नवीन लेखन...

अय्या! तुम्हाला जुळ्या आहेत?

मला जुळ्या मुली आहेत म्हटल्यावर लोकांची पहिली आणि हमखास प्रतिक्रिया म्हणजे, “अरे वा! कित्ती गोड! आम्हालाही जुळी व्हावीत अशी खूप ईच्छा होती….” त्या पाठोपाठ दुसरी म्हणजे, “बरंय ना, एकाच खेपेत दोन्ही उरकली!” आता आम्ही पहिल्याचाच विचार (घरच्यांच्या) जबरदस्तीमुळे केला होता, त्यामुळे एक मूल असतं तरी दुसऱ्यांदा पुन्हा असलं ‘daring’ केलं असतं असं वाटत नाही. त्यातही ‘जुळी आहेत’ असं कळालं तेंव्हा काही काळासाठी का होईना, प्रचंड मानसीक ताण आला होता! कारण ही एवढी मोठी जबाबदारी आपल्या पदरात पडते आहे, तर त्यांच्या पालन पोषणाची संपूर्ण जबाबदारी आमच्याने सुव्यवस्थित निभावली गेली पाहिजे नं! कारण प्रश्न फक्त जन्माला घालण्याचा, आणि भरवण्या खेळवण्याचा नसून, त्यांच्या वाढीच्या संपूर्ण प्रवासात जातीने त्यांच्याकडे लक्ष देण्याचा ही आहे. आमचं उभयतांचं वय देखील तीस ते चाळीस वयोगटातील असल्याने, शरीर आणि मनाने पुढची निदान वीस वर्षे खंबीर असण्याची आवश्यकता सुद्धा आलीच. हे सामान्यतः सर्व पालकांसाठी जरी लागू असलं, तरी आमचं हे म्हणजे, एका दगडात दोन पक्षी नसून, दोन दगडांवरचे दोन वेगळे पक्षी एकावेळी वाढवण्यासारखं आहे.

चला, हा ही प्रश्न जरा उडवून लावू, तोपर्यंत लोकांचा तिसरा तयार असतोच! “पण बरंय बाबा तुमचं… एकमेकांना बघत-बघत सगळं शिकतील, आणि एकमेकांशी खेळत मोठी होतील..!” ह्या टोमण्याचा मात्र खरं रागच येतो. म्हणजे वेगळ्या वयाच्या दोन मुलांना एकावेळी वाढवणं सुद्धा तेवढंच कठीण आहे हे मान्य करतोच आम्ही. पण ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही कसं ह्यांचं कौतुक फक्त बघत बसायचं, आणि पोरं होतायत मोठी आपापली..एकमेकांना बघून शिकत..!” हे कुणाच्या लक्षातच येत नाही, की ही मुलं एकमेकांना बघून, इतर मुलांपेक्षा लवकर, सगळंच शिकतात..! जसं की, तोंडातून थुंकी, फुगे बाहेर काढणं, नाकात बोटं घालणं.. फक्त एकमेकांचं बघूनच नाही, एकूणच कुणाचंही अनुकरण करायला, ही मुलं खूप लवकर शिकतात. जे आसपास बघतात, त्याचे सगळे पाहिले प्रयोग हे एकमेकांवर करतात! हिने दुदु प्यायला नाही म्हटलं की चांगलं पीत असलेली मध्येच थांबून ‘मलाही नको’ म्हणते.. खाताना सांडणारी, दुसरीला सांडायला शिकवते, तसंच नीट खाणारी, “आई रागवेल हं, खालचं उचल पट्कन” असले सल्लेही देते. हाक मारल्यावर आईला जायला उशीर झाला, की एक स्वतः ‘जातीने’ दुसरीची शी धुवायला जाते..!! आपल्याला हवं असलेलं दुसरीच्या हातात दिसलं तर ते हिसकावून घेणं. न दिल्यास अगदी आई-बाबांसारखंच दुसरीला रागावणं किंवा समजावून सांगणं, भांडताना एकमेकांना ओरबाडणं, चावणं, ढकलून देणं. सांडा-सांडी, पाणी, साबण, चिखल उडवण्याचे खेळ… एकमेकांना कपाटात, पांघरुणात, पिशवीत सुद्धा लपवून, बंद करून ठेवणं.., हे सगळंच ही मुलं एकमेकांचं बघून शिकत, करत असतात. ज्यात कुणाही एकाकडून आम्ही पालक समजुतीची अपेक्षा करू शकत नाही. वर ते निस्तरायला लागतं तेही दुप्पटच! आकांत करणारे मुलगे असतील, तर आवाजाचा अंश तापमान सांगायलाच नको; आणि मुली असतील, तर त्यांची रडण्याची, रुसव्या-फुगण्याची नाटकं, संपता संपत नाहीत. आता मला वाटतं, हे सांगायची गरजच नाही, की एकीला मिळत असलेली सहानुभूती बघून, दुसरीला, आपल्याला तिच्यापेक्षा जास्त, किमान तिच्या एवढी तरी मिळावी, ही अपेक्षा असते! जसं की, आजीला बाऊ दाखवला, की आजी ‘आला मंतर कोला मंतर करते’ हे कळू लागल्यावर उगाच एक ओरखडा सुद्धा नसताना एक जाऊन आजीला दाखवेल, “आजी बघ, बाऊss!” त्यावर आजी “अरेरे..खरंच की! थांब हं, आपण त्या बाऊला ‘जादू मंतर छू’ करून टाकूया” असं म्हणू लागली, की ते बघायला दुसरी हजर असतेच! मग तिचं झालं, की ही लगेच दाखवू लागते, “हे बघ..! आज्जी, मला पण केवढाss बाऊ झालाय!!”

मग पुन्हा हिच्यासाठी..! ह्या सगळ्यात आजी आजोबांनाही खूप मजा अनुभवायला मिळते. मग आजोबांकडे काजू, दाणे मागायला जाणं. जाताना दुसरीसाठी म्हणून हातातून मोजून तेवढेच घेऊन जाणं, म्हणजे “आबा मला चार द्या. ह्या हातात मला चार, आणि त्या हातात तिच्यासाठी चार.” हे हीने मध्येच मटकावले, की दुसरीला दोन-चार दिले ते त्यांचं त्यांनाच माहिती असतं. त्यात आमच्यासारख्या समान दिसणाऱ्या जुळ्या असतील, तर आजी-आजोबांना हा ही पत्ता लागत नाही, की आधी कोण आणि नंतर कोण येऊन गेली! की एकच दोनदा येऊन दोघींचे दाणे घेऊन गेली!! अशी जाम धम्माल चालू असते घरात..

नंतर सांगताना मजा येते, पण दर दिवसा-तासाला पालकांची, मुख्यतः पूर्णवेळ घरी असलेल्या आईची जी तारांबळ चालू असते, ती फक्त आणि फक्त दुसरी जुळ्यांची आईच समजू शकते. वडील समजू शकतात, पण जसजशी मुलं थोडीशी मोठी, नि स्वतंत्र होऊ लागतात, तसं ह्या वडिलांमधला नवरा पुन्हा जागा होतो, आणि ह्या आयांना तुम्ही बायकोही आहात, पेक्षा आधी बायको आहात, ही जाणीव करून देऊ लागतो. तर अश्या ह्या तीन सम-मानसीकतेच्या (?) मुलांच्या अपेक्षा पुऱ्या करण्याची ही एक कसरत असतेच.

असो, तर मूळ मुद्द्यावर येताना, ह्या जुळ्यांना वाढवणं म्हणजे जेवढी मज्जा, तेवढीच शारीरिक, मानसिक नि बौद्धिक कसरत होते. ज्यांना बघून वाटतं, की आम्हालाही जुळी हवी होती, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, की ही वरवर दिसणारी मज्जा आई-वडिलांना अनुभवायला कमी, आणि प्रचंड patience सहीत निस्तरायला जास्त लागते. त्यात घरात अजून मदतीचे हात नसतील, तर ती ही वेगळीच तारांबळ! कारण हे सगळं चालू असताना, त्यांचं खाणं/पिणं, औषधं, झोप, शी-शू हे सगळं वेळच्यावेळी होणं, आणि त्यासाठी त्यांच्या diet, नि routine habits सकट सगळी बंधनं कसोशीने पाळणं, निदान पहिल्या दोन वर्षांत तरी अत्यंत आवश्यक असतं. नाहीच तर नंतर दुप्पट काम आहेच आहे! आजारपणाबद्दल आत्ता बोलायलाच नको, कारण तो एक स्वतंत्र विषय होईल.

वागणुकीतले, गमतीचे भाग सोडता, यांच्या संगोपनामध्ये आर्थिक नियोजनसुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं. आताशा शिशुवर्गांचा दरच कुठल्या कुठे असतो, त्यापुढे प्रत्येक वर्षी शालेय फीच्या जोडीने इतर अनेक खर्च येणार असतात. जे दोघींसाठी एकाच वेळी करायचे असतात. अशा वेळेला लक्षात येतं की किमान एक दोन वर्षांच्या फरकात असणाऱ्या मुलांच्या बाबतीतसुद्धा खर्चाचं नियोजन काही हफ्त्यांमध्ये करता येतं! जुळ्यांचा विचार करताना पुरेशी साठवण, गुंतवणूक हाताशी नसेल तर परिस्थिती अत्यंत अवघड होऊ शकते. फार दूरचा विचार सुद्धा करायला नको, अगदी वाढदिवस साजरा करतानासुद्धा दुप्पट गिफ्ट्स, दुप्पट केक, दुप्पट पाहुणे (दोन्ही मुलांच्या वर्गातले), सगळे एकाच वेळेस आणि दुप्पट धडकतात, आणि एकाचवेळी दुपटीने खिसा रिकामा करतात.

ही जुळी मुलं एकाचवेळी दुपटीने सगळं देतात… मग तो आनंद असो, प्रेम असो, त्यांचं आजारपण, दुखणं, खर्च असो, त्यांची भांडणं, हट्ट, दंगा, अपघात, जिव्हाळा, आणि (मोठेपणी पालकांपासून) एकदम दुरावणं..! हे सगळं दुपटीने पालकांना अटॅक करतं! यातल्या काही गोष्टी नैसर्गिकरित्या दोघांना एकाच वेळेला होत असतात, तर काही एकमेकांमुळे. म्हणजे हिला झालं म्हणून, किंवा हवं म्हणून तिलाही, असं! आणि ते कशामुळेही झालं असलं तरी दोघांकडेही समान लक्ष पुरवता आलं पाहिजे, निदान तसं दाखवलं तरी पाहिजे. हे सगळं आव्हानात्मक आहे, अतिशय सुंदर आहे. तसंच हे त्यांचं आणि आमचं आमचं असं स्वतंत्र आयुष्य देखील आहे. एकेकटी वाढणारी आणि जुळी मुलं, यांच्यात जशी तुलना होऊ शकत नाही, तशीच कोणत्याही दोन जुळ्यांची तुलनाही होऊ शकत नाही. अगदी ते एकयुग्मनज किंवा द्वियुग्मनज असले तरीही. हे आणि काय म्हणताय..? पुढच्या लेखात सांगते!

— प्रज्ञा वझे घारपुरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..