नवीन लेखन...

मराठी वाड्मयातील चरित्रलेखन

 

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला जयंत वष्ट यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.


कोणत्याही भाषेतील वाड्मयाचा त्या त्या काळातील विविध क्षेत्रांतील घडामोडींशी,  घटना-प्रसंगांशी निकटचा संबंध असतो. प्रतिबिंबरुपात त्यांचे पडसाद वाङ्मयात उमटलेले दिसतात. कधी वाड्मयीन विचारप्रवाह त्या काळातील राजकारण-समाजकारणासह अनेक विषयांतील घटना-प्रसंगांवर परिणाम करतात तर कधी राजकारण समाजाकारणामुळे वाड्मयीन बदल घडतात. , प्रसंगी वाड्मयात समाजाचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद असणे, याला इतिहास साक्षी आहे.

स्वातंत्र्यानंतर आलेल्या भाषावार प्रांतरचनेच्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन झाल्यावर १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हापासून आजवरच्या सर्व स्तरातील राजकीय, सामाजिक, आर्थिक तसेच धार्मिक क्षेत्रांतील घटना-प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर वाड्मयाचा विचार करायला हवा आणि विविध वाङ्मयाकारांच्या विकासा परिवर्तनांमागच्या प्रेरणा, वृत्ती-प्रवृत्ती तपासत साहित्यकृतीवरच्या परिणामांची निरीक्षणे गोदवायला हवीत. केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक, धार्मिक-दृष्ट्या निश्चय करता हा कालखंड धामधुमीचा आहे. लोकशाहीच्या पुरस्का नेहरूनंतर काँग्रेसमध्ये स्थित्यंतरे होत होत, सत्ता इंदिरा गांधींकडे आली. बांगला देशच्या विजयापर्यंत लोकशाहीच्या संरक्षणकर्त्या म्हणून गौरवल्या गेलेल्या इंदिराजीनी, १९७५ मध्ये आणीबाणी जाहीर करून लेखन-भाषण स्वातंत्र्यावरच गदा आणली. परिणामी देश विरोधात गेला आणि १९७७ ची निवडणूक दुसन्या स्वातंत्र्यासाठी झाली. घटना-प्रसंगांनी समाजाप्रमाणेच साहित्यावरही परिणाम होतो. हे जाणून घेण्यासाठीची ही नोंद.

राजकीय ताणतणावांप्रमाणेच सामाजिक बदल आणि आर्थिक स्थितीही साहित्यावर अप्रत्यक्षरीत्या परिणाम करतच असते. मंडल आयोगामुळे सामाजिक तर अयोध्या घटनेने धार्मिकदृष्ट्या समाज ढवळला गेला. जागतिकीकरणाचे पडसाद उमटू लागल्यावर मॉल संस्कृती आली. आय.टी. उद्योगाने समाजातल्या वरच्या स्तरावर मध्यम वर्गीयांच्याही वृत्तीप्रवृत्ती बदलल्या, अस्वस्थ आणि अचेतन समाजातले ‘माणसाचे’ मोल घसरले, नीतीनियम परिवर्तीत झाले, आणि पैशा’ ची किंमत बदलली, ‘माणूस’ स्वस्थता गमावून बसला. या साऱ्याचा परिणाम साहित्यावरही झाला, कथा, कविता, कादंबरी या साहित्य प्रकारानंतर तो तुलनेने लवकर दिसला. पण आपण विचार करणार असलेल्या चरित्रकृतींवर तो लगेच दिसणार नव्हता. ही बदललेली ‘माणसे’ चरित्रनायक होण्यासाठी काहीएक काळ जावा लागतो. तेव्हा चरित्रकृती बदलतात. एकविसाव्या शतकात तीही सुरुवात झाल्याचे दिसते.

गेल्या पन्नास वर्षांत समाजातल्या विविध क्षेत्रातल्या विविध स्तरांवरच्या मान्यवरांची तसेच कार्यकत्यांची चरित्र लिहिली गेली. पण चरित्रकारांनी अभ्यासासाठी निवडलेले चरित्रनायक पाहता, अजूनही बरेचसे चरित्रनायक स्वांतत्र्यपूर्व काळातले असल्याचे दिसते. अर्थात स्वातंत्र्योत्तर काळात स्वकर्तृत्वाने विभिन्न क्षेत्रात कर्तृत्वाने समाजासाठी मार्गदर्शक ठरलेल्या व्यक्तीही नव्या चरित्रकारांनी आपला अभ्यासविषय केल्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. चरित्रकारांच्याही पिढ्या बदलत गेल्याचा तो दृश्य वाङ्मयीन परिणाम होता.

चरित्र हा लेखनप्रकार इतिहासाचा की साहित्याचा येथपासून मतभेद असले तरी तो ‘माणसा’ चा आहे. यावर एकमत आहे. त्याच्या आयुष्यातील विविध घटना-प्रसंगांचा, त्यातील ‘सत्य’ मांडत विकास दाखवण्याचा हा लेखन प्रकार आहे. तर प्रसंगी मनोवैज्ञानिक कल्पकतेचा आधार घेत, ‘माणसा’ च्या व्यक्तित्वावरचे संस्कार, जडणघडण जाणून त्याचे अधिकाधिक आकलन करून घेण्याचा हा सत्यान्वेषी साहित्यप्रकारही आहे. इतिहासाचे भान न सोडता, वाड्मयीन कलात्मकता राखत निर्मिली जाणारी ती साहित्यकृती आहे. गेल्या पन्नास वर्षांत, चरित्र लेखन पद्धतीत विधायक बदल झालेला दिसतो. चरित्रातून जन्मापासून मृत्युपर्यंतची माहिती देत नंतर काल व कर्तृत्व या विषयी लिहिण्याची पद्धत बदलत जात व्यक्तिमत्व आणि जीवन या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे चरित्रकारांनी लक्षात घेतलेले दिसते. चरित्रनायकाच्या कार्याचे विश्लेषण व मूल्यमापन करता करता, जास्तीत जास्त ‘सत्य’ आणि ‘सजीव’ व्यक्तित्वनिरीक्षण मांडायला सुरुवात झाली. चरित्रनायकाच्या विचारांना त्याच्या व्यक्तिमत्त्वात असणारे स्थानही चरित्रकार लक्षात घेऊ लागले. साहित्य, कला आणि इतिहास याचा मेळ घालत लेखनास आरंभ झाला.

गेल्या पंचवीसएक वर्षात चरित्रलेखन प्रक्रियेचाही अभ्यास केला गेल्याचे दिसते. श्री. गं.दे. खानोलकर, श्रीमती दुर्गा भागवत यांच्यासारख्यांचा अभ्यास तर चालू होताच, शिवाय त्याचबरोबर विद्यापीठीय स्तरावरही चारित्राच्या मूलतत्वांचा आणि समीक्षेचा अभ्यास डॉ. ग.भा. रावते यांनी मांडला. पण चरित्र लेखनामागची निर्मितीप्रक्रिया उलगडण्याचा प्रयोग मात्र डॉ.द.न. गोखले यांनी प्रथमच केला. मनोवैज्ञानिक कल्पकतेचा चरित्रग्रथांत व प्रत्यक्ष वापर करून तिची उपयुक्तता त्यांनी स्पष्ट केली. चरित्रातील लयीची अभ्यासकांसमोर मांडली केली. माधव ज्यूलिअन यांच्याविषयीच्या आपल्या चरित्र ग्रंथाची निर्मितीप्रक्रिया मांडताना त्यांनी व्यक्तित्वाच्या शोधासाठीच्या ऐतिहासिक व साहित्यप्रधान पहलीचे निवेदन केले. अशी सृजनकथा मराठीतच नव्हे तर, अन्य भारतीय भाषांतही यापूर्वी सांगितली गेली नसावी.

असे असले तरी चरित्रकार या काळात स्वातंत्र्योत्तर आणि स्वातंत्र्यपूर्व काळातीलच चरित्रनायकांविषयी लिहून होणे म्हणजेच चरित्र हा वाङ्मयप्रकार कालदृष्ट्या तुलनेने मागेच होता आणि तेच स्वाभाविक होते. या कालखंडात चरित्रे संख्येने भरपूर लिहिली गेली, तरी गुणवत्ता पाहता लक्षणीय चरित्रे कमीच होती. चरित्र नायकाच्या जीवनाचा वृत्तान्त, सत्य सांभाळत, कलात्मकतेने मांडताना, त्याचे शब्दांकन करताना, ते व्यक्तित्व उलगडण्याचा प्रयत्न करणारे चरित्रकारही संख्येने कमीच होते.

साधु-संत चरित्रांचे लेखन प्रामुख्याने भक्ती आणि श्रद्धा या रूपातच झाले आहे. जवळ जवळ दिडदोनशे चरित्रांच्या अवलोकनातील त्यांचा विचार करताना, चरित्रकार संतांची महती व त्यांची शिकवण यावर भर देतात. अधून मधून चमत्कारही त्यात डोकावतात. संतांकडे ऐहिक दृष्टीतून ‘माणूस’ म्हणून पाहण्याची, त्यांचे गुणदोष जाणून घेत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची चिकित्सा करण्याची पद्धत वा परंपरा संत चरित्रकारांत नाही. आणि त्या वाचकांनाही तशी अपेक्षा नसते. तरीही काही चिकित्सक चरित्रकार आहेत. प्रा. न. र. फाटक आणि शिवाजीराव भोसले यांच्याप्रमाणेच श्री. गो. नी. दांडेकरांसारखे चरित्रकारही यात येतात.

ऐतिहासिक चरित्रलेखनाची परंपराही या काळात पुढे जाताना दिसते. महाराष्ट्राचे दैवतरूप प्रेरणास्रोत शिवाजी महाराज यांची अनेक अभ्यासपूर्ण चरित्रे या काळात प्रसिद्ध झाली आहेत. त्र्यं. शं. शेजवलकर, वा. सी. बेंद्रे, ग. ह. खरे, बाळशास्त्री हरदास, वा. रा. कोठारी असे, विविध दृष्टिकोनांतून शिवाजी महाराजांकडे पाहणारे चरित्रकार यात येतात. काही इतिहास शोधनाच्या वळणाने जाणारे चरित्रकार आहेत. काही सामाजिक, राजकीय अंगानेही शिवाजीची प्रतिमा उभी करतात. मात्र यात शिवशाहिरांच्या भूमिकेतून नाट्यमयरीत्या समाजावर शिवाजी संस्काररूप देणारे ब. मो. पुरंदरे यांचे कार्य आपल्या वेगळेपणाने लक्षात राहण्यासारखे आहे. प्राचीन भारताच्या काळातील व्यक्तींविषयीची चरित्रे याकाळात लिहिली गेली आहेत. तसेच इतिहासातील अनेक कर्तबगार व्यक्तींचीही दखल घेतली गेली आहे. संभाजी, राजाराम, या शिवपुत्रांप्रमाणेच त्यापुढच्या पेशव्यांसह महादजी शिंदे, नाना फडणीस, यशवंतराव होळकर, यांची व अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्यसमरातील वीरांची वाचनीय व अभ्यासपूर्ण चरित्रेही याच काळात आहेत. इतिहासातील जिजाबाई, अहिल्याबाई होळकरांप्रमाणेच मस्तानी (बाजीरावांची मानलेली पत्नी) अशा स्त्रियांविषयीचे लेखनही आले आहे. इतिहास संशोधनाचे व्रत पुढे चालवणारे चरित्रकार जसे या काळात आहेत तसेच इतिहासातून पुढच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शनपर लिहिण्याच्या निमित्ताने कर्तृत्ववान सास्तीची चरित्रे रेखाटणारे चरित्रकारही या काळात आहेत.

गेल्या पन्नास वर्षात राजकारणी, क्रांतिकारक आणि समाजकरणी कार्यकर्त्यांची चरित्रे भरपूर संख्येने लिहिली गेली आणि ती व्यक्तिमत्त्वेही चरित्रकारांनी आपला अभ्यासविषय बनवली. लोकमान्य टिळक. म. गांधी, ना. गोखले, स्वा. सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, गोपाळराव आगरकर, मानवेंद्रनाथ रॉय या. स्वातंत्र्यपूर्व काळातील राज्यकारण्यांची चरित्रे लिहिताना स्वातंत्र्योत्तर काळात नव्याने मिळालेल्या. शोधलेल्या माहितीच्या आधारे नवी दृष्टी स्वीकारत, पुन्हा एकदा मूल्यमापन केले गेले. व्यक्तिमत्त्वांचा हा शोध सत्या’ साठी असला तरी काही चरित्रांत ‘माणूस’ म्हणून विचार करता करता ‘सोय’ ही पाहिली गेली होती. काही वेळा अनावश्यक भक्तिभाव तर काहीवेळा त्यात चरित्रकारांची छिद्रान्वेषी दृष्टीही असल्याचे जाणवत होते. संपूर्ण ‘सत्य’ शोधून सजीव करण्याच्या प्रयत्नात ऐतिहासिक व वाङ्मयीन जाणिवांचा समन्वय साधू पाहणारे व्यक्तित्वे शोधण्यात हयात खर्चणारे व्रतस्थ चरित्रकारही होते. प्रा. न. र. फाटक, श्री. ग.दे. खानोलकर, या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या चरित्रकारांबरोबरच डॉ. धनंजय कीर, डॉ. द.न. गोखले. प्रा. सदाशिवराव आठवले. डॉ. य.दि. फडके हे यातले काही सन्माननीय अभ्यासक सहज स्मरतात.

स्वातंत्र्यासाठी क्रांतिमार्गाने जाणाऱ्या वासुदेव बळवंत फडके, चाफेकर, कान्हेरे, भगतसिंह यांची चरित्रेही याकाळात मराठीत लिहिली गेली. तर क्रांतीचे प्रेरक चरित्रनायक स्वा. सावरकर यांच्याकडे अनेकांनी विविध दृष्टींनी पाहत त्यांचे व्यक्तिमत्त्व व आकलन करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

स्वातंत्र्यपूर्व काळाप्रमाणेच स्वातंत्र्योत्तर काळात सत्तास्थानी येणाऱ्या व राष्ट्रकार्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या राजकारण्यांची व्यक्तिमत्त्वे कार्यासह मांडली गेली. येथेच हे ही सांगावयास हवे, की भारताच्या बहुतेक सर्व राष्ट्रपती व पंतप्रधानां विषयी माहिती देणारी चरित्रे मराठीत प्रसृत झाली. तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सर्व मुख्यमंत्र्यांचीही कार्यकर्तृत्व मांडणारी चरित्रे लिहिली गेली. त्या त्या कार्यकाळात आलेली ही चरित्रे बऱ्याच प्रमाणात आणि स्वाभाविकपणे गौरवाची होती, त्यामागच्या प्रेरणाही वेगळ्या होत्या. पण त्यातही काही चरित्रे अभ्यासपूर्ण, विश्लेषण आणि व्यक्तित्वदर्शक होती. हे ही लक्षात घ्यायला हवे.

समाज शहाणा करून सोडण्याचे परिवर्तन व्हावे याचे स्वप्न उरी बाळगून ध्येयाने भारलेले अनेक समाजचिंतक – सुधारकही या काळातल्या चरित्रकारांचे अभ्यासविषय आनंद-विषय झाल्याचे दिसते. तसेच म. ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, म. गो. रानडे, गो. ग. आगरकर, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, बापूजी साळुखे, तसेच ब्राह्मणेतर चळवळीचे अण्णासाहेब लठ्ठे, जेधे, जवळकर, वि. रा. शिंदे यांची चरित्रेही त्यांची प्रेरणास्थाने झाली आहेत. या सर्वांच्या चरित्रांचे अभ्यासपूर्ण लेखन आणि विश्लेषण करण्याचा चरित्रकारांचा प्रयत्न दिसतो. पण त्यातही समाजातल्या ‘दलित’ वर्गाला पुढे आणण्यासाठी झटणाऱ्या बाबसाहेब आंबेडकरांनी गेली पन्नास-साठहून अधिक वर्षे या चरित्रकारांना झपाटून टाकल्याचेही दिसते. त्यांची शंभरहून अधिक चरित्रे लिहिली गेली आहेत. येथे सातत्याने एक चरित्रनायक अनेकांना प्रेरक ठरतो आहे. गांधी, नेहरू, सावरकर, सुभाष यांच्यापेक्षा अधिक चरित्रे एकट्या आंबेडकरांची आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील, बाबुराव जगताप ही व्यक्तित्वे जशी चरित्र विषय झाली तसेच याच काळात काहीशा वेगळ्या समाजचिंतनाचा अभ्यासही केला गेला. आचार्य विनोबा भावे, अप्पासाहेब पटवर्धन, साम्यवादी पुढारी श्री. अ. डांगे, हिंदुत्ववादी के. ब. हेडगेवार, समाजस्वास्थ्यकार र. धों. कर्वे आणि कुष्ठरोग्यांसाठी झटणारे बाबा आमटे ही त्यातली काही पटकन आठवणारी नावे.

वाङ्मयीन कर्तृत्वाने समाजावर आपला ठसा उमटवणाऱ्या वाङ्मयीन क्षेत्रातील लेखकांची, कवी-समीक्षकांसह चिंतकांची व्यक्तित्वेही या काळात अभ्यासली गेली. विचार हेच ज्यांचे जीवन असे विचारवंतही यात येतात. तसेच ललित वाङ्मयातून जाणवलेली काही व्यक्तित्वेही या ‘माणसा’ च्या शोधात चरित्रकारांनी अभ्यासली आहेत. श्री. गं.दे. खानोलकर हे तर समाजास माहीत असणारे व नसणारेही वाङ्मयसेवक अभ्यासून आपला चरित्रनायकांचा अभ्यास याच कामात मांडत होते. तत्कालीन समाजाचे राष्ट्रगुरु म्हटले गेलेले ज्ञानकोशकार केतकर, कवी आणि पंडित म्हणून ख्यात असणारे माधव ज्यूलियन, ‘श्यामची आईचे’ सानेगुरुजी, यांच्याप्रमाणेच एकोणिसाव्या शतकातील दादोबा पांडुरंग आणि ‘शतपत्रे’ लिहून समाज जागृती करणारे लोकहितवादी यांचाही अभ्यास पुन्हा एकदा या काळात केला गेला. तसेच जन्मशताब्दीसारख्या वा अन्य प्रसंगानिमित्तांनी मालाकार चिपळूणकर, डॉ. भाऊ दाजी, वि. मो. महाजनी, म.मो. कुंटे या एकोणिसाव्या शतकातल्या कर्तृत्ववानां-बरोबरच ह. ना. आपटे, कृ.प्र.खाडिलकर, श्री. कृ. कोल्हटकर, न. चिं. केळकर, राम गणेश गडकरी, भा.रा.तांबे, अशा अनेका नेक वाङ्मयसेवकांची चरित्रे कर्तृत्वासह व्यक्तिमत्त्व उलगडण्याचा प्रयत्न करत या काळात लिहिली गेली. तर मराठी असूनही गुजराथीत-मराठीत नावलौकिक मिळालेले काका कालेलकरांसारखे व्यक्तित्वही अभ्यासले गेले, बंगालीतल्या रवींद्रनाथ, शरदबाबूंनाही समजून घेण्याचा प्रयत्न मराठी चरित्रकारांनी केला. संशोधन आकलन या प्रक्रियेत मनोवैज्ञानिक कल्पकता किती असावी किंवा साहित्यिकांच्या साहित्यांचे त्या त्या व्यक्तित्व दर्शनात काय स्थान रहावे याविषयी चर्चा करता करता चरित्रकारांनी मराठीतल्या बहुतेक सर्व महत्त्वाच्या साहित्यिकांचा चरित्ररूपात परामर्ष वाचकांसमोर या काळात ठेवला.

मराठी माणूस कला – नाटकवेडा असला तरी नाट्यचित्र-शिल्प – चित्रपटादी अन्य महत्त्वाच्या क्षेत्रांतील चरित्र नायकांचे प्रमाण आजही कमीच आढळले. या क्षेत्रांत बहुधा आत्मचरित्रांना महत्त्व असावेसे दिसते. बालगंधर्व, केशवराव दाते, मा. दीनानाथ, भीमसेन जोशी, कुमारगंधर्व, मल्लिकार्जुन मन्सूर, छोटा गंधर्व या नाट्य व गायनक्षेत्रातील दिग्गजांप्रमाणे लता मंगेशकर, मोगुबाई कुर्डीकर, केसरबाई केरकर, हिराबाई बडोदेकर या संगीत क्षेत्रातील स्त्रियांविषयीही लिहिले गेले आहे. समाजासमोर दिसणारी आणि प्रत्यक्षात असणारी; ज्यांच्या व्यक्तिमत्त्वांतील माणूसपणही या निमित्ताने चरित्रकारांनी अभ्यासले आहे. विष्णु भातखंडे, विष्णु दिगंबर पलुस्कर, भास्करबुवा बखले अशा नामवंत संगीत तज्ज्ञांबरोबर जी. एल. सामंतांसारख्या वादकाचाही परिचय चरित्रकारांनी करून दिला आहे. हिंदी मराठी चित्रपटांतून गाजलेल्या देव आनंद, राज कपूर, बलाराज सहानी, मा. भगवान, भालजी पेंढारकर ते सत्यजित रे पर्यंतच्या नट-दिग्दर्शकाबरोबरच गुरुदत्त आणि सध्याचा महानायक अमिताभ बच्चन या साऱ्यांची व्यक्तित्वे मराठीत वाचकमान्य ठरली आहेत. त्याचबरोबर मीनाकुमारी वा स्मिता पाटील, सुलोचना वा जयश्री गडकर यांनाही चरित्रकार विसलेले नाहीत.

या तुलनेने शिल्पकार फडके, नकलाकार भोजे, सर्कसकार दामू धोत्रे ही मंडली कमी आढळतात. बाबुराव पेंटर, भय्यासाहेब ओंकार, आबालाल रेहमान, मकबुल फिदा हुसेन पासून ते पिकासो वा चेंपलीनपर्यंत साऱ्यांचा विचार केला तरी, तुलनेने चित्र-शिल्पकारांकडे मराठी चरित्रकारांचे फारसे लक्ष गेलेले दिसत नाही. मात्र यापेक्षा क्रीडा क्षेत्रातली प्रामुख्याने सर्वांच्या आवडत्या क्रिकेट क्षेत्रातील परिस्थिती तुलनेने बरी म्हणावी लागेल. गाजलेल्या फलंदाज गोलंदाजाविषयी षटकार सम्राटांपासून महान कर्णधारांपर्यंत अनेकांविषयी लेखन झाले आहे. पण रणजीत सिंह, दि. ब. देवधर, यांच्याविषयीची चरित्रे कमी आहेत. डॉन ब्रॅडमन, रोहन कन्हाय, सोबर्स, बोथेंम या परकियांप्रमाणे गावस्कर, तेंडुलकर, तसेच खंडू रांगणेकर यांच्याविषयीची चरित्रे माहितीपूर्ण असल्याचे क्रिकेटप्रेमीत लोकप्रिय आहेत. येथे आकडे जास्त महत्वाचे ठरल्याचे दिसते. माणूस वा व्यक्तित्व नव्हे. इतर क्रीडा प्रकारांना शेर्पा तेंगसिंग, मेजर ध्यानचंद, मिहिरसेन, महमंद अली या गामा आणि ब्रुस ली सारख्यांशिवाय इतरांवर फारसे लेखन नाही.

क्रीडाक्षेत्र हे आता नाट्य – चित्रपट क्षेत्रांप्रमाणे झगमगाटाचे झाले आहे. पण संशोधक-शास्त्रज्ञ निदान मराठी चरित्रकारांनी अलक्षितच राखल्याचे दिसते. संशोधक शास्त्रज्ञांविषयीची माहिती देणारी पुस्तकेही तुलनेने कमीच आहेत. मुलांसाठी परिचय यापलीकडे त्यात फारसे काही नाही. गेल्या दशकात त्याविषयी चरित्रासारखे लिहिण्याचा प्रयत्न केला जात असला तरी या क्षेत्रात चरित्रकारांचीच कमतरता आहे. परिचय वा माहिती याहून जास्त काही मिळत नाही.

स्त्रियांच्या चरित्रांचा वेगळा विचार जरी मुद्दाम मांडला गेला नसला तरी ऐतिहासिकदृष्ट्या आणि सामाजिक कार्याने सिद्ध झालेल्या स्त्रियांविषयी, स्त्री चरित्रकारांनी त्यांची व्यक्तित्वे उलगडण्याचे काम या काळात केले आहे. अहिल्याबाई होळकर, डॉ. आनंदीबाई जोशी, डॉ. रखमाबाई आणि लंडनच्या वनारसे आजींविषयी लिहिली गेलेली चरित्रे सहज स्मरतात. कस्तुरबा गांधींच्या चरित्रात जरी म. गांधीच जास्त डोकावत असले तरी इंदिरा गांधीचे चरित्र लिहिताना त्यांच्याच व्यक्तिमत्त्वावर विश्लेषक पद्धतीने भर दिलेला असतो. मात्र कर्तृत्ववान स्त्रियांविषयीची अधिक चरित्रे वाचण्याची वाचकांची इच्छा आजही आहे.

काही चरित्रकारांनी जागतिक स्तरावरच्या परकीय चरित्रनायकांची व्यक्तित्वे अभ्यासपूर्ण रीतीने मांडली आहेत. सुरुवातीच्या काळात इंग्रजीवर आधारित असणारे हे चरित्र लेखन, आता स्वतंत्रपणेही लिहिले जाऊ लागले आहे. यातही राजकारणी, समाजसुधारणा करणारे असणारे आणि धर्मविषयातले अभ्यासक यांच्यापासून ते वाङ्मय, क्रीडा, तसेच संशोधनासह सर्व क्षेत्रांतील व्यक्तित्वांचा समावेश झाल्याचे दिसते. यात माहिती आणि परिचयापलीकडे जाऊन व्यक्तित्वाचे विश्लेषण करणारी चरित्रे कमी आहेत. पण या चरित्रकारांत आचार्य अत्रे, वि. ग. कानिटकर, वि. म. भुस्कुटे, वि. ह. कुळकर्णी, दि. वि. गोखले अशा चरित्रकारांबरोबच सुमती देवस्थळे, वीणा गवाणकर यांच्या सारख्या साक्षेपी खियांचाही समावेश आहे, हे मुद्दाम सांगावयास हवे; इतके त्याचे कर्तृत्व महत्त्वाचे आहे. माणूस शोधणारी ही चरित्रे आहेत.

चरित्रांनीच सत्य, लय, आणि कलात्मकता सांभाळत आणि इतिहास व वाङ्मय या दोन्ही दृष्टीने व्यक्तिमत्व समजून ते उलगडण्यासाठी लेखनप्रयोग याकाळात झाले. त्यातूनच नवचरित्रही जन्मास आल्याचे दिसते. येथे मला ‘व्यक्तिविमर्श’ या डॉ.द.न. गोखले यांच्या यशस्वी नवचरित्र लेखनाविषयी थोडेसे सांगावयाचे आहे. परंपरागत चरित्रकारापेक्षा ‘संकल्पना व्यक्तिविमर्शकाचे कार्य कसे वेगळे आहे, हे ही गोखले यांनी ‘संकल्पना मांडतानाच सांगितले आहे. शास्त्र सांभाळून उपयोजनाबरोबरच कलात्मकता जपणारा हा सत्यान्वेषी नवा सूक्ष्मलेखन प्रकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आणि त्यात तीन वेगवेगळ्या पद्धतींनी हाताळत सावरकर, गांधी आणि आंबेडकरांची व्यक्तित्वे उलगडून दाखवली आहेत. एकाबाजूला ही प्रगती असताना काही वेळा काही प्रमाणात अहितकारी लेखन झाले असले तरी एकंदरीत मराठी चरित्रलेखनाचा विकास या काळात होत गेला आहे. चरित्रकार चरित्रनायकांचे अंतरंग उलगडताना वाचकांचा सादही उंचावता येतो का हे पाहत आहेत. चरित्रनायकांचे सूक्ष्म आकलन व्हावे यासाठी या मानसशास्त्र, मानववंशशास्त्रापासून ते समाजशास्त्राची मदत घेतली जात आहे. आणि नवे चरित्रकार अधिक सूक्ष्मात जाऊन सत्याच्या शोधासाठी इतिहास आणि वाङमयातून शोध घेता घेता व्यक्तिमत्त्वाच्या मूळ स्रोताकडे जात, अधिक कसदार चरित्र; निर्मिती करतील अशी आशा करण्याएवढे आशादायक चित्र नक्कीच आहे.!

— जयंत वष्ट

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..