नवीन लेखन...

सुप्रसिद्ध संगीतकार मा. कृष्णराव यांची स्वाक्षरी

मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांची स्वाक्षरी – सतिश चाफेकर यांच्या संग्रहातून

 

सुप्रसिद्ध संगीतकार मा. कृष्णराव गणेश फुलंब्रीकर यांचा जन्म २० जानेवारी १८९८ रोजी औरंगाबादजवळच्या फुलंब्री गावातील भिक्षुक घराण्यामधील गणेशपंत आणि मथुराबाई यांच्या पोटी पुण्याजवळील देवाची आळंदी येथे झाला. ते ‘ संत सखू ‘ नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले . मा. कृष्णराव यांनी संगीताचे जुजबी शिक्षण सवाई गंधर्व यांच्याकडे घेतले. १९०९ साली त्यांना न. चि . केळकर यांनी त्यांना ‘ मा. कृष्णा ‘ अशी पदवी दिली आणि पुढे याच नावाने लोक त्यांना ओळखू लागले. फुलंब्रीकर यांचे भास्करबुवा बखले यांच्याकडे १९११ पासून संगीत शिक्षण सुरु झाले. नाटकाच्या फिरत्या दौऱ्याने सवाई गंधर्वांना मास्टर कृष्णरावांना योग्य प्रकारे शास्त्रोक्त गायनाचे धडे देता येत नव्हते. संगीत शारदा नाटकात कृष्णरावांची भूमिका बघून इ.स. १९१० मध्ये मा. कृष्णरावांनी पं. भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले स्वत: सवाई गंधर्व यांनी मास्तरांना बुवांकडे सोपवले होते भास्करबुवा यांनी त्यांना मैफली गाण्याची तालीम दिली. मास्तरांचा आवाज मुळामध्ये हलका , पातळ , परंतु चपळ असल्यामुळे भास्करबुवांनी त्यांच्यावर मर्दानी , जोरदार , घरंदाज गायकीचे संस्कार केले .

मास्तरांनी किचकवध , विठू माझा लेकुरवाळा या चित्रपटांना संगीत दिले . ‘ भक्तीचा मळा ‘ या चित्रपटामध्ये त्यांनी सावता माळी यांची भूमिका केली होती. त्यातील त्यांची पदे खूप गाजली होती. ‘ मेरी अमानत ‘ या चित्रपटामध्ये त्यांनी शिक्षकाची भूमिका केली होती. १९३७ साली ‘ साध्वी मीराबाई ‘ हा चित्रपट बालगंधर्वाच्या नाटकावरून म्हणजेच ‘ अमृतसिद्धी ‘ या नाटकावरून निघालेला होता. त्यातही त्यांनी मूळ नाटकासाठी दिलेल्या चाली होत्या.

अनेक नामवंत गायकांनी त्यांच्या नाटकांमधील आणि चित्रपटामधील गाणे गायली . त्यामध्ये बालगंधर्वांपासुन सुधीर फडके , मन्नाडे , महंमद रफी , ज्योत्स्ना भोळे , दुर्गा खोटे , शांता आपटे पासून लता मंगेशकर , आशा भोसले यांचा समावेश आहे. एक बंदिशकार म्हणूनही मास्तरांनी कीर्ती मिळवली.

१९४० नंतर नाट्यनिकेतनच्या नाटकासाठीच्या चाली भावगीतसदृश आहेत. परंतु त्यांच्या १९३४ पर्यंत दिलेल्या नाट्यपदांच्या चाली भारदस्त रागदारीवर आधारित होत्या. फुलंब्रीकरांच्या अडाणा , मालकंस , बागेश्री , तोंडी , हिंडोल , पुरिया , डेस , जयजयवंती , तुम मत जाओ , खमाज , ठुमरी , काफी होरी अशा अनेक ध्वनिमुद्राही गाजल्या. त्यांच्या गाजलेल्या अनेक ध्वनिमुद्रिकांमुळे ते लाहोर -कराची , पंजाब या ठिकाणी ‘ बाजे झनक मास्टर ‘ आणि निजाम संस्थानामध्ये ‘ पिचकारीवाले मास्टर ‘ म्हणून ओळखले जायचे. कमीतकमी स्वरांमध्ये , चटकन पकड घेणारी चाल , रसाळ , सहज सोपेपणा ही त्यांच्या चालींमध्ये जाणवतात.

मा. कृष्णराव ख्यालगायकीबरोबर ठुमरीसाठीही प्रसिद्ध होते. त्यांची ठुमरी ही ख्यालठुमरी किंवा मध्यमग्राम ठुमरी म्हणून ओळखावी जायची. संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मा. कृष्णरावांनी इ.स. १९२२ ते इ.स. १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य आणि आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती , उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत, भजन आणि चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले ‘ झिंजोटी ‘ रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे ‘वंदे मातरम्’ वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर पी एम ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खास विनंतीवरून मास्तर कृष्णरावांनी संपूर्ण बुद्ध वंदना सांगीतिक मीटरमध्ये बसवली , बाबासाहेबांनी त्याची ध्वनिमुद्रिका काढली.

अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील, गायन आणि वादन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे इ.स. १९४० ते इ.स. १९७१ या काळात लिहिलेले ‘रागसंग्रह’ नामक सात खंड त्यांत समाविष्ट आहेत.

शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांनी मा. फुलंब्रीकर यांना ‘ संगीतकलानिधी ‘ ही पदवी दिली.तर देवासच्या महाराजांनी ‘ राजगंधर्व ‘ तर सरोजिनी नायडू यांनी ‘ वंदे मातरमवाले मास्टर ‘ असे म्हटले आहे कारण कारण ‘ वंदे मातरम ‘ ला पूर्णपणे न वगळता भारत सरकारतर्फे राष्ट्रीय गीत (National Song) म्हणून तरी अधिकृत दर्जा देण्यात आला. या घटनेनंतर मा. कृष्णरावांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरमची रेकॉर्ड विविध शाळा-महाविद्यालये, अनेक वैयक्तिक आणि सार्वजनिक संस्था वगैरे ठिकठिकाणी कित्येक वर्षे वाजवली जात असे.

त्यांची कन्या वीणा चिटको काही काळ संगीतकार म्हणून कारकीर्द गाजवली.

मधुसूदन कानेटकर, सरस्वती राणे, मोहन कर्वे, आर.एन. करकरे, राम मराठे, योगिनी जोगळेकर, सुहास दातार, सुधाकर जोशी, रवींद्र जोशी, वीणा चिटको हे मास्तर कृष्णरावांचा असा शिष्यवर्ग होता .

मा.कृष्णराव फुलंब्रीकर यांना अनेक सन्मान लाभले त्यामध्ये त्यांना ‘ संगीत कलानिधि ‘ ही पदवी , भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांना संगीत नाटक अकादमी फेलोशिप , बालगंधर्व सुवर्ण पदक , विष्णुदास भावे सुवर्ण पदक तर जालना गावी एका नाट्यगृहाला मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. १९७२ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी रत्नसदस्यत्व देऊन त्यांचा गौरव केला.

मास्तरांनी १९५१ पासून मधुमेह आणि १९६१ मध्ये आलेल्या अर्धांगवायूचा झटक्यामुळे मैफली कमी केल्या होत्या. त्यांनी १९६९ साली भास्करबुवा बखले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी अखेरचे गायन केले .
मा. कृष्णराव फुलंब्रीकर यांचे २० ऑक्टोबर १९७४ रोजी पुणे येथे निधन झाले.

— सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

1 Comment on सुप्रसिद्ध संगीतकार मा. कृष्णराव यांची स्वाक्षरी

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..