नवीन लेखन...

आकाश-खिडकी

खानावळीची खडूस मालकीण मिसेस पार्कर तुम्हाला प्रथम दोन खणी बारा डॉलर्स भाड्याची जागा दाखवेल व तिथे कसे मोठमोठ्या लोकांच्या मित्रांचे सेक्रेटरी येऊन रहातात ते सांगेल. तुम्ही पुटपुटाल की मी डॉक्टर कींवा डेन्टीस्ट नाही. मग ती तुच्छतेने तुम्हांला आठ डॉलर्स भाड्याच्या खोल्या दाखवायला नेईल. तिथेही कोण कोण कसं कायम खोल्या राखून ठेवतं ते ती सांगेल. तुम्ही धैर्य गोळा करून पुन्हा पुटपुटाल की मला ह्या देखील परवडणार नाहीत. मग तुम्ही मिसेस पार्करच्या रागापुढे जिवंत राहिलात तर तुम्हाला तिसऱ्या मजल्यावर मिस्टर स्कीडरच्या हॉलमधे नेण्यात येतं.
स्कीडर तिथे कधीच रंगमंचापर्यंत न पोहोचणारं नाटक लिहित व धूर सोडत बसत.
तिथे तुम्हाला फक्त सुंदर कशीदाकाम केलेले पडदे दाखविण्यासाठी नेलेले असे. आपल्याला खानावळीतून ही काढून टाकेल ह्या भीतीने स्कीडरही मग तिला थोडे थकलेले भाडे भरत.
तुम्ही अजूनही एका पायावर उभे राहून, खिशातील तीन ओलसर डॉलर्स गरम हातात धरून आपल्या भयंकर गरीबीची कबूल केलीत तर मिसेस पार्कर “क्लाराss” अशी हांक मारून काळ्या दासीच्या हवाली करेल. ती तुम्हाला चौथ्या जिन्यावरून पायऱ्यांना जाजम लावलेल्या शिडीवर घेऊन जाईल आणि तुम्हाला आकाश-खिडकीची खोली दाखवेल, जिने त्या मजल्यावरील ७ X ८ फूट जागा व्यापली आहे. तिच्या प्रत्येक बाजूला एक अंधारी स्टोअररूम होती.
त्यात एक लोखंडी खाट, हात धुण्याचे टेबल आणि खुर्ची होती.
एक खणी वेशभूषा करण्यासाटी कपाट होतं.
खोलीच्या चार भिंती शवपेटीच्या बाजूंप्रमाणे तुमच्याभोवती बंद झाल्यासारखे वाटायचे.
तुम्ही कासावीस व्हाल व वर पहाल तिथे आकाश-खिडकीच्या काचेतून तुम्हाला अनंत आकाशाचा निळा चौरस दिसेल.
“दोन डॉलर्स, हं !” क्लारा तिच्या अर्ध्या तिरसट, अर्ध्या टस्केजीनियल स्वरात म्हणेल.
एके दिवशी मिस लीसन एका खोलीच्या शोधात आली.
तिने एक टंकलेखन यंत्र बरोबर होते, जे एकाद्या मोठ्या बाईने धरण्यासारखे होते.
ती खूप लहान मुलगी होती, तिची वाढ थांबली तरी डोळे आणि केस वाढतच गेले होते आणि जणू ते तिला म्हणत : “काय ग ! तू आमच्याबरोबर का नाही वाढलीस ?”
मिसेस पारकरने तिला जोडखोल्या दाखवून म्हणाली, “या कोठडीत हाडांचा सांगाडा, भूल देण्याचे साहित्य किंवा कोळसा ठेवू शकतो.”
मिस लीसन थरथरत म्हणाली, “पण मी कांही डॉक्टर किंवा डेन्टीस्ट नाही.”
श्रीमती पार्करने तिच्याकडे एक अविश्वास दाखवणारी, उपहासात्मक, तिरस्कारयुक्त, थंड नजर टाकली, जी तिने जे डॉक्टर किंवा डेन्टीस्ट होऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी राखून ठेवली होती.
मग तिला दुसऱ्या मजल्यावर परत नेले व म्हणाली,
“आठ डॉलर ?”
मिस लीसन म्हणाली. “प्रिय बाई ! जर मी लहान दिसले तरी मला पैसे देणारं मोठं कुणी नाही.
मी फक्त एक गरीब छोटी काम करणारी मुलगी आहे.
मला काहीतरी कमी खर्चाचे दाखवा.
दारावर टकटक ऐकून मिस्टर स्किडरने उडी मारली आणि सिगारेटच्या तुकड्यांनी फरशीवर राख पसरवली.
“माफ करा, मिस्टर स्किडर,” मिसेस पार्कर, त्याच्या फिकट चेहऱ्याकडे पहात आसुरी स्मित करत म्हणाली,
“तुम्ही आत आहात हे मला माहीत नव्हते.
मी हिला तुमच्या खोलीतील पडदे दाखवायला आणले आहे.”
“ते कोणत्याही गोष्टीसाठी खूपच सुंदर आहेत,” मिस लीसन एखाद्या देवदूतासारखं सुंदर हंसत म्हणाली.
त्या गेल्यानंतर मिस्टर स्किडर त्याच्या ताज्या (आणखी एका अनिर्मित) नाटकातील उंच, काळ्या केसांची नायिका काढून आणि दाट, चमकदार केस आणि इतर आकर्षक वैशिष्ट्यांसह एक लहानखुरी, सर्वांचं लक्ष वेधून घेणारी नायिका घालण्यात खूप व्यस्त झाले.
“क्लारा !” अशा कर्कश्श हांकेने मिस लीसनची गरीब परिस्थिती जगाला जाहिर झाली.
काळ्या गोब्लिन माशाने (क्लाराने) तिला पकडले, व शिडीवरून वर नेऊन प्रकाशाचा जेमतेम कवडसा असलेल्या तिजोरीवजा खोलीत ढकलले आणि “दोन डॉलर्स !” असे कुत्सित स्वरात म्हणाली.
“मी घेते ही.” मिस लीसन नि:श्वास टाकून म्हणाली आणि आंतल्या कुरकुरणाऱ्या लोखंडी पलंगात गुडुप झाली.
मिस लीसन रोज कामावर जायची.
रात्री घरी खूप लिहिलेले कागद घेऊन यायची आणि टाईपरायटरवर त्याच्या प्रती काढायची.
एखाद्या रात्री तिला काम नसे.
मग ती जिन्याच्या वळणावरच्या पायऱ्यांवर खाणावळीतील इतर रहिवाशांच्या बरोबर बसायची.
मिस लीसनचा अवतार त्या आकाशखिडकीच्या खोलीसाठी नव्हता झाला !
ती उमद्या मनाची, आनंदी, नाजूक तसेच खोडकरही होती.
एकदा तिने स्कीडरकडून त्यांच्या महान (अप्रकाशित) विनोदी तीन अंकी “सब वे चा वारस” चे वाचनही ऐकून घेतले.
जेव्हा जेव्हा मिस लीसनला एक-दोन तास पायऱ्यांवर बसण्यास वेळ मिळाला तेव्हा पुरूष निवासींना आनंद झाला.
पण उंच गोरी, लाल केसांची, सार्वजनिक शाळेत शिकवणारी मिसेस लॉंगनेकर’ म्हणायची, “अस्सं, खरंच कां ?”
तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला ती वरच्या पायरीवर बसून “हुं” करून तुच्छता प्रगट करी आणि डीपार्टमेंटल स्टोअरमधे काम करणारी मिस डॉर्न खालच्या पायरीवर बसून अशीच तुच्छता व्यक्त करायची.
मिस लीसन मधल्या पायरीवर बसली की पुरुष त्वरीत तिच्याभोवती बसायचे.
खास करून मिस्टर स्किडर, ज्यांनी तिला खऱ्या आयुष्यात खाजगी प्रेमाच्या नाटकांत गुपचूप प्रमुख नायिकेची भूमिका दिली होती.
तसाच पंचेचाळीस वर्षांचा लठ्ठ, लाल आणि मूर्ख मिस्टर हूवर आणि तसाच तरुण मिस्टर इव्हान्स, जो तिने त्याला सिगारेट सोडण्यास सांगावे यासाठी खोट खोकायचा.
पुरुषांनी तिला “आतापर्यंतची सर्वात छान आणि आनंदी” निवासी म्हणून जाहिर केले परंतु वरच्या आणि खालच्या पायरीवरील तुच्छता कायम होती.
तुमचे कान चरबीची शोकांतिका, वजनाचा ताप, गलेलठ्ठपणाची दुर्घटना ऐकायला तयार ठेवा. केलात प्रयत्न ?
शेक्सपियरच्या जाड्या विदूषकाने रोमिओहून जास्त चांगला प्रणय केला असता?
ज्याला बावन्न इंचाचा पट्टा लागतो, त्याच्या हृदयाची धडधड व्यर्थ आहे.
हा जाड्या, पंचेचाळीशीचा, मूर्ख हूवर प्रत्यक्ष हेलनला उचलून नेईल पण त्याला कधीही प्रेम करायची संधी मिळणार नव्हती.
अतिलठ्ठपणा म्हणजे सर्वनाश !
एका वसंतातल्या संध्याकाळी मिस लीसनने आकाशाकडे पाहिलं आणि अवखळ हंसत ओरडली, “अरे ! तो पहा, बिली जॅक्सन.
मी इथून खालून सुध्दा पाहू शकते त्याला.
”सर्वांनी वर पाहिलं. कांहीनी समोरच्या उंच इमारतीच्या खिडक्यांकडे तर कांहीनी बिली जॅक्सन चालवत असलेले विमान शोधायला.
आपल्या छोट्याशा बोटाने वर दिशा दाखवत मिस लिसन म्हणाली, “तो तारा, तो मोठा लुकलुकणारा नाही, तो त्याच्या बाजूचा, स्थिर असणारा, निळा.
मी रोज पहाते त्याला माझ्या आकाश-खिडकींतून !
मी त्याचे नांव “बिली जॅक्सन” ठेवले आहे.”
मिस लाँगनेकर म्हणाली”अस्सं !, खरंच !
तू खगोलशास्त्रज्ञ आहेस हे मला माहीत नव्हते, मिस लीसन.”
छोटी खगोलशास्त्रज्ञ म्हणाली, “अरे, हो ! मंगळावर पुढच्या शरद ऋतूत ते कोणत्या प्रकारचे वेश घालणार आहेत याबद्दल मला खगोलशास्त्रज्ञांएवढीच माहिती आहे.”
मिस लाँगनेकर म्हणाली, “अस्सं, खरंच का ! तू ज्या ताऱ्याचा उल्लेख करतेयस तो गामा, कॅसिओपिया नक्षत्रातला आहे.
तो जवळजवळ दुसऱ्या परिमाणाचा आहे आणि तो मेरिडियन मार्गावर आहे–”
तरुण मिस्टर इव्हान्स म्हणाले, “मला वाटतं बिली जॅक्सन हे त्यापेक्षा खूप चांगलं नाव आहे.”
मिस्टर हूवरने जोरात श्वास सोडत मिस लॉंगनेकरला म्हटले.
“मला वाटते की मिस लीसनला तार्‍यांची नावे ठेवण्याचा तितकाच अधिकार आहे जितका त्या जुन्या ज्योतिषांना होता.”
“अस्सं !, खरंच !” मिस लाँगनेकर म्हणाली.
मिस डॉर्नने टीप्पणी केली, “मला वाटते की ती एक उल्का असेल, मी कोनी बेटावर रविवारी दहापैकी नऊ बदके मारली.”
“तो इथून फारसा चांगला दिसत नाही,” मिस लीसन म्हणाली.
“तुम्ही त्याला माझ्या खोलीतून पाहिले पाहिजे.
तुम्हाला माहित आहे की तुम्ही विहिरीच्या तळातून दिवसाही तारे पाहू शकता.
रात्री माझी खोली कोळशाच्या खाणीच्या विहिरीसारखी असते आणि त्यामुळे बिली जॅक्सन मला मोठ्या हिऱ्यासारखा दिसतो.
जणू कांही निशेने तिच्या साडीला लावलेली हिऱ्याची पिन.”
त्यानंतर एक वेळ अशी आली जेव्हा मिस लीसन टाईप करण्यासाठी कोणतेही पेपर घरी आणू शकली नाही.
ती सकाळी बाहेर पडली की, ह्या ऑफिसमधून त्या ऑफिसला जायची आणि ऑफिसच्या उध्दट शिपायांच्या थंड नकाराच्या थेंबात तिचे हृदय पिळवटून जायचे.
असं चाललं होतं.
एक संध्याकाळी ती नेहमीच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करून परत येण्याच्या वेळीच मिसेस पार्करच्या पायरीवर चढली पण त्यादिवशीही तिने जेवण केलेच नव्हते.
तिने हॉलमध्ये पाऊल ठेवताच मिस्टर हूवर एकटाच भेटला आणि त्याने ती सुवर्ण संधी साधली.
त्याने तिला त्याच्याशी लग्न करण्याबद्दल विचारले.
त्याचा लठ्ठपणा एखाद्या पर्वताच्या बर्फाळ कड्यासारखा तिच्यावर कोसळला.
तिने टाळाटाळ केली आणि हाताने जिन्याचा कठडा पकडला.
त्याने तिचा हात धरायचा प्रयत्न केला.
तिने तोच हात उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर अशक्तपणे प्रहार केला.
ती स्वतःला ओढत ओढत पायरी पायरी चढत वर गेली.
तिने मिस्टर स्किडरचा दरवाजा ओलांडला, तेव्हा तो मिस लीसन साठी त्याच्या (न स्वीकारलेल्या) विनोदी नाटकाच्या रंगमंचावरील प्रयोगासाठी दिग्दर्शन करत होता.
कार्पेट केलेल्या शिडीवरून वर जाऊन शेवटी ती रेंगाळली आणि तिने आकाश-खिडकीच्या खोलीचा दरवाजा उघडला.
दिवा लावायला किंवा कपडे उतरवायला सुध्दा तिला ताकद नव्हती.
ती लोखंडी कॉटवर पडली, तिच्या नाजूक शरीराने त्या पलंगाच्या तारासुध्दा कुरकुरल्या नाहीत .
मग त्या आकाश-खिडकीच्या खोलीच्या विमानतळावरून तिने हळूच तिच्या जडावलेल्या पापण्या उघडल्या आणि ती हंसली.
कारण बरोबर वर बिली जॅक्सन चमकत होता, शांत, तेजस्वी आणि सतत.
तिच्याभोवती जग नव्हते.
ती काळोखाच्या गर्तेत बुडाली होती, पण त्या लहानशा चौकोनी आकाश-खिडकीने तिला तो प्रकाशाचा तारा दाखवला होता.
त्याला इतके लहरी आणि हो इतके अप्रभावी नाव कां दिले होत ?
मिस लाँगनेकरचे बरोबर असले पाहिजे; तो कॅसिओपिया नक्षत्रातला गामा असणार, बिली जॅक्सन नाही आणि तरीही ती त्याला गामा म्हणू शकत नव्हती.
ती पाठीवर पडली असताना तिने दोनदा हात वर करण्याचा प्रयत्न केला.
तिसर्‍या वेळी तिने तिच्या ओठांशी दोन पातळ बोटे आणली आणि त्या खोलीच्या काळ्या खड्ड्यातूनच बिली जॅक्सनला एक चुंबन दिले.
तिचा हात मागे पडला.
“गुड-बाय, बिली,” ती हळूच पुटपुटली.
“तू लाखो मैल दूर आहेस आणि तू एकदाही डोळे मिचकावणार नाहीत.
पण तू तिथे नेहमी राहिलास जिथे मी तुला बघू शकते.
बहुतेक वेळा माझ्याभोवती अंधाराशिवाय दुसरं काही नव्हतं, तेव्हा तू होतास नाही का ?
तू . .. लाखो मैल दूर… गुडबाय, बिली जॅक्सन.”
दासी क्लाराला दुसर्‍या दिवशी दहा वाजता खोलीचा दरवाजा बंद आढळला.
मग तो बाहेरून ताकद लावून उघडण्यात आला.
व्हिनेगर हूंगवून, मनगटावर चापटया मारून आणि पिसे जाळून काही मिस लिसन शुध्दीवर आली नाही, कोणीतरी धावत रूग्णवाहिकेसाठी फोन केला.
थोड्याच वेळात ती घोंगावत दरवाज्याकडे आली आणि एक सक्षम पांढऱ्या कोटमधला, तत्पर, सक्रिय, आत्मविश्वासपूर्ण तरूण त्याच्या गुळगुळीत पण गंभीर चेहऱ्यानीशी पायऱ्यांवर धांवत आला.
त्याने थोडक्यात विचारलं, “४९ ईस्ट स्ट्रीटवर रूग्णवाहिका कोणी मागवली ? काय झालंय कुणाला ?”
मिसेस पार्कर म्हणाली, “अरे, हो, डॉक्टर,” जणू कांही तिच्या घरात असं होणं तिला मंजूर नव्हतं.
“काय झालंय कुणास ठाऊक ?
आम्ही काहीही करू शकत नाही.
तिला शुध्दीवर आणू शकलो नाही.
ती एक तरुण स्त्री आहे, मिस एल्सी–होय, मिस एल्सी लीसन. माझ्या घरात यापूर्वी कधीही असं–”
“कोणती खोली ?” डॉक्टर जोरांत मिसेस पार्करवर ओरडले, ज्याची श्रीमती पार्करला संवय नव्हती.
“आकाश-खिडकीची खोली.
रुग्णवाहिकेच्या डॉक्टरला आकाश-खिडकीची खोली कुठे असते ते माहितं होतं.
तो एकावेळी चार चार पायऱ्या चढून वर गेला.
मिसेस पारकर नाईलाजाने हळूच मागोमाग गेली.
ती पहिल्या मजल्यावरच खगोलशास्त्रज्ञाला हातात उचलून घेऊन परत येत असणाऱ्या डॉक्टरला भेटली.
तो थांबला आणि त्याने त्याच्या जिभेचा पट्टा हळू आवाजांत पण सराईतपणे डॉक्टरच्या स्कालपेलसारखा तिच्यावर चालवला.
हळुहळू मिसेस पार्करचा, ताठ कपडा चुरगळल्यावर जसा होतो, तसा चोळामोळा झाला.
नंतरही तिच्या मनाला तें कायम सलत राहिलच.
कधी कधी तिचे जिज्ञासू निवासी तिला विचारायचे की डॉक्टर तिला काय म्हणाले ?
ती उत्तर देई, “असचं ! विशेष कांही नाही.”
कुतूहलाने पाठलाग करणाऱ्या शिकाऱ्यांच्या तांड्यातून रुग्णवाहिका डॉक्टर त्याच्या ओझ्यासह जलद चालत गेला, आणि ते हतबल होऊन फुटपाथवरून मागे फिरले कारण त्याचा चेहरा स्वत:च्या घरांतील मृताला वाहणाऱ्यासारखा दिसत होता.
त्यांच्या लक्षात आले की रुग्णवाहिकेतही त्याने तिला रूग्णासाठी तयार केलेल्या पलंगावर झोपवले नाही, तो तिला तसाच घेऊन बसला आणि फक्त ड्रायव्हरला म्हणाला, “विल्सन, गाडी वाऱ्यासारखी जाऊ दे.”
संपलं सारं ! पण ही एक कथा आहे का ?
दुसऱ्या दिवशी सकाळच्या पेपरमध्ये मी एक छोटीशी बातमी पाहिली आणि त्यातील शेवटच्या वाक्याने मला घटना एकत्र जोडण्यास केली. कदाचित तुम्हालाही मदत करेल:
त्यात वृतांत होता की एका तरुण महिलेला बेल्लेव्ह्यू हॉस्पिटलमधे ४९, ईस्ट-स्ट्रीट मधून रूग्णवाहिकेतून आणण्यात आलं होतं.
उपासमारीने आलेल्या दुर्बलतेमुळे तिची शुध्द हरपली होती.
तें वृत्त ह्या खालील शब्दांनी समाप्त केलं होतं,:
“रुग्णवाहिकेचा तरूण फिजिशियन, ज्याने केसमध्ये हजेरी लावली होती, म्हणाला, ‘रुग्ण नक्की बरा होईल’, त्या डॉक्टरचे नांव विल्यम उर्फ बिली जॅक्सन आहे.”

— अरविंद खानोलकर.

मूळ कथा – स्कायलाईट रूम

मूळ लेखक – ओ हेन्री


तळटीप –

ओ हेन्रीच्या शैलीची काय मजा आहे पहा.

लीसन कांचेतून दिसणाऱ्या ताऱ्याला सहज “बिली जॅक्सन” हे नांव देते आणि अखेर त्याच नांवाचा डॉक्टर रूग्णवाहिकेंतून तिला वाचवायला येतो.

चेटकीणीचे पाव मधे प्रेमिकेच्या आशेचे अचानक निराशेत परिवर्तन झाले तर ह्या कथेत संपूर्ण दु:खद गोष्टी घडत अखेरचे वळण आशादायी करते.

तरूण कर्तव्यदक्ष डॉक्टर चार चार पायऱ्या ओलांडत जिना चढून जातो रूग्णवाहिकेत तिला खाली ठेवत नाही आणि तिला प्रयत्नांची पराकाष्ठा करून उपचार करत असतो.
योगायोगाने त्याचे नांव “बिली जॅक्सन” हेच आहे.
लाखो मैलांवरून तो तारा तिला वाचवायला आला ?
तो तिच्या प्रेमांत पडला ? स्पष्ट उत्तर नाही.

तुम्ही हवी ती कल्पना करू शकतां किंवा अजब योगायोगाबद्दल आश्चर्य व्यक्त करून नायिका वाचली ह्यांतच आनंद मानू शकता.

ह्या दीडशे वर्षांपूर्वीच्या गोष्टी वाचतांना न्यूयार्क सारख्या शहरांतील बेकारी, गरीबी ह्या गोष्टींबद्दलही आपल्याला बरंच कांही समजतं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..