आठवावे मृत्यूसी

निसर्गाची रचना, जन्म मृत्यृची योजना,

गती देई जीवन चक्रांना,  ईश्वरी शक्ती II १II

उत्पत्ती लय स्थिती, या त्रिगुणात्मिक शक्ती

याच तत्वे निसर्ग चालती,  अविरत II २II

ईश्वरी योजना महान, खेळ जीवनाचा चालवून

घडवी शक्तीचे दर्शन, निसर्ग रूपाने II ३II

वस्तूचे निरनिराळे आकार,  चेतना देवूनी करी साकार

यास जीवन संबोधणार,  आपण सारे II ४ II

मातीची भांडी असती, विभिन्न रूपे मिळती

वापरून तीच ती माती,  आकार देई पुन्हा पुन्हा II ५II

दिसेल भांडी फुटलेली,  अथवा नवी बनलेली

हीच हात चलाखी,  सगळी त्याच्या खेळण्याची II ६II

मृत्यू टळला न कुणा,  हे अंतर्मनी जाणा

यशस्वी करा जीवना,  मर्म ओळखूनी त्याचे II ७II

राहीला नाही राम,  उरला नाही शाम

मागे राही फक्त कर्म,  तुमच्या जीवनातील II ८II

जाणता मृत्यूची अटळता,  घालवी ती  मनाची चंचलता

आणील आयुष्या निश्चिंतता,  समजोनी जीवन क्षणभंगूर  II९ II

ठेवा मनामध्ये बिंबवून,  अनिश्चित आहे जीवन

मर्यादा धडपडीना देवून,  आयुष्य मार्ग आक्रमाल II १०II

नागडा उघडा येई येथे,  तसाच जाई परत तेथे

कांहीं न तयाला नेता येते,  सोडताना हे जग II ११II

आत्म्यासंगे जाई कर्म,  जगती राही देह धर्म

निसर्ग चक्राचे हे मर्म,  ओळखावे सर्वांनी II१२II

धडपड तुमची धनापाठी,  कुणी झगडे सत्तेसाठी

आकर्षण सारे मायेपोटी,  बाह्य गोष्टीचे II१३II

संसार हा नाशवंत,  सर्वासी आहे अंत

म्हणूनी जाणावा भगवंत,  अविनाशी शक्तीस II१४II

निद्रेस जाण्यापूर्वी,  मृत्यूची आठवण करावी

मात्र त्याची भिती नसावी,  मनामध्ये II१५II

मृत्यूची करिता आठवण,  चुकांना पडेल बंधन

बंधनात होईल महान,  कार्य तुमचे कडूनी II१६II

जाणोनी छोटा काळ,  न दवडी तो फुकट वेळ

शोधण्यास तो जाईल,  जीवनाचे प्रयोजन II१७II

माहीत असते सर्वांना,  मृत्यू टळला न कुणा

परी आठवण त्याची निर्भय मना, रोज येत राहावी II १८II

भीऊ नका मृत्यूला,  अपघात समजा त्याला

जीवनचक्र पूर्ण होण्याला,  मदत होई त्याची II१९II

जैसा आनंद जन्माचा,  तैसा मानावा मृत्यूचा

यात सहभाग प्रभूचा,  समजावे ही विनंती II२०II

शुभ भवतू

— डॉ. भगवान नागापूरकर

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1653 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…