नवीन लेखन...

ठाण्याचे अभिनेते

सहा दशकांची नाट्यपरंपरा लाभलेल्या ठाणे शहरात होऊन गेलेल्या आणि सध्या रंगभूमीवर आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱया सर्व अभिनेत्यांची दखल घ्यायची तर त्यासाठी स्वतंत्र ग्रंथच लिहावा लागेल. नाट्यसंमेलनाच्या स्मरणिकेच्या माध्यमातून ठाण्यातील काही निवडक, प्रातिनिधीक अभिनेत्यांचा घेतलेला हा ओझरता आढावा.


ठाण्यातील नटांच्या मांदियाळीतील सर्वात जुने नाव म्हणजे दत्तोपंत आंग्रे. 1908 साली ठाण्यात जन्मलेल्या दत्तोपंतांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये पाच वर्षे कमर्शियल पेंटिंगचे शिक्षण घेतले होते. स्वभावाने लाजाळू असलेले दत्तोपंत नाटकमंडळींचे फलक, पडदे रंगवण्याच्या कामामुळे रंगभूमीच्या निकट आले आणि नट म्हणून रंगमंचावर उभे राहिले. ‘भारतभूषण’ नाटक मंडळींमधून दत्तोपंतांनी आपली रंगयात्रा सुरू केली. नंतर मुंबईला अनंत हरी गद्रे (तेच ‘हाऊसफुल्ल’वाले) यांच्या ‘मुंबई नाटिका संगीत मंडळी’ या नाटक कंपनीत दाखल झाले. गद्रे यांनी तेव्हा काहीतरी वेगळं म्हणून स्वत लिहिलेल्या दोन तासांच्या नाटिकांचे सादरीकरण सुरू केले होते. ही संस्था बंद पडल्यावर, यातील काही नटमंडळींनी मिळून ठाण्याला ‘नूतन नाटिका संगीत मंडळी’ सुरू केली. दत्तोपंतांनी या संस्थेमधून ‘मुलींचे कॉलेज’, ‘पुणेरी जोडा’ या नाटिकांमधून भूमिका केल्या.

त्यानंतर श्री. शंकरशेट यांनी काढलेल्या ‘आदर्श नाट्यालय’ या नाटक मंडळींमधून दत्तोपंतांचा प्रवास सुरू झाला. पुढे ‘नाविन्य नाट्यालय’ या रोहिणी वागळे यांच्या संस्थेत काम करताना दत्तोपंतांनी मामा वरेरकरांच्या ‘न मागता’ या नाटकाचे दिग्दर्शन केले. त्यानंतर ‘नाट्य संगम’साठी ‘अर्ध्या वाटेवर’ हे नाटक बसवले. 1944 साली दत्तोपंतांना आकाशवाणीचे बोलावणे आले. नभोवाणीवर काम करत असतानाच त्यांनी ‘महात्मा विदूर’, ‘आपले घर’, ‘अंगुरी’ (हिंदी) या सिनेमांमधून भूमिका केल्या. या भूमिका सरस वठल्याने त्यांना राजकमलच्या ‘बनवासी’, ‘राम जोशी’ आणि ‘अपना देश’ या चित्रपटांमध्ये चमकण्याची संधी मिळाली. ‘दूध भात’, ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटांमधूनही दत्तोपंतांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. नंतरच्या काळात दत्तोपंतांचे अभिनय कौशल्य प्रेक्षकांना पाहायला मिळाले ते साहित्य संघाच्या ‘भाऊबंदकी’मधील राघोबादादाच्या भूमिकेत. तसेच ‘पतंगाची दोरी’, ‘खडाष्टक’, ‘भाग्यवान’ या नाटकांमधील त्यांच्या भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्या होत्या. ‘तो मी नव्हेच’ हे त्यांचे अखेरचे नाटक. 1963 मध्ये अचानक मोटार अपघातामध्ये ठाण्याच्या या गुणवंत अभिनेत्याने जगाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली.

सत्तरच्या दशकारंभी मामा पेंडसेंसारखा ज्येष्ठ अनुभवी नट ठाण्यात राहायला आला तेव्हा ठाणे शहरातील नाट्यवर्तुळ चांगलेच विस्तारलेले होते. हौशी नाट्यसंस्थांमधून अनेक अभिनेते आपल्या अभिनय कौशल्याचे दर्शन घडवत होते. त्यामध्ये रजन ताम्हाणे, मधुसूदन ताम्हाणे, चंदा रणदिवे, अशोक साठे, बाळ परांजपे, चंद्रकांत वैद्य, मकरंद घारपुरे, प्रभाकर पाटणकर, अरुण वैद्य, धनंजय कुलकर्णी, बाबा खानविलकर, श्रीकर जोशी, अरविंद सहस्रबुद्धे अशी कितीतरी नावं सांगता येतील. यातील आवर्जून उल्लेख करायचा झाला तर रजन ताम्हाणेंनी 1974 आणि 1976 साली राज्य नाट्यस्पर्धेत ‘अपूर्णांक’ आणि ‘श्रीशिल्लक’ या नाटकांमधील भूमिकांसाठी अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळवले होते. तसेच कलासरगमचे विजय जोशी, नरेंद्र बेडेकर, दिलीप पातकर हे शिलेदार आपल्या अभिनयाचे झेंडे मिरवत होते.

ठाण्याच्या या हौशी नाट्यवर्तुळाला व्यावसायिक अभिनेत्यांची किनारही होती. 1961साली व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करणारा ठाणेकर अभिनेता म्हणजे दिनेश करमरकर. एल.आय.सी.मधील सुखाची नोकरी सोडून करमरकरांनी थिएटरची वाट धरली आणि त्यांची रंगयात्रा सुरू झाली. आयत्यावेळी फक्त एका दिवसाच्या तयारीवर अत्रे थिएटर्सच्या ‘मोरूची मावशी’ मध्ये कर्नल डोंगरेंची भूमिका करण्याची संधी चालून आली आणि करमरकरांनी त्या संधीचे सोने केले. मग ‘लग्नाची बेडी’, ‘बुवा तेथे बाया’, ‘मी मंत्री झालो’, ‘डॉ. लागू’, ‘ब्रह्मचारी’, ‘प्रीतिसंगम’, असा करमरकरांचा रंगप्रवास सुरू झाला. ‘देखणी बायको दुसऱयाची’, ‘काचेचा चंद्र’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘जास्वंदी’, ‘मृत्युंजय’, ‘दरोडा’, ‘सूर्यास्त’ अशी दिनेश करमरकरांची कला कारकीर्द आहे.

व्यावसायिक रंगभूमीवर सात दशकांची दीर्घ मजल पूर्ण करणारे ठाण्याचे अभिनेते म्हणजे रवी पटवर्धन. पटवर्धनांनी रंगभूमीवर पाऊल ठेवलं ते 1944 साली मुंबईत भरलेल्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्य महोत्सवामधून. त्यानंतर 1946 साली ‘कथा कुणाची व्यथा कुणा’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’ यातून भूमिका केल्या. 1964साली साहित्य संघाच्या ‘भाऊबंदकी’ मध्ये दुर्गा खोटे, नानासाहेब फाटक, केशवराव दाते, मामा पेंडसे या दिग्गजांबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली. नंतर मग ‘अपराध मीच केला’, ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘वाजे पाऊल आपुले’, ‘हॅम्लेट’, ‘मुद्रा राक्षस’, ‘चाणक्य’, ‘जबरदस्त’, ‘कौंतेय’, ‘बेकेट’, ‘आनंद’, ‘हृदय स्वामिनी’, ‘सुंदर मी होणार’, ‘साष्टांग नमस्कार’, ‘तुफानाला घर हवंय्’, ‘तुघलक’, ‘मला काही सांगायचंय्’ अशी रवी पटवर्धनांची रंगयात्रा आजही सुरू आहे. ‘शिवपुत्र शंभूराजे’ या महानाट्यात ते सध्या ‘औरंगजेबाची’ भूमिका करत आहेत. ‘कौंतेय’ नाटकातील त्यांचं दुर्योधनाचं काम पाहून तात्यासाहेब शिरवाडकरांनी ‘आज मला माझा खरा दुर्योधन सापडला,’ असे उद्गार काढले होते. रंगभूमीवर विविधरंगी भूमिकांचा आविष्कार आपल्या सशक्त अभिनयातून ठाशीवपणे करणारे रवी  पटवर्धन खऱया अर्थाने घराघरात पोहोचले ते दूरदर्शनवरील ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रमातील ‘गप्पागोष्टी’ मालिकेतील व्यक्तिरेखेमुळे. रंगभूमीप्रमाणेच मराठी-हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावरही रवी पटवर्धनांनी आपली अभिनय मुद्रा उमटवलेली आहे.

सत्तरच्याच दशकात ठाण्याच्या हौशी रंगभूमीवरून व्यावसायिकवर पोहोचलेलं आणखी एक नाव म्हणजे शशी जोशी. त्याचप्रमाणे दिनानाथ टाकळकर, माधव आचवल, सुधीर दळवी (‘साईबाबा’ फेम) हे व्यावसायिक रंगभूमीवर सातत्याने भूमिका करणारे कलाकारही ठाण्याचेच होते. हौशीवरून व्यावसायिक नाटकांकडे वळलेले आणखी एक कलाकार म्हणजे श्रीराम देव. श्याम फडके लिखित-दिग्दर्शित ‘विद्रोही’ या नाटकापासून 1969 साली श्रीराम देव यांनी अभिनेता म्हणून कारकीर्द सुरू केली. नंतर नाट्याभिमानीच्या ‘काका किशाचा’, ‘वेगळं व्हायचंय् मला’, ‘खरी माती खोटा कुंभार’, ‘बायको उडाली भुर्रर्र’, ‘पत्यात पत्ता’ या नाटकांमधून प्रामुख्याने नायकाच्या भूमिका साकारल्या. अशोक साठे दिग्दर्शित ‘अपूर्व बंगाल’ आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘मा अस साबरीन’ ही त्यांची उल्लेखनीय नाटके. व्यावसायिक रंगमंचावर ‘सौभद्र’मध्ये बलराम, ‘रणदुंदुभी’मध्ये कालकूट, ‘विद्याहरण’ यात त्यांनी भूमिका केल्या आहेत.

महाराष्ट्र विद्यालयात शिकत असल्यापासून लोकमान्य आळीच्या गणेशोत्सवात रंगमंचावर वावरणारा ठाण्यातील ज्येष्ठ कलावंत म्हणजे राजू पटवर्धन. राजूने खऱया अर्थाने नाटकात भूमिका केली ती मोरूकाका सहस्रबुद्धे यांच्या दिग्दर्शनाखाली राज्य नाट्यस्पर्धेतील ‘तुज आहे तुजपाशी’ मधून. त्यानंतर मग विक्रम भागवत लिखित ‘एक शून्य रडते आहे’, हिंदी कथेवर आधारित ‘अंत्य परिधान’ (यात राजूला अभिनयाचे बक्षीसही मिळाले होते.) ‘अश्मक’, ‘सप्तपुत्तुलिका’ अशी स्पर्धेची नाटके होत राहिली. 1981 साली अशोकजी परांजपे लिखित ‘सं. महानंदा’मधून राजून व्यावसायिकवर पदार्पण केले. ‘उंटावरचे शहाणे’, ‘प्रित महाभारत’, ‘भगवान गौतम बुद्ध’, ‘शपथ तुला जिवलगा’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘नटसम्राट’, ‘गारंबीचा बापू’ या नाटकांमधून राजूने आपल्या छोट्या भूमिका लक्षवेधीपणे साकारल्या. पृथ्वी थिएटर्सच्या ‘बस नकाब उठने तक’ आणि ‘तुमने पुकारा और’ या दोन हिंदी नाटकांमधूनही त्याने भूमिका केल्या आहेत. राज्य नाट्यस्पर्धेत जयवंत देसाईंच्या दिग्दर्शनाखाली ‘किरवंत’ नाटकातील भूमिकेसाठी राजूला पारितोषिक मिळाले आहे.

मराठी रंगभूमीवर तुफान लोकप्रिय ठरलेल्या ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या बाळ कोल्हटकरांच्या नाटकात आधी नाटकातील ताईच्या पतीची ‘अविनाश’ची आणि नंतर ताईच्या भावाची ‘सुभाष’ची भूमिका या दोन्ही भूमिका साकारणारा एकमेव कलाकार म्हणजे राजेंद्र पाटणकर. मूळ रत्नागिरीचा राजेंद्र नाटकात अभिनेता बनायचे स्वप्न घेऊन 1987मध्ये ठाण्यात आला. व्यावसायिक नाटकांमध्ये काम मिळते का, हे शोधताना बाळ कोल्हटकरांच्या ‘दुर्वांची जुडी’ मध्ये वर्णी लागली ती ‘अविनाश’च्या भूमिकेसाठी. त्यानंतर ठाण्याचे दिग्दर्शक केशवराव मोरे यांच्या दिग्दर्शनात रामकृष्ण केणी लिखित ‘पावनखिंड’ या नाटकात ‘प्रति शिवाजी – शिवा न्हावी’ ही भूमिका मिळाली. पण मतभेदांमुळे हे नाटक बारा प्रयोगातच थांबले. दरम्यान ठाण्याच्या मित्रसहयोग संस्थेच्या ‘लढाई’, ‘परिसस्पर्श’ या स्पर्धेच्या नाटकांमधून राजेंद्रचा कला प्रवास सुरू होता. 1992 मध्ये बाळ कोल्हटकर यांच्या शिफारशीमुळे व्यावसायिक रंगभूमीवर ‘सुभाष’ ही मुख्य व्यक्तिरेखा जवळपास 125 प्रयोगांत साकारण्याची संधी त्याला मिळाली. 1990पासून आजपर्यंत राजेंद्र आकाशवाणीवर निवेदक म्हणून कार्यरत आहे. नभोनाट्यांमधून तो आपल्या ‘वाचिक अभिनयाचं’ दर्शन घडवत (ऐकवत?) आहे.

हौशी नाट्यसंस्थांमध्ये बहुतेकवेळा कलाकार एकाच वेळी दोन जबाबदाऱया निभावत असतात. म्हणजे नाटकात काम करतानाच ध्वनिसंकेत, प्रकाशयोजना, नेपथ्य याकडेही तेच कलाकार बघत असतात. असं कायम दुहेरी भूमिकेत वावरणारं ठाण्याच्या नाट्यवर्तुळातलं नाव म्हणजे भास्कर पळणीटकर. आदर्श मित्र मंडळ, ठाणे या संस्थेतून पुढे आलेले पळणीटकर पार्श्वसंगीत-ध्वनी संकेत आणि संधी मिळेल तेव्हा भूमिका अशा दोन्ही रोलमध्ये वावरायचे. ‘असाही एक अभिमन्यू’, ‘तीन चोक तेरा’, ‘महापुरुष’, ‘स्टील फ्रेम’, ‘आंटी’, ‘खुनी पळाला काळजी नसावी’ या हौशी रंगमंचावरील नाटकांमध्ये आणि ‘देव नाही देव्हाऱयात’, ‘राजू तू खरं सांग’, ‘सं. मृच्छकटिक’, ‘सं. मदनाची मंजिरी’, ‘शरीरसंग’, ‘अय्या, इश्श गडे’ या व्यावसायिक रंगभूमीवरील नाटकात त्यांनी भूमिका केल्या आहेत.

ठाण्याच्या ‘पूर्णांक’ नाट्यसंस्थेमधून आपला अभिनय सादर करणारे अनंत भागवत हे मूळचे बॅडमिंटनपटू. बँक अॅाफ इंडियातील नोकरीमुळे बेलापूरला राहत असताना तिथल्या स्थानिकांनी बसवलेल्या ‘दिवा जळू दे सारी रात’ मधून अनंत भागवतांनी, आपल्या पत्नीसह माधुरी भागवतसह रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर ‘पूर्णांक’ चा ‘तुज आहे तुजपाशी’ (काकाजी), ‘प्रेमा तुझा रंग कसा’ (बल्लाळची भूमिका, दिग्दर्शन) ही नाटके केली. व्यावसायिक रंगभूमीवर ‘अप्रेंटिस नवरे पाहिजेत’, ‘ही वाट दूर जाते’, ‘जबरदस्त’ या नाटकांमध्ये भूमिका करण्याची संधीही त्यांना मिळाली. त्यानंतर शशी जोशींच्या दिग्दर्शनात ‘वेगळं व्हायचंय् मला’ आणि मामा पेंडसेंच्या मार्गदर्शनाखाली ‘सं. विद्याहरण’ या नाटकात भागवतांनी भूमिका केल्या. ‘यू बी दि जज’ या एकांकिकेचं भाषांतर करून, स्पर्धेत ती सादर केली आणि पारितोषिके मिळवली. बँकेतर्फे राज्य नाट्यस्पर्धेत ‘आज राबता बंद आहे’, ‘हाच खरा वारसदार’ या नाटकातून भागवतांनी भूमिका केल्या आहेत. पुढे ‘बॅडमिंटन’ या मूळच्या आवडीकडे लक्ष केंद्रित केल्यामुळे भागवतांची रंगयात्रा थांबली.

नृत्य, अभिनय, जादूचे प्रयोग, शॅडो शो अशा मनोरंजनाच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे माधव धामणकर. ‘शततारका’, ‘रक्त नको मज प्रेम हवे’, ‘एकच प्याला’, ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘लग्नाची बेडी’, ‘मृच्छकटिक’ या व्यावसायिक नाटकांप्रमाणेच ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’, ‘रडका राक्षस’, ‘जंतर मंतर पोरं बिलंदर’, ‘भूत माझा दोस्त’ या बालनाट्यांमधून धामणकरांनी भूमिका केल्या आहेत.

बालपणापासून रंगभूमीवर वावरणारा आणि दिग्दर्शक-अभिनेता म्हणून गेली 33 वर्षे नाट्य चित्रपटसृष्टीत वावरणारा ठाण्याचा कलाकार म्हणजे विनोद कुलकर्णी. राज्य नाट्यस्पर्धेत ठाणे केंद्रावर ‘पुरुष’, ‘प्रतिघात’, ‘अतिताचे दुवे’, ‘आतला आवाज’ या नाटकांचे दिग्दर्शन करणाऱ्या विनोदने राज्य नाट्यस्पर्धेत ‘पुरुष-गुलाबराव’, ‘काकस्पर्श-हरीदादा’, ‘प्रतिघात-नायक’ आणि ‘प्रयोग क्र. 999’ या नाटकांमधील भूमिकांसाठी अभिनयाचे पारितोषिक मिळवले आहे. कामगार कल्याणच्या नाट्यस्पर्धांमध्ये ‘देवनवरी’, ‘गहाण’, ‘कॉकी पॉपीची गोष्ट’, ‘परिसस्पर्श’ या नाटकांच्या दिग्दर्शनासाठी विनोदने पारितोषिके मिळवली आहेत. ‘अश्वत्थाची मुळे’, ‘देहसिमा’, ‘नामानिराळा’, ‘आदि अनादी अनंत’, ‘एक अभंग’ या एकांकिकांसाठी विनोदने दिग्दर्शन व अभिनयाची पारितोषिके मिळवली आहेत. विनोद कुलकर्णी या अभिनेत्याच्या अभिनय कौशल्याचा गौरव कुसुमाग्रज पुरस्कार, डॉ. काशिनाथ घाणेकर पारितोषिक, शांता जोग पारितोषिक, अनंत जोग पारितोषिक, व्ही. शांताराम पारितोषिक इ. पुरस्कारांनी करण्यात आला आहे. व्यावसायिक रंगभूमीवर ‘काय सांगतोस काय?’ या नाटकाचे दिग्दर्शन करणाऱया विनोदने ‘संत गोरा कुंभार’, ‘दुसरा सामना’, ‘नटसम्राट’, ‘पाऊलखुणा’, ‘षडयंत्र’, ‘खलनायक’, ‘आम्ही बिघडलो’, ‘भोळे डांबिस’, ‘हे वयच असं असतं’, ‘किमयागार’, ‘आम्ही शाळेत जाणार नाही’, ‘मोठी माणसं भांडतात का?’ या नाटकांमधून आपल्या अभिनयाचे रंग भरले आहेत.

ठाण्याच्या कलासरगमधून आपला रंगप्रवास सुरू करून आज व्यावसायिक नाट्य चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजे उदय सबनिस. विजय जोशीच्या दिग्दर्शनात ‘असायलम’ हे उदयनं केलेलं राज्य नाट्यस्पर्धेतलं पहिलं नाटक. त्यानंतर हे ‘कॅलिग्युला’, ‘अॅमॅडÎुयस’,‘विठ्ठला’,‘घनदाट’, ‘राधी’ ही स्पर्धेची नाटकं उदयने केली.

व्यावसायिकवर ‘सूर्याची पिल्ले’, ‘रात्र उद्याची’,‘जन्मगाठ’, ‘रण दोघांचे’, ‘भोळे डांबिस’, ‘निखारे’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘अखेर मी लक्ष्मी’, ‘ती आई होती म्हणुनी’, ‘तुमची मुलगी मजेत आहे’ अशी उदयची अभिनय कारकिर्द आजही सुरू आहे. मराठी चित्रपट, मालिकांबरोबरच हिंदी सिनेमातूनही झळकवणारा उदय सबनिस त्याच्या कमावलेल्या भरदार आवाजामुळे जाहिरातींच्या, डबिंगच्या क्षेत्रातली लोकप्रिय आहे.

ठाण्यातील ‘बालरंगायन’ संस्थेमुळे अभिनयाच्या क्षेत्रात आलेला आणि आता तिथेच स्थिरावलेला अभिनेता म्हणजे दुर्गेश आकेरकर. ‘हिमगौरी आणि सात बुटके’, ‘जादूचा शंख’, ‘आम्ही शाळेत जाणार नाही’, ‘दर्यावर्दी आणि काळा पहाड’ या बालनाट्यांमधून दुर्गेशने आपल्या अभिनय यात्रेला सुरुवात केली. त्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर ‘बायको पळाली माहेरी’, ‘जाणून बुजून’, ‘आमच्या या घरात’,‘तन मन’, ‘आहे मनोहर तरी’, ‘कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या’, ‘भांडा सौख्य आहे’, ‘आमची बटाटाची चाळ’, ‘गोलपिठा’ या नाटकांमधून विविध व्यक्तिरेखांमध्ये दुर्गेशने आपल्या अभिनयाचे रंग भरले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेतर्फे दुर्गेशने दिग्दर्शित केलेल्या ‘मस्तानी’ या नाटकाला व दिग्दर्शनाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

‘श्री दत्त साधना’ या आपल्या नाट्यसंस्थेतर्फे आणि ‘केळकर नाट्यसंपदा’ या केळकर कंपनीच्या सांस्कृतिक विभागातर्फे राज्य नाट्यस्पर्धा, कामगार कल्याण स्पर्धा आणि हौशी रंगमंच गाजवणारा निर्माता, दिग्दर्शक, कलाकार म्हणजे गजेंद्र गोडकर. केळकर नाट्यसंपदातर्फे गोडकरांनी ‘सूर्यास्त’, ‘बेईमान’, गाठ आहे माझ्याशी’, ‘सूर बदनाम’, 16 जानेवारीची काळरात्र’, ‘हा राष्ट्रीय सुरक्षिततेचा प्रश्न आहे’,‘स्पर्श अमृताचा’ इत्यादी नाटके दिग्दर्शित केली व त्यात भूमिकाही केल्या. कामगार कल्याण स्पर्धेत गोडकरांनी ‘बेईमान’मधील ‘धनराज’च्या भूमिकेसाठी अंतिम फेरीत पारितोषिकही मिळवले.

स्पर्धेच्या नाटकांमधून व्यावसायिककडे वळलेला आणि अनोख्या एकपात्री कार्यक्रमांचे सादरीकरण करणारा ठाण्याचा अभिनेता म्हणजे यतिन ठाकूर. आपल्या ‘मधुबिम्ब’ या संस्थेतर्फे स्पर्धेत नाटके सादर करता करता, यतिनने ‘ठकीचं लग्न’ हा विनोदी एकपात्री कार्यक्रम व्यावसायिक रंगभूमीवर आणला. त्यानंतर त्याने ‘रंगात रंगला श्रीरंग’ हा एकपात्री कार्यक्रम सादर केला. त्याचप्रमाणे ‘पहिली भेट’, ‘तुझ्या सवे तुझ्या विना’ या नाटकांची निर्मिती करून, त्यात भूमिका साकारली. नाट्यदर्पण पुरस्काराने गौरवलेल्या यतिनने व्यावसायिक रंगमंचावर ‘अश्रूंची झाली फुले’, ‘तुज आहे तुजपाशी’, ‘लग्नाची बेडी’, पक्के शेजारी’, ‘अनादी मी अनंत मी’, ‘थँक्स रेशम’, ‘पती गेले गं काठेवाडी’ या नाटकांमधून भूमिका केल्या आहेत.

व्यावसायिक रंगभूमीवर ‘वाऱयावरची वरात’, ‘बटाट्याची चाळ’, ‘तो मी नव्हेच’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘बेचकी’, ‘टॉस’ अशी अनेक नाटकांमधून विविधरंगी भूमिका करणारा विघ्नेश जोशी ठाण्याचाच रहिवासी आहे. विघ्नेश त्याच्या स्वतच्या ‘वसंत वलय’ या संस्थेतर्फे ‘हसत खेळत’, ‘विरंगुळा’, ‘मानवंदना’ असे कार्यक्रमही सादर करतो.

नाट्यप्रेमाचा आणि अभिनयगुणांचा वारसा उपजतच लाभलेला ठाण्याचा युवा रंगकर्मी म्हणजे संग्राम समेळ. वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षी संग्रामने एका मराठी मालिकेत आशालता वाबगावकर यांच्यासह काम केले. नंतर 11 वर्षांचा असताना संग्राम भक्ती बर्वेंबरोबर एका मालिकेत झळकला. ऋग्वेद संस्थेच्या ‘मी कुमारी अरुणा’ या नाटकातील भूमिकेसाठी संग्रामला राज्य नाट्यस्पर्धेत अभिनयाचे प्रशस्तीपत्रक मिळाले आहे. त्यानंतर वडील अशोक समेळ यांच्या लेखन, दिग्दर्शनाखाली संग्रामने ‘केशव मनोहर लेले’ या भावनानाट्यात प्रमुख भूमिका करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. संग्रामच्या अभिनय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या नाटकातील स्वामी विवेकानंदांची भूमिका. अभिनयाबरोबरच दिग्दर्शनातही रस असलेल्या संग्रामने ‘सावल्या’ या नाटकामध्ये स्वतचे वडील आणि ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांना दिग्दर्शन केले आहे.

एकीकडे नोकरीची चाकोरी सांभाळायची आणि संधी मिळताच रंगभूमीवर कामगिरी बजावायची, अशा प्रकारे आपली अभिनयाची हौस पूर्ण करणाऱया रंगकर्मींपैकी एक म्हणजे प्रवीण जोशी. बँकेत नोकरी करता करता जोशींनी लिटल थिएटर, कलायतन, स्वरगंधा, सन्मित्र कलाकेंद्र, नाट्याभिमानी या संस्थांमधून अभिनयही केला. ‘ठोशास ठोसा’, ‘मला काही सांगायचंय्’, ‘रायकडाला जेव्हा जाग येते’, ‘काका किशाचा’, ‘तीन चोक तेरा’, ‘घालीन लोटांगण’, ‘सिंहगर्जना’, ‘मायबाप’,‘उचक्या’ (बहुपात्री) इत्यादी नाटकांमधून प्रवीण जोशींनी अभिनय केला आहे.

सिव्हील इंजिनियर म्हणून स्वतच्या व्यवसायात स्थिरावलेला असतानाच, जमेल तेव्हा हौशी नाट्यसंस्थेपासून ते दूरदर्शन मालिकेपर्यंत संधी मिळेत तिथे आपले अभिनय कौशल्य प्रकट करणारा उद्योजक अभिनेता म्हणजे ठाण्याचा सतीश आगाशे. महाविद्यालयीन स्नेह संमेलनात सतीशने आपल्या चेहऱयाला रंग लावला आणि मग नाटकात काम करायची जणू त्याला चटकच लागली. नाट्याभिमानी, नाट्य परिषद, ठाणे शाखा या संस्थांच्या नाटकांमधून, एकांकिकांमधून अभिनय करता करता सतीशने व्यावसायिकवर शिरकाव करून घेतला.सध्या सतीशची भूमिका असलेली दोन नाटके ‘इंदिरा’ आणि ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ रंगभूमीवर सुरू आहेत. आजवर वेगवेगळ्या सातशे नाट्यप्रयोगांमधून अभिनय करणारा सतीश दूरदर्शन मालिकांमध्येही झळकताना दिसतो.

ठाणेकर अभिनेत्यांच्या यादीमधलं एक जुनं-जाणतं नाव म्हणजे ‘लिलाधर कांबळी’. बेरकी म्हाताऱयापासूनते विनोदी व्यक्तिरेखेपर्यंत विविध प्रकारच्या भूमिका लिलाधर कांबळी यांनी अगदी सहजतेने साकारल्या आहेत. ‘वात्रट मेले’,‘वस्रहरण’मधील लिलाधरजींचा ‘कडक’ अभिनय प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत.

ठाण्यातील अभिनेत्यांच्या ताज्या फळीतील एक ठळक नाव म्हणजे ‘अंगद म्हसकर’. महाविद्यालयीन एकांकिकांकडून व्यावसायिक रंगभूमीकडे प्रवास करणाऱ्या अंगदने काही वर्षांपूर्वी मराठी मालिकेत ‘बाजीराव पेशवे’ साकारला होता. व्यावसायिक रंगभूमीवर ‘ती फुलराणी’, ‘रणांगण’, ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’, ‘ऑल द बेस्ट’, ‘गारंबीचा बापू’, ‘गिधाडे’ आणि सध्या सुरू असलेलं ‘तिन्हीसांज’ असा अंगदचा रंगप्रवास आशादायी आहे.

ठाण्याच्या नाट्यवर्तुळातून रंगभूमीच्या मुख्य प्रवाहात पोहोचलेला युवा रंगकर्मी म्हणजे प्रशांत विचारे. एकांकिका  स्पर्धेमधून दिग्दर्शन आणि अभिनयाची अनेक पारितोषिके मिळवणाऱया प्रशांतने व्यावसायिक रंगभूमीवर ‘वंदे मातरम्’,‘आमच्या या घरात’, ‘यदा कदाचित’, ‘कमळीचं काय झालं’, ‘निघाले आज तिकडच्या घरी’, ‘लोच्या झाला रे’, ‘ढँड ढॅण’,‘पुन्हा सही रे सही’ या नाटकांमधून भूमिकेसाठी त्याला 2011सालचे झी अॅवॉर्ड मिळाले होते. ‘कुणासाठी कुणीतरी’, ‘आता आपणच’, ‘दिसतं तसं नसतं’ या नाटकांचे दिग्दर्शन करणारा प्रशांत विचारे मराठी सिनेमांमधूनही झळकताना दिसतो.

रुढार्थाने अभिनेता नसूनही, आता ठाण्याच्या कलाकारांच्या यादीत आवर्जून घ्यावं असं नाव म्हणजे आमदार संजय केळकर. ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या विवेकानंदांवरील चरित्र नाटकात संजयजी ज्या सहजतेनं स्वामी रामकृष्ण परमहंस रंगमंचावर साकारतात ते पाहिल्यावर ह्या नेत्याने खरंतर अभिनेताच व्हायला हवं होतं असा विचार प्रेक्षकांच्या मनात येऊन जातो.

ठाण्याचे उत्कृष्ट व्यंगचित्रकार  विवेके मेहेत्रे धमाल एकपात्री कार्यक्रमही सादर करतात. हास्ययात्रा या विषयावरचा भारतातला पहिला विनोद डिजिटल शो ‘हास्य कॉर्नर’, चीनमधील अद्भूत भविष्य पद्धती उलगडून दाखवणारा ‘राशी वर्ष’, भारतीय राशी भविष्यावरील हसता गाता ‘राशींच्या संगतीने’, ‘आयुष्य जगूया गंमतीने’, प्रेरणादायी ‘चला, यशस्वी होऊ या’ या कार्यक्रमांचे शेकडो प्रयोग विवेक मेहेत्रे यांनी सादर केले आहेत.

नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने ठाण्यातील अभिनेत्यांचा आढावा घेत असताना, आपली रंगयात्रा अर्ध्यावर सोडून जगाच्या रंगभूमीवरून अचानक एक्झिट घेणाऱया काही ठाणेकर अभिनेत्यांची आठवण होणं अपरिहार्य आहे. त्यातलं एक वलयांकित नाव म्हणजे ‘चंदू पारखी’. मूळचे इंदोरचे चंदूभैय्या अभिनयाच्या ओढीने मुंबईला आले आणि मराठी रंगभूमीवर स्थिरस्थावर होताच ठाण्यात विसावले. कधी खलनायकी ढंगाची व्यक्तिरेखा, कधी विनोदी अर्कचित्र कधी कारुण्याचा स्पर्श असलेली व्यक्तिरेखा, चंदुभैय्यांनी आपल्या रंगयात्रेत मराठी व्यावसायिक नाटकांमधून विविध प्रकारच्या भूमिका करून नाट्य रसिकांची दाद मिळवली. मात्र रंगभूमीवर आपल्या अभिनय कौशल्याचा आविष्कार दाखवणारे चंदूभैय्या घराघरात पोहोचले ते टीव्ही सिरिअलमधील ‘मदनबाण’ या व्यक्तिरेखेमुळे. हिंदी, मराठी चित्रपटांमधूनही त्यांनी मस्त भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या आकस्मिक निधनाने मराठी रंगभूमी एका उत्तम अभिनेत्याला मुकली.

अचानक एक्झिट घेऊन ठाण्याच्या नाट्यवर्तुळाला चटका लावणारा अभिनेता म्हणजे दिलीप पातकर. कलासरगमच्या नाट्यसंस्कारात वाढलेला दिलीप उत्तम अभिनेता आणि उत्तम दिग्दर्शकही होता. आपल्याला मिळालेली भूमिका लहान असो वा मोठी, ती मनापासून, चोख सादर करायची आणि नाटकाच्या परिणामकारकतेत भर घालायची हा दिलीपचा नाट्यमंत्र होता. राज्य नाट्यच्या नाटकांमध्ये लहानशी, अगदी एखाद्या प्रसंगापुरतीच भूमिका मिळाली तरी त्यात आपल्या अभिनयाचे असे रंग दिलीप भरायचा की  त्याला हमखास अभिनयाचे बक्षिस मिळून जायचे. ‘असायलम्’, ‘अॅमॅडÎुअस’, ‘विठ्ठला’ या कलासरगमच्या नाटकांमधून भूमिका करणाऱया दिलीपने ‘अनंग देही’चे दिग्दर्शन केलं होतं. त्याचबरोबर ‘रात्र थोडी सोंगे फार’, ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘तेचि वासू ओळखावा’, ‘डार्लिंग डार्लिंग’ हे फार्स फर्मासपणे दिग्दर्शित करून, कॉमेडी ही आपली खासियत असल्याचे दाखवून दिले होते. जाणिवपूर्वक व्यावसायिक रंगभूमीवर पूर्णवेळ अभिनेता म्हणून काम करण्याचे टाळणारा दिलीप अचानक या जगातूनच निघून गेला आणि त्याची रंगयात्रा अधुरीच राहिली.

व्यावसायिक रंगभूमीवर गाजण्याची क्षमता असलेला आणि नियतीच्या फटकाऱयामुळे ते स्वप्न अपुरे ठेवून निघून गेलेला ठाण्याचा अभिनेता म्हणजे विलास भणगे. आजही हे नाव उच्चारले की ठाण्याच्या नाट्यरसिकांना आठवते विलासचा भारदार, भारदस्त, प्रभावी आवाज. या आवाजालाच जोड होती संवेदनशील अभिनयाची. सखाराम भावे दिग्दर्शित ‘मायबाप’ या नाटकातून. विलासने रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यानंतर एकच प्याला, बेबंदशाही, मृच्छकटिक यातील भूमिका करता करता त्याला साहित्य संघाच्या ‘आग्र्याहून सुटका’ या नाटकात दाजी भाटवडेकरांबरोबर काम करायची संधी मिळाली. चंद्रलेखाच्या ‘रात्र उद्याची’ या नाटकातील भूमिकेद्वारे विलासने खऱया अर्थाने व्यावसायिकवर पदार्पण केलं. त्यानंतर ‘संगम’, ‘आकाशमिठी’, ‘आर्य चाणक्य’ अशी त्याची कारकीर्द सुरू होती. पण नियतीच्या मनात काही निराळंच होतं. 1991 साली अचानक विलास भणगेने या जगाचा निरोप घेतला. आपलं ‘नटसम्राट’साकारण्याचं स्वप्न पूर्ण न करताच अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला.

ठाण्याच्या नाट्यवर्तुळात चमकणारा, मित्रसहयोगचा एकनाथ शिंदेदेखील असाच चटका लावून गेला. आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवणारा एकनाथ जितका उत्तम अभिनेता होता, तितकाच चांगला गायकही होता. व्यावसायिक रंगभूमीवर ‘गंध निशिगंधाचा’, ‘लाली लिला’ या नाटकांमधून आपल्या शैलीदार अभिनयाचे दर्शन घडवणारा हा अभिनेता तरुण वयातच आपली रंगयात्रा अधुरी सोडून गेला. याशिवाय हरिहर सहस्रबुद्धे, अरुण वैद्य, धनंजय कुलकर्णी, आशिष राजे, कैलास बनकर या दिवंगत कलाकारांचे  स्मरणही आज होत आहे.

नव्वदच्या दशकात ठाण्यात आम्ही युवककला, चिन्ह-ठाणे, पुअर अॅक्टर्स क्लब अशा संस्थांच्या माध्यमातून एकांकिका, अभिनय स्पर्धा वगैरे होत. पुढे यातून काम करणारा सारेच हौशी कलाकार रंगयात्रेच्या विविध प्रवाहात दाखल झाले. त्यापैकी अशोक कार्लेकर, नितीन शहाणे, महेन्द्र कोंडे, दीपक दळवी, विनोद पितळे, निशिकांत महांकाळ, स्वप्नील कोळी, रत्नपाल जाधव वगैरे मंडळी आजही सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

ठाण्यातच वाढलेले, घडलेले अभिनेते आहेत, त्याप्रमाणे बाहेरगावाहून येऊन ठाणेकर झालेले अभिनेतेही बरेच आहेत. त्यातील व्यावसायिकवरचे ठळक नाव म्हणजे सागर तळाशिलकर. कोल्हापूरचा सागर तिथल्या ‘प्रत्यय हौशी नाट्यकला केंद्र’ या संस्थेत घडला. तिथल्या अनेक नाटकांमधून अभिनय आणि दिग्दर्शन करणारा सागर गेली पंचवीस वर्षे व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत आहे. ‘राजा लिअर’, ‘वेटिंग फॉर गोदो’, ‘पाहिजे जातीचे’, ‘ऐन वसंतात अर्ध्या रात्री’, ‘डबलगेम’, ‘रंगनायक’ अशी मोठी नाट्ययादी असलेल्या सागरने नाट्यदर्पण, झी गौरव, राज्य शासनाचे अनेक पुरस्कार मिळवले आहेत.

मराठी रंगभमीवर गेली पंचेचाळीस वर्षे आपल्या अभिनयाचे पैलू दाखवणारे ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकरही आता ठाणेकर झाले आहेत. ठाण्याच्या अभिनेत्यांची यादी खरोखरच न संपणारी आहे. ठाण्याच्या ग्लॅमरस, वलयांकित अभिनेत्यांची यादीही फार मोठी आहे. उल्लेख करायचाच झालातर संजय जाधव, अभिजीत पानसे, शेखर फडके, संतोष जुवेकर, चिन्मय मांडलेकर, आशिष कुलकर्णी, मिलिंद सफई, सुनील गोडसे, संजय नार्वेकर, संजय खापरे, संतोष पवार, रमेश चांदणे, नयन जाधव, मंगेश देसाई, संतोष सराफ  अशी कितीतरी नावे सांगता येतील. विस्तार भयास्तव या लेखात प्रातिनिधीक कलाकारांचाच समावेश केला आहे. त्यामुळे हा लेख एका परीने अपूर्णच आहे आणि त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

विजय जोशी (सन्मित्र), सुधाकर फडके, विद्या साठे, मोहन जोशी, सौ. कीर्ती केरकर, भाऊ डोके आणि अनेक नाट्यप्रेमींनी महत्त्वाची माहिती देऊन ही स्मरणिका समृद्ध करण्यास हातभार लावला आहे.

साभार- ठाणे रंगयात्रा २०१६.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..