नवीन लेखन...

मजल-दरमजल ६५०

सुप्रसिद्ध मुलाखतकार आणि निवेदक अशोक शेवडे यांच्या ‘सूर तेच छेडिता’ या कार्यक्रमाच्या अनेक प्रयोगात मी गायलो. माझ्याबरोबर मनोज टेंबे, मीनाक्षी गुणाजी, अलोक काटदरे, नीलाक्षी पेंढारकर, पुष्पा पागधरे असे अनेक कलाकार असायचे. निवेदनात अशोकजींच्या बरोबर प्राची देवस्थळी असायच्या. अशोकजींचे किस्से, विनोद आणि इतक्या कलाकारांच्या सहवासामुळे या कार्यक्रमाला एक वेगळीच मजा यायची. ठाण्याच्या विद्या प्रसारक मंडळाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल झालेल्या समारंभात माझे गाणे झाले. लवकरच मुंबई युनिव्हर्सिटीसाठी मी हिंदी गझलची मैफल आणि त्यावरील चर्चासत्र असा कार्यक्रम केला. हा माझा ६५० वा जाहीर कार्यक्रम होता. धीरे धीरे मगर निश्चित रूपसे माझी ‘मुक्काम पोस्ट एक हजार’च्या दिशेने वाटचाल सुरू होती. मंजिल अजूनही बरीच दूर होती. पण गुरुजनांचा आणि आईवडिलांचा आशीर्वाद पाठीशी होता. माझी पत्नी प्रियांका आणि दोन्ही मुली शर्वरी आणि केतकी यांचा भावनिक पाठिंबा होता. वादक मित्रांची मोलाची साथ होती आणि अगणित रसिक श्रोत्यांचा आधार होता. त्यामुळे आत्मविश्वास मात्र खूपच वाढला होता.

गाण्याच्या कार्यक्रमांबरोबरच आमची केमिकल कंपनी व्यवस्थित सुरू होती. दोन नवीन जागा मी विकत घेतल्या होत्या. शेअर मार्केटमध्ये ऑप्शन्स अँड फ्यूचर्स ट्रेडींग सुरू झाले होते. पण त्यात गुंतवणुकीसाठी फक्त आर्थिक कंपन्यांना परवानगी होती. या क्षेत्रात काम करण्यासाठी माझा मित्र उमेश गद्रे याच्याबरोबर मी आर्थिक कंपनी सुरू केली. शेअर बाजार हे काम करण्यासाठी माझे आवडीचे क्षेत्र होते. या नव्या कंपनीमुळे आम्ही आर्थिक उलाढाल बरीच वाढवू शकलो.

कविवर्य निरंजन उजगरे माझे चांगले मित्र होते. त्यांचा पहिला कवितासंग्रह माझ्या आई-वडिलांनी निशीगंध प्रकाशनतर्फे प्रकाशित केला, तेव्हापासून आमचे जवळचे संबंध होते. माझ्या गाण्याचे ते चाहते होते आणि पहिल्या कार्यक्रमापासून आजपर्यंतच्या माझ्या गायनक्षेत्रातील वाटचालीचे ते साक्षीदार होते. काहीतरी निराळे करायचे हा त्यांचा ध्यास होता. संत कबीरांच्या रचनांचा त्यावेळी मी अभ्यास करत होतो. एकदा त्यासंदर्भात आमची चर्चा झाली. निरंजनजी फारच खूष झाले आणि अखिल महाराष्ट्र युवा संमेलनासाठी गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात त्यांनी माझा संत कबीरजींच्या भजनांचा खास कार्यक्रम आयोजित केला. उषा तांबे यांचाही या आयोजनात मोलाचा वाटा होता.

६ जानेवारी २००५ रोजी कोकण मराठी साहित्य संमेलनानिमित्त आयोजित कला महोत्सवामध्ये मी गझलचा कार्यक्रम सादर केला. दुसऱ्याच दिवशी ७ जानेवारी २००५ रोजी कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या सुरूवातीसाठी लिहिलेले खास स्वागत गीत आणि कोकण गीत मी गायले. जानेवारीतच पुण्याला एक गझलचा जाहीर कार्यक्रम केला. त्सुनामी रिलीफ फंडासाठी ठाण्यातील सर्व कलाकारांनी मिळून एक जाहीर कार्यक्रम केला. हा कार्यक्रम रात्री संपवून दुसऱ्या दिवशी पहाटेच मी औरंगाबादला रवाना झालो. त्या रात्री अखिल भारतीय मराठी गझल संमेलनामध्ये माझा गझलचा कार्यक्रम झाला. मराठी गझलचे नामवंत गायक भीमराव पांचाळे यांची भेट झाली. भीमरावांबरोबर गझलवर चर्चा करणे ही आनंदाची पर्वणी असते. भीमरावांनी एका व्यक्तीशी माझी ओळख करून दिली. ते होते गझलकार दिलीप पांढरपट्टे. काही दिवसांपूर्वीच ‘ऋतुरंग संगतीला’ या सीडीसाठी मी त्यांची गझल रेकॉर्ड केली होती. पण त्यांची प्रत्यक्ष भेट आज होत होती. “ठाण्याला गेल्यावर सावकाशीने भेटू. घरी जेवायलाच या,” दिलीपजी म्हणाले. “आपणही ठाण्यालाच राहता?” मी विचारले. “अहो, मी ठाणे महानगरपालिकेचा डेप्युटी कमिशनर आहे.” मी चाटच पडलो. इतक्या मुलायम गझल लिहिणारा हा गझलकार दिवसभर महापालिकेच्या रूक्ष फाईल्स हाताळत असेल, असे मला स्वप्नातदेखील वाटले नव्हते.

व्हीपीएम पॉलिटेक्नीक आयोजित करिअर फेअरसाठी संगणकतज्ञ अच्युत गोडबोले यांच्याबरोबर मला आमंत्रित करण्यात आले. संगणक क्षेत्रातील संधींबाबत अच्युत गोडबोले बोलले आणि साऊंड टेक्नॉलॉजी आणि म्युझिक इंडस्ट्रीतील संधींबाबत मी भाषण केले. भाषण संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी गाण्याचा आग्रह केला. तेव्हा एक गाणे त्यांच्यासाठी गायलो. अच्युत गोडबोले गंमतीने म्हणाले, “अनिरुद्ध, तुझं हे बरं आहे की भाषणाचा शेवट तू गाण्याने करू शकतोस. आम्ही काय करायचं?” मी त्यांना म्हणालो, “अहो, तुमचे भाषण इतके परिणामकारक असते की इतर काही करण्याची तुम्हाला गरजच रहात नाही. एक मात्र इथे मी मान्य करतों की गाण्याइतकेच मला भाषण करायला, थोडक्यात बोलायलाही आवडते. गप्पा-संवाद आणि किस्से मला अत्यंत प्रिय आहेत. नातेवाईक आणि विशेषतः मित्रमंडळींबरोबर रात्रभर गप्पा मारणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब असते.

डॉ. शुभा चिटणीस ‘यशवंत’ या पुस्तकाचे लिखाण करीत होत्या. त्यासाठी त्या अनेकांच्या मुलाखती घेत होत्या. एक दिवस त्यांनी माझी मुलाखत घेतली. अनेक मान्यवरांच्या मुलाखतींमधून “यशवंत’ हे त्यांचे पुस्तक आकार घेत होते. ‘परचुरे प्रकाशन मंदिर’ या प्रख्यात प्रकाशन संस्थेतर्फे १० एप्रिल २००५ रोजी गडकरी रंगायतन, येथे या पुस्तकाचे भव्य प्रकाशन झाले. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, अरुण गुजराथी, महापौर राजन विचारे यांच्या उपस्थितीत मी गाणे सादर केले. कारण यशवंत पुस्तकाचा मी एक भाग होतो. गझलगायक अनिरुद्ध जोशी असा माझ्यावरील लेख या पुस्तकात होता. ही गोष्ट माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत होती. याबद्दल मी डॉ. शुभा चिटणीस यांचा कायम ऋणी राहीनच. पण अजूनही एका गोष्टीसाठी मी त्यांचा आभारी राहीन. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांबरोबर त्यांनी मला समाविष्ट केले होते. याच दिवशी ‘जगावेगळ्या’ या त्यांच्या पुस्तकाचेही प्रकाशन झाले. त्यासाठी एक खास गाणे संगीतकार विनय राजवाडे यांनी माझ्या आवाजात रेकॉर्ड केले होते. एकूणच हा दिवस मला बरेच काही देऊन गेला.

-अनिरुद्ध जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..