नवीन लेखन...

भटकंतीतील भुतनी

अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये नीलम विलास फडके यांनी लिहिलेली ही कथा. 


अखेर मायावतीच्या कड्यावर मला एकट्यालाच जावं लागणार हे निश्चित आहे. नेहमीप्रमाणे सहा महिने आधी सांगूनही इतरांनी काही ना काही सबबी सांगून माघार घेतली. हीच मंडळी नेहमी मी कुठे जाऊन आलो की, ‘अरे, आधी बोलला असतास आम्ही बरोबर आलो असतो,’ असे म्हणणार आणि तिकीटे बुक करायची वेळ आली की सबबी पुढे करणार हे ठरलेले. खरं तर इतक्या वर्षांचा अनुभव लक्षात घेता मला या गोष्टीची सवय व्हायला हवी होती तरीही प्रत्येक वेळी मनाचा चडफडाट व्हायचा तो झालाच!

रात्री माझ्या सॅकमध्ये आवश्यक त्या गोष्टी भरल्या आणि गजर लावून झोपून गेलो. सकाळी जागा होताच तोंड धुतले, सॅक उचलली आणि स्टँडवर येऊन मायावतीच्या डोंगराकडे जाणारी पहिली बस पकडली. गाडी पायथ्याच्या गावाशी पोहोचली तेव्हा नुकतंच उजाडलं होतं. गावच्या प्रथेप्रमाणे जवळजवळ प्रत्येक घराबाहेर एकमेकांशी गप्पा मारत गावकऱ्यांचं मशेरी लावणं चालू होतं. त्यातल्याच एकाला चहा कुठे मिळेल असं विचारलं असता त्यानं हातानंच इशारा केला. त्यानुसार पुढे गेलो असता घराच्या अंगणातच उभी केलेली एक गाडी व दोन बाकडी दिसली. मालक नुकताच तोंडबिंड धुवून नुकताच गाडीजवळ आलेला दिसत होता. सर्वसाधारणपणे अशा टपरीवाल्यांप्रमाणे तोही गाडीला टांगलेल्या तसबिरीला उदबत्ती ओवाळत होता. मला बसायचा इशारा करून त्यानं आपले ओवाळणे पूर्ण केले आणि स्टोव्ह पेटवून त्यावर पाण्याचं आंधण ठेवलं, त्यात साखर, चहापत्ती टाकून दुधाच्या पिशव्या फोडायला घेतल्या. त्याचा हा उद्योग चालू असताना मी सॅकमधून बिस्कटांचा पुडा व थर्मास बाहेर काढला.

टपरीवाल्यांच्या त्यांच्या प्रथेप्रमाणे सुरुवातीला केलेला कपभर चहा रस्त्यावर ओतून माझ्यासाठी परत ठेवला. तोपर्यंत मी पुडा फोडून बिस्कीटं खाण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यानं दिलेला गरमागरम चहा घेतला. त्यानं भरून दिलेला थर्मास सॅकमध्ये ठेवला, पैसे चुकते केले. डोंगराच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली.

हवा मोठी छान होती. त्यामुळे सुरुवातीला चाल मोठी झटपट झाली. मग वेग कमी झाला. एका टप्प्यावर थोडी विश्रांती घेतली आणि नव्या दमानं पुन्हा पावलं टाकू लागलो. सरळपणे ठरलेल्या ठिकाणी गेलो आणि की आलो असा माझा स्वभाव नाही. जरा वाकड्या वाटेनं जाणं, आजूबाजूला दृश्य देखणं आणि बरं वाटलं तर फोटो घेणं हा छंदच आहे आजही तसंच चाललं होतं. त्यामुळे मायावतीच्या टोकाजवळ पोहोचलो तेव्हा दुपार टळून गेली होती. कड्यावर गेलो. सुसाट वारं अंगावर झेलत काही मिनिटं उभा राहिलो. इकडेतिकडे भटकलो, फोटो काढले आणि एका मोठ्या झाडाच्या सावलीत बसकण मारली. सॅक काढली, थर्मास आणि सँडविच बॉक्स बाहेर काढला. चहाचा एकेक घोट घेत सँडविचचा फडशा पाडला आणि सावलीत मस्तपैकी ताणून दिली.

किती वेळ झोपले कोणास ठाऊक पण जाग आली. तेव्हा उन्हें उतरणीला लागली होती. थर्मासमधील उरलेला चहा बिस्किटांच्या पुड्याबरोबर संपवला. कपडे झटकले आणि परतीच्या प्रवासाला निघालो. आल्या वाटेने परत न जाता वेगळी वाट चोखाळावी म्हणून कड्याला वळसा घालून खाली जाणारी दुसरी वाट पकडली, डोंगरदरीतून खाली जाणाऱ्या साऱ्या वाटा अखेर बाहेराकडेच जातात याची कल्पना असल्याने आपण रात्रीपर्यंत गावात पोहोचू असा विश्वास होता. साधारण तासभर चालल्यावर वाटेला तीन फाटे फुटल्याचे आढळले. देवावर विश्वास ठेवून त्यापैकी एक वाट निवडली, आता आपण कड्याच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे मी आलो त्या बाजूला आलो आहोत असं वाटू लागलं पण दूरवरही शहरातल्या दिव्यांचा मागमूस दिसत नव्हता. सारंच काळोखाचं साम्राज्य!

तेव्हा मोबाईल अस्तित्वात नव्हते. कुणाला संपर्क साधणार आणि कुठला मॅप व लोकेशन बघणार! आकाशावर नजर टाकली आणि ताऱ्यांच्या अनुरोधानं काही दिशा समजते का याचा अंदाज घेतला पण काहीच लक्षात येईना. आता चालत राहण्याखेरीज काही मार्गच नव्हता. पुन्हा पावलं टाकायला सुरुवात केली. एक एक पाऊल चांगलंच जड वाटत होतं. थोडा वेळ चालल्यावर एक प्रशस्त खडक दिसला. पाठीवरची सॅक उतरली आणि खडकावर बसकण मारली. थोडा वेळ नुसता श्वासोच्छ्वास केल्यावर थोडं बरं वाटलं. हातावरील घड्याळावर नजर टाकली. रात्रीचे साडेआठ वाजून गेले होते. म्हणजे गेले तीन तास तरी आपण चालत होतो तर! एव्हाना पायथ्याशी तरी पोहोचलो असतो पण आता ते जमणार नव्हतं. पायथ्याच्या गावात मुक्कामाची सोय नव्हती की जेवणाची! सकाळी आठपर्यंत वस्ती मिळणार नव्हती. आता करायचं काय? जवळ सिगरेट असती तर? एकदम मनात विचार आला. खरं तर आतापर्यंत मी तंबाखूच्या कुठल्याही प्रकाराच्या वाटेला गेलो नव्हतो. गरज म्हणून दारु प्यायला, मटण/चिकन खायला शिकलो होतो पण तंबाखू/सिगरेटची कधी गरजच भासली नव्हती.

“काय चुकलात वाटतं?” अचानक कानावर प्रश्न पडला. क्षणभर भास झाल्यासारखं वाटलं पण डोळे चोळून समोर बघितलं तर समोर जुनाट टी शर्ट आणि जीन पँट घातलेला एक इसम उभा होता. वयानं पंचवीस-तिशीच्या दरम्यान असावा.

“वाट चुकलात वाटतं?” त्यानं पुन्हा विचारलं. “हो!” मी सुकलेल्या ओठांवरून जीभ फिरवत उरत्तर दिलं. “निघायला उशीर झाला आणि रस्ता चुकला!”

“म्हणजे चकवा लागल्यासारखंच झालं की!” तो म्हणाला.

चकवा लागला की माणूस गोल गोल फिरतो आणि पुन्हा पुन्हा त्याच जागी येतो हे मला माहीत होतं पण माझं तसं काही झालं नव्हतं. मी केवळ वाटच चुकलो होतो. मी त्याला तसंच सांगितलं. “मग आता काय?” त्यानं विचारलं.

“तोच तर प्रश्न आहे. खालच्या गावात जाता येत नाही आणि जाऊनही उपयोग नाही.” मी खरं काय ते सांगितलं.

“मग काय इथेच खडकावर रात्र काढणार?”

“काय करावं काही सुचत नाही.”

“आणखी थोडं चालू शकता?” त्यानं विचारलं.

“थोडं म्हणजे किती?” मी काहीशा वैतागलेल्या सुरात विचारलं.

“थोडं म्हणजे पंधरा वीस मिनिटं! खायची काही सोय होते का बघतो. झोपायला निदान आसरा तरी मिळेल.” तो म्हणाला.

मला तर देवच पावल्यासारखं वाटलं. “चला!” मी म्हणालो आणि सॅक उचलून त्याच्या मागोमाग निघालो. कुठे जायचं ते माहीत नव्हतं. पण परिस्थिती आणखी चिघळणार नाही अशी आशा होती. भारावल्यासारखं चालत होतो. खरोखरच पंधरा वीस मिनिटं चालल्यावर दूरवर झोपडीसारखं काहीतरी दिसू लागलं. तिच्यापासून पंधरा वीस पावलांवर पोहोचलो तशी बरोबरच्या माणसानं साद घातली, “मायाऽऽ ए माया!”

‘काय रे दादा?” आतून एका बाईचा आवाज आला.

“एका पाहुण्यापुरतं पिठलंभाकरी करण्याएवढं सामान आहे का घरात?”

“अरे देवा! अशा अवेळी कोणाला बरोबर घेऊनआलास? बघते हं!”

तोपर्यंत आम्ही झोपडीपर्यंत पोहोचलो होतो. “जरा पाणी पण दे ग हातपाय धुवायला!” त्या दादानं सांगितलं आणि बाहेर ठोकलेल्या एका फळकुटावर बसायची खूण केली. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी सॅक खाली टाकली आणि फळकुटावर बसकण मारली. पाचएक मिनिटातच आतून एक तरूणी पाण्यानं भरलेला तांब्या घेऊन बाहेर आली. तिच्या भावानं तो तिच्या हातातून घेऊन माझ्या हाती दिला. त्या गरम पाण्यानं हातपाय व तोंड धुताच सारा शीण कुठल्या कुठे गेला. एवढ्यात आतून फोडणीचा वास आला. बहुतेक पिठलं फोडणीला टाकलं असावं. पाठोपाठ भाकऱ्या थापल्याचाही आवाज ऐकू येऊ लागला. पंधरावीस मिनिटात आतून जेवणासाठी हाक आली. आम्ही दोघेही आत गेलो. त्या दादानं (मला अजूनही त्याचं नाव समजलं नव्हतं) माझ्यासाठी गोणपाटाची घडी टाकली तर बहिणीनं पिठलंभाकरीची थाळा समोर मांडली. दादाला विचारलं असता त्या दोघांचंही जेवण आधीच झालं असल्याचं समजलं. मग मी अधिक काही न विचारता पिठलं भाकरीवर ताव मारला.

जेवण झालं तशी दादानं बाहेर दोन गोणपाटं टाकली आणि दोन जुन्या चादरी टाकल्या. “दादा, झोप आता! सकाळी तुम्हाला अर्ध्या वाटेवर सोडतो!’ दादा म्हणाला. माझे डोळे आधीच गपागपा मिटू लागले होते म्हणून लगेच आडवा झालो. तो आणि त्याची बहीण कधी झोपली ते कळलंच नाही.

सकाळी जागा झालो आणि डोळे चोळत मोठी जांभई दिली. अंगाला आळोखेपिळोखे देत आजूबाजूला बघितलं. भुताटकीच्या गोष्टीसारखी ती झोपडी आणि ती बहीणभाऊ नाहीशी तर झाली नाहीत ना! हे बघून घेतलं. सुदैवानं सारं काही जागेवर होतं. दादाचं तोंड धुवून झालं. माझ्यासाठी गरम पाण्यानं भरलेला तांब्या तयार होता. तोंड धुवून होतं न होतं तोच गरमागरम चहा समोर आला. आत्तापर्यंत नुसता वाचनात आलेला, चुलाण्यावर बनवलेला कोरा चहा चवीला अमृतासारखा वाटला. “चला दादा, तुम्हाला अर्ध्या वाटेपर्यंत नेऊन सोडतो म्हणजे गावाकडे जाणारी बस मिळू शकेल!”

मी झटपट तयार झालो आणि निघण्यापूर्वी झोपडीकडे नजर टाकली. माया, त्याची बहीण दरवाजात उभी होती. रात्री रॉकेलच्या ढणढणत्या दिवटीच्या प्रकाशात तिला नीट बघायला झालं नव्हतं. आता तिचं खरं रूप दिसलं. गावरान सौंदर्याचा तो उत्कृष्ट नमुना होता. मी हसून हात हलवला. तिनंही तसाच प्रतिसाद दिला. आम्ही दोघे झटपट पावलं टाकू लागलो.

“दादा, माझं नाव माधव!” तो स्वत:हून बोलू लागला. “लोक मला महादेव, महादू म्हणतात. चालतंय! माझी बहीण माया! आम्ही दोघंच एकमेकांना आहोत. भाजीपाला, फळं विकतो. कधी मजुरी करतो. त्यावर आमचं भागतं. ही झोपडी आमच्या बापजाद्यांनी मागे ठेवली. कधी बनवली माहीत नाही. आम्हाला. तेवढाच आडोसा. आम्ही दिवसभर गावात असतो आणि मुक्कामाला झोपडीकडे जातो. काल काय झालं कोणास ठाऊक! रात्री जेवण झाल्यावर चक्कर मारावीशी वाटली आणि नेमकी तुमची भेट झाली. काय योगायोग असतो बघा!”

बोलता बोलता आम्ही निम्मा टप्पा मागे टाकला होता. खालची वाडी दिसू लागली होती. माधव माझा निरोप घेऊन परत फिरला. मी झपाझप पावले टाकीत गावात पोहोचलो. सुदैवानं ड्रायव्हर, कंडक्टर गाडी उभी करून टपरीवर चहा घ्यायला गेले होते. मी गाडीत जाऊन बसलो. ड्रायव्हर, कंडक्टर येताच गाडी सुरू झाली. अर्ध्या पाऊण तासात गावात पोहोचलो. सगळे देहधर्म उरकून, नाश्ता करून ऑफिसला गेलो.

संध्याकाळी परत येऊन बघतो तो माधव आणि माया दरवाजात ठिय्या मारून माझी वाट पाहत बसलेले! “या दादा! तुमचीच वाट बघत बसलो होतो. म्हटलं ऑफिस सुटल्यावर थेट घरी येता की कुठे दुसरीकडे जाता!”

“काय काम होतं?” मी विचारलं. मनात शंका आली की बहुतेक कालच्या आदरातिथ्याचे पैसे वसूल करायला आले असणार.

‘आधी दार तर उघडा! आत गेल्यावर बोलू!” माधव म्हणाला. माझ्या पाठोपाठ तीही दोघे आत आली आणि भिंतीला टेकून खालीच बसली. मी कॉटवर बसलो आणि लगेच प्रश्न केला, “आता बोला, काय काम आहे?”

“सांगतो की! एवढी काय घाई आहे. संध्याकाळी कामावरून आल्यावर चहा कॉफी काही घेता की नाही/ स्वतः करता की बाहेरून मागवता की येतानाच घेऊन येता?’’ माधवनं प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली.

“कधी घेतो, कधी घेत नाही. करायचा कधीकधी कंटाळा येतो पण बाहेरून मागवत नाही की येताना घेऊन येत नाही!” मी सरळ सरळ सांगून टाकलं.

“मग आज घरचा, आमच्या मायेच्या हातचा, दुधाचा चहा घेणार काय? तिला फक्त वस्तू कुठे ठेवल्या आहेत ते सांगा.”

“पण तुम्ही का एवढा त्रास घेता?” मी काहीसं वैतागून विचारलं.

‘आपल्या माणसापाई कसला त्रास? तुम्ही पटापट वस्तू कुठे ठेवल्या आहेत ते सांगा आणि निवांत बसा!’ माधवलं सांगितले. मीही वस्तू कुठे ठेवल्या आहेत ते सांगितलं आणि त्यानं सांगितल्याप्रमाणे खरोखर निवांत बसलो.

थोड्याच वेळात माया चहाचे कप घेऊन आली. असा आयता चहा मिळाल्यामुळे बरंच वाटलं. चहा खरोखरच चांगला झाला होता. बोलून दाखविल्यावर मायाचा चेहरा खुलला. डोक्यात किडा वळवळत होताच. ही मंडळी कशासाठी आली आहेत?

“दादा, एक विचारू का?” माधवनं विचारलं.

“विचारा की!” मी परवानगी देऊन टाकली.

“तुमच्या घरी कोण कोण आहे?”

“कुणीही नाही. मी सडाफटींग आहे. आईवडील लहानपणीच गेले. मी आणि मोठी बहीण या नातेवाईकांकडून त्या नातेवाईंकांकडे दिवस काढत होतो. बहिणीचं लग्न झालं. ती आपल्या घरी असते. वर्षातून एकदोनदा आमची भेट होते. मी नोकरी लागल्यापासून इथेच आहे.” मी भडाभड सगळं सांगून टाकलं.

“अ रा रा रा, म्हणजे वाईटच की! मग जेवणाखाण्याचं कसं काय?”

“एका खाणावळीत जेवतो. कधी कधी मित्र बोलवतात त्यांच्याकडे जातो.’

‘मग घरच्या घरी ताजं अन्न मिळालं तर?”

“बरंच वाटेल. पण करणार कोण?” मी विचारलं.

‘आपण बाहेर जाऊन निवांतपणे बोलू या का?”

माधवनं विचारलं.

“मग बाहेर कशाला? इथे निवांतपणा नाही?”

“ठीक आहे! काय ग माये, विचारू का?” माधवनं मायाला प्रश्न केला. तिनं संमतीदर्शक मुंडी डोलावली.

“ठीक आहे. विचारायचेच तर मग! तुम्हाला माया कशी काय वाटते? कराल लग्न तिच्याशी?” माधवनं एकदम बॉम्बच टाकला.

‘असं लगेच कसं सांगता येईल? मला थोडा विचार करावा लागेल.” मी म्हणालो.

“करा, करा! सावकाश विचार करा! आणखी कुणाला विचारायचं असेल तरी विचारून घ्या!” माधव म्हणाला.

“विचारायला आहे कोण इथे? एकुलती एक बहीण! ती काहीच बोलणार नाही. पण मलाच जरा विचार केला पाहिजे.’

“मग करा की! नाही कोण म्हणतोय. बरं, आम्ही आता निघू?”

‘काहीतरीच काय?” मी मनापासून म्हणालो. ‘आता रात्र झाली आहे. मला घरात काही करता येणार नाही. पण तिघांसाठी डबा घेऊन येतो. निवांत जेवा आणि इथेच झोपा.”

“बघा, घरात बाईमाणूस नसलं की असं होतं. आता तुम्ही म्हणताच आहात तर थांबतो. आपण दोघं डबे घेऊन येऊ या! माया थांबेल इथेच. काय गं थांबशील ना एकटी मागं?”

मायानं मान डोलावली.

“हे बघा दादा, आता बहिणीला तुम्ही बघितलंच आहे. तिच्या हातची चवही बघितली आहे. ती फारशी शिकलेली नाही पण व्यवहार उत्तम सांभाळते. फारशा आवडीनिवडी नाहीत, चैनबाजी नाही. अगदी साधी आहे.” माधवचं गुणवर्णन चालू होतं.

“ठीक आहे. आपण आता डबे घेऊन येऊ या.” मी पिशवी उचलत म्हणालो. माधवही उठला. दोघेजण डबे घेऊन आलो. रात्री फारसं बोलणं झालं नाही. मी सांगितलं की, पुन्हा गावात आलात की फेरी मारा. तोपर्यंत माझा निर्णय नक्की होईल.

सकाळी उठल्यावर मायानं तिघांसाठी चहा केला आणि तो घेऊन झाल्यावर दोघेही निघाली. मागे वळून हात करताना दोघांच्याही नजरेत आशा आणि आर्जव दिसत होतं. ती दिसेनाशी होईपर्यंत मी दारात उभा होतो. नंतर आत येऊन दैनंदिन उपक्रम चालू केले. एकीकडे डोळ्यांसमोर मायाचा चेहरा आणि डोक्यात तिचेच विचार चालू होते.

काय हरकत आहे? मनानं कौल दिला. दिसायला बरी आहे. स्वयंपाकपण चांगला करते. नसेल चांगली शिकलेली पण आपल्याला कुठे तिला नोकरीला लावायचं आहे? घर सांभाळलं आणि जरा टकाटक राहू लागली की चालेल की! बहीणही काही हरकत घेणार हे माहीत होतं. माझा निर्णय जवळजवळ पक्का झाला.

सकाळचं नाश्तापाणी उरकून ऑफिसात गेलो. संध्याकाळी परत येतो तर जोडगोळी पुन्हा दारात हजर. मी काहीही न बोलता दरवाजा उघडला. तिघेही आत गेलो. मायानं लगेच स्वयंपाकघराचा ताबा घेतला आणि चहाचं आधण ठेवलं. माधव कालच्यासारखाच भिंतीला टेकून खाली बसला. मी त्याला समोरच्या खुर्चीत बसायला सांगितलं. काहीसा ओशाळा, मनातल्या मनात खूश होत तो खुर्चीवर बसला.

चहा घेता घेता मी त्याला माझा होकार सांगितला. तसा त्याचा चेहरा उजळला.

“पण दादा, आमच्याकडे द्यायला काहीच नाही, हातावरची पोटं आमची!” माधव म्हणाला.

“पण मी काही मागितलं का? पण माझ्या काही अटी मात्र आहेत.” मी सांगितलं.

“त्या कोणत्या?” त्याचा चेहरा काहीसा चिंताग्रस्त झाला.

“हे बघा, तुमच्याकडे मदतीला माणसं नाहीत, माझ्याकडेही नाहीत. तर काय मोठा घाट न घालता सरळ रजिस्टर्ड लग्न करू! माझ्याकडून दोन साक्षीदार लागतील, तुमच्याकडून दोन! तुम्हाला मिळवता येत नसतील तर तसं सांगा मग तीही जबाबदारी माझी.”

“असं कसं! दोन माणसं आमीबी उभी करू की! आणखी काय?”

“चार दिवस मायाला घेऊन इथे यायचं! मित्रांच्या बायकांच्या मदतीनं ती साड्या व ड्रेसेस घेईल. मी बाकीची तयारी करतो. रजिस्टर लग्नाला नोटीस द्यावी लागते. म्हणजे आपल्याजवळ महिना तरी आहे. दरम्यान तुम्हाला काय करायचं असेल ते तुम्ही करा.”

माधवनं त्याला मान्यता दिली. आम्ही रितसर नोटीस दिली. ठरल्याप्रमाणे माया चार दिवस आली. मित्रांच्या बायकांच्या मदतीने खरेदीही झाली. अचानक एक दिवस माधव एक गाठोडं घेऊन आला. ते सोडल्यावर आतून छोटी, मोठी आणखी गाठोडी निघाली. ती उघडल्यावर आतून नोटा आणि नाण्यांचा पाऊसच पडला.

“हे काय माधव?” मी आश्चर्यानं विचारलं.

“माझ्या बापजाद्यांपासून शिल्लक ठेवीत आलो आहोत ती अशा कामासाठी खर्च करायची नाही तर कधी?” त्यानं प्रतिप्रश्न केला.

आम्ही दोघे मिळून साऱ्या नोटा व्यवस्थित लावल्या. नाण्यांची बंडले बांधली आणि व्यवस्थित मोजणी केली तेव्हा तो काही हजारांचा ऐवज निघाला. आम्ही काय द्यायचे किंवा करायचे राहिले याचा अंदाज घेतला तर काहीच लक्षात येत नव्हतं. म्हणून मी माधवला सारी रक्कम त्याच्याकडेच ठेवायला सांगितलं.

अखेर ठरल्याप्रमाणे सारे विधी ठरल्याप्रमाणे पार पडले. माझी बहीणही लग्नाला आली होती. तिलाही भायजय म्हणून माया पसंत पडली व आपल्याकडे येण्याचे आमंत्रणही दिले. मित्रांची व त्यांच्या पत्नींची भरपूर मदत झाली आणि सोनपावलाने माया माझी धर्मपत्नी बनून घरात आली. गृहिणी म्हणून ती कर्तबगार होतीच पण मित्रांच्या पत्नींकडून, बहिणीकडून तिनं रितीरिवाजही शिकून घेतले आणि त्यातही पारंगत झाली.

शेवटी सुखी संसाराच्या ज्या अपेक्षा असतात त्याप्रमाणे झालेच. माया आई बनणार याची चिन्हे दिसू लागली. माधवही ही बातमी ऐकून खूश झाला.

“दादा, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे.” तो म्हणाला.

‘आता आणखी काय सांगायचे आहे?” मी काहीशा कुतुहलाने विचारलं.

“नीट ऐका! तुम्हाला धक्का बसेल पण घाबरू नका. ही शरीरं माधव आणि मायाची असली तरी आम्ही दोघे वेगळेच आहोत. मी मधू आणि ही मालू. आम्ही दोघेही भूतं आहोत आणि काही काळासाठी काही हेतूसाठी या देहातून वावरत असतो.

“काय/” मी किंचाळलोच.

“घाबरू नका! तुम्हाला धक्का बसेल म्हणून बोललो होतोच पण तुम्हाला आमच्यापासून काही त्रास झाला का? पुढेही होणार नाही. आता सारं काही समजावून सांगतो. या माधव आणि मायाप्रमाणे आम्हीही डोंगरातील फळफळावळ आणि भाजीपाला आणून विकत होतो. एक दिवस अशीच करवंदं काढीत असताना मालूचा पाय घसरला आणि ती खाली जाऊ लागली. तिला सावरायला गेलो तर माझाही तोल गेला. दोघंही आदळत आपटत कड्याच्या तळाशी गेलो आणि तिथेच आमचा जीव गेला. आम्ही तेव्हा याच वयाचे होतो. मालू संसाराची स्वप्नं बघत होती आणि का कुणास ठाऊक, तिच्या नजरेसमोर तुमचाच चेहरा येत असे. तिची इच्छा आणि तिला मदत करण्याची माझी इच्छा यामुळे दोघांचे जीव घुटमळत राहिले. योगायोगाने आम्हाला हे दोघे बहिण भाऊ दिसले आणि आम्ही त्यांचा ताबा घेतला. त्यांनाही आम्ही कधी त्रास दिला नाही. त्यांना आमचे अस्तित्व जाणवत होतं पण ते काही करू शकत नव्हते की काही बोलू शकत नव्हते. त्यांना आमची मदतच होत होती. त्यामुळे कुरकूर करण्याचा प्रश्नच नव्हता. आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही त्यांच्या देहातून बाहेर पडू शकत होतो. त्या रात्री असाच बाहेर पडलो असताना तुम्ही दिसलात आणि मालूचे स्वप्न आठवलं. मी लगेच माधवचा ताबा घेतला आणि पुढे काय झालं ते तुम्हाला सारं ठाऊकच आहे.”

हे ऐकून मी अवाक्च झालो. क्षणभर काही सुचेना.

मग कसाबसा तोंडून प्रश्न बाहेर पडला, “मग आता?”

“घाबरू नका! मायाला सुखरूप बाळ होईपर्यंत आम्ही दोघं इथेच राहणार. मग या दोघांचा आणि तुमचा निरोप घेऊ. तुमच्या आयुष्यावर काहीच परिणाम होणार नाही. माया इथेच राहील आणि माधवही अधूनमधून येत राहिल. आणखी एक गोष्ट आम्ही देह सोडले तरी आमची तुमच्यावर नजर राहीलच. जेव्हा जेव्हा तुम्हाला कसली अडचण येईल तेव्हा आम्ही लगेच धावून येऊ. आपलं नातंच तसं आहे.’

चहा घेऊन माधव गेला. दिवस सुरळीत जात होते. तरी आपण एका भुताबरोबर संसार करीत आहोत याची जाणीव होतच होती. पण या भूताने आपल्याला सुखच दिले आहे ही जाणीवही मनात होती. अखेर माया सुखरूप प्रसूत होऊन तिला जुळं झालं. म्हणजे मधू आणि मालूचा वंश किंवा पुनर्जन्मच झाला होता असे म्हणायचं! ती दोघं माया माधवचे देह कधी सोडून गेले ते कळलेच नाही. पण आमच्या संसारावर कोणाचे तरी स्नेहाचे पांघरूण आहे याची जाणीव आम्हाला सतत होत असते.

-नीलम विलास फडके

अ/३०६, व्हिजन सिटी, जांभूळ गाव,
पो. कान्हे, मुंबई पुणे जुना हायवे
ता. मावळ, जि. पुणे

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..