नवीन लेखन...

आयुबोवान

आयुबोवान बोलून दरवाजाच्या दोन्ही बाजूला उभ्या असेलेल्या श्रीलंकन एअरवेजच्या दोन्ही एअर होस्टेस ने स्वागत केले, एकीने बोर्डिंग पास वरील सीट नंबर बघून पुढील बाजूने जायला सांगितले. चेक इन करताना काउंटर वर नेहमी प्रमाणे विंडो सीट मिळेल का असे विचारले. काउंटर वरील क्लार्क ने बघतो म्हणून सांगितले. मी कोलंबो ते जकार्ता साठी पण विंडो सीट आहे का बघायला सांगितले.

पहाटे तीन दहा वाजताची मुंबई कोलंबो फ्लाईट कोलंबो ला पहाटे साडे पाच वाजता पोचून तिथून पुन्हा सात पंचवीस ची जकार्ता साठी कनेक्शन फ्लाईट. जकार्ताला तिथल्या वेळेनुसार दीड वाजता पोचून पुन्हा पाच वाजताची जांबी शहरात जाण्यासाठी तिसरी फ्लाईट. मुंबई कोलंबो आणि कोलंबो जकार्ता फ्लाईट ह्या श्रीलंकन एअरवेज तर जकार्ता ते जांबी बाटीक एयर या इंडोनेशियातील स्थानिक कंपनीचे होते. फ्लाईट पहाटे तीन दहाची होती पण ऑफिस मधून मेसेज आला की रात्री अकरा वाजताच एअरपोर्ट वर पोहचा. दोन दिवसांपूर्वी मुंबई एअरपोर्ट वर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याच्या बातम्या वाचल्या होत्या त्यामुळे एअरपोर्ट वर जाण्यासाठी रात्री नऊ वाजताच घर सोडले होते.

मुंबई हून चेक इन केल्यावर लगेज जकार्ता मध्ये मिळणार होते. जकार्ता मध्ये इमिग्रेशन क्लिअर करून आणि लगेज कलेक्ट करून कस्टम क्लिअरन्स झाल्यावर कंपनीचा एजंट रिसिव्ह करायला येणार होता. जकार्ता एअरपोर्टवर रिसिव्ह केल्यावर एजंट मला जांबी ला जाणाऱ्या बाटिक एअर च्या टर्मिनल वर नेऊन सोडणार होता. तिथून पुढे स्थानिक एजंट रिसिव्ह करून हॉटेल मध्ये सोडणार होता. दुसऱ्या दिवशी हॉटेल मध्ये सेल्फ क्वारंटाइन, सकाळी आर टी पी सी आर टेस्ट, रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच पुढल्या दिवशी सकाळी पाच वाजता दोन तास कार ने ड्राईव्ह करून एजंट बोट जवळ सोडणार. तिथून अडीच तास नदी आणि समुद्रातून प्रवास करून बोट जहाजावर सोडणार. असं सगळं नियोजन केले गेले होते. श्रीलंकन ऐरवेज ने जकार्ता ला जाण्याची ही चौथी वेळ होती. दोन वेळा सिंगापूर मार्गे तर आणखीन एक एक वेळा दुबई व बँकॉक मार्गे जकार्ताला पाठवले गेले होते. यापूर्वी सहा वेळा जकार्ता शहरापासून समुद्रात शंभर किलोमीटरवर असलेल्या जहाजावर मी नेहमी जात होतो पण यावेळेस कंपनीकडून जांबी शहराच्या जवळ दुसऱ्या जहाजावर मला पाठवण्यात येणार होते.

श्रीलंकन फ्लाईट मिळाली की झोपेची पूर्ण वाट लागून जायची. सव्वा दहा वाजता एअरपोर्ट वर पोचलो बारा वाजेपर्यंत चेक इन , सिक्युरिटी चेक आणि इमिग्रेशन होऊन बोर्डिंग गेट वर तीन तास वाट बघायला लागणार होती. पुढे अडीच तासात कोलंबो आणि नंतर लगेच दोन तासांनी जकार्ता साठी फ्लाईट. कोलंबो फ्लाईट मध्ये विंडो सीट मिळाली होती. विमानाने मुंबई एअरपोर्टच्या रन वे वरुन टेक ऑफ साठी स्पीड घ्यायला सुरुवात केली अक्सीलरेशन मुळे संपूर्ण शरीर मागे सीटवर लोटले जाऊ लागले.

जहाज जॉइन करायला निघाल्यावर रन वे वर विमानाने वेग पकडल्यावर त्याच वेगाने डोळ्यात पाणी जमा व्हायला लागते. प्रियापासून पोरांपासून आणि घरापासून खुप लांब जात आहोत याची प्रत्यक्ष जाणीव व्हायला लागते. पाण्याने डबडबलेल्या डोळ्यातून खिडकी बाहेर रात्रीच्या अंधारातील मुंबई मागे पडताना दिसते. टेक ऑफ नंतर विमान कोलंबो च्या दिशेला वळल्यावर खाली गेट वे ऑफ इंडिया आणि त्यासमोरील समुद्रात उभी असणारी जहाजे आणि छोट्या मोठ्या बोटींवरील दिवे लूक लुकताना दिसले. पंधरा वीस मिनिटांनी एअर होस्टेस ट्रॉली घेऊन निघाल्या बिअर, वाईन आणि फूड सर्व्ह करू लागल्या. माझ्यासाठी मी स्प्राईत आणि चिकन घेतले. पहाटे साडे तीन वाजता चिकन कबाब चे चार पिस असलेले फूड पॅकेट संपवलं आणि पुन्हा खिडकी बाहेर बघु लागलो. विमान पस्तीस हजार फुटांवर होते. खाली पिवळे दिवे लागलेली शहरे दिसत होती. सध्या कुठल्या शहरावरून उडत आहोत हे काही कळत नव्हते. अंधारात झोपलेली आणि दिव्यांनी उजळलेली शहरे बघता बघता मला कधी झोप लागली ते काही कळले नाही. पण पायलटने पब्लिक अड्रेस सिस्टीम वर अनाउन्समेंट केली आणि थोड्याच वेळात कोलंबो एअरपोर्ट वर उतरणार आहोत, बाहेरील तापमान पंचवीस डिग्री आहे वगैरे वगैरे सांगितले आणि मी जागा होउन पुन्हा एकदा खिडकीबाहेर बघू लागलो. या वेळेस पण कोलंबो मध्ये विमान लँड झाल्यावर बाहेर पडताना पुन्हा एकदा दोन्ही एअरहोस्टेस दरवाजा जवळ उभ्या राहून सगळ्यांना आयुबोवान बोलत होत्या. कोलंबो एअरपोर्ट वर कनेक्शन फ्लाईट साठी सिक्युरिटी चेक ची प्रक्रिया पार करावी लागली.
सव्वा सात वाजता जकार्ता साठी विमानात जाताना पुन्हा एकदा आयुबोवान कानावर पडले. सकाळी बरोब्बर साडे सात वाजता विमानाने टेक ऑफ घेतला चौथ्यांदा त्याच फ्लाईट ने जात होतो पण यावेळी मला पहिल्यांदाच विंडो सीट मिळाली होती. मागील तिन्ही वेळेस विमानात एकही सीट रिकामी नसायची. यावेळी बऱ्याचशा सीट रिकाम्या होत्या.

कोलंबो एअरपोर्ट वरुन टेक ऑफ घेतल्यावर विमान जकार्ता च्या दिशेने ३६० अंशात फिरले. कोलंबो च्या किनाऱ्याला मुंबई च्या किनाऱ्या प्रमाणे समुद्र भिडत होता. पण मुंबई सारखं काँक्रिटचे जंगलाने कोलंबो च्या किनाऱ्याला वेढलेले नव्हते.
नारळाची हिरवीगार झाडे आणि त्या झाडांच्या आतून डोकावणारी लहान मोठी घरे कोलंबो शहर मागे पडताना दिसत होती.
कोलंबो कडे येणारे रस्ते , लहान मोठ्या नद्या दिसत होत्या, कुठेही ओसाड जागा किंवा मोकळी मैदाने दिसत नव्हती. एकतर नारळाची झाडे नाहीतर हिरवीगार शेतं. जसं जसं कोलंबो मागे जाऊ लागले तसतसे हिरवेगार घनदाट जंगल आणि लहान मोठे डोंगर दिसू लागले. सकाळी पावणे आठ वाजायला आले होते. सकाळची सोनेरी किरणे हिरव्या गर्द झाडीवर पसरली होती. सगळे डोंगर हिरवेगार काही डोंगरावरून फेसाळणारे पांढरे शुभ्र धबधबे दिसत होते. जंगलातून वाट काढत जाणाऱ्या नद्या. नितळ स्वच्छ पाण्याचे जलाशय ज्यामध्ये आकाशाचे प्रतिबिंब दिसत होते.

अधून मधून लहान मोठी गावं दिसायची पण घरे मात्र एकमेकांपासून लांब लांब वसलेली. अर्ध्या तासात श्रीलंका ओलांडून हिंदी महासागराच्या वरुन विमान उडणार होते पण या अर्ध्या तासात रम्य ही स्वर्गाहून हून लंका या पंडित भीमसेन जोशी यांनी गाऊन अजरामर केलेल्या गदिमांच्या गीताच्या ओळी प्रत्यक्ष पाहायला मिळत होत्या. या गीतात केलेले लंकेचे आणि सृष्टीचे वर्णन किती सुंदर आणि समर्पक आहे याची अनुभूती क्षणाक्षणाला होत होती. हिंदी महासागरातील श्रीलंकेचा दक्षिणेकडील भाग जस जसा जवळ येऊ लागला तसा सुवर्णकमला परी ही नगरी फुलून दरवळे निळ्या सागरी लक्ष्मी व लंका दोघी भगिनी उभय या उपजल्या जलधितुनी याचा साक्षात्कार घडू लागला. दूर लांबवर नजर जाईल तिथपर्यंत हिरवाई तिच्या पलीकडे निळा समुद्र आणि त्या दोघांच्या मध्ये सोनेरी कणांच्या किनाऱ्याला भेटायला येणाऱ्या पांढऱ्या शुभ्र लाटा.

जकार्ता ला जाणाऱ्या फ्लाईट पूर्वी दुबई हून येणारी एक फ्लाईट कोलंबो ला पोचते त्यामूळे कोलंबो जकार्ता फ्लाईट मध्ये दुबई हून येणारे काही अरबी नागरिक व उरलेले सगळे पॅसेंजर हे आखाती देशात असणारा इंडोनेशियन कामगार वर्गातील असतात.
जकार्ता एअरपोर्ट वर विमानातून बाहेर पडताना पुन्हा एकदा आयुबोवान शब्द कानावर पडले. कोलंबो एअरपोर्ट वर एका सिक्युरिटी गार्ड ला मी आयुबोवान म्हणजे नेमके काय असे विचारले होते. त्यावर त्याने आयुबोवान म्हणजे सुस्वागतम किंवा धन्यवाद यापेक्षा तुम्हाला दीर्घायु लाभो अशी सदिच्छा व्यक्त करणे असा घ्यावा असे सांगीतले.

– प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनिअर
B.E. (mech), DIM, DME
कोन, भिवंडी,ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 184 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..