नवीन लेखन...

बाबा, होते म्हणून…

लहानपणी आमच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळले ते, बाबा होते म्हणून.. भालजी पेंढारकरांचे ‘छत्रपती शिवाजी’, ‘पावनखिंड’, ‘नेताजी पालकर’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘मराठा तितुका मेळवावा’ हे चित्रपट आम्ही पाहिले. ते पाहून शिवाजी महाराजांविषयी मनात अपार आदर निर्माण झाला. अशा संस्कारमय ऐतिहासिक चित्रपटांसाठी बाबांना मानाचा त्रिवार मुजरा!!
१८९८ साली भालजींचा कोल्हापूर येथे जन्म झाला. शिक्षणात मन न रमलेल्या भालजींनी तरुण वयातच कोल्हापूर सोडले व पुणे गाठले. पुण्यातील ‘केसरी’मध्ये त्यांनी काही काळ नोकरी केली. ‘केसरी’चे जुने अंक व ग्रंथालयातील इतर अनेक पुस्तके, ग्रंथ वाचून त्यांच्यातल्या लेखकावर संस्कार झाले. या काळात त्यांच्यावर वि. दा. सावरकर व बाबाराव सावरकर यांच्या विचारसरणीचा प्रभाव पडला. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर ते कोल्हापूरला परतले.

त्यांनी देशप्रेमावर सहा नाटके लिहिली. नाटकात भूमिकाही केल्या. ‘बकंभट’ या व्यंगपटाचे लेखन दिग्दर्शन केल्यानंतर सरस्वती सिनेटोनच्या ‘श्यामसुंदर’ या पौराणिक बालचित्रपटाची दिग्दर्शन, पटकथा, संवाद, गीते ही आघाडी सांभाळली. या चित्रपटाने पहिला ऐतिहासिक रौप्यमहोत्सव होण्याचा मान मिळवला.
यानंतर भालजींनी कोल्हापूर सिनेटोन, श्याम सिनेटोन, शालिनी सिनेटोन, सरस्वती सिनेटोन, अरूण पिक्चर्स अशा अनेक चित्रसंस्थांच्या चित्रपटांची दिग्दर्शन अथवा पटकथा संवादाची जबाबदारी सांभाळली. भालजींच्या प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीलाच ‘बहु असोत सुंदर …’ हे महाराष्ट्र गीत असायचेच. १९३४ च्या ‘आकाशवाणी’ पासून १९८६ च्या ‘शाबास सूनबाई’ पर्यंत भालजींनी ४० कृष्णधवल व २ रंगीत अशा ४२ चित्रपटांची निर्मिती-दिग्दर्शन केले.
१९४५ साली कोल्हापूरच्या छत्रपतीं राजाराम महाराजांनी तेरा एकरचा जागा भारतींना दिली. तिथे स्टुडिओ उभारुन त्याचे ‘जयप्रभा स्टुडिओ’ असे नामकरण केले. १९४८ साली गांधी हत्येनंतरच्या जाळपोळीत स्टुडिओ जळाला. या आगीत ‘मीठ भाकर’ व ‘मेरे लाल’ या दोन चित्रपटांची राख झाली. भालजींनी सर्वांची देणी भागवून पुन्हा शून्यातून ‘मीठ भाकर’ चित्रपटाची निर्मिती केल्यावर या चित्रपटाने व्यवसायही चांगला केला.
भालजींनी ऐतिहासिक बरोबर सामाजिक विषयही चित्रपटासाठी हाताळले. ‘साधी माणसं’ हा चित्रपट लोहार व त्याच्या रणरागिणी पत्नीच्या सरळसाध्या जीवनावर बेतलेला होता. या चित्रपटाला महाराष्ट्र राज्य सरकारची अकरा पारितोषिके मिळाली. सूर्यकांत, चंद्रकांत हे मांढरे वंदू, जयश्री गडकर, सुलोचना, राजशेखर, अनुपमा व दादा कोंडके अशा अनेक नामवंत मराठी कलाकारांना त्यांनी घडविले.
दादा कोंडके ‘विच्छा माझी पुरी करा’च्या प्रचंड यशानंतर एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करणार होते, बाबांनी त्यांना ‘सोंगाड्या’च्या निर्मितीस प्रोत्साहन दिले…आणि दादांनी स्वतःच्या अनेक सलग रौप्यमहोत्सवी चित्रपटांचे युग निर्माण केले.
बाबा असेपर्यंत ‘जयप्रभा स्टुडिओ’तून अनेक उत्तम चित्रपटांची निर्मिती होत होती. काही कारणाने बाबांनी घेतलेले कर्ज फेडू न शकल्यामुळे स्टुडिओची मालकी लता मंगेशकरकडे गेली. जिने बाबांच्या चित्रपटांतून मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकले, तिनेच बाबांना क्लेश दिले.
भालजींना ९६ वर्षांच्या आयुष्यात चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल १९९२ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. १९६६ च्या ‘साधी माणसं’ व १९७० च्या ‘तांबडी माती’ या दोन चित्रपटांना सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
आज भालजींची १२५वी जयंती. शेकडो वर्षांतून एखादी अशी युगप्रवर्तक व्यक्ती जन्माला येते. जसे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण राहिलो तसेच… बाबा, होते म्हणून आपल्याला चित्रपटांतून छत्रपती शिवाजी महाराज समजले…
चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!!
– सुरेश नावडकर २-५-२३
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत.

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..