नवीन लेखन...

भारत सुवर्णभूमी…

भारत हा देश अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. याच भूमीचा आदर अनेक कवी-लेखक-विचारवंतांनी आपल्या रसाळ व देखण्या शैलीतून केला आहे . याच भारतभूमीचे वर्णन करताना राजिंदर कृष्णन आपल्या सुप्रसिद्ध गाण्यात म्हणतात,
जहाँ डाल डाल पर सोने की
चिडियाँ करती हे बसेरा,
वह भारत देश हे मेरा …..
या गाण्यातील एका वाक्यातूनच सुवर्णभूमी भारत देशाची महती विशद होते. इतिहास, संस्कृती, आध्यात्म, संस्कार या सर्वच बाबतीत सोन्याची झळाळी असणार्या या देशात प्रत्यक्ष सोन्याचे अस्तित्व काय होते? आज आपल्याकडे नव्या नववर्षारंभी, लग्न समारंभानिमित्ताने म्हणू नका प्रत्येक शुभ प्रसंगी सोन्याची उपस्थिती लागते, मग आजच्या प्रमाणे प्राचीन भारतीय सोन्याला तितकेच महत्त्व देत होते का? राजिंदर कृष्णन यांनी गाण्यात वर्णन केल्याप्रमाणे या सोनेकी चिडियाँचा बसेरा सांगणारे भारताच्या इतिहासात कोणते पुरावे सापडतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत असताना मागे वळून इतिहासाच्या काळोख्या डोहात डोकावून पहावेच लागते.

या इतिहासाच्या डोहात पाहत असताना सर्वात आधी नजरेस पडते ती सिंधू संस्कृती. भारतीय इतिहासाचा मानबिंदू असलेल्या या संस्कृतीला विसरून चालणार नाही. भारतीय इतिहास समजून घेण्यासाठी या जगप्रसिद्ध अशा सिंधू संस्कृतीचा आढावा घ्यावाच लागतो. भारतीय इतिहासातील सर्वात प्रगत संस्कृतीतील लोकांना ही सोन्याचा मोह आवरता आला नव्हता. पुरातत्वीय सर्वेक्षणात व उत्खननात सोन्याचे अनेक दागिने सापडले आहेत. स्त्री ही कुठल्याही काळातील असो तिला दागिन्यांचा मोह नाही झाला तर नवलच! असेच काहीसे स्वरूप सिंधू संस्कृतीतही आढळते.

२००० सालची घटना, उत्तर प्रदेशातील मांडी या गावी एका शेतकर्याला शेतात काम करत असताना, जमिनीच्या खाली जवळ जवळ तीन टन सोन्याचे दागिने सापडले, परंतु अचानक सापडलेल्या या सोन्याच्या दागिन्यांमुळे गावात बातमी वार्यासारखी पसरली, सबंध गाव त्या स्थळी गोळा झाला. गावकर्यांनी हा हा म्हणता जमिनीच्या पोटातून बाहेर पडलेला हा सुवर्ण ठेवा गायब केला, पोलीस त्या स्थळावर पोहचले त्या वेळी त्यांना केवळ दहा किलो सोने वाचवण्यात यश आले. या सोन्याच्या दागिन्यांचे परीक्षण व अभ्यास झाल्यावर असे लक्षात आले की हे सर्व सोने सिंधू संस्कृती कालीन आहे.

अभ्यासकांच्या मते हे सोन्याचे दागिने इसवी सन पूर्व २००० काळातील आहे. मांडी येथे सापडलेल्या या दागिन्यांशी साधर्म्य दर्शविणारे सोन्याचे दागिने १९२० साली उघडकीस आलेल्या मोहंजोदडो या सिंधू संस्कृतीच्या स्थळावर देखील सापडले. या दागिन्यांमध्ये प्रामुख्याने केशरचनेसाठी वापरात येणार्या सोन्याच्या पिना, गळ्यातील माळा, अंगठ्या, बाजूबंद या सारख्या दागिन्यांचा समावेश होतो. इतकेच नव्हे तर सिंधू संस्कृतीची प्रतीके मानले गेलेल्या बैल व इतर प्राण्यांच्या मुद्रा काही ठिकाणी सोन्याच्या सापडलेल्या आहेत.

सुवर्णनाणी

सिंधू संस्कृतीच्या काळातून थोडं अजून पुढे गेलो तर ऐतिहासिक काळात येणारा सोन्याचा उल्लेख हा नाण्यांच्या रूपाने येतो. इसवी सनाच्या पहिल्या शतकात कुशाण शासकांनी सोन्याच्या चलनी नाण्यांचा उपयोग भारतात सर्व प्रथम केला असे अभ्यासक मानतात. परंतु भारतीय सोन्याच्या नाण्यांचे खरे खुरे श्रेय जाते ते गुप्त घराण्याकडे भारतीय इतिहासात गुप्त घराण्याचा काळ हा सुवर्ण युग म्हणून ओळखला जातो. गुप्तांनी सोन्याची नाणी मोठ्या प्रमाणात पाडली. त्यांची राजाराणी, राजदंड, परशु, अश्वमेध, वीणावादक, व्याघ्रपराक्रम इत्यादी छापाची नाणी विशेष उल्लेखनीय आहेत.

इतक्या मोठ्या प्रमाणातील सोन्याचा वापर हा प्राचीन भारतातील समृद्धी विशद करते. परंतु खुद्द् भारतात सोन्याच्या खाणी फार कमी होत्या. प्राचीन काळापासून भारतात कर्नाटक मधील तीन सोन्याच्या खाणी प्रसिद्ध आहेत. त्यातील कोलार व हट्टी खाणीतून सिंधू संस्कृतीला सोन्याचा पुरवठा करत होते. परंतु प्राचीन भारतातील सोन्याचा वापर पाहता, या खाणीतून होणारा पुरवठा पुरेसा नव्हता, इतक्या मोठ्या प्रमाणात वापरातील सोने आले कुठून? या प्रश्नाचे उत्तर देखील इतिहासातच मिळते.

सिंधू संस्कृती पासून भारताचे आंतरराष्ट्रीय व्यापारात विशिष्ट स्थान होते. विशेषत: इजिप्त व मेसोपोटेमिया यांच्याशी होणार्या व्यापाराचे पुरावे आजतागायत सापडतात, भारत वगळता जगाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचा इतिहास पडताळून पाहत असताना लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे सोन्याचा जगातील सर्वात जुना पुरावा इजिप्त व मेसोपोटेमिया येथे आढळला. हा पुरावा इसवी सन पूर्व ४००० च्या सुमारातील आहे. प्राचीन इजिप्शिअन संस्कृतीमधील सुवर्णकारांनी घडविलेल्या सोन्याच्या वस्तू उत्खननात सापडल्या आहेत. इसवी सनाच्या सुरवातीस इजिप्त हे सोन्याच्या उत्पादनाचे महत्वाचे केंद्र होते. म्हणूनच बहुदा इजिप्त-मेसोपोटेमिया येथूनच भारतीय सोन्याचा स्रोत येत असावा असे अभ्यासक मानतात. प्राचीन भारत-रोम व्यापाराच्या काळातही अशाच स्वरूपाचे पुरावे मिळतात. भारतात आयात होणार्या सोन्यामागे, भारत-रोम व्यापाराचा सर्वात मोठा वाटा मानला जातो . या व्यापारावर भारताचे वर्चस्व होते. भारतातून निर्यात होणार्या गरम मसाल्यांना, सुवासिक अत्तरांना, मलमल कापडाला रोमन बाजार पेठेत विशेष मागणी होती. या व्यापाराचे अनेक उल्लेख आपल्याला तत्कालीन रोम व ग्रीक प्रवाश्यांच्या प्रवास वर्णनात सापडतात . या उल्लेखांमध्ये नमूद केले आहे की रोमन व्यापारी भारतीय दर्जेदार मालासाठी सुवर्ण मुद्रा मोजीत असत. यावरूनच भारताची व्यापारावरील पकड व भारतात येणारा सोन्याचा स्रोत लक्षात येतो. अशी ही प्राचीन भारतातील सुवर्णाची कहाणी! आपल्या मेहनतीच्या बळावर प्राचीन भारतीयांनी या सौभाग्यवती भू मातेला सालंकृत बनवून सुवर्णभूमीचा दर्जा जगाच्या पटलावर बहाल केला.

-शमिका सरवणकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..