नवीन लेखन...

“औषधी गर्भसंस्कार” : काळाची गरज

Aushadhi Garbhasanskar - Need of the Hour

जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्यावर तीन ऋणे म्हणजे तीन प्रकारची कर्जे असतात. त्यांना ‘ऋणत्रय’ असे म्हणतात. ऋषिऋण, देवऋण व पितृऋण ही ती तीन ऋणे होत. प्रत्येक व्यक्तीस ही तीन ऋणे फेडावीच लागतात अशी भारतीय संस्कृतीची मान्यता आहे. ऋषींनी केलेले वेद हे पहिले ऋषींचे ऋण. वेदांच्या अध्ययनाने त्याची फेड होते. देवांनी सृष्टी उत्पन्न केली व ती सृष्टी चालविली आहे; हे दुसरे देवांचे ऋण. यज्ञ करण्याने त्याची फेड होते. ही दोन ऋणे समाजरक्षणाची अंगे आहेत. पितरांनी म्हणजे पूर्वजांनी टिकविलेली वंशपरंपरा एका पिढीने पुढे नेण्याची जबाबदारी हे पितृऋण. त्याची परतफेड प्रजोत्पादनाने होते. थोडक्यात; वंशपरंपरा अविरतपणे चालू राहावी यास आपल्या पूर्वजांनी अतिशय महत्व दिलेले आहे.

अगदी ऋग्वेदापासूनच तत्कालीन ऋषी-मुनींना केवळ गर्भधारणाच नव्हे तर प्रत्येक महिन्यातील गर्भाच्या वाढीविषयीदेखील सखोल ज्ञान होते; हे पाहून मन थक्क होते. अथर्ववेदाचा उपवेद म्हणजे आयुर्वेद. हा आयुर्वेद म्हणजे या पृथ्वीतलावरील सर्वात प्राचीन वैद्यकशास्त्र होय. आयुर्वेदातील अतिशय महत्वाचे ग्रंथ म्हणून विख्यात असलेल्या चरकसंहिता व सुश्रुतसंहितेमध्येदेखील सोनोग्राफी सारखी कोणतीही सोय उपलब्ध नसलेल्या काळात लिहिली गेलेली गर्भाच्या वाढीची वर्णने आजही काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली दिसून येतात. असे असूनदेखील दुर्दैवाने आपल्याला याबाबत विशेष माहिती नसते. किंबहुना आयुर्वेद हे पर्यायी वैद्यकशास्त्र असल्याचाच बहुतेकांचा गैरसमज असतो. मात्र; सध्या काळ बदलतो आहे. अधिकाधिक लोक आयुर्वेदाकडे वळत आहेत. मुख्यत्वेकरून प्रेग्नन्सी म्हणजेच सगर्भावस्थेतदेखील आयुर्वेदाकडे सध्या प्राधान्याने बघितले जात आहे. आज ‘गर्भसंस्कार’ हा शब्द घराघरात पोहोचलेला असून; प्रत्यक्ष अनुभवानंतर तर लोकांच्या हमखास कौतुकाचा विषय बनलेला आहे.

खरे तर सगर्भावस्था हा केवळ त्या गर्भवती स्त्रीसाठीच नव्हे तर ते दांपत्य आणि पर्यायाने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाकरताच कुतूहल, आनंद आणि काळजी अशा संमिश्र भावनांनी भरलेला काळ असतो. अनेकांचे सल्ले-उपदेश, काही समजुती-गैरसमजुती यांच्या समीकरणातून उभ्या राहिलेल्या या काळात योग्य मार्गदर्शनाकरता अर्थातच वैद्यांची भूमिका ही अतिशय महत्वपूर्ण असते. मी एम.डी. (आयुर्वेद) या पदवीसाठी ‘कामशास्त्र आणि आयुर्वेद’ या विषयावर संशोधन केलेले असून मी एक वंध्यत्व-उपचार तज्ञ आहे. त्यामुळेच गर्भवती स्त्रियांच्या अशाच अनेकविध शंकांचा पुरेपूर अनुभव आहे. इंटरनेट असो वा या विषयासंबंधित असलेले प्राचीन किंवा नवे ग्रंथ; यांचे वाचन करून आपल्या ज्ञानात सतत भर घालण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. याच प्रयत्नात असताना नुकतेच एक अप्रतिम पुस्तक हाती लागले. अक्षय फार्मा रेमेडीज प्रकाशित ‘औषधी गर्भसंस्कार’ असे या पुस्तकाचे नाव असून डॉ. संतोष श्रीनिवास जळूकर आणि डॉ. नीता संतोष जळूकर या अनुभवसंपन्न डॉक्टर दांपत्याने या पुस्तकाचे लेखन केलेले आहे.

गर्भसंस्कार म्हणजे काय?

आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे; प्रत्येक मनुष्यावर सोळा प्रकारचे संस्कार करण्यात यावेत असे सांगितले गेले आहे. एखाद्या विशिष्ट पदार्थातील उत्कृष्ट गुणांची प्रयत्नपूर्वक प्राप्ती करून घेणे , यांस ‘संस्कार’ असे म्हटले जाते. ज्याप्रमाणे लोण्यावर अग्नीचा संस्कार झाल्यावर त्याचे रुपांतर अनेकानेक औषधी गुण असलेल्या तूपात होते; किंवा मुळात खाणीतून अशुद्ध स्वरूपात मिळणाऱ्या सोन्यावर अनेक संस्कार करून त्याचे मौल्यवान दागिन्यांमध्ये रुपांतर केले जाते; त्याचप्रमाणे भावी माता पिता या दोघांनी पंचकर्माच्या सहाय्याने शरीरशुद्धी करून, रसायन-वाजीकर औषधांच्या सेवनानंतर प्राप्त झालेल्या सगर्भावस्थेतील ‘दहा महिने’ नियमितपणे आयुर्वेदाने सांगितलेल्या वनस्पतींचे सेवन करून निरोगी, सद्गुणी, इच्छित संतती म्हणजेच ‘सुप्रजा’ प्राप्त करणे या संपूर्ण प्रक्रियेला ‘गर्भसंस्कार’ असे म्हटले जावू शकते. महाभारतातील अभिमन्यूची कथा म्हणजे खरंतर गर्भसंस्कारांचे मूर्तिमंत उदाहरणच!! हा अभिमन्यु ज्याप्रमाणे सुभद्रेच्या पोटातूनच चक्रव्यूहात प्रवेश करण्याचे ज्ञान घेवून जन्माला आला त्याचप्रमाणे आपल्या येणाऱ्या पिढ्यांनादेखील सध्याच्या स्पर्धात्मक युगाच्या चक्रव्युहात उतरण्यासाठी जन्मापासूनच कणखर राहणे आवश्यक असणार आहे!!

येथे नमूद केलेल्या दोन बाबींकडे आपले लक्ष नक्कीच गेले असेल. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे ‘दहा महिन्यांची’ प्रेग्नन्सी!! सगर्भावस्थेचा काल हा नऊ महिन्यांचा असतो हे गणित आपल्या डोक्यात पक्के बसलेले असते. मात्र; केवळ आयुर्वेदातच नव्हे तर ऋग्वेदापासून ते अगदी सत्यनारायणाच्या कथेपर्यंत सर्वच ठिकाणी सगर्भावस्था दहा महिन्यांची असल्याचे वर्णन मिळते. या दोहोंची सांगड घालायची तरी कशी? उत्तर अतिशय सोपे आहे… आयुर्वेदोक्त ही कालगणना आपल्या नित्यपरिचयाच्या ३०-३१ दिवसांचा एक महिना मानणाऱ्या दिनदर्शिकेनुसार नसून स्त्रीच्या मासिक ऋतुचक्रानुसार, म्हणजेच २८ दिवसांचा महिना धरून केली आहे. ह्याप्रमाणे २८० दिवस असो किंवा ४० आठवडे, गर्भावस्थेचे आयुर्वेदाचे गणित किती तंतोतंत आहे हे या पुस्तकामध्येच वरीलप्रमाणे दिलेल्या स्पष्टीकरणाद्वारे दिसून येते.

दुसरी गोष्ट म्हणजे ‘सुप्रजाजनन’. संस्कृत भाषेत असे म्हटले आहे की;

‘आहार निद्रा भय मैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् ।‘

थोडक्यात काय तर आहार, झोप, भीती आणि मैथून या चार गोष्टी प्राणी आणि मनुष्य या दोहोंमध्येही समानस्वरूपात आढळतात. असे असले तरी या दोघांमध्ये फार मोठा फरक आहे. आणि तो फरक म्हणजेच ‘सुप्रजाजनन’. केवळ प्रजोत्पादनासाठी मैथून करणे हा सर्वच प्राण्यांचा नैसर्गिक स्वभाव होय. मात्र; त्यापलीकडील विचार करून काया-वाचा-मनाने उत्तम गुणाची आणि निरोगी अशी संतती प्राप्त करून घेणे म्हणजे ‘सुप्रजाजनन’. असे प्रयत्न केवळ मनुष्यप्राण्याकडूनच केले जाऊ शकतात. ‘औषधी गर्भसंस्कार’ या पुस्तकाच्या माध्यमातून आयुर्वेदाच्या प्राचीन ज्ञानाला आधुनिक संशोधनांची जोड देवून निकोप भावी समाज निर्माण करण्यासाठी नेमका हाच प्रामाणिक प्रयत्न केल्याचे दिसून येते.

गर्भसंस्कार खरंच आवश्यक आहेत का?

लहानपणी आपण साऱ्यांनीच ऐकलेला चिमण्यांचा चिवचिवाट आठवतो का? ‘आठवतो का?’ असे विचारण्याचे कारण म्हणजे; या चिमण्यांच्या संख्येत सध्याच्या काळात झपाट्याने झालेली घट!! चिमण्यांची संख्या इतक्या प्रमाणात घटण्याचे कारण ठावूक आहे?? आपले मोबाईल, त्यांचे टॉवर, माइक्रोवेव यांसारखी विविध उपकरणे. विश्वास बसत नाही ना? परंतु हेच सत्य आहे!! या उपकरणांतील विद्युतचुंबकीय लहरींमुळे या छोट्या जीवाच्या प्रजननक्षमतेवर परिणाम झाला. आयुर्वेदानुसार चिमणी हा पक्षी सर्वोत्तम प्रजननक्षमता असणारा पक्षी म्हणून प्रसिद्ध आहे; त्याच्या बाबतीत जर असे होवू शकते तर सतत पँटच्या खिशातच मोबाईल बाळगणाऱ्या आपली काय कथा!

सध्याच्या काळानुसार वाढत असलेला शैक्षणिक कालावधी, मानसिक ताणताणाव, खाद्यपदार्थातील कृत्रिम व रासायनिक रंग / प्रिझरव्हेटिव्हज, मोबाइलसारख्या उपकरणांतील विद्युतचुंबकीय लहरींचा दुष्परिणाम, प्रदूषण अशा अनेक गोष्टी गर्भावस्थेतील दुष्परिणामांसाठी कारणीभूत होतात. सतत बदलत्या शिफ्ट ड्युटीजमध्ये काम करणारा अभियंतावर्ग तसेच विशेषतः आय.टी. मध्ये काम करणाऱ्या वर्गातील रुग्णांचे या समस्यांबाबत आमच्यासारख्या तज्ञांकडे येण्याचे वाढते प्रमाण ही धोक्याची घंटाच आहे!! अशा विचित्र जीवनशैलीमुळे ज्या दांपत्यांत जिथे साधा ‘सुसंवाद’ साधण्यासदेखील वेळ नाही तिथे ‘सुप्रजाजनन’ तर दूरच पण केवळ ‘प्रजाजनन’देखील कठीण होत चालले आहे. परिणामस्वरूपी हा तमाम वर्ग फार मोठ्या प्रमाणात वंध्यत्व (मूल न होणे), बीजदोष (जेनेटिक आजार), गर्भस्राव, गर्भपात, प्रसूतीच्यावेळी अडचणी इत्यादी समस्यांना बळी पडत आहे. या साऱ्या समस्यांवर केवळ आयुर्वेदच उत्तर देवू शकतो. आणि हे उत्तर म्हणजे ‘औषधी गर्भसंस्कार’.

‘औषधी गर्भसंस्कार’ म्हणजे नेमके काय?

‘गर्भसंस्कार’ म्हणजे आधी उल्लेख केल्याप्रमाणे गर्भवती स्त्रीने आचारावी, अशी जीवनपद्धती किंवा आचारपद्धती आहे. आयुर्वेद शास्त्रात गर्भाच्या प्रत्येक महिन्याच्या वाढीनुसार आणि अवयव निर्मितीनुसार विशिष्ट आहार, औषधी व विहार यांचे मार्गदर्शन केलेले आहे. आयुर्वेदातील एक अतिशय महत्वपूर्ण ग्रंथ म्हणजे आचार्य वाग्भट यांनी रचलेला अष्टांगहृदय होय. या ग्रंथामध्ये गर्भिणी स्त्रीने सगर्भावस्थेतील प्रत्येक महिन्यात घ्यावयच्या वनस्पतींबद्दल माहिती दिली आहे. याच संदर्भात डॉ.जळूकर यांच्यासारख्या तज्ञ डॉक्टरांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने संशोधन केले. त्यांच्या याच परिश्रमांमुळे; वाग्भटांना अपेक्षित असलेल्या वनस्पतीच्या या संदर्भांस आधुनिक विज्ञानातील संशोधनाची जोड देवून तयार झालेली गर्भिणीच्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेणारी शास्त्रशुद्ध पद्धत म्हणजे ‘औषधी गर्भसंस्कार’.

वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रेग्नन्सीच्या एक ते दहा महिन्यांपर्यंतच्या कालावधीत गर्भिणी स्त्रीने दररोज घ्यावयाच्या ‘प्रथमाह ते दशमाह’ असे नाव असलेल्या चूर्णवटीचा संच अर्थात चूर्णाच्या गोळ्या असे या औषधींचे स्वरूप असल्याचे दिसून येते. ‘गोळी’ या स्वरूपात असल्याने औषध सहजपणे सेवन करतायेण्याजोगे तर होतेच मात्र वनस्पतींची चूर्णे त्याच वनस्पतीच्या काढ्यात घोटून त्यांच्या गोळ्या तयार करण्यात येत असल्याने त्यांची कार्यक्षमतादेखील वाढते.

विवाहानंतर गर्भधारणेसाठीचे नियोजन झाल्यावर पुरुषांनी नियमितपणे घेण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘अश्वमाह’ या गोळ्यांमधील वनस्पती; शुक्रजंतूंची संख्या, वीर्याचे प्रमाण, वीर्य द्रवित होण्याचा काल या साऱ्यांमध्ये सुधारणा घडवून आणणाऱ्या आहेत. स्त्रियांनादेखील गर्भधारणेस शारीरिकदृष्ट्या तयार करण्यासाठी ‘फलमाह’ नामक गोळ्या उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. सगर्भावस्थेत सतावणारी स्ट्रेचमार्क्ससारखी समस्या असो वा नैसर्गिक प्रसूती सुलभपणे होण्यासाठी करावयाचे उपाय असोत; किंवा अगदी प्रसूतीनंतर त्या सूतिका स्त्रीची तसेच तिच्या नवजात बालकाची घ्यावयाची काळजी असो; या साऱ्या बाबींचा सखोल अभ्यास करून त्यांवर आयुर्वेदाने दिलेली उत्तरे आपल्याला औषधी गर्भसंस्कारांत मिळतात. मुख्य म्हणजे हे केवळ एकांगी संशोधन नसून अनेक वर्षे वंध्यत्व वा स्त्रीरोग तज्ञ म्हणून उपचार करत असलेल्या अनेक मान्यवर डॉक्टरांनी या संशोधनास दिलेला पाठींबा व त्यांचे अभिप्रायदेखील या पुस्तकांत समाविष्ट करण्यात आलेले असल्याने हे पुस्तक जणू एक परिपूर्ण खजिनाच बनले आहे!

उत्तम दर्जाच्या वनस्पती आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले निर्माण यांमुळे या औषधींची किंमत काहीशी जास्त वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु याला एकप्रकारे आपणच कारणीभूत आहोत!! निसर्गाकडून मिळेल तितके ओरबाडून घेण्याच्या वूत्तीमुळे आपण जी प्रचंड वृक्षतोड केली त्याचीच परिणती म्हणजे अनेक औषधी वनस्पती आज मरणोन्मुख झाल्या आहेत. साहजिकपणे त्यांचे जतन करणे जिकीरीचे झाले आहे. खरंतर जेथे दर्जा आणि परिणाम उत्तम असतो तिथे सुजाण नागरिक मुल्याबाबत विचार करेल असे मुळीच वाटत नाही. या औषधींचे मूल्यांकन करता येणारच नाही. निरोगी व निकोप भावी समाज हेच त्यांचे खरे मूल्य!! थोडक्यात काय तर; खऱ्या अर्थाने या वनस्पती अमुल्यच आहेत.

केवळ या वनस्पतीच नव्हे तर हे पुस्तकदेखील अमुल्य आहे. आपण घेत असलेल्या औषधींमध्ये कोणते घटक आहेत; इतकेच नव्हे तर त्या प्रत्येक घटकाचे आयुर्वेद व आधुनिक अशा दोन्ही शास्त्रांनुसार काय कार्य आहे याबद्दलची संपूर्ण माहिती हे पुस्तक आपल्याला देते. संपूर्ण पुस्तकात साधी-सोपी आणि प्रवाही भाषा वापरली असल्याने ते समजावयास अगदी सोपे आहे. संपूर्णपणे ‘आर्ट पेपर’ वर छापण्यात आलेले हे देखणे पुस्तक म्हणजे सर्वच विवाहित व संतती इच्छुकांना मार्गदर्शन करणारा मित्रच आहे! सुप्रजननासाठी इच्छुक असलेल्या प्रत्येक माता-पित्यांनी वाचावे, आचरणात आणावे अशा या पुस्तकाची किंमतदेखील सर्वसामान्यांना सहजगत्या परवडेल अशीच आहे.

अनुभवसंपन्न वैद्यांनी शास्त्राधारानुसार आणि संशोधकवृत्तीने ‘सुप्रजाजननार्थ’ लिहिलेले हे पुस्तक प्रत्येक नवविवाहीताने स्वसंग्रही ठेवण्यासारखे आहे. इतकेच नव्हे तर लग्नात भेट म्हणून पुष्पगुच्छ, भेटवस्तु किंवा रोख रक्कम देण्यापेक्षा ह्या पुस्तकाची प्रत देण्याने दांपत्यास वैवाहिक जीवनात उपयुक्त माहीती देण्याचा आनंदही आपल्याला मिळेल; यात शंका नाही. निरोगी समाज निर्माण करणे ही आपल्यासमोरील सद्यपरिस्थितील एक अतिशय महत्वाची जबाबदारी आहे. त्यादिशेने वाटचाल करण्यासाठी ‘औषधी गर्भसंस्कार’ ही काळाची गरज आहे!!!

– डॉ. परीक्षित स. शेवडे.

एम.डी. (आयुर्वेद)

वंध्यत्व उपचार तज्ञ आणि वैवाहिक आरोग्य समुपदेशक.

‘श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद चिकित्सालय-औषधालय’, डोंबिवली

संपर्क: ९८१९५१०७७०

pareexit.shevde@gmail.com

— डॉ. परीक्षित सच्चिदानंद शेवडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..