नवीन लेखन...

बाई आली पणात

अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये शांतीलाल रा. ननावरे यांनी लिहिलेली ही कथा. 


सुगीचे दिवस आले होते अन् समधी माणसं कशी पटापटा आपल्या कामाला लागली व्हती. शाळूकाढायला आला व्हता. कारडी गहू, हरभऱ्यानी रानं कशी फुलून तरारली व्हती. चिंचोळलीमधी जिकडं तिकडं घाई गडबड चालू व्हती. समधं शेतकरी लई कामात व्हढाचढीनं मरमर मरोस्तवर काम उरकीत व्हती. गावात शिंद्याची आळी विठ्ठल रखमाई दोन्ही हात देवळात कमरेवर ठेवून जणू चिंचोलीची राबणारी कष्टकरी बाई बाप्पे पाहत होती.

एरव्ही रोज भजनाला कीर्तनाला येणारी मंडळी आता आता देवदर्शन घ्यायला देखील फिरकत नव्हती. मजुरांची तर परवडच झाली व्हती. मजूर शेतात काम करायला मिळत नव्हती. चिंचोली गावात रामाचं देऊळ अन् विठ्ठलाचं देऊळ जणू सारी दैवतं गावाचीच राखण करीत व्हती. गावचा खळ खळ वहाणारा ओढा डोंगराच्या कुशीतून उगवणारा सूर्य अन् मावळणारा सूर्य सकाळ संध्याकाळ किरणं सोन्यावानी फेकीत व्हता. गावच्या साऱ्या देवळांचं कळस कसं या दिवसात सोन्यावाणी दिसतं. गावच्या लक्ष्मीआई तुकाई गावच्या राजवाड्याभवती त्या  थाटात उभ्या या गावाला जसं मुंबईला लक्ष्मी अंबा मातेनं अन् मुंबादेवीनं वाचिवलं तसं चिंचोलीला या लक्ष्मी आईनं अन् तुकाईनं वाचवलं. त्यांच्यामुळं गावात बरकत आली. कोल्हापूरच्या ज्योतिबाची मूर्ती जवा गावात आणली आन् त्या मूर्तीचा जयजयकार म्हणून मुंबईतील गावच्या रहिवाश्यांनी तर कहर केला. ज्योतिबा कुठं ठेवू अन् कुठं नाय तवा ज्योतिबाचं बक्कळ पैका खर्चून देऊळ बांधलं अन् त्या मूर्ती स्थापनेच्या कार्यक्रमाचं मुंबईकरांनी लई चंग बांधला. विठ्ठल रखुमाईच्या आन् रामाच्या देवळापेक्षा लयी कार्यक्रम भन्नाट झालाच पाहिजे म्हणून व्हढाचढीनं खर्च केला. आन् गावाची शाण वाढवली. गाव तसं बाराबलूत्याचं. गावात राम जन्माचा उत्सव होतो दरवर्षी दारु, भुईनळे यात्रेत तमाशाबारी ‘ऑर्केस्ट्रा कवा शिनूमा. मग काय एक गाव आन् बारा भानगडी. गावात कवा बवा यात्रा आली म्हणजी उरपडंच वाटायची. कवा बवा यात्रेमधी हस्तिनापूरची यादवी लढाई होऊन जाईची. कवा तमाशात नाचनाऱ्या बाईला पोरांना छेड काढल्यावरून दोन गटात मारामारी व्हायची. कवा बवा कुस्त्याच्या फडावरून बाचाबाची व्हायची. गावचे पुढारी मिश्यांना पीळ देऊन एकमेकांचा कसूर काढण्यात पटाईत असायची तर कवा बवा समजूतीनं घ्यायची. गाव तिथं बारा भानगडी. सरपंच बोले अन् पाटील चाले कोतवाल बोंबललं अशा पंचायती अन् भांडणाला शिरपानं कवाच डोकं दिलं नाही. सुगीच्या दिवसात गाव राब राब राबायचं आन् आपल्या पोराबाळांना साळंत शिकवायचं. सुंदराला हौस म्हणून कपडालत्ता, साडी पुरवायची.

नावापरमानं सुंदरा दोन पोरांची आई असूनसुद्धा फक्कड. चालताना तिची कमर हलली म्हणजे बाजीराव पाटलांचा जीव कसानुसा होई. हिचा नवरा शिरपा म्हणजी नुसता जणू सालगडी. लई हाडकुळा. जणू त्यो चाललाय रानात आणि सुंदर आलीय पणात असंच बाजीराव पाटलाला वाटायचं. अडगळीतलं हाडूक कसं बाजूला करावं हे बाजीरावच्या मनात सुंदराला कवा कवा पाण्याला जाताना पाहून तिच्या भिजलेल्या हिरव्या साडीकडे पाहून वाटायचं नव्हं हिला अंगाखाली कवा घेईन. इथपर्यंत बाजीराव पाटलाचा तोल जाईचा. त्याचं बी काय चुकत नव्हतं. रोज तीच तीच भाजी खावून कुणाबी माणसाला कंटाळा येतो अन् अगदी तसंच बाजीरावला वमाड्या हिराबाईना पाहून वाटायचं. कुठं अप्सरा अन् कुठं हिराबाई भदाडी म्हंजी भादी म्हैसच वाटायची. बरं पाटलानी तिला किती ओंजारली गोंजारली पण तिला काही पोरंबाळं झालीच नाही तवा पाटील फक्त सुंदरास पाहताच मनातल्या मनात चेकाळत व्हता. सुंदरा रूपानं गोरीपान, सुंदर घारे डोळे, लाललाल तिचे ओठ, गोरे गोरे गाल, कपाळावर बिंदी, नाकात ऐटबाज नथ, गळ्यात साजेसे मंगळसूत्र अन् मोजकेच सोन्याचे दागिने. कमरेला पट्टा, पिवळी पिवळी साडी, करकचून लावलेला तसा कमरेवर पट्ट्याचा वण तिच्या गोऱ्या गुबगुबीत अंगावर उठून दिसायचा. सुंदराच्या गोऱ्या पायाच्या पिटऱ्या अन् मधाळ चालताना हलणारा मागचा भाग पाठमोरा दिसणारा. गावातल्या माणसांना तिचा पृष्ठभाग भल्या भल्यांची नजर त्याच्यावर पडत असे. जणू बाई असावी तर आशी. तिचे छातीवरील मदनाचे गोळे चालताना दूध ओघळते की काय असे वाटायचे. बाजीराव पहाताक्षणी घायाळ व्हायचा. वाटायचं शिरपाचं केवढं मोठं भाग्य. कधी कधी वाटतं परमेश्वर कृपा त्याच्यावरचं करतो की ज्यांची मागच्या जन्माची काहीतरी पुण्याई असावी आन् ही शिरपाच्या वाट्याला आली होती. शिरपानं सुंदराच्या सुखासाठी जशी रामानं सीतेसाठी कुटीवजा झोपडी बनविली होती तशी तिच्यासाठी गावच्या पूर्वेला अगदी सूर्य तिच्याच झोपडीवर पडावा आन् सोनेरी किरणं त्याच्या कुटुंबाला मिळावी अशी जणू शिरपानं देवाला मागणी केली होती. अन् विधात्यानं त्याची इच्छा पुरी केली होती. शिरपा आज शेतातून दिवसभराच्या कामानं थकून आला व्हता. संध्याकाळी पोराबाळांची विचारपूस करून सुंदराच्या हातची भाजी भाकरी सगळ्यांनी एकत्र खाल्ली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून शेतावर जाण्याच्या तयारीतच व्हता तोच बाजीराव पाटलाच्या वाड्यात गडबड झाली. काहीतरी जोराजोरात आवाज येऊ लागला म्हणून सुंदरा तिकडे गेली. बाजीरावाच्या बायकोचे पोट दुखत होते. ती जोराजोरानं हातपाय आपटीत होती. डॉक्टर गावातला कुंभाराचा पोरगा होता. त्यो तिला तपाशित होता. पण हिराबाईचं काही खर नव्हतं, तिचं जगणं जणू जिवावर आलं होतं. व्हत्याचं नव्हतं झालं, हिराबाईनं जग सोडलं होतं. तरी बाजीराव पाटलांचं चिंचोली गावसुद्धा तिनं सोडलं होतं. बाजीराव पाटलाला देखील तिनं सोडलं व्हतं. पाटलाच्या हातात तिनं हात दिला होता. आता तूच तुझ्या भावाची पोरं सांभाळ म्हणून जणू काय पाटलाला इशारा देवून ती देवाघरी गेली व्हती अन् ही घडल्याली वाईट बातमी घेवून सुंदरा दुःखी मनानं घरी आली. शिरपाला म्हणाली, थांब आज तू कामावर जावू नकोस. आरं पाटलीनबाई मेली रं. हिराबाई पाटलीन देवाघरी गेली. आज तिला समदं गाव स्मशानात नेण्यासाठी तयारी करतीन. आपल्यालाबी समद्याबरूबर मयतीसाठी जावं लागन. तसं शिरपानं हातातलं खोरं-टिकावू औजारं बिगीबिगीनं एका कोपऱ्यात ठेवलं. पाटलाच्या आळीकडं त्याची पाऊलं वाट धरू लागली. शिरपालाही मनातून वाईट वाटत होतं. असं व्हायला नको होतं. देवपण कधी कधी दुःख देतो. पण दुःख देत असताना माणसाला सुखाची किंमत सुखाचा मिळालेला आनंद याची मोजदाद करता येतं तसं ढ असणारी मुलं अन् पहिला नंबर मिळवणारा हुशार मुलगा यांची तुलना करावी कारण ढ असणारा मुलगा आहे म्हणूनच पहिला नंबरला किंमत आहे. तसं सुख दुःख आहे म्हणूनच सुखाची किंमत आहे आन् हे विधात्यानं आपल्याला प्रारब्धात दिलं आहे. त्याशिवाय जीवन सागरातील ही नौका किनाऱ्याला लागू शकत नाही. शिरपा जरी पुरुष होता तरी बुद्धीनं थोडाही ढ नव्हता. म्हणून त्याच्या मनात हिराबाईच्या अंतयात्रेपर्यंत विचार चालूच होते.

दुसऱ्या दिवशी सूर्य उगवल्याबरोबर शिरपानं जमिनीला हात लावून आपल्या मस्तकावर हात ठेवला आनू सूर्यनारायणाचं दर्शन घेवून शेताच्या बांधाकडं निघाला. तोच गावातली चार पाच पुढारी माणसं देसाई, भागडे, ढोळे, शिंदे, होळे भटजी अशी कितीतरी कालच्या हिराबाईच्या मृत्यूबाबत चर्चा करणारी घोळक्या घोळक्यानी गावभर व गावाबाहेर हिराबाईच्या मृत्यूची चाहूल बातमी अन् तिच्याबद्दल वाटणारा कळवळा गाव काही विसरला नव्हता, नव्हे त्यांच्या मनातून दु:खाचा डोंगर लहान झाला नव्हता.  शिरिपाकडं तंबाकू चोळीत सर्जू पानसरे काहीतरी कुजबुजत होता. त्याच्या भोवती गावातली काही कुटाळ पुढारी पेंढारी जमली होती आन् त्यांच्या तोंडून एकच ‘बाजीराव पाटलाचं काय व्हणार?’ ‘कसं व्हणार? त्याला खायला कोण घालील?’ जणू काही तो ह्यांच्या घरी खायला येणार. ‘तेंच्या भावाच्या मुलांना खायला कोण घालीन,’ ‘त्यांच्या घरी जेवण कोण बनविन?’ आजवर बाजीराव पाटलानं स्वत:चा पाण्याचा तांब्या कधी प्यायला घेतला नाही त्याला आता जेवाण बनवायला येणार का?’ अशी चर्चा जिकडं तिकडं चालली व्हती. मोदीनं चायपर चर्चा झाली केली नसती तितकी गावावाल्यांनी केली. त्यावर दादा मूलाणी व बाळकृष्ण काळीमशा यांनी शिरपाला आडोश्याला घेवून सांगितले, ‘जर सुंदराला बाजीराव पाटलांच्या घरी रोज एक तास जेवण बनवायला तुम्ही पाठवले तर तुमाला शिरपा जमेन का नाही/ तरी पाटील फुकट जेवण बनवून घेणार नाही. तुमच्या बायकोला मेहनताना म्हणून मजुरी म्हणून पाटील तीन हजार रुपये देतील, नाहीतरी तुम्ही शेतावर आणि मजूरीने काय भागतंय त्येबी नारळाक पाणी की एरंडीक पाणी. आरं हिच येळ हाये तुलाबी पोराबाळांना शिक्षणाला पैका लागतो हाय तवा तू हात धुवून घे. फक्त सुंदराला एक तास तर जेवण बनवायला जावं लागेन.’ शिरपा विचारी पण अविचारी नव्हता. त्यानंही मनात ठरवलं दुःखाच्या अशा वेळेला कुणालाही मदत करणे हा आपला धर्म आहे अन् त्यात चूक ती काय आहे? सुंदरा त्यांचं जेवण एक तासापुरतं बनवायला जाणं आन् यात कसली आहे लाज? शिवाय पाटील ‘मेहनतीचे पैसे’ही देणार. ते सुद्धा महिना तीन हजार रुपये! ठरलं म्हणून त्यानं लगेच लोकांना सांगितलं. शिरपाची बायको लालना भार्या कांता सौभाग्यकांक्षिणी सौदामिनी चंद्रासवे रोहिणी जणू अप्सराच आहे. दिवस दिवस वाटायची गावातून ती आता पाटीलवाड्याकडे जायला निघाली म्हणजे पारावर बसलेली पोरं तरणीबांड पोरं मिसरुड फुटलेली तिच्याकडे तिच्या चालीकडे पाहतात. जणू यांच्या मर्दानी छातीवरून नाचत ती चालायची अन् हे बघे तिच्यावर काहीतरी कुरघोडी करून येईन का म्हणून दिवसें दिवस विचारानं भंजाळून जायचे. तिच्या हनुवटीवरील तीळ पाहून यांना त्यांची मैना वाटायची पण सुंदराने यांना कधी घास टाकला नाही की जुमानलं नाही. खानदानी बाईचं वय वाढतं तशी तिची किंमत वाढते अन् सुंदरताही खुलते तशापैकी सुंदरा तिच्या रुबाबात हिंडते. दिवसेंदिवस सुंदरा आपल्या पोराबाळांचा आन् शिरपाच्या तब्येतीला सांभाळीत होती. त्यांना काय बी कमी पडू देत नव्हती. घरातील आवराआवर करून ती पाटलांच्या वाड्याकडं जायला निघे. बाजीराव पाटील आन् पोरं वाड्याभोवती तिथंच असायची. बाजीराव पाटलांच्या भल्यामोठ्या बखळीवजा खोल्या आन् ओसऱ्या नीट नेटकी स्वच्छ करायची. इकडंतिकडं पडलेलं सामान तिथल्या तिथं ठेवायची अशी नित्याची कामं ती बेमालूम पार पाडायची. त्या वाड्यात ती काम करत असताना तिथलं घरपण सांभाळताना वाड्याला जणू पाटलीनच मिळाली असं ज्याचं त्याचं गावच्यांना वाटायचं.

अशाच एके दिवशी बाजीराव पाटलाला सनानून ताप भरला. पाटील खुड खुडायला लागला. बोचरी थंडी आन् तापामुळं पाटील अक्षरश: बेजार झाला. पाटील हुड हुड करायला लागलं तसं सुंदरानं पोरांना बिगीबिगी न्याहरीला खाऊ घालण्यास सुरुवात केली आन् बाजूला कसला आवाज येतोय तिकडे ध्यान दिलं तर पाटील कळवळून म्हणालं, ‘आरं सुंदरा जरा माझ्या अंगावर ती कांबळ घोंगडी टाक, लई थंडी वाजतीय. पोरं जेवत होती म्हणून सुंदरानं प्रसंगावधान राखून खाटेवर पडलेल्या बाजीराव पाटलाच्या अंगावर घोंगडी टाकायला दोन्ही हातांनी पसरावयला सुरुवात केली. त्याचवेळी शिरपाचा लंगोटीदोस्त शंकऱ्या मुकाट्यानं एका खिडकीतून ते पाहिलं, आन् चुटकी वाजवित म्हणाला, च्यामायला, बायकांची जात आन् कांद्याची पात कवा बी वाकणार. काय खरं नाही शिरपा तुझा घात केला. बायको सुंदर नसावी पण कुरूप असावी. माझा बा म्हणायचा तू दुसऱ्यासाठी सुंदर देखणी बायको करू नको. बायको देखणी असली की ती आपली रहात नाही. जसं झाडावर फळ पिकलं म्हणजी कुणी बी दगड मारतं तसं बायको देखणी आसली की असं होतं. बरं झालं म्या माझ्या ‘बा’चं ऐकलं नाहीतर शिव शिव ह्यो दिस दिसला असता तवा आता शिरपाला ही बातमी सांगायला पाहिजे.’ गड्यानं जी धूम ठोकली दहुसासा टाकीतच शिरपाचं घर गाठलं. शिरपा खोरं, टिकाव ठेवून पाठमोरा उभा होता. शंकऱ्या मुकाट्यानं शिरपाचं डोळं आपल्या हातानी बंद केलं. अन् म्हणाला, ‘तू ओळखपाहू मी कोण आहे ते? वशा, धर्मा, हऱ्या. आरं यातलं कुणी बी नाय.’ मी सांगतो मी ‘शंकऱ्या मुकादम’. आयला तू पण कशापायी माझ्याकडं आलास? शिरपानं ‘आरं कुत्र्यासारख्या धापा काय देतोयसं सांग की लेका?’

‘काय सांगू शिरपा लई मोठी भानगड हाय इथे तुझ्या घरी. कुणी नाही ना?’ ‘नाही बाबा, कुणी नाही,’ शिरपानं त्याला आजूबाजूचा अंदाज घेऊन सांगितलं. ‘बोल आता, शिरपा म्हणाला. त्यावर शंकऱ्या बोलता झाला, ‘काय बी म्हण वाईट वाटून घेऊ नकोस,’ शंकऱ्या शिरपाला म्हणाला. ‘खरं सांगू तुझी बायको आता सती सावित्री नाही राहिली.’ ‘म्हंजी?’ शिरपा त्याच्यावर शंका घेत बोलू लागला. ‘हा शिरपा, म्या माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, बाजीराव पाटीलबरोबर ती गुलछर्रे उडवती, आरं लई मज्जा करती, त्यांच्या खाटेवर पांघरुन काय टाकतीय बाजूला काय झोपतीय. बाबा नको रं असली ब्याद तुझ्या घरात घेवू. तुझी बाई पद्मिनी आणि तो बाजीराव, ती आलीया पणात आन् चाललाय वनात! काही म्हण पण असली औलाद घरात ठेवू नको.’

शिरपाचं डोकं सणणायला लागलं. कवा कवा हलक्या कानाची माणसं आपलं खरं करण्यासाठी कान भरवतीन त्याचा भरवसा नाही आन् असली माणसं दुसऱ्यांचा संसार मोडल्याशिवाय आन् डोक्याच्या शेंडीला गाठ बांधल्याशिवाय राहत नाहीत. जातो मी म्हणून शंकऱ्या मुकादम गेला.

शिरपाभवती काजवे चमकू लागले. शिरपा आता विचारांच्या तंद्रीतच होता. बरं झालं मलासुद्धा कारण मिळालं. सुंदरा कवा चूक करतेय त्याचीच शिरपा वाट पाहत होता. बाहेरून सभ्य दिसणारी माणसंसुद्धास करामतीच असतात. शिरपासुद्धा आतून तमाशा आन् बाहेरून कीर्तन करणारा होता. झाकली मूठ सव्वा लाखाची तसा त्यो देखील धुतल्या तांदळासारखा नव्हता. दिव्याखाली अंधार पडतो तसा शिरप्याच्या जगण्यात पण अंधारातील चांदणं दडलं व्हतं. भोसल्यांची तरणीबांड लुसलुशीत चिंगी शिरप्याला पिंगा घालीत व्हती. चिंगीला शिरप्या आवडायचा आन् शिरप्याला चिंगी लई आवडायची. शेतामध्ये चिंगी-शिरप्याला लई भेटायची. विहिरीत पवरा सोडायची.  शिरपा पाणी काढ रं लई तहान लागलीय बघ. शिरपा तिथेच गोंडा घोळायचा आन् चिंगीला पाणी काढून द्यायचा. चिंगी विहिरीत उतरून शिरपा मी पाण्यात पडली मला वाचव. खरं तर तिला पोहायला येत व्हतं पण शिरपाला लबाड बोलून फसवायची आन् शिरपा तिच्यासाठी पाण्यात उतरायचा. दोघे पाण्यात भिजून जायची आन् शिरपा ती पाण्यात बुडू नये म्हणून धरायला जायचा. तिला शिरपाचं उघडं अंग अन् तिचं शिरपाला उघडं अंग लागल्यावर दोघं सैराट व्हायची आन् पाण्यात एकमेकाला धरायची. खरं तर चिंगी शिरपाला म्हणायची, आरं तू माझ्यासंगं लग्न कर! पण दोन बायको अन् फजिती ऐका. ह्यो खेळ बायकाला पसंत नव्हता म्हणून त्यानं विचार केला आता ह्योच वेळ हाय सुंदराचा काटा काढायला आन् चिंगी बरोबर पुन्हा नवं घर, नवी बायको सगळं नवं नवं अशी स्वप्न पाहायला. जणू त्यानं पक्का विचार केला तशी तिची यायची वेळ झाली होती. दारात उभी का? आत ये म्हणून त्यानं सुंदरास प्रश्न केला. सुंदराने विचार केला इतका वेळ हा का थांबला. शिरपा तू आजून नाही रानात गेलास? आरं बोल की रं? जळतं कोलीत अंगावर फेकावं तशी शिरपाच्या डोक्याची आटी सरकली. ‘का रानात जायच्यापायी म्या मसणात गेलं पाह्यजे.’ शिरपा तावानं बोलू लागला. त्यावर सुंदरा म्हणाली, ‘तुझ्या जीभेला काय हाड बीड?’ आरं कशापायी आसं बोलतूयास? सांग तरी.’ ‘सांगू? शिरपा तिच्याकडे रागानं पाहात म्हणाला, ‘त्यो बाजीराव पाटील तुलला लई आवडलाय. जा की त्याच्याकडे जावून झोप त्याच्याजवळ.’ ‘शिरप्या आरं बांडगुळा तूला झालंय तरी काय? चिंगानी बिंगानी वैतागलय की काय? आरं दारु बीरु प्याला की काय? तू कवा आसे बोलत नव्हता.’ सुंदरानं रणरागिणीचं रूप धारण केलं. अन्यायाचा प्रतिकार कसा करावा हे तिला समजत नव्हतं. ती चवताळली. तिनं गळ्यातलं मंगळसूत्र त्याच्याकडं फेकलं आन् म्हणाली, ‘ह्या मंगळसूत्रा शपथ म्या बाई हाय खानदानी. आरं माझा बाप खानदानी, माझी आई खानदानी. आरं माझ्यासारख्या बाईचं वय जसं जसं वाढतं तशी तशी तिची किंमत वाढते आन् वेश्येचं वय वाढलं म्हणजी तिची किंमत कमी होते. लक्षात ठेव. बायकोचे प्रेम हे पवित्र प्रेम आसतं.’ तिनं शिरपाच्या डोक्यात लाईट पेटवायला जणू अन्यायाची बाजू परखड मांडली व्हती. पण खवळलेला समुद्र जसा स्तब्ध होत नाही तसा शिरपा थंड होवू शकला नाही. उलट रागातच तिला त्यानं फटकारलं, ‘तू न आता तुझा पाट लाव तुला मी सोडचिठ्ठी देतो. उद्या साऱ्या गावासमोर पारावर पंचायतीसमोर तुझा सोक्षमोक्ष लावतो. त्या दिवशी जणू सुंदराची हार झाली होती. सुंदराची दोन्ही बाजूंनी उरफाड आन् चरफड झाली होती. इकडे आड आन् तिकडे विहीर. दोन लाकडं जसी पाण्यात विभक्त होतात आणि भयाण लाटेपुढे दूर दूर अंतरावर जातात तशी तिच्या मनाची अवस्था झाली होती. पुरुष हा पुरुष असतो तो दागिना असतो. समाजात ढोंगी म्हणून वावरत नसतो. त्याने विपरीत काही केले तरी समाज त्याला पाठीशी घालतो. बाईचं मात्र तसं नसतं. तिला तसे वागता येत नाही. तिला इज्जत असते. ती कितीही शुचिर्भूत राहिली तरी समाज शंकेने कुशंकेने तिला पाहत असतो. बाईला समाजातील कृतघ्न माणसे आपली मालमत्ता समजतात. बाईचं मोल जगाच्या बाजारात किलोच्या भावानं मांस विकतात. तळागाळातील माणसापासून श्रीमंतीत वाढलेल्या समाजातही अगदी बाईला कवडीमोल स्थान आहे.  म्हणून शिरपासारखा माणूस तिच्यापासून काडीमोड घेण्यासाठी हलक्या कानाच्या माणसांचा आधार घेवून तिला आपल्या जीवनातून परावृत्त करून दुसऱ्या चिंगीसारख्या बाईला घरी आणून संसार उभा करायचा. पुन्हा दुसरा घाट घालतोय. यापेक्षा सुंदरासारख्या बाईचं दुर्दैव ते कोणतं? पण काहीही असो कर्म तसे फळ म्हणतात. ते खोटे नाही. सुंदरानं तिच्या आयुष्यात आजपर्यंत चांगलंच कर्म केलंय आन् त्याचं फळ म्हणून ती पुन्हा पुन्हा सांगतेय, फिरुनी जन्म घेईन मी, फिरुनी येईन मी, फिरुनी जन्म घेईन मी….

– शांतीलाल रा. ननावरे
९०१, भेनती कॅसल बी विंग,
खेतवाडी मेन रोड, मुंबई – ४०० ००४
मो. ८८५०२८९८१५
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..