नवीन लेखन...

अक्षरलेण्यांचा शिल्पकार: आप्पा महाशब्दे

मुरलीधर गडे यांचा ठाणे रंगयात्रामधील लेख.


१९७० च्या दशकाच्या काळात जाहिरातींसाठी चकाचक फ्लेक्स नव्हते. त्यामुळे पेंटरने हाती रंगवलेले बोर्डच नाटकाच्या जाहिरातीसाठी नाट्यगृहावर व चौकाचौकात झळकत असत. त्या काळापासूनच ठाण्यातील हातखंडा बोर्ड पेंटर म्हणजे चंद्रशेखर ऊर्फ आप्पा महाशब्दे. जन्मत:च सुवाच्च,वळणदार आणि मोती-सुंदर अक्षराचे वरदान लाभलेल्या आप्पा महाशब्दे यांची बोटे अगदी सहजपणे कापडी बोर्डावर नाटकाच्या नावांची अक्षरलेणी चितारू लागली.

ठाण्यात १९६०-७० च्या दशकात नाटके कमीच लागायची. कारण तेव्हा ठाण्यात बंदिस्त सुसज्ज नाट्यगृहेच नव्हती. नाटके लागायची ती मो. ह. विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणात. काही वेळा बेडेकर विद्यामंदिरचे पटांगणही ‘नाट्यगृह’ बनून जायचे. नाटक कुठेही असो, कुठल्याही कंपनीचे असो, बोर्ड मात्र आप्पांच्या कुशल बोटांतून उतरलेला असायचा.

१९७० च्या आसपास ठाण्यामध्ये ठेकेदारी पद्धतीने नाटकाचे प्रयोग लावणाऱ्या काही मोजक्या संस्था होत्या. मोहन जोशी यांची ‘रंगवैभव’, विद्याधर ठाणेकर यांची ‘कलाविद्या’ व रमेश मोरे यांची ‘नाट्यनिनाद’ या संस्था होत्या. यापैकी मोहन जोशींच्या ‘रंगवैभव’तर्फे लावल्या जाणाऱ्या नाटकांचे बोर्ड रंगवण्याचे काम आप्पा महाशब्दे यांना मिळाले आणि हा होता आप्पांच्या बोर्ड रंगवण्याच्या कामाचा शुभारंभ. एकापाठोपाठ तीन नाटकांच्या बोर्डांचे काम मिळाले आणि हळूहळू काम मिळण्याचे प्रमाण वाढत गेले. बोर्ड बघितल्यावरच तो आप्पा महाशब्दे यांच्या हातचा आहे, हे बघणाऱ्याच्या क्षणार्धात लक्षात यायचे. त्यांच्या अक्षरांचे वळण हीच त्यांची सही होती.

बोर्ड/साइनबोर्ड ही आप्पांची खासियत बनली. मग त्यांचा ब्रश नाटकाच्या बोर्डांच्या सीमांमध्ये अडकून पडला नाही. जाहिरातींचे बोर्ड, बॅनर्स, प्रचाराचे बोर्ड अशा विविध दिशांनी आप्पांची अक्षरे खेळू बागडू लागली. आप्पा महाशब्दे यांच्या बोटांना लाभलेले वरदान केवळ बोर्डाच्या अक्षरांपाशीच घोटाळत राहिले नाही. तर कलाक्षेत्राशी निगडित असलेल्या विविध अंगांनी ते बहरून आले. विविध संस्थांच्या अनेकविध कार्यक्रमांसाठी गौरवचिन्हे, स्मृतिचिन्हे यामधील त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे. आतापर्यंत अशी हजारो स्मृतिचिन्हे त्यांच्या हातून बनली आहेत. याशिवाय बॅनर्स, बॅचेस, साइन बोर्ड्स, मानपत्रे अशा कितीतरी बाबीत आप्पांची मुशाफिरी वैशिष्ट्यपूर्ण आहे.

निवडणुकींचा प्रचार डिझाइन करणे ही आप्पांची आणखी एक खासियत. कामामध्ये गुणवत्ता असल्यामुळे निवडणूक प्रचाराची अनेक कामे त्यांच्याकडे येऊ  लागली. अनेक मोठमोठ्या राजकीय व्यक्तींशी ओळख व परिचय वाढत गेला. कामाच्या पसाऱ्याबरोबर आप्पांचा जनसंपर्कही विस्तारत होता.

कट टू नाटक अगेन! आप्पा महशब्दे केवळ रंगारी पेंटर नव्हते. तर नाटक या विषयात त्यांना मनापासून रस होता. नाटकावर त्यांचा जीव होता म्हणा ना! त्यामुळे अनेक नाटकांचे नेपथ्यही त्यांनी केले. त्याची काही उदाहरणे सांगायची तर ‘एक होतं भांडणपूर’, ‘गाणारी मैना’, ‘हिमगौरी आणि सात बुटके’, ‘अलीबाबा चाळीस चोर’, इ. ‘मित्रसहयोग’ या संस्थेच्या ‘राजा राणी’ या एकांकिकेचे नेपथ्यही त्यांनी केले होते.

नाटकाशी संबंधित विविध प्रकारची कामे करीत राहिल्यामुळे नाट्यसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार, तंत्रज्ञ यांच्याशी त्यांचा अत्यंत निकटचा संपर्क आहे. काहीजणांबरोबरच तर ‘मैत्र जीवाचे’ आहे. त्यामुळे नाटक व इतर सांस्कृतिक उपक्रमांशी संबंधित सोहळ्यांमध्ये आप्पांना आवर्जून निमंत्रित केले जाते आणि तेही हौसेने आणि जिव्हाळ्याने त्यात आपली उपस्थिती लावीत असतात. तर नाटकाशीच नव्हे तर अखिल कलासृष्टीच्या विविधरंगी घटनाक्रमाशी नाळ जुळलेल्या आप्पा महाशब्दे या अवलियाचा सृजनशील संचार कलाक्षेत्रात गेली जवळपास ४५ वर्षे समर्थपणे सुरू आहे. यापुढेही त्यांचा हा कलायज्ञ असाच अखंड सुरू राहील, असा विश्वास वाटतो.

— मुरलीधर गोडे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..