नवीन लेखन...

‘चक्र’ – कादंबरी ते चित्रपट

मराठीतील अनेक नामवंत लेखकांच्या कादंबऱ्यावरुन आजवर चित्रपट निर्मिती झालेली आहे. तसाच जयवंत दळवी यांच्या ‘चक्र’ या कादंबरीवरुन १९८१ साली ‘चक्र’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्याविषयीचा दळवींना आलेला अनुभव त्यांनी ‘आत्मचरित्राऐवजी’ या पुस्तकातील एका प्रकरणात मांडलेला, माझ्या वाचनात आला. जयवंत दळवी हे माझे अतिशय आवडते लेखक! त्यांचे कथासंग्रह, कादंबऱ्या व नाटके मी वाचलेली आहेत..

लेखक जे आपल्या जीवनात पाहतो, अनुभवतो तेच त्याच्या साहित्यातून मांडले जाते. १९४८ ते १९५० या तीन वर्षांत, दळवी पत्रकारिता करीत होते. त्यानिमित्ताने शिवडी मधील वाडीबंदरला असलेली, रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथवरील झोपडपट्टी दळवींच्या पाहण्यात आली. कधी सकाळी तर कधी दुपारी, रात्री आणि मध्यरात्री सुद्धा ते वळवळणारे जीवन कुठेतरी त्यांच्या मनात ठसले. त्यावरुनच १९६३ साली त्यांनी पहिली कादंबरी लिहिली… ‘चक्र’! ‘चक्र’ प्रकाशित झाल्यावर कौतुकासोबत, त्यावर जोरदार टीकाही झाली. १९६९ साली, ती हिंदी भाषेत अनुवादित झाली. ती कादंबरी वाचून अरूण कौल नावाचा तरुण, दळवींनी भेटायला आला. त्याने कादंबरीवरुन चित्रपट करण्यासाठी दळवींशी पाच हजार रुपयांचा करार केला. सही करताना, त्याने एकवीस रुपये त्यांच्या हातावर ठेवले. दोन वर्ष काहीच हालचाल न झाल्याने दळवींनी त्याला पत्र पाठवले. तो पुन्हा आला व चित्रपट करायचाच आहे, असे सांगून एक हजार रुपयांचा चेक दिला व पुन्हा गायब झाला..

१९७४ साली याच कादंबरीची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित झाली. रवींद्र धर्मराज नावाच्या एका पत्रकाराने, ती वाचली व त्याने जयवंत दळवींना गाठले. त्याने पहिल्या भेटीतच दळवींना सांगितले, ‘या कादंबरीवरुन चित्रपट केल्याशिवाय मी मरणार नाही!’ १९७८ साली, चित्रपटासाठी साडेसात हजार रुपयांचा करार केला गेला. टोकन म्हणून दळवींना, त्याने पांचशे रुपये दिले. एक वर्षानंतर धर्मराज पुन्हा दळवींना भेटायला आला. यावेळी आधीच्या करारामध्ये बदल करुन, तो ‘निओ फिल्म्स’च्या नावाने केला गेला.

काही महिन्यांनंतर दळवी ‘छिन्न’ नाटक पाहण्यासाठी शिवाजी मंदिरला गेले होते. तिथे स्मिता पाटील त्यांना भेटली. तिनेच त्यांना सांगितले की, ‘चक्र’ कादंबरीवरुन चित्रपटाचं शुटींग सुरु झालंय.’ यावर दळवी सहज बोलून गेले की, ‘शुटींग सुरु झाल्यावर धर्मराजने करारानुसार, मला दोन हजार रुपये द्यायला हवे होते.’

स्मिताने, दळवी भेटल्याचे धर्मराजला सांगितल्यामुळे, चारच दिवसात दोन हजार रुपयांचा चेक त्याने दळवींना पाठवून दिला. दरम्यान जयदेव हट्टंगडी व गणेश सोळंकी यांची दळवींशी भेट झाल्यावर, त्यांनी चित्रपट चांगला होतो आहे असे आवर्जून सांगितले. मात्र रवींद्र धर्मराजने दळवींना शुटींग पाहण्यासाठी लोकेशनवर या, असे सांगितले नाही किंवा साधा फोनही केला नाही.

पुन्हा एकदा एका नाटकाच्या मिटींगवेळी दळवींना, स्मिता भेटली. मिटींग झाल्यावर ‘चक्र’च्या डबिंगसाठी निघताना तिने दळवींना विचारले, ‘येताय का माझ्यासोबत? तिथे धर्मराजची भेट होईल.’ दळवी गेले. रवींद्र धर्मराजला, दळवींना भेटून आनंद झाला. डबिंगचे ते रटाळ काम पाहून, धर्मराजची इच्छा असूनही दळवींनी घरी जाणे पसंत केले.

काही महिन्यांनी धर्मराजचा दळवींना फोन आला, ‘चित्रपट पूर्ण झाला असून कलाकारांसोबत एका पार्टीचे आयोजन केले आहे, तुम्ही नक्की या.’ दळवी काही पार्टीला गेले नाहीत. त्याने काही दिवसांनी पुन्हा फोन करुन दळवींना सांगितले की, ‘चित्रपटाचा ‘निमंत्रितांसाठी खास शो’ आयोजित केला आहे, आपण यावे.’ याही वेळेस दळवींना जाता आले नाही. त्या शो नंतर दुसऱ्याच दिवशी तो दिल्लीला गेला. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘चक्र’ ला प्रवेश मिळाला. दिल्लीवरुन धर्मराज मुंबईला परतला व त्याचे निधन झाले. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या पहिल्या पानावर, धर्मराजचा फोटो व खाली तो गेल्याची बातमी होती.

‘चक्र’च्या जाहिराती झळकल्या, सर्वत्र पोस्टर्स लागली. चित्रपटाच्या प्रीमियर शोला दळवींना निमंत्रण नव्हते. चित्रपट गर्दी खेचत होता, तिकीटे ब्लॅकने विकली जात होती. करारानुसार राहिलेल्या रकमेसाठी दळवींनी धर्मराजच्या पार्टनरला पत्र पाठवले. प्रदीप कपूरने प्रत्यक्ष भेटून, उरलेल्या रकमेचा चेक दळवींना सुपूर्द केला.

दळवींनी तिकीट काढून चित्रपट पाहिला. त्यांना प्रथमदर्शनी तो, कलात्मक निर्मिती म्हणून आवडला. त्यांना मनातून असं वाटलं की, मी शुटींगच्या दरम्यान सहभागी असतो तर स्मिताचे आंघोळीचे दृष्य एवढे भडक होऊ दिले नसते. त्यातून झोपडपट्टीचे दैन्य दाखवले असते. स्मिता आंघोळ करताना, झाडूवाला सोन्या (गणेश सोळंकी) तिच्याकडे अभिलाषेने पहातोय, असे दाखवले आहे, कादंबरीत तसे नाही. तीच गोष्ट वेड्या चमन्याची. तोही चित्रपटात वावरलेला नाही. कादंबरीत त्याने एक बादशहा नावाच्या रंगीबेरंगी कोंबड्याला पोसून चांगलाच वाढवलेला आहे. तो दलालांनी कादंबरीच्या मुखपृष्ठावर दाखविलेला आहे. त्याऐवजी धर्मराजने, विलायती कोंबडा घेतलेला आहे. चित्रपटातील दाखवलेले भंडाऱ्याचे हाॅटेल दळवींना अजिबात आवडले नाही. धर्मराजने विचारले असते तर, तशी दोन चार हाॅटेलं दळवींनी सहज दाखवली असती.. कलाकारांच्या बाबतीत सांगायचे झाले तर सुहास भालेकर हा एकमेव कलाकार कादंबरीशी सुसंगत वाटला, बाकीचे कलाकार हे झोपडपट्टीतले वाटलेच नाहीत. बेन्वा व त्यांचे मित्र कोंबडी मारुन सोलतात व शिजवितात. ते सर्वजण दारु पिऊन झिंगताना, त्याच कोंबडीची छोटी पिल्लं ‘चिंव चिंव’ करत त्या कोंबडीच्या पिसांजवळ येतात तेव्हा बेन्वा व त्याचे मित्र शिजवलेली कोंबडी खात नाहीत, हे चित्रपटात दाखवलेच नाही..

‘चक्र’ चित्रपट ‘त्या’ पोस्टरमुळे का होईना, तुफान चालला. चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. स्मिता पाटील, रवींद्र धर्मराज व चित्रपटाचे कलादिग्दर्शक यांना फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर जयवंत दळवी यांच्या कादंबरीवरुन अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती झाली, मात्र त्यांना आलेला हा ‘पहिला अनुभव’, अविस्मरणीय असाच होता!

व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘बनगरवाडी’ कादंबरीवरुन, व्ही. शांताराम यांना चित्रपट करायचा होता.. प्रत्यक्षात तो केला, अमोल पालेकर यांनी. कुणीही केला तरी, त्याला पुरस्कारांची खैरात होणारच होती.. कारण कादंबरीच अप्रतिम आहे! मात्र ती पडद्यावर पाहण्यापेक्षा वाचून जे समाधान मिळते, त्याला तोड नाही..
कारण कोणत्याही कादंबरीवरुन चित्रपट करताना जे ‘स्वातंत्र्य’ घेतले जाते, त्यामुळे मूळ विषयाकडे दुर्लक्ष होते. मी लिहिलेल्या दोन कथांवरुन, दोन शाॅर्टफिल्म्स झालेल्या आहेत. मात्र मूळ कथानकात दिग्दर्शकाने हवेतसे बदल केल्याने मला स्वतःला, त्या अजिबात पटलेल्या नाहीत…

– सुरेश नावडकर १९/१२/२३
मो. ९७३००३४२८४

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..