नवीन लेखन...

आक्करमाशा

ए आक्करमाशा निघ माझ्या घरातून, चालता हो बघु , पुन्हा पाय ठेवलास तर याद राख. सख्ख्या मामाच्या तोंडातून सुद्धा यापूर्वी आजवर कधीही न ऐकलेले शब्द ऐकून रंज्याला खुप वाईट वाटले.
त्याचे आजोबा तर त्याला आठवतं तेव्हापासुन आक्करमाशा म्हणूनच हेटाळणीच्या सुरात हाक मारून , त्याला काम सांगायचे.
त्याच्या आईशी त्याचा मामा आणि आजोबा कधी बोलल्याचे त्याने बघितलेच नाही. रंज्यावर फक्त दोन व्यक्तींचीच माया एक त्याच्या आईची आणि दुसरी त्याच्या आईच्या आईची. त्याच्या आजी मुळे त्याच्या आईला आणि त्याला डोक्यावर छप्पर आणि दोनवेळचे खायला मिळत होते. त्याच्या आजोबांनी आणि मामाने रंज्याच्या आईला ती गरोदर असताना देखील घरात आसरा दिला नव्हता आजीने खुप विनवण्या केल्या तेव्हा कुठे तिला वाड्यातल्या जनावरांच्या गोठ्याला लागून असलेल्या लाकूडफाट्याच्या खोलीत राहायची परवानगी दिली.
रंज्याच्या आईचे नांव गुंजी, ती दहावी झाल्यावर कॉलेजला जायला लागली होती, तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कॉलेजला जायला गावातून जीप ने जावे लागायचे. जीपचा ड्रायव्हर गुंजीच्या मनात भरला होता, रोज सकाळ संध्याकाळ भिडणाऱ्या नजरेचे रूपांतर प्रेमात झाले. गुंजी त्याच्यावर प्रेम करायची आणि तो प्रेमाचे नाटक. त्याला घरदार काही नव्हतं ज्या गावात जाईल तिथं खोली घेऊन जीप चालवायचा सहा महिने एका गावात तर वर्षभर दुसऱ्या गावात, एखादं लफड अंगाशी आले की एक गाव सोडुन दुसऱ्या गावात पसार.
गुंजी एक दिवशी त्याच्यासोबत मागचा पुढचा विचार न करता घर सोडून पळाली. गावातली सगळ्यात देखणी पोरगी ड्रायव्हर सोबत पळाली ही खबर वाऱ्यासारखी संपूर्ण पंचक्रोशीत पसरली. गुंजीचे वडील गावाचे सरपंच राहिले होते, तिचा भाऊ पंचायत समितीचा सदस्य होता, गावांतील एक नावाजलेले कुटुंब पण गुंजीने प्रेम आंधळं , मुकं आणि बहिरं पण असतं हे दाखवून दिले होते.
चार महिन्यांनी तिला दिवस गेल्याचे लक्षात येईपर्यंत खुप उशीर झाला होता, तिने ज्याच्यावर प्रेम केलं होत त्याचे नाटक तिच्या हळु हळु लक्षात येत होते, पण करणार काय परतीचे मार्ग ती स्वतःच बंद करून आली होती. जेव्हा गुंजीने त्याला सांगितले की तो बाप होणार आहे, ते ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो जो गेला तो चार दिवस झाले तरी परत आलाच नाही. गुंजी रात्रीच्या अंधारात तिच्या वाड्यात शिरली, तिच्या आईने तिला बघताच हंबरडा फोडला आणि तिला पोटाशी कवटाळून घेतले. गुंजीच्या वडिलांना तिची चाहूल लागली आणि ज्वालमुखीचा उद्रेक व्हावा तसे ते रागाने लालबुंद होउन गुंजीच्या अंगावर धावून गेले. तिचे केस धरून तिला वाड्या बाहेर काढू लागले. गुंजीचा भाऊ पण आरडा ओरडा ऐकून खोलीबाहेर आला. त्याला सुद्धा गुंजीला पाहून राग अनावर झाला. गुंजीची आईने वडिलांच्या पायाला मिठी मारली, गुंजीला सोडवण्यासाठी तिचा आक्रोश सुरु होता. पोरगी चुकली तिला माफ करा म्हणून विनवण्या करू लागली. गुंजीच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता तिने फक्त दोन्ही हात जोडले होते.
गुंजीच्या भावाला काय वाटले कोण जाणे पण त्याने त्याचा राग गिळला आणि तो त्याच्या वडीलांना थोपावायला सरसावला.
गुंजी काही महिन्यांपूर्वी वाड्यातली लाडकी लेक होती पण आता तिची अवस्था मोलकरणी पेक्षा वाईट झाली होती. तिची भावजय तिला राबराब राबवून घेत होती, गुंजीच्या आईला ते सहन होत नसे, पण गुंजी तिची समजूत घालायची असू दे माझ्या चुकीची शिक्षा मला भोगू दे, मला छप्पर आणि दोन घास मिळतात तेवढं तरी नशीबात आहे आता, असं बोलायची.
गुंजीने मुलाला जन्म दिला, त्याला बघून गुंजीचे वडील लेकीला माफ करतील या आशेने गुंजीची आई त्या नवजात अर्भकाला घेऊन गुंजीच्या वडीलांना दाखवायला घेऊन गेली.
त्या आक्करमाशाला माझ्या नजरेसमोर आणू नकोस असं जोराने गुंजीचे वडील कडाडले. त्यांचे ते शब्द ऐकून गुंजीच्या आईच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या, तिने त्या बाळाला घेतले आणि दुःखी अंतकरणाने गुंजीकडे दिले, वडिलांनी उच्चारलेला आक्करमाशा हा शब्द गुंजीने सुद्धा ऐकला, ज्या लेकीवर एके वेळी एवढा जीव लावला त्या लेकीच्या पोराला असं नावं ठेवलेले तिला सहन झाले नाही. आपल्या चुकीची शिक्षा केवळ आपल्यालाच नाही तर मुलाला सुद्धा भोगावी लागणार या कल्पनेने ती दुःखी झाली.
आजीने गुंजीच्या मुलाचे नाव रणजीत ठेवले. रणजीतचा रंज्या झाला , रंज्या जसं जसा मोठा व्हायला लागला तसतसा हुशार आणि मेहनती होऊ लागला. सुरवातीला त्याचा मामा त्याचा तिरस्कार करायचा पण त्याची हुशारी आणि मेहनत बघुन त्याला विश्वासाने कामं सांगू लागला.
रंज्याचे आजोबा मात्र त्याला कोणी नसल्यावर अगदी नाईलाज झाल्यावरच आक्करमाशा म्हणूनच हाक मारून काम सांगायचे. कळायला लागल्यावर त्याने त्याच्या आजीला विचारले की आजोबा मला आक्करमाशा का बोलतात?
आजीने तोंडाला पदर लावला तिला हुंदका अनावर झाला, गुंजीने रंज्याचा प्रश्न ऐकला होता. तिनेच उत्तर दिले, आक्करमाशा त्याला बोलतात ज्याचा जन्म व्यभिचारातून होतो. माझे आणि तुझ्या जन्मदात्या बापाचे लग्न एका देवळात झाले होते कुठल्याही साक्षीदाराशिवाय त्याच्यामुळे मला लग्न न करताच मुल झाले असा सगळ्यांचा समज आहे.
एवढं ऐकूनही रंज्याला त्याच्या आईबद्दल किंवा त्याच्याशी तुसडेपणाने वागणाऱ्या आजोबांबद्दल तक्रार नव्हती. त्यांचे असं वागणे सहाजिकच आहे अशी त्याने स्वतःच स्वतःची समजूत घातली होती. त्याच्या मनात फक्त त्याच्या आईला सोडून जाणाऱ्या त्याच्या बापाबद्दल तिरस्कार होता.
रंज्याचे आजोबा एका रात्री झोपेतच वारले. रंज्या चोवीस वर्षांचा झाला होता , त्याच्या हुशारीने आणि मेहनतीने तो वकील झाला होता. त्याच्या मामाला त्याचे कौतुक आणि अभिमानही वाटतं होता.
आजोबा वारल्यानंतर रंज्याने गावातल्या तलाठ्याकडे आजोबांच्या नावावर असलेल्या शेत जमिनींच्या सातबारा वर मामासह त्याच्या आईचे गुंजीचे नाव चढविण्यासाठी रीतसर अर्ज केला होता. त्याच्या मामाला ही गोष्ट समजताच त्याने गूंजीला नको नको त्या गोष्टी केल्या. रंज्याला हे समजताच तो मामाच्या खोलीत जाब विचारायला गेला. आजवर त्याच्या मामाने त्याचे लाड असे कधी केले नव्हते परंतु कधी तिरस्कार देखील केला नव्हता, की त्याच्या शिक्षणात व खाण्यापिण्यात काही कमी पडू दिले नव्हते.
पण आज सातबाऱ्यावर नाव चढवायची बातमी ऐकल्यामुळे रंज्याला समोर बघताच त्याचा मामा ओरडला , ए आक्करमाशा निघ माझ्या घरातून, चालता हो बघु , पुन्हा पाय ठेवलास तर याद राख.
गुंजीला तिच्या भावाच्या तोंडून पहिल्यांदा निघालेला आक्करमाशा हा शब्द ऐकून रंज्याच्या जन्मावेळी वडिलांनी उच्चारलेल्या त्याच शब्दाची आठवण झाली, वडील वारल्या नंतर आता माझ्या रंज्याला पुन्हा तो शब्द ऐकावा लागणार नाही म्हणुन ती सुखावली होती. पण ज्या भावाने आईच्या विनवणी ऐवजी बायकोच्या मागणीचा विचार करून तिला आसरा दिला होता हे फक्त तिलाच माहिती होते. तिच्या भावजयीने भावाच्या कानात या अवदसेला ठेवून घ्या घरात आयती मोलकरीणच चालून आली आहे दारात, तिला हातची जाऊ देऊ नका. भावाच्या कानात पुटपुटलेले ते शब्द गुंजीच्या कानापर्यंत सुद्धा पोचले होते.
— प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर,
B. E. (Mech), DME, DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 184 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..