नवीन लेखन...

भटकंती

‘भटकणे’ हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो. माहित असलेल्या वाटेवरून फिरण्याला भटकणे म्हणतात. काही उद्देशाने केलेली रपेट व पाय नेतील त्या वाटेने केलेली चाल हा भटकण्याचाच प्रकार. काही न ठरवता केलेली पदयात्रा व चालण्याच्या स्पर्धेमध्ये कापलेले अंतर हेही भटकणे नाही का? सपाटीवरून केलेले भ्रमण व डोंगरदर्‍यातील फिरणे ही भटकंतीची रूपे आहेत. ठराविक काळात ट्प्पे पार करीत केलेली वारी ही वेगळ्या पातळीवरील अनुभव देणारी पण भटकंतीच.

डोंगरातील भटकंती

भटकण्याच्या या प्रत्येक प्रकारातून आनंद घेतला जाऊ शकतो. वाट चुकल्यामुळे किंवा निष्कारण काराव्या लागलेल्या वणवणीला भरकटणे म्हणतात. असे होते तेव्हा मात्र आनंदापेक्षा त्रास जास्त होतो. ज्याला फिरण्याची आवड आहे त्याने वरीलपैकी कोणत्याही प्रकारे पायपीट केली तरी ती आनंददायी होऊ शकते. ज्याला चालण्याचा कंटाळा असतो त्याला पाच-दहा मिनिटांचे अंतर कापणे जिवावर येते. तर अशी ही फिरण्याची अनेक रूपे ज्याने अनुभवली आहेत त्याला ‘चालणे’ म्हणजे काय हे कळलेले असते, त्याचे फायदे-तोटे यांची माहिती असते.

आजच्या जमान्यात कामाच्या वेळा पाळणे, लांब अंतराचे प्रवास करणे यासाठी वाहतुकीची (खाजगी व सार्वजनिक) साधने सोयीची ठरू लागली आहेत. चरितार्थ चालविण्याची जबाबदारी असणार्‍यांना अशा वाहतुकीचा आसरा घ्यावा लागतो. पुर्वी ज्या अंतरावरील शाळेत मुले चालत जात असत त्याच्या अनेक पट अंतरावरील शाळा आजची मुले गाठतात. लांब अंतरावर शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना वाहनांचा आधार असतो. जवळपास असणारी कामे आणि बाजारहाट यासाठी वाहन सोयीचे पडते, कारण वेळ महाग झाली आहे. घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा असणा-यांना वाहनांचा उपयोग करावा लागतो.

‘भटकणे’ हे पायी असते असे गृहित धरायला हरकत नाही. वाहनावर मारलेला फेरफटका म्हणजे ‘भटकणे’ नव्हे. त्यामुळे सध्याच्या काळात पायी चालणे कमी झाले आहे, म्हणजेच ‘भटकंती’ कमी झाली आहे असे म्हणता येईल. यात एवढे काळजी करण्यासारखे काय आहे? तांत्रिक प्रगतीचा स्वीकार करणे म्हणजे प्रगतीचे लक्षण आहे ना? मग चालणे कमी झाल्याचा एवढा बाऊ कशाला? कारण चालणे ही फॅशन होऊ पहात आहे. हे संवाद बघा.

1) ‘मी रोज 5 कि. मी. चालतो.’
‘हो का? वा. कोठे जाता?’
‘जिममध्ये.’
‘तिथे कसे जाता?’
‘कारमधून.’
‘मग चालता कोठे?’
‘ट्रेडमिलवर.’

2) ‘ह्या बघा मी नवीन चपला घेतल्या आहेत.’
‘काय म्हणतात या चपलांना?’
‘ह्या ऍक्युप्रेशर चपला आहेत. घरात कारपेट असल्याने व बाहेर अनवाणी चालण्याची वेळ येत नसल्याने ह्या वापरण्याचा सल्ला दिला आहे डॉक्टरांनी.’

एके काळी अन्य पर्याय नसल्याने चालणे ही प्राथमिक गरज होती. पण त्याचे फायदे शरीराला मिळत होते. आता चालण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे न चालण्याचे तोटे पुढे येत आहेत. मोकळ्या हवेतील चालणे व एसीतील चालणे यात फरक आहे हे डॉक्टरांची फी भरल्याशिवाय कळत नाही. आधी जिमची फी भरलेली असते. हेडफोनवर गाणी ऐकत नुसते पाय हलवणे ही चालण्याची व्याख्या झाली आहे. हात हँडलवर असतात. खांद्यापासून हात हलण्याची क्रिया करण्यासाठी वेगळा व्यायाम प्रकार करावा लागतो. पहाटेच्या वेळी हवा शुध्द असते. आवाज व दृष्ये नैसर्गिक असतात. हात पाय व सारे शरीर एका लयीत हलत असते. पण हे फुकटचे असल्याने याचे बाजारी मूल्य शून्य असते. जवळ असलेल्या शाळेत मुलांना गाडीवर सोडायला जाणारे पालक मुलांना न चालण्याचे धडे देत असतात. जुन्या सवयींना चिकटून बसण्याचा सल्ला कोणी देणार नाही. पण चांगली सवय असेल तर ती का सोडायची? चालणे, सायकल चालविणे व पोहणे हे सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार आहेत. सध्याच्या काळात बेशिस्त वाहतुक ही पहिल्या दोन प्रकारांसाठी अडथळा ठरते आहे. नियोजनशून्य कारभारामुळे पर्यावरणीय समस्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत अशुध्द हवेबरोबर आरोग्याच्या नव्या तक्रारी उद्भवू लागल्या आहेत. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न काही गृहसंकुले करीत आहेत. बागेतील तसेच रस्त्याच्या कडेला बसविलेली व्यायाम व फिटनेस साधने यांचा उपयोग केला जातो आहे. हे चित्र आशादायक आहे. पण समस्यांचे मुळापासून निवारण व्हावे यादृष्टीने प्रशासन प्रयत्न करताना कधीच दिसत नाही. ह्क्क व कर्तव्य या बाबतीतली भारतीयांची मनोवृत्ती ‘चलता है’ या शब्दाने वर्णिली जाते. ‘चलता है’ म्हणजे ‘चालणे’ या सुदृढ अर्थी नाही, तर ‘चालायचेच’ या बेफिकीर अर्थी आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.

चला आपण खरंखरं चालायला सुरुवात करायची का? डबल सेव्हिंग होईल – जिमची व डॉक्टरांची फी वाचेल. आणि जवळच्या कामांसाठी चालत गेलं तर ईंधनाची बचतही होईल. मिळणारा वेळ हा आपल्या अग्रक्रमानुसार ठरत असतो. ‘चालणे’ मात्र या अग्रक्रमात वर सरकणे आवश्यक आहे, तरच त्यासाठी वेळ मिळेल. म्हणून, ‘चालण्याची सवय ही चांगली सवय आहे’ हे मनात ठसविणे अवश्यक आहे.

 

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 36 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..