नवीन लेखन...

अर्थहीन निवडणुका !

निवडणुका येतात, निवडणुका जातात ! राजकीय पक्षांची ध्येयधोरणे, भूमिका ठरलेल्या असल्या तरी त्या भूमिका वठविणारे कलाकार आपल्या दिशा सतत बदलवत राहतात. यंदाही नियमानुसार सर्वच राजकीय पक्ष आपापल्या भूमिका घेऊन लोकांसमोर येत आहेत. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांना स्वतःवर खूप अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊन टोप्या बदलाव्या तसे पक्ष बदलत आहेत. त्यामुळे सध्याच्या वातावरणात “निष्ठा” नावाची गोष्ट उरली नाही.
ज्यांनी आयुष्यभर विरोधात असलेल्या पक्षाला शिव्या देण्याचे महान कार्य केले, आज तेच स्वार्थासाठी, सत्तेसाठी त्याच विरोधी पक्षात रीतसर प्रवेश करून निवडणूक लढवाताना दिसत आहेत. आणि मग एकमेकांवर पातळी सोडून चिखलफेक करून, दोषारोप करीत आपला पक्ष किती चांगला आहे हे दाखवण्याचा निष्फळ प्रयत्न करत आहेत. अगदी स्पष्टंच बोलायचं झालं तर एकिकडे आहे “महायुती” आणि दुसरीकडे “आघाडी” ! महायुतीमध्ये भा.ज.पा., शिवसेना व इतर घटकपक्ष आहेत तर विरोधात राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे घटकपक्ष अशी आलटून पालटून सत्तेत बसून गेलेली मंडळी आहेत. आज तेच एकमेकांचं उणंदुणं काढून पुन्हा सत्तेसाठी प्रचंड धडपड करताना दिसत आहेत.
यामध्ये शिवसेना हा पक्ष महायुतीमध्ये आहे कि नाही हे आजपर्येंत आम्हाला तरी समजलं नाही. ते सत्तेत होते की विरोधात हेच आमच्यासारख्या सर्वसामान्यांना गेली पाच वर्षे पडलेला मोठा प्रश्न आहे. असो, सांगण्याचा उद्देश एवढाच कि सर्व राजकीय पक्ष सत्तेसाठी लाचार असल्यागत भुमिका बदलत आहेत. काही जुने असणारे हास्यास्पद पक्ष तर विरोधी विचारसरणीच्या वळचणीला बसलेले आहेत. ज्यांची एकूण लोकसंख्या देशात अधिक आहे, ज्यांचे सरकार बनविण्याची ताकद व क्षमता आहे ते मात्र विखुरलेल्या अवस्थेत आहेत. त्यांच्यात तर प्रत्येक गल्लीत एक राष्ट्रीय नेता दडलेला आहे.
सत्तेत असणाऱ्यांना सध्या माज आल्यामुळे ते प्रत्येकाला ईडी ची भीती दाखवून वेगवेगळ्या पक्षातील बलाढ्य समजल्या जाणाऱ्या नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन त्यांचे शुद्धीकरण करून पुन्हा आमदारकीची तिकीट देत आहेत. अशा वेळी लोकांचे म्हणणे खंबीरपणे सरकारला सांगण्यासाठी, सत्तेतील माजुऱ्या लोकांवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्ष असा उरला नाही. आणि याच गोष्टीचा धागा पकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी देशाच्या राजकारणात सर्वप्रथम घेतलेली विरोधी पक्षाच्या भूमिका नावाजण्याजोगी ठरली आहे. कारण महाराष्ट्राला आज खरी गरज आहे ती ‘ सक्षम विरोधी पक्षाची. ‘
महाराष्ट्राच्या हितासाठी, लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि खरंच काहीतरी भव्य करण्याची इच्छाशक्ती असल्याशिवाय अशा पद्धतीचं मनाचं मोठेपण दाखवता येत नाही. असा निर्णय घेण्यासाठी मनाचा प्रचंड मोठेपणाच असावा लागतो. म्हणूनच सन्माननीय राज साहेबांचं आज प्रत्येकाला नवल वाटतंय ! राजकारणात असे धाडसी निर्णय घेण्यासाठी प्रचंड व प्रगल्भ विचारसरणी असावी लागते. ‘राजकारण हे सत्ता मिळवण्याचं माध्यम नसून हा निस्वार्थीपणे समाजकारण करण्याचा मार्ग आहे ‘ हे वाक्य राजसाहेब ठाकरे यांनी पुरेपूर आचरणात आणलंय. यामुळे  महाराष्ट्रातील राजकारणाला त्यांनी नवीन दिशा दिली व संपूर्ण देशातल्या मतदारांना मतदान करण्यासाठी नवीन कारण दिलं आहे.
खालावत चाललेल्या सध्याच्या राजकारणाला, पक्ष बदलणाऱ्या संधीसाधू लोकांना व विश्वास गमविलेल्या राजकीय पक्षांना मतदार राजा पुरता कंटाळलाय. प्रत्येक निवडणुकीला कुणावर तरी विश्वास टाकायचा आणि पुढील पाच वर्ष चातका सारखी  वाट बघत बसायचं. परंतु ज्यांच्या हातात सत्ता दिली व ते हुकूमशाही प्रमाणे वागत असतील, लोकांना गृहीत धरत असतील तर त्यांना प्रश्न विचारणार कोण?  खरतरं हे विरोधी पक्षाचं काम असतं, परंतु जनतेला वेळोवेळी गाजरं दाखवून सत्तेसाठी गळ टाकून बसलेल्या पक्षांना जेव्हा हातात काहीच लागत नाही तेव्हा त्यांना विरोधीपक्ष पदावर समाधान मानावं लागतं, असे विरोधीपक्ष कोणत्या तोंडाने प्रश्न विचारणार? आणि आजची परिस्थिती तर भयानक गंभीर आहे. इथं विरोधातला देखील भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे.  ज्या लोकांना कंटाळून जनतेने भाजपला मतदान केलं त्याच लोकांना भाजपनं आता शुद्ध करून  तिकीट देऊन मोकळा झाला आहे. मग जनता जनार्दन अपेक्षा  ठेवणार कोणाकडून ? आम्हाला तर असे वाटते की, ह्या अशा पक्षबदलू लोकांवर निवडणूक आयोगाने आजीवन निवडणूक लढवण्यास बंदी घातली पाहिजे.
सत्तेत असलेल्या एका पक्षाबरोबर सत्ता उपभोगायची, वेगवेगळी पदे भूषवायची आणि हवेची दिशा बदलली की, संधी साधत परत पक्ष बदलायचा. सामान्य जनता कितीही नाराज असली तरी ज्या पक्षात जाऊ तिथून निवडणूक लढवू हे धोरण ठेवायचं. अशा दलबदलू लोकांना अजून किती दिवस आपण डोळे झाकून निवडून देणार आहोत ? म्हणूनच मायबाप मतदारांनी आता आपला राग व्यक्त करून अशा दलबदलूंना कायमचं घरी बसवायला हवं, म्हणजे हे संधीसाधू लोक पुन्हा असले मतलबी चाळे करणार नाहीत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा अधिकार समस्त देशवासीयांना लोकशाहीने दिलेला आहे. फक्त त्यासाठी आपल्याला अन्यायाची चीड यायला हवी!  आपणच स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत कि सरकारने मला काय दिलं? समाधानकारक उत्तर मिळत नसेल तर ती चीड मतपेट्यांमधून व्यक्त झालीच पाहिजे तरच ह्या निवडणुकांना अर्थ आहे अन्यथा यापुढील सर्व निवडणूक अर्थहीन असतील.
— डॉ. शांताराम कारंडे
मोबा. क्र.: ९८२०१५८८८५ 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..