नवीन लेखन...

आयुष्य

अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये संध्या सिनकर यांनी लिहिलेली ही कथा. 


“स्मिता, ए स्मिता,” आईच्या हाका ऐकू आल्या. स्मिता नुकतीच उठून फ्रेश होऊन आली होती. अजून चहादेखील घ्यायचा होता. “स्मिता, मिहीर रडतोय. जरा बघ ना. आम्ही डबा बनवतोय.” “हो घेते त्याला.” म्हणत स्मिताने जाऊन मिहिरला उचलून घेतले. आजूबाजूला कोणीच दिसत नसल्यामुळे तो घाबरला होता. स्मिताने आपल्या छोट्याशा भाच्याकडे पाहिलं अगदी नीताची कॉपी. उचलून घेताच तो शांत झाला.

स्मिता कॉम्प्युटर इंजिनीअर. चार वर्षे झाली विक्रोळीला एका छोट्याशा कंपनीत नोकरीला होती. तिला प्रोग्रॅमिंग व काही क्लाएंटचे प्रोजेक्ट्स बघावे लागत. ती घरातून बारा-साडेबाराला निघे व रात्री बारा साडेबारापर्यंत परत येई. अर्थात तिला कारने घरापर्यंत ड्रॉप असे. पण काल रात्री तिला अजिबात झोप आली नाही. काल मनीषने तिला लग्नाविषयी विचारलं. तिच्या बहिणीचे अयशस्वी लग्न बघून तिने ठाम ठरवलं होतं लग्न करायचं नाही. पण मनीषशी बोलल्यावर ती थोडी विचलित झाली. विचारात पडली. मनीषही कॉम्प्युटर इंजिनीअर. दोघेही एकाच वेळी नोकरीला लागले. तोही तिच्याप्रमाणे आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरातील होता. त्याला दोन मोठ्या बहिणी, लग्न झालेल्या. आईवडील सासवड जवळच्या एका खेड्यात राहात. मनीष तिचा चांगला मित्र होता पण लग्नाच्या दृष्टीने तिने त्याच्याकडे बघितले नव्हते. मनीषने चार महिन्यांपूर्वी जॉब बदलला होता. त्याला पवईला एका मोठ्या आय.टी. कंपनीत चांगले पॅकेज मिळाले. तो अधूनमधून कंपनीत सगळ्यांना भेटायला येई. काल तो थोडा उशिरानेच आला होता. दोघे कॉफी पीत गप्पा मारत असताना त्याने सांगितलं, “स्मिता तू मला खूप आवडतेस. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आपली जात वेगळी आहे. पण ते काही फार महत्त्वाचे नाही. तू लग्न करायचं नाही असं ठरवलं आहेस हे मला माहीत आहे. पण तू माझे ऑफर लेटर बघितलं आहेस. आपल्या आयटी रिटर्न पण आपण नेहमी एकत्र ऑनलाईन फाईल करत असल्यामुळे आपलं इन्कम एकमेकांना माहिती आहे. त्यामुळे नीतासारखी फसवणूक व्हायची काही शक्यता नाही. शिवाय आपण एकत्र तीन चार वर्षे काम केलं आहे. त्यामुळे आपल्याला एकमेकांचे स्वभाव, सवयी व आवडी माहिती आहेत. तेव्हा तू शांतपणे विचार कर. हवं असल्यास आईशी व नीताशी बोल आणि मग ठरव. तुला हवं असेल तर मी तुझ्या आईशी बोलेन. तू तुझा वेळ घे. विचार कर आणि मग ठरव. मी कांजूरमार्गला छोटासा रेडी फ्लॅट घेतलाय. चारशे स्क्वेअर फुटाचा. तीन खोल्यांचा. सहाव्या मजल्यावर आहे. मला पवईला व तुला विक्रोळीला जायला जवळ पडेल. अगदी लहान, साधा फ्लॅट आहे. बँकेकडून कर्ज, माझे पैसे व थोडे मित्रांकडून घेतलेले कर्ज सगळे फ्लॅटमध्ये गेलं. काहीही फर्निचर किंवा व्हाइट मुड्स घ्यायला पैसे उरले नाहीत.” स्मिाताने मनीषला सांगितले, “तिला मित्र म्हणून तो आवडतो पण लग्न करण्याच्या दृष्टीने तिने विचार केला नाहीये. ती विचार करून सांगेन.” “स्मिता अगं बाळ झोपलं त्याला गादीवर ठेव व चहा घ्यायला ये.” आई म्हणाली. “मी तुला दोन हाका मारल्या पण तुझं लक्षच नाहीये.” आईने बाळाला स्मिताकडून घेतलं. स्मिता म्हणाली, “मी चहा व खारी बिस्कीटं खाते नी परत जरा पडते. माझं डोकं दुखतंय व कणकण वाटतेय.”

स्मिता बेडवर येऊन पडली. तिला आईने, नीताने सांगितलेल्या गोष्टी आठवू लागल्या. तिचं मन भूतकाळात गेलं. आई विशीत असताना आई बाबांचे लग्न झाले. बाबा मुंबईत नोकरी करत होते. एका नातेवाईकांकडे राहात होते. त्यामुळे लग्न झाल्यावर आई, काही काळ गावाला आजी-आजोबांकडे (बाबांच्या आई- वडिलांकडे) राहिली. नंतर वर्षाआत्याने आईबाबांना मुंबईला आपल्या घरी बोलावून घेतले. नीताचा जन्म झाल्यावर बाबांनी ठाण्याला एक छोटी खोली भाड्याने घेतली. त्या खोलीत सुरुवातीला पाणी बाहेरून भरावे लागे पण स्वत:चे घर झाल्यामुळे आईला खूप बरे वाटले. त्या घरासाठी पण थोडे पैसे कमी पडत होते. मग आईने तिच्या आईला पैशांसाठी विचारले. आजी म्हणाली, “मी विभाच्या (आईची बहीण) लग्नासाठी ठेवलेले पैसे तुला देते. तुझी नड भागवून घे. विभाचे लग्न मी थोडे पुढे ढकलते.” आई बाबांनी थोड्याच महिन्यात ते पैसे फेडले. आई-बाबांची रहाणी काटकसरीची व साधी होती. आईने मागे लागून बाबांचे दारू पिणे कमी केले होते. बाबा खूप प्रेमळ व कष्टाळू होते. आम्हा सगळ्यांचे ते अतिशय प्रेमाने करीत. त्यांना पटकन राग येई. चिंता पण त्यांची पटकन पकड घेई. ते थोडेसे घाबरट होते. आई कष्टाळू, खंबीर व वास्तववादी होती. गरिबी व कष्ट असले तरी त्यांचा संसार सुखाचा व आनंदाचा होता.  स्मिताच्या डोळ्यासमोर नीताचा लग्नाचा प्रसंग फिरू लागला. सगळ्यात दुःखदायक गोष्ट म्हणजे नीताचे, स्मिताच्या मोठ्या बहिणीचे लग्न नीताने बी.कॉम. केले. लगेच विक्रोळीला एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नोकरीला लागली. तिचे वरिष्ठ तिच्या कामावर खूष होते. ती पहिल्यापासून सिन्सीअर व एकपाठी. तिचा पगारही आता तीन-चार वर्षांत चांगला वाढला होता. तिच्यासाठी स्थळं बघणं चालू होतं. तेव्हा कोणीतरी नागपूरचे स्थळ सुचवलं. पण तुम्ही माहिती काढा असंही सांगितलं. बाबा नागपूरला जाऊन आले. मुलाचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस होता. तो नगरपालिकेकरता रस्ते बांधणे व इतर कामे करतो असे कळले. त्यांनी बाबांचे चांगले स्वागत केलं. बाबांना माणसं खूप चांगली वाटली. आई म्हणाली, “नीताची चांगली नोकरी आहे. मुली आपल्या पायावर उभ्या असलेल्या कधीही बऱ्या. नवऱ्याचे कितीही चांगले उत्पन्न असले तरी मुलीला स्वत:ची नोकरी असावी. आता लग्न करून नागपूरला जाणार म्हणजे तिला नोकरी सोडावी लागणार. नवऱ्यावर अवलंबून राहा लागणार.” बाबा म्हणाले, “तिला चांगलं कुटुंब मिळतं तर तू काहीतरी खुसपट काढत बसते. मुंबईचा मुलगा असला तर तिला नोकरी व संसार करायचा म्हणजे किती कष्ट पडतील. तिला काय लग्नानंतर तू देतेस तसा तयार डबा मिळणार आहे का? आता ती लोकं परवा ठाण्याला घर बघायला येणार आहेत. तुला माणसं बरी वाटली तर साखरपुडा उरकून सावित्री, त्यांचा छान बंगला आहे. समोर थोडी फुलझाड आहेत. सगळं अगदी उत्तम आहे. नंतर राजू व त्याचा परिवार ठाण्याला आले. सगळेजण छान गप्पा मारत होते. गुलाबजामचा मोठा डबा व कोथिंबीर वड्या घेऊन आले होते. आमच्याकडे जेवून गेले. सगळेजण नीताचे खूप कौतुक करत होते. तिला एक सुंदर साडी व अंगठी आणली होती. ते साखरपुडा करूनच परत गेले. नीताची घेऊ. स्वत:ची अशी ठाम मते नव्हती. मी तिला विचारलं, “राजू तुला खरंच आवडला ना?” ती म्हणाली, “मुलगा बरा आहे पण मी आई-बाबांना पसंत असेल त्या मुलाशी लग्न करणार.” मी तिला विचारलं, “तू काय बोललीस त्याच्याशी? तुमची मतं जुळतात का ते बघितलंस का? तुझ्या मनात काहीतरी जोडीदाराचे चित्र असेल ना? राजू त्याच्या जवळपास आहे का?” नीता म्हणाली, “मी ठरवून ठेवलं होतं पहिल्यापासून की आई-बाबा ठरवतील त्या मुलाशी मी लग्न करणार.” मी वैतागून म्हटलं, “अगं, हा तुझ्या आयुष्यातला मोठा निर्णय आहे. तुझ्या स्वतःच्या आयुष्याचा निर्णय तुला स्वत:लाच घ्यायला हवा. तुझ्या आयुष्याविषयी तुझ्याइतकं कुणालाच माहिती नसणार. तुला काय हवंय? तुझ्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत? आई-बाबांचा सल्ला घे पण निर्णय तुलाच घ्यायला हवा.” बाबांनी ठरवल्याप्रमाणे लगेचच नीताचं नागपूरला लग्न झालं. बाबांनी जवळच्या सगळ्या नातेवाईकांची ट्रेनची तिकिटे काढली. रिझव्हेंशन केलं. लग्न अगदी छान झालं. माझी घरातील हक्काची मैत्रिण लांब नागपूरला गेली. त्यामुळे मी बाबांशी खूप वेळा भांडणही केलं. नीताचं लग्न एवढ्या लांब नागपूरला केलं म्हणून. नीताचं सगळंच सुपरफास्ट. लग्नानंतर एका वर्षाच्या आतच त्यांना मुलगा झाला. नीताचं बाळंतपण सासूने नागपूरला केलं. छोटं मस्त बारसं करून मग नीताला माहेरी ठाण्याला पाठवलं. नीता बाळातच रमली होती. मी तिला खोदून खोदून विचारलं तेव्हा ती म्हणाली, “घर खूप मोठं आहे. त्यामुळे खूप काम पडतं. सासूबाई थोडीफार मदत करतात. पण मी कष्टांना घाबरत नाही.” ठाण्याला राहायला आल्यावर एक महिना नाही झाला तो सासूकडून ‘तू कधी येणार आहेस’चे फोन यायला सुरुवात झाली. पण आईने सांगितलं ती चार-पाच महिने तरी माहेरी राहणार. नीता व बाळ आल्यामुळे घरात एकदम चैतन्य आलं होतं. मी नीताला विचारलं, “राजूचे उत्पन्न किती आहे? त्याचा व्यवसाय असल्यामुळे कधी एकदम पैसे येत असतील तर कधी कमी येत असतील ना? मग तू घरखर्च कसा प्लॅन करतेस?” ती म्हणाली, “मला राजूच्या उत्पन्नाविषयी काहीही माहिती नाही. तो घरातील सामान दर महिन्याला भरतो. माझ्याकडे दोन-तीन हजार नेहमीच्या भाजी व गॅससाठी देतो. साड्या, ड्रेसेस लग्नातच मिळालेले आहेत त्यामुळे नवीन घेतले नाहीत. बाळाला बारश्याला सोन्याची चेन घातली होती ती सासूबाईंची चेन पॉलिश करून घेतली होती.” मी नीताला म्हटलं, “तू राजूला त्याचा व्यवसाय, उत्पन्न व खर्च याविषयी विचारायला पाहिजेस. त्याला काम कसं मिळतं? ते पूर्ण करण्याकरता तो कामगार कुठून घेतो? त्याचे उत्पन्न व खर्च किती? हे प्रश्न विचारले नसशील तर आता विचार प्रश्न विचारले पाहिजेत आणि जाणून घेतलं पाहिजे. हा बाळाच्या चेनवरून आठवलं तुझे लग्नात केलेले दागिने कुठे आहेत?” नीता म्हणाली, “ते दागिने सासूबाईंनी त्यांच्या कपाटात ठेवले आहेत.” मी कपाळाला हात लावला व म्हटलं, “नीता, तुझ्या सासूबाई चांगल्याच असतील. पण आपले दागिने कधी लागले तर आपल्याकडे असले पाहिजेत असे मला वाटते.” तेवढ्यात बाळ उठला. नीता म्हणाली, “मला बाटलीत दूध भरून दे.” आणि आमच्या गप्पा थांबल्या. मग ती तीन-चार महिने ठाण्याला राहिली. मिहीर सहा महिन्यांचा झाल्यावर परत नागपूरला गेली. तिच्याशी आठवड्यातून एक-दोनदा फोनवर बोलल्याशिवाय मला चैन पडत नसे. एकदा तिने आईला फोन केला व म्हणाली, “आई, मी सोमवारी एक तारखेपासून नोकरीला सुरुवात करतेय. जवळच आहे. घरापासून दहा मिनिटांवर ऑफिस. दहा हजार रुपये पगार. राजू म्हणाला की आपली फॅमिली वाढते तर दोघे मिळून कमावू.” आईला मिहीर लहान असताना नीताने नवीन आणि तीही कमी पगार असलेली, लहानशी नोकरी करणं पटलं नाही. ती म्हणाली, “नीता, पैशाचा काही प्रॉब्लेम आहे का? नसेल तर आत्ता मिहीरकडे लक्ष दे. घरातही तुला भरपूर काम असते.” पण नीताने नोकरी पकडली. घरातली सगळी कामं, मिहीरचे करणे व नोकरी यामुळे तिला फोनवर बोलायलासुद्धा वेळ मिळत नसे. मी तिला क्लीनिंगसाठी बाई ठेवायला सांगितली. काही कामं आता तुला जमणार नाही असं स्पष्ट सांग. मला एकंदरीतच राजूचा बिझनेस चालतो का नाही अशी शंका येऊ लागली. मी आईला ही शंका बोलून दाखवली. मी आईला म्हटले की नीताला विश्रांतीसाठी एक-दोन महिने इकडे बोलावून घे. आई म्हणाली, “स्मिता, मलाही हे सगळं थोडं विचित्र वाटतंय. आता दोन महिन्यांनी दिवाळी आहे. ते निमित्त पकडून आपण नीताला बोलावून घेऊ आणि आली की महिनाभर विश्रांतीसाठी ठेवून घेऊ.” आमचे हे बोलणे झाले अन् दुसऱ्याच दिवशी नीताचा फोन आला. ती म्हणाली, “राजूचे बरेच पैसे धंद्यात अडकले आहेत त्याला एक लाख रुपये हवे आहेत. त्याची येणी वसूल झाली की तो लगेच परत करेल.” आईने तिला सांगितले, “स्मिताच्या लग्नाचं बघतोय. त्यासाठी आम्हालाच कर्ज काढावे लागणार आहे. तरी मी बाबांशी बोलते.” आई मला म्हणाली, “मला हे सगळं विचित्र वाटतंय. नीता दिवाळीत आली की तिला नीट विचारायला पाहिजे. नाहीतर राजूला पैसे देऊनही तिचे कष्ट चालूच राहतील आणि पैसेही बुडीतखाती.” आईने बाबांना रात्री नीताच्या फोनविषयी सांगितलं. बाबा लगेच म्हणाले, “मी बँकेतले डिपॉझिट मोडतो व नीताला पैसे पाठवून देतो. नीताला काही त्रास व्हायला नको.” आई बाबांना सांगत होती इतक्यात पैसे पाठवू नकोस. पण बाबांनी ऐकले नाही. त्यांनी लगेच पैसे पाठवून दिले. त्यानंतर एखाद्या महिन्यातच राजूला अर्धांगवायूचा झटका आला. तेव्हा त्यांच्याकडे औषधासाठीसुद्धा पैसे नव्हते. नीताचा पगार आणि उधार उसनवार असे चालले होते. नीता विश्वास ठेवणारी असल्याने दोन वर्षात तिला काहीही कळलं नव्हतं. राजू नोकरीधंदा काहीही करत नव्हता. घरात कोणीही कमावणारं नव्हतं. त्याने कुठलीतरी वारसाने मिळालेली त्याच्या वाट्याची प्रॉपर्टी २० लाख रुपयांना विकली. त्यातूनच त्याने बंगला भाड्याने घेतला. लग्नाचा थोडा खर्च, बाळंतपण व छोटा बारशाचा समारंभ केला. पैसे संपले तसे उधार उसनवार केली. मग ते फेडण्यासाठी बाबांकडून एक लाख रुपये घेतले. नीताला नोकरी करायला लावली. अर्थात हे सगळं तो आजारी पडला म्हणून कळलं. बाबांना खूप धक्का बसला. आपण नीट चौकशी केली नाही. आपण फसलो व नीताच्या आयुष्याची वाट लागली. या विचाराने ते खचले. आईने त्यांना सांगितलं, “तुम्ही काही काळजी करू नका. आपण नागपूरला जाऊ या. तिघांनाही इकडे घेऊन येऊ. त्याच्यावर उपचार करू. तो बरा होईल. दोघेही इकडे नोकरी करतील. आपण त्यांना भाड्याने जागा घेऊन देऊ. सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही शांत राहा. मी भक्कम आहे माझ्या मुलीच्या आयुष्याची काळजी घ्यायला.” बाबा व आई नागपूरला जाऊन त्या तिघांनाही घेऊन आले. नीता ज्या कंपनीत पूर्वी नोकरी करत होती तिथे जाऊन भेटली. ते सगळे तिच्या कामावर खूष होते. तिला ती नोकरी परत मिळाली. आई राजूला हातापायाचे व्यायाम करण्यासाठी घेऊन जाई. त्याचे उपचार व्यवस्थित चालू होते. पण बाबांना नीताची खूप काळजी वाटे. त्यांना अपराधी वाटे. चिंतेने व दुःखाने बाबांची प्रकृती बिघडू लागली. दारू पिण्यामुळे आधीच लिव्हर खराब झाले होते. त्या दिवशी बाबांची प्रकृती खूप बिघडली. कामावर न जाता ते झोपून होते. आई त्यांना घेऊन नेहमीच्या डॉक्टरकडे गेली. त्याने बाबांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करायला सांगितले. रात्रीच उपचाराला प्रतिसाद न देता बाबा आम्हाला सोडून गेले. आमच्या घरावर दु:खाचा त्या डोंगरच कोसळला. आईला खूप दुःख झाले होते. तीन-चार दिवसात तिने स्वत:ला सावरले. राजूची तब्येत खूपच सुधारली. तो व्यवस्थित चालू फिरू लागला. फक्त उजव्या हाताची दोन बोटे त्याला नीट हलवता येत नव्हती. आईने कुणाकुणाला सांगून त्याच्यासाठी दोन-तीन नोकऱ्या शोधल्या. पण त्याने काही ना काही कारण सांगत त्या टाळल्या. काही ठिकाणी तो गेलाचं नाही. एका ठिकाणी एक दोन दिवस जाऊन सोडून दिली. आईच्या लक्षात हळूहळू आले की राजूने कधी कामच केले नाहीये. त्याला नुसता आराम करण्याची सवय झाली आहे.

एका रविवारी माझा फोन वाजला. फोन पोलीस स्टेशनवरून होता. पोलीस म्हणाले, “सावित्रीबाई पाटील यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखला झाला आहे. मला खूपच धक्का बसला. मी विचारलं, “आईने काय गुन्हा केला आहे? कोणी तक्रार केली आहे?” पोलीस म्हणाले, “तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये यावे लागेल. वसंत व वासंती पवार (राजूचे आईवडील) यांनी सावित्रीबाईंच्या विरोधात तक्रार केली आहे.” “पण ते नागपूरलाच असतात ना?” मी म्हटले. पोलीस म्हणाले, “तुम्ही लगेच पोलीस स्टेशनला या. त्या दोघांनी सावित्रीबाई त्या दोघांना मुलाशी बोलू देत नाहीत. मुलाला भेटू देत नाहीत अशी तक्रार केली आहे.” मी आईला सांगितलं. आईला खूपच राग आला तिने काकांना फोन केला. काका, आई, मी व राजू असे पोलिस स्टेशनवर गेलो. आईन नीता व मिहीरला घरीच थांबायला सांगितले. काका व आई राजूच्या आई-वडिलांना खूप बोलले. तुमच्या मुलाला चालताही येत नव्हते. अंथरुणात पडला होता तेव्हा तुम्ही त्याला काही उपचार केले नाहीत. मी इकडे घेऊन आले. सगळे उपचार केले. औषधोपचाराचा खर्च केला. पण त्याबाबत माझे आभार मानायचे राहिले बाजूला तुम्ही पोलिस ठाण्यात येऊन माझ्याविरुद्ध तक्रार करता?”  राजूची आई म्हणाली, “आम्ही आता म्हातारे झालो आहोत. आमचे काही उत्पन्न नाही. मग मी मुलालाच फोन करणार ना? आमच्याकडे आमच्या औषधांसाठी व खाण्यासाठीसुद्धा पैसे नाहीत. तुम्ही त्याला आमचे फोनही देत नाही.” आई वैतागून म्हणाली, “अहो, तुमच्या मुलालासुद्धा मीच पोसते आहे. त्याच्या खाण्यापिण्याच्या व औषधाचा खर्च मीच करते आहे. तो काही नोकरीधंदा करत असेल तर तुम्हाला पैसे पाठवू शकेल.” त्याची आई म्हणाली, “नागपूरला तो काही धंदा करू शकतो किंवा त्याला नोकरी तरी मिळेल.” आई म्हणाली, “मग घेऊन जा त्याला. माझी काही हरकत नाही.” राजू म्हणाला, “नीता, मी व मिहीर एकदम येऊ.” आई म्हणाली, “नीताला चांगली नोकरी आहे. ती व मिहीर येणार नाहीत. तुला काय करायचे ते तू ठरव.” इन्स्पेक्टर म्हणाला, “हा सगळा तुमचा घरचा खाजगी मामला आहे. तुमचा मुलगा, तुमचे नातेवाईक व तुम्ही आपसात चर्चा करून हा प्रश्न सोडवावा.” राजू म्हणाला, “आई, बाबा तुम्ही नागपूरला परत जा. थोड्या दिवसात आम्हीपण येऊ.’ राजूच्या आईने रडून भरपूर ड्रामा केला. नंतर ते नागपूरला परत गेले. राजूसाठी आईने खरंतर खूप कष्ट केले होते. ती त्याला घेऊन फिजिओथेरेपिस्टकडे व डॉक्टरकडे जाई. त्याच्याकडून घरात व्यायाम करून घेई. आईने त्याच्यासाठी कष्टही केले होते व पैसाही खर्च केला होता. नीता व राजू दोघे नोकरी करतील व जवळच भाड्याची जागा घेऊन राहतील. नीताचे आयुष्य मार्गी लागेल असं आईला वाटत होतं. पण राजू एकदम ऐतखाऊ होता. नोकरी करण्यासाठी कष्ट करण्याची त्याची तयारी नव्हती. पोलिसांसमोर तो आईच्या बाजूने काहीतरी बोलेल असं मला वाटलं होतं. पण तो काहीही बोलला नाही. त्यामुळे आई खूप दुखावली व रागावलीसुद्धा. ती त्याला स्पष्टपणे म्हणाली, “अरे, मी तुझ्या एवढ्या खस्ता खाल्ल्या ते तुला तुझ्या आईला सांगता आले नाही का? तुला जायचे असेल नागपूरला तर जा. पण मिहीर किंवा नीता तुझ्याबरोबर येणार नाहीत.” राजे म्हणाला, “मी नागपूरला जाऊन येतो. आई सारखी बोलावत आहे.” आईने त्याला तिकीट काढून दिलं. तो नागपूरला गेला.

काही दिवसांनी त्याचा फोन आला. “आई मी परत ठाण्याला येतो.’’ आईने त्याला सांगितलं की तुझ्या आईने सांगितले ना त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये तुला नागपूरमध्ये नोकरी किंवा धंदा करता येईल. मग तिकडे तू नोकरी चालू कर.” राजू म्हणाला, “मला नोकरी मिळाली नाही. तुम्ही माझ्यासाठी ठाण्यातच नोकरी बघा.” आईने त्याला सांगून टाकले, “तुझ्या आईला तू तिच्या जवळ राह्यला हवा आहेस तेव्हा तू तिकडेच राहा. माझी मुलगी आमच्या जवळ राहून मिहीरला वाढवू शकते.” नंतर त्याने नीताला फोन केला, “मला ठाण्याला यायचं आहे.” नीताने त्याला सांगितले, “घर आईचं आहे. ती हो म्हणाली तरच तू ये. तू आलास व तिने मला घराबाहेर काढले तर मी छोट्या मिहीरला घेऊन कुठे राहणार? आता मला ही नोकरी सोडायची नाही. माझ्यासाठी व मिहीरसाठी नोकरीची आवश्यकता आहे.” आता नीता एकटीच आईकडे राहून मिहीरचा सांभाळ करते. नीताच्या लग्नाचा कटू अनुभव आल्यामुळे मी आईला सांगून टाकलं की मी लग्न करणार नाही. स्मिता आठवणींच्या सफरीतून वर्तमानात आली. नीताच्या लग्नाच्या अनुभवाने स्मिताच्या मनावर मनाला खोलवर जखम झाली होती. त्यामुळे तिने लग्नच करायचं नाही असे ठरवलं होतं. स्मिताने विचार केला की मनीषला चांगल्या शब्दात नाही म्हणायचे. स्मिताला मनीषबरोबरचे प्रसंग आठवले. मनीषने व तिने एकत्रच या कंपनीत नोकरीची सुरुवात केली. सुरुवातीला तिला युके क्लाएंटचे उच्चार समजायला कठीण जायचे. तेव्हा मनीषने काही साईट शोधल्या. मित्राकडून व्हिडिओज् मिळवले साडेबाराच्या शिफ्टच्या आधी कंपनीत जाऊन ते दोघे त्या साइट्स व व्हिडीओज् वरून शिकत. त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. राजूच्या आई-वडिलांनाही जेव्हा पोलीस स्टेशनवर आईच्या विरोधात तक्रार केली तेव्हा स्मिता खूप निराश झाली होती. तिने मनीषला फोन करून ती सोमवारी ऑफिसला येणार नाही असे सांगितले. सोमवारी सकाळीच मनीष घरी आला. त्याने तिला समजावले, “जगात सगळ्या प्रकारचे लोक असतात. जसे चांगले तसेच वाईट. राजूच्या आई-वडिलांना तुझ्या आईने व्यवस्थित उत्तर दिले आहे. आता पुन्हा ते तुमच्या वाट्याला येणार नाहीत. तेव्हा तू कंपनीत चल. त्यामुळे तुझे मन कामात गुंतून राहील. घरी राहिलीस तर पोलीस स्टेशनवर काय घडलं त्याचाच विचार करत राहशील.” मनीषने तिला भावनिक सपोर्ट केला. मनीषला नाही सांगायचे म्हणजे त्याला आता जास्त भेटायचे नाही. फोनही कमी करायचे. मनीषला भेटायचे नाही असे ठरवल्यावर तिला अतिशय वाईट वाटले. तिला मनीषचे शब्द आठवले, “वाईट गोष्टीत जास्त गुंतून पडायचे नाही. पुढे चालत राहायचे. आयुष्य सुंदर आहे ते भरभरून जगायचे.” स्मिता शांत बसून विचार करू लागली. तेव्हा तिला मनात खोल मनीषविषयी प्रेम जाणवलं. मग स्मिताने आई व नीताला मनीषविषयी सांगितलं. आईने त्याला घरी बोलावलं. मनीष मोकळेपणाने बोलला. सगळ्यांनाच मनीष चांगला वाटला. खूप केल्यानंतर स्मिताने स्वत:च्या मनाचा कौल मानण्याचे ठरवले व मनीषला होकार दिला आणि नजिकच्या मुहूर्तावर पंधरा-वीस जवळच्या लोकांच्या उपस्थितीत मनीषच्या दुसऱ्या फ्लॅटवर दोघांनी साध्या पद्धतीने लग्न केले. आता स्मिताचा संसार सुखात चालू आहे.

– संध्या सिनकर

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..