नवीन लेखन...

कथलाचा व्यापार

कांस्ययुगातलं हे जहाज, विविध प्रकारच्या मालानं भरलेलं व्यापारी जहाज होतं. या जहाजातल्या एकूण सुमारे सतरा टन वजनाच्या वस्तू पाण्याबाहेर काढल्या गेल्या. यांत विविध प्रकारची भांडी, खाद्यान्नासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांनी भरलेले बुधले, खंजिरासारखी शस्त्रं, सोन्याचे दागिने, मौल्यवान रत्नं, हस्तिदंत, काचेचे ठोकळे, इत्यादींचा समावेश होता. त्याचबरोबर या वस्तूंत कांस्याच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या, तांब्याच्या आणि कथलाच्या लगडीही होत्या. प्रत्येकी काही किलोग्रॅम वजन असणाऱ्या या लगडींपैकी, काही लगडी या पूर्ण स्वरूपात होत्या, तर काही लगडी मोडलेल्या स्वरूपात होत्या. यांतील तांब्याच्या लगडींचं एकूण वजन सुमारे दहा टन आणि कथलाच्या लगडींचं एकूण वजन सुमारे एक टन इतकं होतं. हा सर्व माल या जहाजात बहुधा, आजच्या इस्राएलमधील हायफा या बंदरातून भरला असण्याची शक्यता दिसून येत होती. या जहाजाच्या शोधामुळे, संशोधकांना तीन हजार वर्षांपूर्वीचं धातूशास्त्र, जहाजाची बांधणी, व्यापार, इत्यादी बाबींचा अभ्यास करण्याची मोठी संधी मिळाली.

कांस्ययुगातल्या उत्तरार्धाच्या काळात, कांस्याचा वापर सर्वदूर पसरला होता. त्यातही चीन, ग्रीस आणि इराक इथल्या राजवटी कांस्याच्या वापरात आघाडीवर होत्या. कांस्याचा हा वापर अगदी नेहमीच्या भांड्यांपासून ते शस्त्रांसारख्या विविध वस्तू तयार करण्यासाठी केला जात होता. कांस्याच्या या मुबलक वापरावरून, आजच्या संशोधकांना एक प्रश्न पडला. तो म्हणजे, त्या काळी कांस्याच्या निर्मितीला लागणारं इतकं कथील कुठून मिळवलं जायचं? कारण कांस्यात साधारणपणे नव्वद टक्के भाग तांब्याचा आणि दहा टक्के भाग कथलाचा असतो. तांबं हे एकूणच विपुल प्रमाणात आढळतं. युरोप आणि आशिआतही त्याकाळी, तांब्याचे साठे अनेक ठिकाणी अस्तित्वात होते. त्यामुळे कांस्याच्या उत्पादनासाठी तांबं मिळवणं हे सोपं होतं. परंतु कथलाच्या बाबतीत परिस्थिती अगदी उलटी होती. मुळातच कथलाची विपुलता ही तांब्याच्या तुलनेत फक्त तीन टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे कथलाची उपलब्धता मर्यादित आहे. इतकंच नव्हे तर, कथलाचे साठे असणारी ठिकाणं त्याकाळच्या वसतीपासून खूपच दूर होती. या परिस्थितीत इतक्या प्रमाणात कथील उपलब्ध होणं, ही एक कुतूहलाची गोष्ट होती.

उलुबुरूनच्या जहाजावर सापडलेल्या तांबं आणि कथलापासून, सुमारे अकरा टन कांस्याची निर्मिती होऊ शकत होती. या जहाजावरचं हे इतकं कथील कोणत्या ठिकाणच्या खाणींतून आलं असावं, याचा शोध घेण्याचा पहिला प्रयत्न १९९०च्या दशकात केला गेला. एखाद्या धातूच्या वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेल्या नमुन्यांत, त्या धातूच्या समस्थानिकांच्या प्रमाणात थोडाफार फरक असू शकतो. समस्थानिकांच्या प्रमाणातील फरकावरून या धातूचं उगमस्थान, म्हणजे तो कुठल्या खाणीतून काढला गेला आहे, ते समजू शकतं. १९९० साली केल्या गेलेल्या संशोधनात कथलाच्या नव्हे, परंतु या कथलाबरोबर सापडलेल्या शिशाच्या समस्थानिकांचा वापर यासाठी केला गेला होता. कथलाबरोबर आढळलेल्या या शिशातील समस्थानिकांचं प्रमाण हे कोणत्या ठिकाणच्या कथलातील शिशाशी जुळतं, ते तपासलं गेलं. या संशोधनानुसार, या लगडींतील कथलाच्या काही भागाचं उत्पादन तुर्कस्तानातील टाऊरस पर्वतातील खाणीत, तर काही भागाचं उत्पादन मध्यआशिआतील खाणीत केलं गेलं असल्याची शक्यता दिसत होती. मात्र मध्यआशिआतलं हे ठिकाण नेमकं कोणतं, ते मात्र सांगता येत नव्हतं. आतापर्यंत अनुत्तरित राहिलेल्या या प्रश्नाचं उत्तर अलीकडेच शोधलं ते, न्यूयॉर्कमधील ब्रूकलिन महाविद्यालयातील वेन पॉवेल आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी.

उलुबुरून जहाजातील कथलाचं मध्यआशिआतील उगमस्थान स्पष्ट न झाल्यामुळे, वेन पॉवेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अधिक व्यापक पद्धतीनं हा शोध पुनः घेण्याचं ठरवलं. यासाठी या संशोधकांनी फक्त शिशाच्या समस्थानिकांवर अवलंबून न राहता, या लगडींतील शिशाच्या समस्थानिकांबरोबरच, कथलाच्या समस्थानिकांचाही आधार घेतला. त्याचबरोबर त्यांनी, लगडींत आढळणाऱ्या इतर मूलद्रव्यांचीही मदत घेतली. वेन पॉवेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपलं हे संशोधन फक्त उलुबुरूनच्या जहाजातील कथलापुरतं मर्यादित ठेवलं नाही. त्यांनी या आपल्या संशोधनाद्वारे युरोप-आशिआतील कथलाच्या व्यापाराचा मार्गही शोधून काढला. वेन पॉवेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे लक्षवेधी संशोधन, ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस‘ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे. या संशोधकांनी आपल्या संशोधनासाठी, अमेरिकेतील टेक्सास येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल आर्किऑलॉजी’ या संस्थेत जतन केलेल्या, उलुबुरूनच्या जहाजात सापडलेल्या लगडींतल्या कथलाच्या नमुन्यांचा उपयोग केला.

वेन पॉवेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, या नमुन्यांद्वारे जहाजावर सापडलेल्या कथलाच्या, एकूण १०५ लगडींचं तपशीलवार विश्लेषण केलं. या विश्लेषणाद्वारे त्यांनी या लगडींतील कथलाच्या आणि शिशाच्या विविध समस्थानिकांचं प्रमाण शोधून काढलं. तसंच या कथलाच्या लगडींतील शिशाबरोबरच अल्प प्रमाणात आढळणाऱ्या बिस्मथ, जस्त, मँगॅनिज, यासारख्या इतर मूलद्रव्यांचं प्रमाणही त्यांनी मोजलं. त्यानंतर त्यांनी या सर्व माहितीची, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या, विविध ठिकाणच्या कथलासंबंधीच्या माहितीशी तुलना केली. या उपलब्ध माहितीत विविध ठिकाणच्या सुमारे एक हजार प्राचीन वस्तूंतील व चारशेहून अधिक खनिजांतील कथलाच्या विश्लेषणात्मक माहितीचा समावेश होता. या तुलनेवरून कोणत्या लगडी या कुठल्या ठिकाणच्या कथलातून तयार झाल्या होत्या व त्यानंतर त्यांचा वापर कोणत्या ठिकाणी केला गेला, ते समजू शकलं. या सर्व माहितीचं एकत्रित विश्लेषण केल्यानंतर, आशिआ आणि युरोपमध्ये होणाऱ्या कथलाच्या व्यापाराचा संपूर्ण मार्गही स्पष्ट झाला.

उलुबुरूनच्या जहाजातील कथलाच्या एकूण लगडींपैकी सुमारे दोन-तृतीयांश लगडींतील कथलाची वैशिष्ट्यं ही, तुर्कस्तानातीलच टाऊरस पर्वतांत सापडलेल्या कथलाशी जुळत होती. यावरून, या कथलाचा मोठा भाग हा जवळच्याच टाऊरस पर्वतांतील खाणींतून आला असल्याच्या पूर्वीच्या निष्कर्षांना दुजोरा मिळाला. उर्वरित एक-तृतीयांश लगडी या मध्यआशिआतूनच आल्याचं नक्की झालं. हे कथील आजच्या ताजिकीस्तान आणि उझबेकिस्तानमधल्या खाणींतलं असल्याचं स्पष्ट झालं. मध्यआशिआतली ही ठिकाणं, हे जहाज जिथून आलं असावं, त्या हायफापासून तीन हजार किलोमीटरपेक्षाही अधिक अंतरावर होती! कथलाचा हा व्यापार आजच्या दक्षिण सायबेरिआतील (रशिआ) अलटाय पर्वतांपासून, तुर्कस्तानातील युरोपला जवळ असणाऱ्या अनाटिलिआ पर्वतरांगांपर्यंत होत होता. हा व्यापार पामीर पर्वत, हिंदुकुश पर्वत, इराणचं पठार, आजचा इराक, अशा मार्गानं केला जात होता. त्या काळातली कथलाची प्रचंड गरज ही अशा प्रकारे दूरदूरच्या ठिकाणांहून भागवली जात होती.

या अगोदर झालेल्या संशोधनानुसार, कांस्ययुगातल्या या काळातलं कथलाचं उत्पादन हे मुख्यतः छोट्याछोट्या स्तरावर होत असल्याचं दिसून आलं आहे. मध्यआशिआत तर विविध ठिकाणच्या भटक्या व तत्सम छोट्या जमाती या कथलाचं उत्पादन करीत असत. या काळात कथलाला असलेली मोठी मागणी ही, अशा छोट्या उत्पादकांकडून पुरवली जात होती. अशा परिस्थितीत, सुमारे तीन हजार किलोमीटर अंतरावरील ताजिकीस्तान आणि उझबेकिस्तानमधल्या खाणींतून काढलं गेलेलं हे टनावारी वजनाचं कथील, डोंगर-दऱ्यांनी व्यापलेला मधला सर्व प्रदेश पार करत तुर्कस्तानात पोचवणं, हे एक आव्हानात्मक काम होतं. आशिआ आणि युरोप खंडातील दूरदूरचे, अगदी भिन्न संस्कृतींचे प्रदेश, हे व्यापारानं एकमेकांना जोडले गेले असल्याचं या कथलाच्या व्यापारावरून दिसून येतं. यातून एक गोष्ट स्पष्ट होते… ती म्हणजे, कथलाला हजारो किलोमीटर दूरपर्यंत पोचवणारी, तीन हजार वर्षांपूर्वीची ही व्यापार-व्यवस्था सुबद्धरीत्या विकसित झालेली होती – अगदी आजच्या काळातल्या व्यवस्थेसारखीच!

(छायाचित्र सौजन्य : Panegyrics of Granovetter/ Bodrum Museum of Underwater Archaeology
peterborougharchaeology.org, www.archaeology.org
)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..