नवीन लेखन...

अपना लक पहन कर चलो! (कथा)

अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये विश्वनाथ शिरढोणकर  यांनी लिहिलेली ही कथा.


मी घातलेला सदरा कुणीतरी माझ्या शरीरावरून अलगदच वेगळा केला होता, इतका की मलाही कळले नव्हते. बसमध्ये माझ्या मागच्या सीटवर बसलेल्या कुणीतरी कात्रीने हे कृत्य फारच सावधगिरीने आणि कलाकारीने केले होते. मी बसमध्ये डुलक्या घेत होतो. तो उनाड इथेच थांबला नव्हता. त्याने त्याच अंदाजाने माझ्या बनियानचे देखील कात्रीने तुकडे तुकडे केले होते व ते देखील माझ्या अंगावरून त्याने त्याच शिताफीने वेगळे केलेले होते. ठाऊक नाही मी कुठे जात होतो आणि का जात होतो? कोणत्या उद्दिष्टासाठी, कोणासाठी, कोणत्या जागी मी या प्रवासात होतो? त्यातल्या त्यात हे बरे झाले की तो माझा पायजमा उतरवू शकला नाही. माझ्या गाढ झोपेची किंमत मला मोजावी लागली. आई नेहमी सांगायची, बाळा, प्रवासात सावध राहायला हवे.’ परंतु याचा अर्थ असा तर होत नाही ना की झोपूच नये? आणि एखाद्याने शरीरावरून कपडेच काढून घ्यावे हे तर कल्पनेच्या बाहेरचेच आहे ना?

त्या सोबत प्रवाशाने चोरले काहीच नव्हते पण त्याची ही मस्करी मला महागात पडणारी होती. झोपेत असलेले गाफील ठाऊक नाही काय काय गमावून बसत असतील. आई नेहमी हिंदीतली एक म्हण सांगायची, ‘जो सोवत हैं सो खोवत हैं, जो जागत हैं सो पावत हैं अर्थात जो निद्रा अवस्थेत असतो तो बरेच काही गमावतो आणि जागृत अवस्थेत माणसाला बरेच काही मिळविता येते. आईची मला खूप आठवण येतेय. पण आईची ही म्हण मला झोपेतून जागा झाल्यावरच आठवली. मला एका अनोळखी जागेवर हे सांगून उतरविण्यात आले की मला इथेच उतरायचे होतो आणि हेच की माझ्याजवळ इथपर्यंतचेच तिकीट होते. रात्रीच्या त्या प्रहरात भर थंडीत एका अनोळखी शांत जागेवर साखरझोपेतून नुकताच जागा झालेलो मी डोळे चोळत उभा होतो. कोंबड्यांचे आरवणे अद्याप सुरू व्हायचे होते. सूर्य ठाऊक नाही जगाच्या कोणत्या जागेवर आकाशातून उजेड टाकत होता?

थोड्या वेळाने मला थंडीमुळे जाणवू लागले की माझ्या शरीरावर कपडे नव्हते. सदरा नव्हता, बनियान नव्हता. मला धक्काच बसला. आश्चर्यच वाटले. तसे माझ्याजवळ सामान असे विशेष काहीच नव्हते. अगदी थोडेसेच रुपये होते जे माझ्या पायजम्याच्या खिशात असल्याने वाचले होते. परंतु ते आयुष्य घालविण्यासाठी पुरेसे नव्हते. परत आईची आठवण झाली आणि आठवण आली तिच्या हिंदी म्हणीची. आई म्हणायची, ‘सामान सौ बरस का पल की खबर नहीं’ अर्थात म्हणून शंभर वर्ष जगण्याइतपत सर्व पसारा मांडतो पण पुढच्या क्षणी त्याच्या नशिबाने त्याच्या आयुष्यात काय वाढून ठेवले आहे हे कोणालाही ठाऊक नसते. पण काही असो येणाऱ्या त्या पुढच्या क्षणासाठी माझ्या गरजेप्रमाणे पुरेसे रुपये नक्कीच नव्हते आणि त्या क्षणाची ती माझी महत्त्वाची गरज होती बनियान. अर्थात मला एका बनियानची फार गरज होती.

मला कुठे जायचे आहे आणि काही तरी करावयाचे आहे माझ्यासमोर हे प्रश्न उभे ठाकले होते. बनियानची गरज माझ्या उघड्या छातीसाठी होती तर केसांनी भरलेली माझी छाती विण्यासाठी आणि मला लाजिरवाणे होण्यापासून वाचविण्यासाठी ती प्राथमिकता होती. मला काही तरी तर करावे लागणारच होते. परत आईची आठवण झाली. ती म्हणायची, ‘बाळा, आपल्याला काहीच सुचेनासे झाले तर नुसते बसून राहू नये. पहिले पाऊल उचलणे महत्त्वाचे. मग ते कोणत्याही दिशेने असो, नंतर आपोआपच कळते की दिशा कोणती आहे.’ आईची शिकवण लक्षात ठेऊन मी अनोळखी रस्त्यावर पहिले पाऊल ठेवत पुढे चाललो. त्या रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात मी कोणजाणे कोणत्या दिशेने पुढे चाललो होतो. थोडावेळ चालल्यावर मला दूर एक शेकोटी जळताना दिसली. बरोबर दिशा होती, योग्य वाट होती. योग्य प्रवास होता का योग्य मुक्कामाकडे होतो या सर्व बाबतीत मी अजाण उजेडाच्या दिशेने पुढे चाललो होतो. तिथे जाऊन बघतो तर काय शकाटीला घेरून काही उघडे म्हातारे चिलीम ओढीत धूर फेकत बसले होते. त्यातल्या एकाची नजर माझ्याकडे गेली. माझ्या नजरेत त्याला याचना दिसली. त्याने मला विचारले, ‘काय पाहिजे पोरा?’

थोडावेळ मी काहीच न बोलता फक्त त्याच्याकडे बघत होतो. थंडीचे दिवस आणि त्यातही पहाटेचा गारवा आणि त्यात दाट धुके. मला कापरे भरून आले. मला याही अवस्थेत आईची आठवण आली. आई म्हणायची, ‘बाळा, काहीही झाले तरी कधी भीक मागू नये म्हणून मी काहीच उत्तर न देता शांत उभा होतो. मग त्यानेच विचारले, ‘बेटा, तुला बनियान हवी आहे का?’

मला आश्चर्य वाटले. याला कसे कळले? तेव्हाच अचानक तो आपल्यासोबत असलेल्यांना म्हणाला, ‘ऐकलं का याला बनियान हवी आहे. सर्व म्हातारे माझ्याजवळ आले. त्या म्हाताऱ्याने त्याच्याजवळ असलेल्या पिशवीतून वेगवेगळ्या पक्षांच्या पंखांनी सजलेली एक रंगीबेरंगी सुंदर, मनमोहक अशी बनियान काढली आणि मला त्याच्या स्वत:च्या हातांनी घातली. वेगवेगळ्या पंखांनी बनलेली ती बनियान घालताच मला थंडी वाजणे थोडे कमी झाले आणि मला थोडी ऊब देखील अनुभवता आली. माझ्या केसानी भरलेली उघडी छाती आता झाकली गेली होती आणि या नागड्या जगाच्या समोर मला माझ्या उघड्या छातीमुळे लाजिरवाणे व्हावे नव्हते लागणार. मी आनंदित झालो. मी त्या सर्वांना नमस्कार करत सर्वांचे आभार मानले. ‘आपले उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. आपले आभार आणि धन्यवाद.

तो म्हातारा म्हणाला, ‘सुखी राहा. परंतु बेटा, अंग झाकण्यासाठी कपडे पुरेसे असले तरी लाज झाकण्यासाठी पुरेसे नसतात.’ मला पुन्हा आश्चर्य वाटले. आईपण नेहमी हेच म्हणायची आणि मी त्याबद्दलच विचार करत होतो. पण माझ्या मनातले प्रत्येक विचार याला कसे कळत आहेत? इतक्यात तो म्हातारा पुन्हा म्हणाला, ‘आता तू विचार करत असशील की कुठे जाऊ?’ अगदी बरोबर. पण कोण आहे हा म्हातारा? कोणी का असेना? माझा कोण लागतो? मी फक्त आपली मान हलविली. त्याने एक नजर माझ्याकडे टाकली आणि म्हणाला, ‘जिकडून तू आला आहेस ना त्याच दिशेने परत जा.’

मी लगेच उलट्या पावलाने आलो होतो त्याच दिशेने वळलो. बराच वेळ मी चालत होतो. पंखांची ती ऊबदार बनियान मला खूप आवडली होती. कोंबड्याचे आरवणे अद्यापही सुरू झालेले नव्हते. सूर्याच्या लालिमाचा तर प्रश्नच नव्हता. मी अद्याप देखील थांबलो नव्हतो. चालत चालत शेवटी त्या दाट जंगलामध्ये मी भल्यामोठ्या अशा एका वडाच्या झाडाखाली एका दगडावर जाऊन बसलो. वडाचे झाडदेखील विचित्रच असेल. जडेतून निघून स्वत:च परत जडेत शिरायला तयार असते. जणू आत्मा परमात्म्याचा सर्व खेळ या जगाला इथेच दाखवायचा आहे. माणसाला हा खेळ दाखविण्यासाठी मरावे लागते. परंतु मी आपल्या आईला शेजारच्या काकुंना एकदा म्हणताना ऐकले होते, ‘जन्माचे ठाऊक नाही पण तिला तर रोजच मरावंच लागतं. कधी स्वयंपाकघरात चुलीसमोर, कधी अंगणात, कधी जत्रेत तर कधी गर्दीत. कधी बाजारात, तर कधी बिस्तरावर.’ पण मागच्या शेवटच्या मरणानंतर तिच्यावर पुन्हा मरण्याची वेळच आली नाही. सर्वांनी जाळून टाकले तिला. म्हणत होते, ‘तुझी आई नसून आता ही फक्त मृतदेह आहे.’

मी जेव्हा कधी माझ्या बापाला पाहण्याची जिद्द करायचो तेव्हा आई नेहमी माझ्यावरच ओरडायची आणि हेच म्हणायची, ‘त्याने आपल्याला कायमचे सोडलेले आहे तुला कुठून त्याचा चेहरा दाखवू? तुझा बाप आपल्या दोघांना मेलेले समजून चुकला आहे. मी कोणतेही वडाचे झाड नाही की तुला सतत छाया आणि थंडावा देत राहू. माझ्या जडादेखील तुझ्या बापाच्या घराण्यासारख्या नामवंत आणि प्रतिष्ठित नाही. ज्यांना जडाचा बळकट असा घट्ट आसरा असतो ते कितीही उंचावर जाऊ शकतात.’

आईने सतत केलेल्या वडाच्या झाडाच्या उल्लेखान मला देखील वडाच्या झाडाचे आकर्षण होतेच आणि मी वडाच्या झाडाखाली बसलो होतो. माझी झोपही झालेली नव्हती आणि थकलेलाही होतोच म्हणून तिथेच त्या दगडावर थोडा आडवा झालो आणि लगेच झोपही लागली.

जमिनीच्या अंथरूणावर आकाश पांघरून मी बराच वेळ गाढ झोपेत होतो. कोंबड्याच्या आरवण्याने माझी झोप उघडली आणि मी उठून बसलो. सूर्यकिरणांची लालिमा देखील दिसू लागली होती. थोड्याच वेळात आता रस्त्यावर लोकांचे येणे-जाणे सुरू झाले. परंतु काय आश्चर्य? सर्वच पुरुष उघडे आणि फक्त लंगोटी घातलेले. बायकांच्या देखील फक्त गुडघ्याच्या वरपर्यंतच अर्धवट नेसलेले वस्त्र होते. त्यांच्या कमरेला देखील काहीच वस्त्र नव्हते आणि त्यांच्या मांड्यादेखील स्पष्ट दिसत होत्या. थोड्याच वेळात बरेच लोक मला घेरून उभे आपापसात कुजबुजू लागले. ते सर्व माझ्याकडे आश्चर्यजनक अशा विचित्र नजरेने बघत होते. ठाऊक नाही त्यांच्या मनात काय गोंधळ होता? मी घाबरलो. मला अंदाज आला की मी कोणत्या तरी आदिवासींच्या गावात आलेलो आहे. मी चारहीबाजूने एक नजर टाकली. ते काय बोलत होते मला समजतच नव्हते. त्यांची बोली माझ्यासाठी समजण्यासारखी नव्हतीच.

अचानक त्यांच्यातली काही पोरे माझ्यावर धावून आली. त्यांना माझ्या बनियानवर असलेले पंख हवे होते. पोरे जसजशी बनियानला हात लावत होते ते पंख आपोआप गळून पडत होते. त्यांनी मला पुन्हा उघडे करूनच सोडले. नंतरच मला हे समजले की बनियानवर पंख नव्हते तर बनियानच पंखाने बनविलेली होती. माझ्या उघड्या छातीला बघून सर्वांनी टाळ्या वाजवून, ओरडून त्यांचा आनंद आणि उल्हास व्यक्त केला. त्यांनी मला त्यांच्यासारखे करून टाकले होते आणि बहुतेक याचाच सर्वांना आनंद असावा. परंतु मी त्यांच्यासारखा नव्हतो. फक्त बनियान घातल्याने किंवा न घातल्याने माणूस- माणूस वेगळा कसा काय होऊ शकतो? पण या अनोळख्या जागेत या अनोळख्या लोकांना कसे समजणार? मला तर त्यांची बोलीभाषा देखील येत नव्हती. मला तहान लागली होती पण त्यांना हे सांगणे किंवा समजावणे शक्य नव्हते. शेवटी मी तिथून निघालो आणि थोडा वेळ चालल्यावर मी दाट अरण्याच्या बाहेर होतो.

आता सूर्य आपला प्रकाश मोकळ्या मनाने वाटत होता. आई नेहमी म्हणत असे, ‘सूर्याच्या भाग्यात सतत जळणेच लिहिलेले आहे. बायकांसाठी सुद्धा हेच खरे आहे.’ पण जळल्याने उजेड व्हावा हे तर आश्चर्यच आहे. आयुष्यभर आई जळतच राहिली पण प्रकाशाचा एक किरणही उत्पन्न करू शकली नाही. आई रागात असली की म्हणत असे, ‘तुझ्या बापाने माझ्या आयुष्यात इतका दाट अंधार करून ठेवला आहे की सबंध आयुष्य जळत राहूनदेखील मी तुझ्यासाठी उजेड करू शकत नाही.’ कमालच आहे. कोणी सतत जळत राहून उजेड देत असतो आणि कोणी सतत जळून विझत असतो, आणि अनेकांच्या आयुष्यात अंधार करून जातो. बहुधा विरोधाभास आणि विसंगती हे आयुष्यातले मुख्य घटकच मानायला हवेत.

चालता चालता मी एखाद्या गावात आलो होतो. गावात एका खुल्याशा जागेत आठवड्याचा बाजार लागण्याची तयारी चालली असावी. बाहेरच्या गावातून आलेले व्यापारी आपली दुकाने लावत होते. मनात आले अगोदर थोडे काही खावे आणि मग नंतर बाजारातून बनियान विकत घ्यावी. आठवड्याच्या बाजारात मी अनेक दुकानांवर गेलो पण कुठेही मला बनियान मिळाली नाही. सदरादेखील नव्हता. बाजारात पुरुष व स्त्रिया सर्व उघड्या छातीनेच फिरत होते, परंतु बाजारात बाहेरचे लोक आपले सामान विक्रीसाठी घेऊन आले होते म्हणून मला त्यांच्याशी बोलणे थोडे सोपे होते. काही दुकानांवर सनी देओलचा फोटो असलेला’आपला लक पहन कर चलो’ जाहिरातीचे बॅनर होते. हे बघून मी एका दुकानाजवळ थांबलो आणि त्याला विचारले, ‘बनियान मिळेल का?’ हे ऐकताच त्याला आश्चर्य वाटले. खालपासून वरपर्यंत मला विचित्र नजरेने बघत म्हणाला, ‘बनियान नाही. इथे कोणीच वापरत नाही.’

‘सदरा असेल?’ ‘नाही, सदरा पण नाही.’ तो म्हणाला. मी दुसऱ्या जागी मिळेल हा विचार करत पुढे चाललो.

‘बनियान मिळेल का?’ एका दुसऱ्या दुकानावर मी विचारले. या दुकानदाराने पण मला आश्चर्याने बघितले आणि म्हणाला, ‘नाही आहे. इकडे कुणीच घालत नाही. तुला माहीत नाही का?’ आणि मग स्वत:च म्हणाला, ‘नवीन वाटतोय इकडे.’

मी मान हलवित विचारले, ‘पण का घालत नाहीत? मला तर याच क्षेत्रात त्या म्हाताऱ्यांनी पक्षांच्या पंखांवाली एक बनियान मोठ्या प्रेमाने घातली होती.’

‘काय?’ तो जोराने ओरडला. मी घाबरलो. त्याला म्हणालो, ‘होय. पण त्यात ओरडण्यासारखे व घाबरण्यासारखे काय आहे? आता थोड्याच वेळा पूर्वी गावातल्या काही पोरांनी बनियानला हात लावला आणि सगळे पंख गळून पडले.’ तो दुकानदार अजूनही घाबरलेलाच होता. त्याने मला आपल्याजवळ बसविले आणि विचारले, ‘कुठे घातली होती ती बनियान?’

‘जे गाव मी मागे सोडून आलो ना त्या गावात. बहुतेक ते आदिवासींचे गाव असावे. काल रात्री मी जेव्हा येत होतो तेव्हा तिथे एका जागी काही म्हातारे शेकोटी लावून तापत बसले होते. त्यातल्याच एका म्हाताऱ्याने मला ती सुंदर बनियान स्वत:च्या हाताने घातली होती.

‘अरे… रे… रे…’ त्याच्या तोंडातून शब्द बाहेर निघत नव्हते. मोठ्या मुश्किलीने तो म्हणाला, ‘ज्या शेकोटीची जागा तुम्ही सांगत आहात तिथे तर स्मशान आहे आणि तिथे एखादे प्रेत जळत असेल.’

आता घाबरण्याची वेळ माझी होती. माझी बोबडीच वळली. मला आता सर्व आठवले. ते तीन म्हातारे, त्यांचे ते चिलीम ओढणे, ते माझ्याशी आपुलकीने बोलणे आणि माझ्या मनातले ओळखून मला ती पंखांची बनियान स्वत: आपल्या हाताने घालणे. मला आल्यासारखे परत जाण्याचा सल्ला देणे. मी थोडे सावध झालो. ‘पण मला तर ते म्हातारे तिथेच भेटले होते आणि त्यातल्याच एकाने मला ती बनियान घातली होती.’

आता तो हळूच म्हणाला, ‘ग्रामपंचायत सरपंच आणि त्यांच्या भावांचे आत्मे असतील.’

मला तर आता जास्तच घाबरल्यासारखे झाले. माझ्या घशाला कोरड पडली. म्हणजे माझी भेट प्रेतात्म्यांशी झालेली होती? त्या दुकानदाराने माझी अवस्था बघून त्याने मला जवळ बसविले. बहुधा आता मी त्याच्यासाठी एक महत्त्वाचा माणूस झालेलो होतो पण माझी भेट प्रेतात्म्यांशी झाली होती म्हणून तोदेखील माझ्याशी घाबरलेला होता. तहान लागलीच होती. आता मला भूकेची देखील जाणीव होऊ लागली. मी त्याच्याजवळ काही खायला मागितले. त्याला म्हणालो, ‘मी फार भुकेला आहे. तुझ्याजवळ भाकरी वगैरे असेल तर दे मला.’ त्याने मला स्पष्ट नकार दिला. तो म्हणाला, ‘माझ्याजवळ भाकरी आहे पण मी देणार नाही. या राज्यात काहीपण मागणे वर्ण्य आहे. आमच्या राज्यात भीक मागण्यावर प्रतिबंध आहे. काही मागणे हा राज्यात गंभीर गुन्हा मानला जातो आणि त्याची शिक्षा मृत्युदंड अशी आहे.

बाप रे..! कुठे आलो मी? स्मशानात मी प्रेतात्म्यांना भेटलो म्हणून अगोदरच घाबरा झालेलो. मी आता आणखीनच जास्त भयभीत झालो. काही मागितल्यावर मृत्युदंड हे कारणच माझी अस्वस्थता वाढविणारे होते. हे देवा! आता मी काय करू? कुठे जाऊ? मला आईची आठवण तीव्रतेने येऊ लागली. आई म्हणायची, काहीही झाले, कितीही वाईट परिस्थिती असो कधीही कुणाकडून काही मागू नकोस. तो आपल्याला सर्वांना देत असतो. त्याला सर्वांची काळजी असते.’ कोण आहे आईचा ‘तो?’ आणि कुठे लपून बसला आहे? मला त्याची या वेळेस फार फार गरज आहे. आई तर हिंदीतली ही म्हणदेखील नेहमी म्हणायची, बिन मांगे मोती मिले मांगे मिले न भीक.’ म्हणजे मी मागून देखील मला भीक मिळणार नाही? मला हिरे-मोती नको होते. मी उपाशी होतो आणि मला काही खायला हवे होते पण उपाशी-तापाशी मी येथे या अनोळखी जागी वणवण भटकत होतो.

थोड्या वेळाने मी त्याला विचारले, ‘हे आदिवासींच्या सरपंचाची कथा काय आहे?

‘इथल्या राजाने त्यांना मृत्युदंड दिला होता. या राज्यातल्या याच गावात राजाने लोकशाहीची सुरुवात म्हणून पहिल्यांदाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या…

‘… पण मग यात मृत्युदंड कशासाठी?’ मी त्याला मध्येच टोकले.

‘सांगतो. इथे या राज्यात पोरांना सोडून मोठ्यांनी काहीही मागणे, अगदी भीक मागणेसुद्धा गंभीर गुन्हा आहे व त्यासाठीच मृत्युदंड ही शिक्षा असते. त्या निवडणुकीत तेच सरपंच पुन्हा सरपंचाच्या निवडणुकीत उभे होते. स्वत:साठी ते सर्वांसमोर मतांची भीक मागत होते, आणि सोबत त्यांचे दोन भाऊदेखील त्यांच्यासाठी मतांची भीक मागत होते. म्हणून राजाने भर दरबारात त्या सर्वांना या गुन्ह्यासाठी मृत्युदंड ही शिक्षा दिली.’

बापरे! किती भयंकर आहे हे सर्व. मला भूक लागली आहे. तहानेने घसा कोरडा पडला आहे आणि इथे काही मागणेच मोठा गुन्हा आहे आणि त्यासाठी मृत्युदंड? आता मी काय करू?

‘इथून लवकर पळ काढा. राजाच्या शिपायांनी बघितले तर अनोळखी समजून लगेच पकडतील आणि राजासमोर उभे करतील. मग दरबारात हजेरी आणि नंतर मृत्युदंड.’ दुकानदार मला म्हणाला.

मला पण तेथून पळ काढणेच सोयीचे वाटले आणि मी लगेच उभा राहिलो, पण इतक्यात मला राज्यातल्या शिपायांनी बघितले. भीतीमुळे मी आता धावू लागलो पण मीही किती वेळ धावू शकणार होतो? शेवटी सर्व शिपायांनी मला घेरूनच घेतले. दुसऱ्या दिवशी भर दरबारात मला उभे केले. राजाने प्रधानांना माझा गुन्हा विचारला यावर सर्व खुशामती दरबारी एकाच स्वरात म्हणाले, ‘श्रीमंत, हा आपल्या राज्यात भीक मागत होता. आपल्या राज्याला कलंक आहे हा.

‘आमच्या राज्यात भीक मागणे गंभीर गुन्हा आहे आणि त्याची शिक्षा मृत्युदंड आहे, हे तुला ठाऊक नाही का?’ राजाने मला विचारले.

दरबार, दरबारातले खुशामती सर्वच माझ्या विरोधात होते आणि माझे काही ऐकण्यासाठी तयार नव्हते. मग गप्प राहाण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. शिवाय या अनोळखी जागेत माझी बाजू कोण मांडणार आणि कोण समजणार? म्हणून मी गप्पच राहिलो. राजा प्रधानांना म्हणाला, ‘हा काहीच बोलत नाहीये.एकदा पुन्हा याच्यासमोर याच्या गुन्ह्याचा पाढा वाचा.’

भर दरबारात माझ्या गुन्ह्यांचा पाढा वाचला गेला. प्रधान म्हणाले, हुजूर, हा भाकरीसाठी भीक मागत होता, पाण्यासाठी भीक मागत होता. आपल्या राज्यात बनियान घालण्याची पद्धत नाही आणि विना बनियानच्याच नशिबाने आपल्याला जगावे लागते, पण हा सर्व जागी बनियान भीक मागत होता आणि म्हणून आपल्या स्थानिक लोकांच्या अस्मिता आणि भावनांशी खेळण्याचा गंभीर गुन्हा पण याने केलेला आहे. आणखीन काय सांगावे हुजूर, हा सूर्याचा प्रकाश भीकेत मागत होता. चंद्राचे किरण भीकेत मागत होता, थंड वारे भीकेत मागत होता. आणखीन काय सांगू हुजूर, स्वच्छ पाणी भीकेत मागताना तर याला सर्वांनी बघितले. येणाऱ्या जाणाऱ्यांकडून प्रेमाची आणि आपुलकीची भीक मागत होता. आपल्या राज्यात प्रेम आणि आपुलकी उपजतच असते हे याला ठाऊक असायला हवे होते पण ती माहिती याने जाणून घेतली नाही. विशेष म्हणजे माणूस असून माणुसकीची भीक मागत होता.’

प्रधानजी थांबले. मी शांत उभा असलो तरी माझ्या मनात फार अस्वस्थता होती. पण माझ्या अशा शांत राहण्याला माझी कबुली समजली गेली. शिवाय काही मोजक्या खुशामतीच्या ग्वाहीने देखील माझा गुन्हा सिद्ध झाला होता.

दरबारात राजा माझ्याकडे बघत म्हणाला, ‘राज्यातल्या या अनोळखी माणसाचा गुन्हा सिद्ध झालेला आहे. भिकाऱ्यांना आमच्या राज्यात जागा नाही. त्यांसाठी मृत्युदंड आहे. म्हणून या गुन्हेगार भिकाऱ्याला त्याच्या गुन्ह्यासाठी मृत्युदंड ही शिक्षा देण्यात येत आहे.’

राजाचे शिपाई मला दरबारातून नेत होते आणि ‘मी कोणताही गुन्हा केलेला नाही’ असे जोरजोराने मी ओरडू लागलो. अचानक माझ्या डोळ्यांवर पाण्याचे थेंब पडले आणि मी जागा झालो. उठून बसलो तर बायको समोर उभी होती.

‘अहो, काय बडबडत होता? कोणत्या गुन्ह्याबद्दल ओरडून ओरडून सांगत होता तुम्ही? आणि विसरला वाटते आज आईचे वर्षश्राद्ध आहे म्हणून तुम्हाला लवकर उठविले आहे. किती कामे पडली आहेत. चला लवकर उठा आणि आवरा लवकर.’

– विश्वनाथ शिरढोणकर 

इंदूर

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..