नवीन लेखन...

अलबेला अभिनेता – मंगेश देसाई

मंगेश देसाई समंजस, परिपक्व अभिनेता… फोटो काढताना मंगेशच्या व्यक्तिमत्त्वातील समोर न आलेले अनेक पैलू उलगडलेत…

पहाटेचे पाच-साडेपाच वाजले असतील. गुलाबी थंडीत सकाळी मॉर्निंग वॉकसाठी मुंबईत गेटवेला लोकांची गर्दी होती आणि गर्दीत एका आलिशान कारमधून फाटका, मळकट झब्बा अन् तसाच लेहंगा घातलेला तरुण उतरलेला पाहून सगळेच अचंबित झाले. पेहरावावरून कमालीची गरिबी सोसत असलेल्या या तरुणाकडे आलिशान कार कशी काय, असा प्रश्न सगळ्यांच्याच चेहऱयावर दिसत होता. ‘मंग्या, तू कॅरेक्टरमध्ये चांगलाच घुसलायेस बघ. कोणी ओळखलं नाही तुला!’ सिनेमाचे निर्माते अशोक नारकर मंग्याला प्रोत्साहन देत होते, अधूनमधून त्याची फिरकी घेत होते. मंग्याही या मस्तीत सहभागी होऊन धमाल करत होता. धम्माल, मजा-मस्ती आणि त्याला विरोधाभास ठरावा अशा गंभीर वातावरणातून साकारलेले मंग्याचे शूट. मुंबापुरीत गेटवे ऑफ इंडियाच्या बॅकग्राऊंडवर ‘खेळ मांडला’ सिनेमाच्या शूटसाठी मी, अशोक नारकर आणि मंग्या म्हणजेच मंगेश देसाई सिनेमातले काही राहिलेले, महत्त्वाचे सीन शूट करत होतो.
आजूबाजूला शेकडो लोकांची गर्दी, वेगळ्या नजरा हे सगळे झेलत मंगेश गांभीर्याने शूट करत होता. आपली भूमिका चोख पार पाडण्यासाठी तो धडपडत होता. मंगेशच्या अभिनयाची हीच वेगळी ओळख सांगता येईल. मंगेशकडे कोणताही चेहरा ताकदीने प्रेझेंट करण्याची दैवी कला आहे आणि ते तो प्रामाणिकपणे गेली तेवीस-चोवीस वर्षे करतोय. मंगेशचा ‘खेळ मांडला’ ते ‘एक अलबेला’ असा प्रवास याचीच प्रचीती म्हणता येईल.

व्यक्तिरेखा साकारण्यात पटाईत असलेल्या मंगेशचे २०१२ साली मी एक फोटोशूट केले. मंगेशला मी गेली अनेक वर्षे ओळखत होतो. अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून एकत्र भेटण्याचा, बोलण्याचा योग आला होता परंतु अगदी पहिल्यांदाच त्याचे मी शूट करत होतो. त्यावेळी साधारणपणे सतरा-अठरा वर्षे तो सिनेमा क्षेत्रात कार्यरत होता. असे असूनही त्याचे हे पाहिलेच पोर्टफोलिओ शूट असल्याचे त्याने कबूल केले आणि म्हणूनच मला या शूटवेळी थोडे दडपण होते. मात्र हे दडपण काही मिनिटांतच विरले. मंगेश मनमोकळेपणाने बोलतो. कोणतेही डावपेच न आखता चांगले-वाईट थेट तोंडावर सांगतो आणि म्हणूनच माझ्या गुड बुक्सच्या यादीत मंगेशचा क्रमांक वर आहे.

मंगेशच्या पोर्टफोलिओ शूटच्या निमित्ताने त्याचे अनेक पेहरावात फोटोशूट आम्ही केले. काही इनडोअर तर काही आऊटडोअर. इनडोअर स्टुडिओत फोटो काढताना मंगेशचे हावभाव, त्याच्यातील कलाकार हा कॅमेराबद्ध करण्याचा प्रयत्नात मी होतो. इनडोअर म्हणजेच स्टुडिओमधल्या शूटच्या वेळी फोटोग्राफरला प्रकाशाची तीव्रता, दिशा, गुणवत्ता, त्यात हवे असलेले बदल हे सारे काही नियंत्रणात ठेवणे सहज शक्य असते. त्याचाच उपयोग करत प्रकाश आणि सावलीचा खेळ करत एक फोटोग्राफर कलाकाराचा चेहरा खुलवत असतो. मीदेखील मंगेशच्या शूटवेळी हेच करण्याचा प्रयत्न करत होतो. हे शूट झाल्यानंतर आम्ही आऊटडोअर शूटसाठी बाहेर पडलो. आऊटडोअर शूट हा प्रकार स्टुडिओ शूटपेक्षा बरोबर उलट. म्हणजेच प्रकाशाची तीव्रता, दिशा आणि गुणवत्ता यावर नियंत्रण नसलेली परिस्थिती आणि म्हणूच आऊटडोअरचे फोटो अगदी निराळे. वेगळ्या रंगसंगतीतले मला यावेळी टिपता आले.

रंगभूमी ते रुपेरी पडद्यावर अभिनयाची वेगळी छाप उमटवलेल्या मंगेशने ‘खेळ मांडला’ सिनेमासाठी मुख्य भूमिका तर साकारली होतीच, मात्र निर्मात्याच्या भूमिकेचाही श्रीगणेशा त्याने केला होता. हेच हेरून मंगेशचे एक वेगळे फोटोशूट आम्ही करायचे ठरवले. कॉर्पोरेट लूकमधले हे त्याचे शूट होते. ‘खेळ मांडला’ सिनेमाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून मंगेशच्या हातात कठपुतली दिली होती आणि त्याने निर्मात्याच्या भूमिकेतून घेतलेली झेप दाखवण्यासाठी त्याला हवेत उंच उडी मारायला सांगितली होती. यातली एक उडी मला अचूक कॅमेराबद्ध करता आली. मंगेशची ही झेप पुढे त्याने आपल्या कर्तृत्वाने कायम उंचच उंच ठेवली. ‘खेळ मांडला’ हा सिनेमा मंगेशसाठी टर्निंग पॉइंट ठरला.
एका सिनेमाच्या निमित्ताने मंगेशला त्याच्या शरीराला आकार देणे क्रमप्राप्त होते. रोजचा व्यायाम, ठरलेला आहार, कोणतेही व्यसन नाही हे सारे मंगेशने कटाक्षाने पाळले. या सिनेमाच्या मेकिंगसाठी आम्ही जिममध्ये त्याचे फोटोशूट करत होतो. त्यावेळी त्यात झालेला आमूलाग्र बदल मला जाणवत होता. या सिनेमाचे चित्रीकरण नंतर बराच काळ लांबले, मात्र मंगेशच्या या मेहनतीचे फळ पुढे त्याला मिळालेच. फ्री स्टेट या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या सिनेमानंतर ‘एक अलबेला’ सिनेमासाठी मंगेशची निवड झाली. भगवानदादा साकारणे हे मंगेशसाठी भाग्याचेच काम होते.

‘एक अलबेला’ सिनेमादरम्यान मंगेशच्या प्रसिद्धीसाठी त्याचे काही फोटोशूट मी केले होते. अनेक पत्रकार परिषदा, सततचे कार्यक्रम, विविध माध्यमांच्या मुलाखतींदरम्यान मी मंगेशला जवळून पाहिले. त्याने आजवर कधीही कोणाला दुखावल्याचे मला आठवत नाही. मंगेशचा हाच स्वभाव त्याच्या यशात मोठा वाटा उचलत आहे. कलाकार एका उंचीवर गेल्यावर त्याच्या वागणुकीत, बोलण्या-चालण्यात बदल झालेला साधारपणे पाहायला मिळतो. मंगेशने त्याचा स्वाभिमान जपत जगण्याची कला आत्मसात केलीये. मंगेश कितीही कामात व्यग्र असला तरीही त्याने त्याच्या कुटुंबासाठी नेहमीच वेळ राखलेला असतो. मंगेश त्याच्या मुलाच्या- साहिल बाबतीत फार संवेदनशील आहे. साहिलच्या आवडीनिवडी, त्याचे छंद हे मंगेशने जपलेत.

रंगभूमीवर रमणारा, सिनेमात प्रमुख भूमिकेतून झळकणारा, वेबसीरिजमधून समोर आलेला मस्तीखोर तर विविध संस्थांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम करणारा अशा सगळ्याच भूमिका चोख निभावणारा मंगेश मी पाहिलाय. इतिहासात फार न रमता नेहमी भविष्यासाठी स्वार होणारा मंगेश येत्या काही काळात अभिनयाच्या जोरावर सिने क्षेत्रावर अधिराज्य गाजवेल अशी खात्रीच मला वाटते.

— धनेश पाटील
dhanuimages@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..