नवीन लेखन...

बलात्कार

घराण्याची इभ्रत किंवा आपला अहंकार जोपासण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन दुसऱ्याचे आयुष्यभराचे नुकसान करून टाकण्याचे प्रसंग आपण कथा, सिनेमात पाहतो. मात्र स्वतः सुशिक्षित असूनही आपले घराणे दुसऱ्याच्यापेक्षा उच्च असल्याच्या भ्रमात एका निष्पाप जिवाच्या आयुष्याची वाताहत केल्याचे उदाहरण एका गुन्हे प्रकरणाच्या तपासात मला पहायला मिळाले.

दक्षिण मुंबईत गिरगावला छेद देऊन जाणारा जगन्नाथ शंकरशेट रोड काळबादेवी रोडला जिथे मिळतो, त्या नाक्याच्या आसपास जुन्या दगडी इमारतीत पारशी कॉलनी सामावलेली आहे.

अशाच एका इमारतीतील छोट्याशा पारशी कुटुंबात पन्नाशीची आई आणि तेवीस वर्षाची मुलगी रहात असत. मुलीला वडील नव्हते आईच्या घराण्याला उच्चभ्रू पार्श्वभूमी. तिची आयएएस असलेली एक बहीण दिल्ली दरबारी केंद्र सरकारात मोठया हुद्यावर. मुलगी लहानपणापासून अत्यंत हुशार आणि मृदू स्वभावाची.
तिला लहानपणापासून डॉक्टर होण्याची मनीषा. तिने मेहेनत करून ती साध्यही करत आणली होती. तिला नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आणि तिचे वैद्यकीय शिक्षण सुरळीत चालू झाले. ती नागपूरमधे हॉस्टेलमधे राहू लागली.

दुसरे सत्र संपल्यावर सुटी लागली आणि मुलगी आईकडे मुंबईला आली.

यावेळी मुलीच्या एकूणच वागण्यात आईला फरक जाणवू लागला होता. एरवी पुस्तकांत रमणारी, घरातून सहसा बाहेर न पडणारी मुलगी सकाळी आणि संध्याकाळी काहीतरी कारण काढून थोड्या वेळासाठी घरातून बाहेर जाऊ लगली. प्रथम आईने दुर्लक्ष केले. मात्र हे रोज होऊ लागले तेव्हा आई जरा दक्ष झाली. मुलीवर तिने बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली. तिच्या लक्षात आले की मुलगी रोज ठराविक वेळेला PCO वरून कुणाला तरी फोन करत असे. आईची बेचैनी वाढली. तिने मुलीला खोदून खोदून विचारले. परंतु मुलीने काही थांगपत्ता लाऊन दिला नाही.

झाले होते असे की मुलगी नागपूरला गेल्यानंतर मुलीच्या कुटुंबाच्या ओळखीतील पारशी व्यक्तींनी नागपूर येथील ओळखीच्या पारशी कुटुंबांचे पत्ते आणि संपर्काचे तपशील मुलीकडे देऊन ठेवले होते. नागपूरमधे गेल्यावर अशाच एका कुटुंबाशी मुलीची ओळख झाली. त्या सुखवस्तू कुटुंबाचा मिठाचा मोठा व्यापार होता. त्यांच्याकडे मुलीचे प्रसंगानुरुप जाणे-येणे होत असे. अशाच वारंवार भेटीत त्या कुटुंबातील २६ वर्षीय मुलाबरोबर या मुलीची ओळख झाली. हा मुलगा बारावी झाला. त्याला शिक्षणात स्वारस्य नव्हते. त्याने एकदोन वर्षे कॉलेज मध्ये ढकलली आणि शिक्षण सोडून दिले. पुढे वडिलांच्या व्यापारात लक्ष घालू लागला. शिक्षण सोडले असले तरी त्याने स्वत:ला कुटुंबाच्या व्यवसायात झोकून दिले होते. मजबूत बांध्याच्या या तरुणाची वृत्ती साहसी. सर्वसाधाणपणे पारशी समुदायातील बव्हंशी जणांना असलेला, वेगवेगळ्या जुन्या मॉडेल्सच्या मोटर सायकलींचा यालाही शौक. स्वभाव दिलखुलास आणि जगमित्र असलेल्या याच्या टगेपणावर ही मुलगी भाळली आणि दोघांच्या मैत्रीचे नकळत प्रेमात रूपांतर झाले. मुलगी तिच्या कॉलेजच्या सुटी दरम्यान आईकडे असताना मुंबईत येऊन तिला भेटूनसुध्दा गेला.

मुलींच्या आईला तिच्या या तरुणाशी असलेल्या संबंधाबद्दल कुणकुण लागली. तिने मुलीकडून शेवटी हर प्रयत्न करून त्याबद्दल कबूल करून घेतले.

मुलीने” लग्न करीन तर याच मुलाशी”असे आईला निक्षून सांगितले. आई बिथरली. कुठे आपला दर्जा आणि कुठे तो मिठाचा व्यापारी. तुलनासुद्धा होऊ शकत नव्हती. तिने मुलीला हरप्रकारे समजावण्याचा यत्न केला परंतु मुलगी तिच्या निर्णयावर ठाम होती. आई पहिल्यापासून वरचढ आणि दबावतंत्र वापरणारी. तिने मुलीला घराबाहेर पडण्यास सक्त मनाई केली.

कॉलेजची सुटी संपत आली. एकवेळ शिक्षण बंद झाले तरी चालेल परंतु त्या मुलाच्या संपर्कात तुला जाऊ देणार नाही असे आईने मुलीला सांगून नागपूर येथे कॉलेज साठी परत जाण्यास मनाई करून घरात डांबले.

मुलगी सैरभैर झाली. मोठ्या मेहेनतीने डॉक्टर होण्याचे आपले स्वप्न तिने साकार करत आणले होते. शिक्षणासाठी नागपूरला जाण्याअगोदरचे सर्व आयुष्य आईच्या धाकात काढलेल्या तिला आता तिचं मन खुलवणारा जिंदादील मित्र मिळाला होता. शिक्षण पूर्ण करून त्याच्याशी लग्न करून भावी आयुष्य तिला त्याच्या कायमच्या सहवासात व्यतित करायचे होती. मात्र आईने घ सक्तीने घरात डांबून ठेवल्यामुळे तिची सगळी मनोरथे कोसळली. ती वेडीपिशी झाली.

आणि एक दिवस घरातील सुरी घेऊन तिने स्वतःच्या दोन्ही मनगटांवर आणि पोटऱ्या मांड्यावर जखमा करुन घेतल्या. जखमा गंभीर नसल्या तरी संख्येने जास्त होत्या.

मुलीने घेतलेल्या या पवित्र्याने आईचे मन किंचितही बदलले नाही. उलट, मुलीच्या अशा कृत्याचा आईने फायदा उठवायचे ठरवले. पोलिस ठाण्यात जखमी मुलीसह येऊन आईने फिर्याद केली ती थोडक्यात अशी की…

त्या दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुलगी बाजारात जाण्यासाठी निघाली होती. काळबादेवी रोड आणि जगन्नाथ शंकरशेट रोड जंक्शन जवळ ती पोहोचली असताना, टॅक्सीतून आलेल्या एका तरुणाने तिला, त्याच्याबरोबर असलेल्या दुसऱ्या तरुणाच्या सहाय्याने टॅक्सीमधे खेचून घेतले आणि टॅक्सीत तिच्या डोळ्यावर पट्टी बांधून धमकावत अज्ञात स्थळी नेले. तेथे एका बंगल्यामधे मुलीला विवस्त्र केले तिच्या अंगावर चाकूने वार करून तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर डोळ्याला पट्टी बांधून पुन्हा एका टॅक्सीने घराजवळ आणून सोडले.

अपहरण, शारीरिक हल्ला आणि बलात्कार…. गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर होते. गुन्हा तात्काळ नोंद करण्यात येऊन लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यामधील तत्कालीन पोलिस निरीक्षक श्री.चंद्रकांत चव्हाण यांच्याकडे तपास देण्यात आला. अनुभवी पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी सर्वप्रथम मुलीच्या हाता पायांवरील जखमांवर वैद्यकीय उपचार करून घेतले. मात्र त्याच वेळी त्यांनी डॉक्टरांकरवी जखमांचे फोटो काढून घेतले. बलात्काराच्या पार्श्वभूमीवर मुलीची पोलिस हॉस्पिटल नागपाडा येथे वैद्यकीय तपासणी करून घेतली. तपासणीत मुलीवर बलात्कार झाल्याचे काही निष्पन्न झाले नाही.

ज्या ठिकाणी ही कथित घटना घडली होती ती जागा सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत कमालीची गजबजलेली असते. मरीन लाईन्स स्टेशन कडून सकाळपासून संध्याकाळ पर्यंत लोकांचे लोंढेच्या लोंढे तिथून जात येत असतात. शिवाय त्या रस्त्यावर असलेली लॉटरी तिकिटांची दुकाने आणि स्टेशनरी विकणाऱ्या फेरीवाल्यांचे व्यवसाय अगदी सकाळपासून सुरू होतात. अशा गर्दीतून दोन तरुण एखाद्या मुलीला रस्त्यातून चालताना जबरदस्तीने ओढून टॅक्सीतून पळवून नेतात आणि तिथल्या कोणालाही हे दिसत नाही ही गोष्टच पटण्यासारखी नव्हती. डीटेक्शन स्टाफने अशा असंख्य लोकांकडे चौकशी केली. असा प्रकार कोणाच्याही निदर्शनास आला नव्हता. आणि तसा घडलाच असता तर तो त्यांच्या नजरेतून सुटणे शक्य नव्हते. तेथील फूटपाथवर कायम वावर असलेल्या काहींनी तर असा प्रकार झालाच नसल्याचे छातीठोक पणे सांगितले.

कथित गुन्हेगारांचे वर्णन आणि अधिक माहिती मिळविण्यासाठी मुलीकडे चौकशी करणे अत्यावश्यक होते. मात्र घडलेल्या प्रकाराने ती मानसिक धक्क्याखाली असल्याने तिला काहीही विचारू नये असे तिच्या आईचे म्हणणे होते. फिर्याद दिल्यानंतर मुलगी एकदाही पोलिस ठाण्यात आली नाही. चौकशीकामी तपास अधिकारी महिला पोलिस अधिकाऱ्यासह तिच्या घरी जाऊ पहात असतानाही मुलीच्या आईने विरोध करून मुलीला भेटण्यास मज्जाव केला. त्या दरम्यान विधान सभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होते.

दिवसाढवळ्या भर रस्त्यावर इतका गंभीर गुन्हा घडल्याने प्रसारमाध्यमांनी ही घटना उचलून धरली. विरोधी पक्षाने तर अधिवेशनात याबाबत तारांकीत प्रश्न उपस्थित केला. त्या संदर्भात, तोपर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल घेऊन पोलिस निरीक्षक चव्हाण नागपूर येथे गेले. परंतु अहवाल सादर करून मुंबईत परत येत असताना त्यांना प्रवासात हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

गुन्हे प्रकरण माझ्याकडे पुढील तपासासाठी देण्यात आले. माझ्या आधीच्या तपास अधिकाऱ्यानी या गुन्ह्यातील संशयित अरोपितांचे वर्णन,चेहरेपट्टी इत्यादी तपशील हासिल करण्यासाठी गुन्ह्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शोधण्याचे अथक प्रयत्न केले होते. मी स्वतःसुध्दा त्या परिसरातील अगणित इसमांशी प्रत्यक्ष संपर्क साधला. मुलीशी त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला की तिची आई मुलगी मानसिक धक्क्याखाली आहे असे सांगून तिला भेटायला मज्जाव करत असे.

संशयितांच्या वर्णनाचा तपशील मुलीकडून मिळाला तरच त्यांना अटक करणे सोपे होईल असे सांगितल्यावर आईने स्वतःच एका संशयिताचे वर्णन पोलिसांना दिले होते. ते वर्णन नेमके मुलीच्या नागपूरच्या मित्राशी तंतोतंत जुळणारे होते. मात्र तपासात असे निष्पन्न झाले होते की त्या घटनेच्या ठराविक दिवशी मुलीचा मित्र नागपुरातच होता. त्यामुळे त्याच्या अटकेचा प्रश्न निकाली निघाला होता.

त्याच्याशी नागपूर येथे संपर्क करून पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी त्याचा रीतसर जबाब नोंदविला होता. त्याचे या मुलीवर मनापासून प्रेम असल्याचे आणि तिच्याशीच लग्न करण्याची इच्छा असल्याचे त्याने जबाबात म्हटले होते.

माझ्याकडे तपास आल्यानंतर मी मुलीच्या आईशी संपर्क करून मुलीची प्रत्यक्ष भेट घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तिने मलाच फैलावर घेत त्या नागपूरच्या मुलाला अटक का करत नाही असा जाब विचारायला सुरुवात केली.

पुरावा गोळा करण्याचे काम पूर्ण झाले की मग अटकेची कारवाई होईल असं सांगून मुलीकडे घटनेची आणखी सखोल चौकशी केल्याशिवाय तपासात प्रगति होणार नाही असे मी वारंवार सांगितले तेव्हा कशीबशी आई मुलीला घेऊन पोलिस स्टेशन ला घेऊन येण्यास तयार झाली.

तपासात माझ्यासोबत असलेली सहकारी महिला अधिकारी व मी, कोणते प्रश्न मुलीला विचारायचे याची उजळणी करत होतो. तेवढ्यात मुलीला घेऊन आई माझ्या केबिनमधे हजर झाली.

समोर बसलेल्या मुलीच्या पहिल्या दर्शनातच माझी खात्री पटली की या मुलीकडे कोणतीही विचारपूस करण्यात काहीही हंशील नाही. तिचा चेहेरा कमालीचा मख्ख. नजर स्थिर. समोरच्या भिंतीकडे एकटक लागलेली. प्रवासात खिडकीबाहेर पाहण्यासारखे नसले की आपण नुसतेच बाहेर दृष्टी लावून असतो आणि प्रत्यक्षात काहीच पहात नसतो तसे डोळ्यात भाव. चेहेरा नुकताच गाढ झोपेतून उठल्यासारखा. स्वत:ला पूर्णपणे हरवून बसलेली ती मुलगी माझ्या एकाही प्रश्नाला उत्तर देत नव्हती कारण तिच्या मनापर्यंत माझे शब्द पोहोचतच नव्हते. तिला उद्देशून काही विचारणा करावी तर तिची आईच उत्तरे देत असे. कथित गुन्ह्यातील संशयिता बाबत कोणतीही विचारणा केली की आईच्या उत्तरांचा रोख नागपूरच्या त्या तरुणाकडे असायचा. त्या तरुणाला गुन्हे प्रकरणात अडकविण्या साठी त्या कथित गुन्ह्याचे कुभांड रचले असण्याची धारणा अधिक पक्की होत चालली होती.

मुलीच्या अंगावरील जखमांचे फोटो मी पाहिले होते. जखमा तशा खोल नव्हत्या. तिच्या हातावरील जखमांच्या व्रणांकडे जेव्हा जेव्हा माझी नजर जायची तेव्हा त्यात काहीतरी मला वैशिष्ठ्य भासायचं. म्हणजे दोन्ही मनगटावरील जखमा एकाखाली एक समांतर रेषा आखल्यासारख्या दिसत होत्या.

एखाद्या व्यक्तीचे दोन्ही हात अजिबात हलणार नाहीत अशा रीतीने बांधून धाक दाखवण्यासाठी कोणी चाकूने अशा जखमा केल्या तर गोष्ट वेगळी. एरवी हल्ला करताना कोणालाही अशा सिमिट्रीमधे जखमा करणे केवळ अशक्य होते. कारण पीडित व्यक्ती गोंदवून घेतल्या सारखी स्वस्थ बसणार नाही. प्रतिकाराची हालचाल होऊन अशा समांतर रेषेत आखीव जखमा होणे असंभवनीय होते. मुलीने स्वत:च अंगावर जखमा करून घेतल्याचा माझा संशय दृढ झाला.

जखमा ताज्या असतानाचे फोटो दूरदर्शीपणाने आधीचे तपास अधिकारी कै. चंद्रकांत चव्हाण यांनी काढून ठेवून फार महत्त्वाचे काम केले होते.

व्यक्ती जेव्हा स्वत:ला अशी इजा करते तेव्हां चाकू, सुरी आदी हत्यारावरील दाब, जखमेच्या सुरवातीला जेवढा असतो त्यापेक्षा कितीतरी कमी, जखम संपते तिथे असतो. याचं कारण, त्या व्यक्तीच्या भावना कितीही तीव्र असल्या तरी जखम होत असताना वेदना टाळण्यासाठी प्रतिक्षिप्त क्रियेने आक्रसून घेत शरीरच प्रतिकार करतं. मुलीच्या अंगावरील सर्व जखमांचे फोटो मोठे करून घेतले. ते घेऊन मी तत्कालीन पोलिस सर्जन श्री. उप्पे यांना भेटलो आणि त्यांच्याशी या केस बाबत सांगोपांग चर्चा केली. त्यांनी बारकाईने फोटो तपासले आणि त्या सर्व जखमा त्या मुलीनेच स्वतः करून घेतलेल्या (“Self inflicted injuries”) असल्याचा खात्रीपूर्वक निर्वाळा दिला. तसे लेखी प्रमाणपत्रही दिले.

तिच्यावर उपचार करणाऱ्या खाजगी डॉक्टरांकडे केलेल्या गुप्त चौकशीत आम्हाला असे कळले होते की मुलीला नागपूरला जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी आईने घरात बंदिस्त केल्यावर मुलीला फार मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे ती डिप्रेशनमधे गेली. तिला आवश्यक आणि चालू असलेली औषधे इतकी तीव्र होती की मुलगी जागी असतानाही अर्धवट झोपेत असल्यासारखी असायची. आणि ती या धक्यातून बाहेर येणे जवळ जवळ अशक्य होते.

परिस्थितीजन्य पुरावे आणि मुलीच्या वैद्यकीय तपासणीचे निष्कर्ष यांच्या आधारे मुलीच्या आईने दिलेली अपहरण आणि बलात्कार झाल्याबद्दलची फिर्याद खोटी असल्याचे सिध्द झाले. तपास बंद झाला.

खोटी फिर्याद दिल्याबद्दल मुलीच्या आईवर कायदेशीर कारवाई करण्याबाबतच्या परवानगीसाठी माझा प्रस्ताव मी वरिष्ठांना सादर केला. मात्र त्याबाबत निर्णय घेण्यापूर्वी झालेल्या बैठकीत असे ठरले की आईवरच्या कारवाईदरम्यान त्या मुलीचीच आणखी परवड होण्याची शक्यता असल्याने ती कारवाई स्थगित करावी.

आईच्या हट्टामुळे एका सालस,अभ्यासू मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. एखाद्या व्यक्तीचे शारीरिक बलात्काराने जितके नुकसान होईल तेवढे किंबहुना त्यापेक्षा जास्त, मुलीचे आयुष्यभराचे नुकसान तिच्याच आईने अहंकारापोटी केले. पोटच्या मुग्ध जीवाला कायमचे मुके केले.

तोही एक वेगळ्या प्रकारचा बलात्कारच म्हणायचा.

— अजित देशमुख.

(निवृत्त)अपर पोलीस उपायुक्त.

9892944007.

ajitdeshmukh70@yahoo.in

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..