभंग सापडतात हे विशेष! अर्थात, त्यातील सर्वच अभंग तुकोबांचे नाहीत हे स्पष्ट आहेच. सदर अभंगाबाबत, तुकोबांचे असे विचार तेव्हाच्या रुढीग्रस्त लोकांना परवडणारे नसल्याने ते वगळले गेले असं मत डॉ. बहिरटांनी व्यक्त केले आहे. शिवाय, असं लिहिण्याची वृत्ती आणि साहस असणारा तुकारामनामधारी एकच कवी मराठीत होऊन गेला आणि तो म्हणजे संत तुकाराम असं डॉ. सदानंद मोरे यांनी म्हटलेलं आहे. चोखोबांच्या बाबतीत असं म्हणणं अगदीच स्वाभाविक आहे. ‘चोखा माझा जीव, चोखा माझा भाव। कुलधर्म देव, चोखा माझा।।’ असं म्हणत नामदेवरायांनी चोखोबांबद्दलचा आदर व्यक्त केला आहेच. संत बंका महाराज देखील ‘चोखा मनाचे मोहन। बंका घाली लोटांगण।।’ असं म्हणतात.

पण इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुकोबांच्या अभंगातील (चोखोबा माझा गणपती) ‘चोखोबा’ म्हणजे मला समस्त संतांचे सूचक वाटतात. कारण महाराष्ट्र भूमीत सर्वांसारखे होऊन नांदलेले, सामान्यातल्या सामान्य लोकांनी सुद्धा पाहिलेले गणपती म्हणजे आपले संतच, नाही का? मुळात, गणपती म्हणजे ‘गणानां पतिः’ अर्थात गणांचा जो पती तो गणपती. इथे, महाराष्ट्र जनांचे पती म्हणजे संतच तर होते! महाराष्ट्र समाज संस्कृतीची घडी सुरळीत करणारे, शतकानुशतकं पुरेल इतकी संस्कारांची रुजवात करणारे, महाराष्ट्र अंतर्बाह्य श्यामलसुंदर करणारे संत म्हणजे खर्या अर्थाने गणपतीच. नाहीतरी, कृपाकरुणेने ओतप्रोत भरलेलं त्यांचं मन-उदर विशाल होतंच यात शंका नाही. प्रामुख्याने वारकरी संत व जवळजवळ इतर सर्वच पंथातील संतांनी महाराष्ट्र संस्कृतीची पताका समर्थपणे सांभाळली, तिच्या योग्य विकास-विलासासाठी दिशा दिली, नीतिमूल्यांचं भान आणि स्वार्थ परमार्थाची सांगड घालून खर्या अर्थाने या भूमीत अमृताचा सुकाळु केला! तोही चिरंतन.. न संपणारा. महाराष्ट्र धर्माची अशी दैदीप्यमान गुढी उभारणारे संत म्हणजे आपल्यासाठी वरदविनायकच.
तुकोबांनी श्री गजाननाचं वर्णन करताना अ, उ आणि म या तीन मात्रा म्हणजे क्रमशः ब्रह्मा, विष्णू आणि महेश असून हा ओंकार (गणपति) हेच तिन्ही देवांचे जन्मस्थान आहे असं प्रतिपादन केलेलं आहे.

सहज वाटतं, की उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही क्रिया संतांठायी, त्यांच्या वाड्मयाठायी सहजी आढळतात. सद्गुणांची (आणि खरंतर सद्गुण जाणिवेची) उत्पत्ती, प्रपंच व परमार्थाची सु-स्थिती आणि दुर्गुणांचा विलय या रूपातून तीनही देव / त्यांचं कार्य संतांठायी दिसून येतं. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे संत साहित्य वाचल्यावर ही तीनही कार्य आपापल्या जीवनात योग्य रित्या पार पाडण्याचं सामर्थ्य अंगी आल्याशिवाय रहात नाही. हे सामर्थ्य तर आहेच, पण त्याहूनही मोठं आणि महत्त्वाचं म्हणजे विवेक बल संत आपल्याला देतात. याही अर्थाने संतांची वाङ्मयमूर्ती म्हणजे ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’.

गणपतीचं अगदी दोन शब्दांत वर्णन करायचं तर सहज सांगता येईल ‘सुखकर्ता दुःखहर्ता’. हाच धागा संतांशी जोडता लक्षात येतं की मंगलकारक आणि अमंगल हारक हे संतांचे देखील गुण आहेतच. ‘कर्माचे डोळे ज्ञान, ते आधी मेळवावे’ हा विवेक असो, किंवा ‘नाही भेदाचे हे काम’ ही जाणीव. ‘काय भुललासी वरलिया रंगा’ हे जागवणारं भान असो वा ‘स्वकर्म कुसुमांची पूजा’ ही प्रेरणा असो किंवा ‘तुझा विसर न व्हावा’ हे मागणं.. सारं काही सुखकारकच आहे. शिवाय, ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ असो किंवा ‘धटासि धट उद्धटासि उद्धट’ अथवा ‘नाठाळाचे माथी हाणू काठी’ असा अगदी परखड पण व्यावहारिक उपदेश असो हे सारं काही सांगून संत दुःखहर्तेच होतात. म्हणूनच महाराष्ट्र गणांचे पती म्हणजे संत! कार्यारंभी आपण ज्याप्रमाणे गणपति पूजन करतो, त्याचप्रमाणे कर्मारंभी संतस्मरणही अगत्याचं आहे. दिशादर्शक, आश्वासक आणि वरद आहे. किंकर्तव्यमूढ झालेल्या व होणार्‍या प्रत्येकाला जवळ घेऊन विवेकाचा पान्हा देणारं आहे.

म्हणूनच तुकोबांच्या अभंगातील ‘चोखोबा’ म्हणजे सर्व संतांचं प्रतीक वाटतात. असा हा गणपति आणि संत यांमधील अनुबंध..
महाराष्ट्र-धर्माचं अधिष्ठान हे संत विचारांमधेच आहे. संत साहित्यावरील चिंतनाची, आणि केवळ चिंतनाचीच नव्हे, तर त्याच्या प्रत्यक्ष आचरणाची परंपरेने आलेली अशी ही गणेशपूजा देखील आपण सर्वांनी निरंतर करत रहावी, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावी, पोहोचवत रहावी, इतकंच!

-पार्थ जोशी
28parthjoshi@gmail.com
( शेअर करण्यास हरकत नाही)

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 370 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..