नवीन लेखन...

माझे शिक्षक

शाळेत जायला सुरुवात होताच आपण विविध शिक्षकांच्या संपर्कात येतो. शाळा, कॉलेज, इतर वर्ग क्लास तर नंतर आपल्या कामाच्या निमित्ताने खूप लोकांकडून शिकत असतो. दर वेळी वर्गात बसून प्रत्यक्ष शिकतो असे नाही तर कधी कधी या मोठया लोकांच्या आयुष्याकडे पाहून, त्यांचे उदाहरण समोर ठेवून देखील शिकतो. हे सगळे आठवायचे कारण शिक्षक दिन! ज्यांनी मला शिकवले/ घडवले अशा व्यक्तींच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न. खरे तर या प्रत्येक व्यक्तीवर विस्ताराने लिहायला हवे तसा विचारही आहे.आज त्यांचा उल्लेख करुन त्यांच्या बद्दल एक दोन वाक्यात भावना व्यक्त करणे अस प्रयत्न आहे. खरोखरीच मी या सर्वांचा ऋणी आहे.

सुरुवात करतो लहानपणी संघाच्या शाखेत बाल स्वयंसेवक म्हणून असताना शिवाजी मंदिर शाखेचे कार्यवाह अरुणराव आगाशे आणि मुख्य शिक्षक जयंत म्हाळगी यांच्यापासून . याच सुमारास स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर लंगडी आणि खो खो चे प्रशिक्षक अर्जुन पुरस्कार विजेते श्रीरंग इनामदार यांनी चिकाटी आणि उत्तमतेचे धडे दिले. सातवी मधे शिष्यवृत्ती साठीच्या वर्गाचे लंके सर ज्यांनी अभ्यासक्रमा व्यतिरिक्त खूप कविता आणि कठीण गणित शिकवले तसेच आठवी पासून ते दहावी पर्यंत गणित, शास्त्र विषय इंग्रजीतून असल्याने त्यासाठी नूमवि तील दापके सरांनी करून घेतलेली तयारी कधीच विसरणार नाही. तसेच माझ्या आईचे काका तात्याकाका देशपांडे यांनी संस्कृत विषयी गोडी निर्माण केली पुढे ल. पा. सातपुते यांनी दहावी मधे संस्कृत ची उत्तम तयारी करून घेतली.शाळेतील चित्रकलेचे राजे, केसकर आणि पुरंदरे सर तसेच कार्यानुभवाचे कवठेकर व ताडफळे सर विशेष लक्षात राहण्या सारखे होते. मराठीचे शाळेतील शिक्षक मांडके व स्वतंत्र वर्ग घेणारे सु. द. तांबे यांनी साहित्याची गोडी लावली. अकरावीत रहाळकर सरांनी करून घेतलेली आय आय टी ची तयारी तर बारावी मधे कॅम्प भागातील मूगट सरांचा गणिताचा क्लास तसेच पंडित / खाजगीवाले आणि पाध्ये बाई यांनी शिकवलेले फिजिक्स व केमिस्ट्री कायम लक्षात राहील.

इंजिनिरिंग ला दराडे सरांनी शिकवलेले ग्राफिक्स आणि बालगंधर्व चौकातील गोखले सरांचा गणिताचा क्लास तर खासच. कॉलेज मधे इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग चे भिडे सर यांनी अतिशय अवघड मोटार आणि जनरेटर असे विषय सोपे करून शिकवले.

कॉलेज मधेच विवेकानंद केंद्रातील शिबिरामुळे भेटलेले वासुदेव जी ज्यांच्याशी पुढे खूप चांगली मैत्री देखील झाली आणि ज्ञान प्रबोधिनी तील मित्रांच्यामुळे भेटलेले विवेक कुलकर्णी व विनय हर्डीकर. विवेक कुलकर्णी बरोबर प्रचीती या गटात कम करताना खूप नवीन शिकलो तर विनय हर्डीकर यांच्यामुळे साहित्य आणि शास्त्रीय संगीताकडे पाहण्याची दृष्टी मिळाली. पाणी विषयातील विचारवंत विलासराव साळुंखे आणि मुकुंद घारे सर यांचा सहवास खूप काही शिकवून गेला किंबहुना इतका प्रभाव राहिला की व्यवसाय देखील पाणी विषयातील करावा असे ठरवले. दिल्लीतील वास्तव्यात जास्त जवळून भेटलेले नानाजी देशमुख आणि गांधी शांती प्रतिष्ठान चे अनुपम मिश्र यांचाही खूप प्रभाव सर्व पुढील कामावर राहिला.

शेवटी सध्या व्यायामाला सकाळी मार्गदर्शन करणारे नितीन ढवळे यांचाही उल्लेख फार महत्वाचा आहे. रोज दिवसाची सुरुवात त्यांच्या प्रसन्न हसण्याने होते. (अर्थात प्रवासामुळे त्यात दांड्या मारल्या जातात हे ही तितकेच खरे ) असो.

पुन्हा एकदा या सर्वांना मनापासून धन्यवाद आणि साष्टांग नमस्कार!

— नीलेश कुलकर्णी

1 Comment on माझे शिक्षक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..