नवीन लेखन...

आठवणींची मालिका

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व  दिवाळी २०२२ ह्या विशेषांकात प्रकाशित झालेला डॉ. वसंत भूमकर यांनी लिहिलेला लेख)

वय वाढत जातं तसं एकेक जवळच माणूस दुरावतो. वर्षानुवर्षे असलेली साथसंगत हरवते. एकटेपण कधी मनाला बोचते. तर कधी काहीशा गमतीदार प्रसंगानाही सामोरे जावे लागते. अशाच काही भावनाशील, प्रेमळ अनुभवांचा कोलाज!

त्या रात्री….

एकटाच आहे. मी सोडून मजल्यावर कोणीच राहायला आलेलं नाही. तसं शेजारच्या फ्लॅटमध्ये काम सुरू असतं, मला झोप लागेपर्यंत तरी त्यांचा आवाज येत असतो, तितकीच जाग, पण आज त्यांचीही सुट्टी आहे. 18 मजल्याच्या बिल्डिंगमध्ये 7-8 जणंच आलेले आहेत, बाकी आख्खी बिल्डिंग रिकामी.

समोरच्या गावातली माणसं फटाके वाजवून आता झोपायला लागलीत. शेजारच्या वाहत्या रस्त्यावर पण वाहनं तुरळकच दिसतायंत. सारं काही एकाकी एकटेपणानी शांततेच्या पंजात जखडून गेलंय.

एकेक लाईट बंद करत बेडरूममध्ये आलो. बाहेरच्या खोलीत सावल्या हलत होत्या. अजून तग धरून राहिलेली एकुलती एक पणती प्राणपणाने झुंजत तेवत राहिली होती. तिच्या आसपासच्या वस्तूंच्या सावल्या हलत हलत जणू तिला भिववीत होत्या. ते सोडून सारं काही थिजल्यासारखं भासत होतं.

आडवा झालो डोळे मिटले खरे पण मनावर अनामिक भयाचं सावट पसरलं होतं. एकटेपणानी कधी नव्हे ते एकाकीपणाची झुल पांघरली होती. अस्वस्थ वाटायला लागलं काहीसं असहाय वाटायला लागलं. रात्रीची वेळ आसपास कुणी नाही, मोठ्या मोठ्याने ओरडलो तरी कोणाला ऐकू सुद्धा जाणार नाही. आणि…आणि अशा वेळी कुणी आलं तर….? दार वाजवलं, उघडल्यावर भसकन आत आला आणि गळ्यावर….नुसत्या कल्पनेनंच थरथरलो. गपकन उठून बसलो, छातीत धडधड वाढली. भीतीच्या लहरी नसानसात थैमान घालू लागल्या…. काय करायचं…कोणाला सांगायचं…फोन करायचा…? त्यांना काय सांगणार…? एकटेपणानी घाबरलो आहे म्हणून…? आणि सर्वात जवळचा माणूस 4-5 किमी अंतरावर….पूर्ण पूर्ण असहाय वाटायला लागलं.

तसाच लडबडत्या पावलांनी उठलो किचनमध्ये गेलो, पाण्याची बाटली तोंडाला लावली. पाण्याच्या घोटाचा आवाज केव्हढा तरी मोठ्ठा वाटायला लागला.

आणि नंतर.. नंतर सारं गप्प शांत…धपापणाऱ्या उराचा आवाज पण येईनासा झाला. जशी निःशब्दता सारं काही गिळून पुन्हा घात लावून बसली होती.

बेडरूमकडे वळलो आणि प्रचंड दचकलो. दारा बाहेरून आवाज येत होता, जणू काही कोणीतरी चालत दारापर्यंत आलं होतं. माझे डोळे विस्फारले, पाय लटलटायला लागले. तरी पण ऐकत राहिलो संमोहित झाल्यासारखं. पावलांचा आवाज थांबला. बराच वेळ गेला, काही नाही पुन्हा शांततेनी सारं काही गिळलं. आणि अचानक पुन्हा आवाज आला, जणू कोणी चुना तंबाखू मळतंय आणि हलक्या टाळ्या मारत मळलेली तंबाखू साफ करतंय. एकदा…दोनदा…तीनदा…आवाज सुरूच होता आणि…आणि त्याच्या जोडीला कुणाचा तरी कुजबूजता स्वर ऐकू आला.

मग मात्र मी पूरा गर्भगळीत झालो. काय करायचं…? वॉचमनला फोन करावा तर बिल्डिंग अगदीच नवीन आहे. वॉचमन नसतो… इंटरकॉम सुरू नाही. डोक्यात घणाचे घाव पडल्यासारखं वाटायला लागलं. काय…काय…काय…? काही सुचत नव्हतं. मग मात्र असला नसला धीर एकवटला. म्हटलं व्ह्यू फाईंडर मधून बघूया तरी….एकेक पाऊल, एकेक पाऊल टाकत अजिबात आवाज न करता व्ह्यू फाईंडर मधून पाहिलं.

बाहेर दाराकडे पाठ करून कोणीतरी उभं होतं. थरथरायला लागलो, घशाला कोरड पडली. पुन्हा पाहिलं, तो तसाच उभा होता. उंच निंच, खूपच उंच. त्याचा दंड व्ह्यू फाईंडर समोर आला होता इतका उंच…अधून मधून तंबाखू मळल्याचा आवाज सुरू होताच. छातीत धडधड वाढली होती. नाका तोंडापर्यंत भीतीत बुडालो होतो… मध्येच तंबाखू मळल्याचा आवाज, जोडीला खूप अस्पष्ट पण बेचैन करणारी कुजबूज. मी दाराशी थिजलो होतो. राहून राहून हात कडी कडे जात होता. वाटत होतं, सरळ दार उघडावं आणि काय हवं विचारावं…पण तो नक्की कोण आहे? नक्की माणूसच ना…? मग इतका उंच कसा?…इतका स्तब्ध कसा किंचितही न हलता…पोपटीसर हिरवट शर्ट आहे…पूर्ण गच्च भरलेलं शरीर, दंडावरून खूप तगडा वाटतोय…कोण आहे?…काय आहे?…या जागेत माझा दुसरा तिसराच दिवस आहे…हा एरिया काय आहे कसा आहे माहीत नाही…बिल्डिंगच्या जमिनीवर आधी काय होतं…? छोटी छोटी गावं असणार, समोर छोटंसं गाव आहेच. ही गाववाली माणसं घरात कोणी मेलं की दारा समोरच्या शेतात त्याचा….विचारांनी डोक्याचा भुगा पडत होता…गप्प मागे जाऊन बेडवर पडावं… पण नंतर दार वाजलं तर काय करायचं?…डोळ्यांची पापणी न हलवता व्ह्यू फाईंडर मधून पहात होतो…तो हलत कसा नाही….इतका वेळ न हलता डुलता कोणी कसं उभं राहू शकतं….? धडधडणारी छाती, भीतीने आवळलेलं शरीर आणि तारवटलेली नजर…शांततेनी वेळ पण गिळला की काय…

आणि…आणि…आणि…मनावरचा ताण अचानक झरकन उतरला, शरीर सैलवलं, नजर निवली…

कळलं बाहेर असलेलं ’ते’ काय आहे…आपसूक हात कडीवर गेला दार उघडलं….दारावरचं तोरण एका बाजूनी सुटलं होतं. तोरणा मधल्या आंब्याच्या पानांनी व्ह्यू फाईंडर अर्धवट झाकला गेला होता. आतून पाहताना वाटत होतं जसा कोणाचा दंड आहे. वाऱ्याच्या झुळकेनी तोरण हलकेसे हलत होते, दारावर घासत होते. भ्यायल्या मनानी त्या आवाजाला नाव, रंग, रूप सारं दिलं प्रसंग दिला…लटकत्या तोरणाकडे बघत हसत राहिलो… ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं, अशा वेड्या प्रसंगापासून पूर्ण जीवनाला कुठेही लागू पडतं नाही….

तू भ्रमत आहासी वाया।
शस्त्री हाणीतलीया छाया॥

*-*-*-*-*-*-*-*

बर्फी

एक झेंडूचं फूल, त्या बाजूला आंब्याचं पान, पुन्हा झेंडू पुन्हा पान एका ओळीत मांडून ठेवली त्यांनी. खूप छान दिसत होती माळ.

भरपूर फुलं आहेत, आणखी एक माळ बनवूया…तिच्यासाठी….. नुसत्या विचारांनी पण तो शहारला, बावरला. ‘एकच माळ बनवू या’, त्याचा त्यानेच निर्णय घेतला. पण दोन माळा बनविण्याच्या विचारांना कुरवाळत कुरवाळत तो माळ गुंफू लागला. पार गुंग झाला होता तो फूल पान पुन्हा फूल ओवण्यात. तोच सावली पडली, दारात कोणीतरी आलं होतं. त्यांनी मान वर केली.

समोर ती… अबोली रंगाचा पंजाबी ड्रेस, पांढरी ओढणी, कपाळावरच्या टिकलीखाली उमटवलेली हळद-कुंकवाची बोटं. नुकत्याच न्हायलेल्या कुरळ्या केसांतून पाण्याचे थेंब ड्रेसवर ओघळत होते. एक आगळा दरवळ आसमंतात दरवळत होता.

त्याचं काळीज लकाकलं. अनिमिष नजरेने तो तिच्याकडे पाहत होता.

‘सुई बोचेल,’ ती बोलली. तो किंचितसा बावरला.

‘ठेव ती माळ खाली आणि सुई सतरंजीला टोचून ठेव.’

त्यानं माळ खाली ठेवली आणि तसाच उभा राहिला तिच्याकडे पाहत.

नितांत सुंदर… ओठ कळेल-नकळेलसे पुटपुटले…

‘फराळ….’ ती खोलवर त्याच्या नजरेत पाहत खट्याळ हसली.

ताटली देताना बोटांचा स्पर्श झाला आणि सर्वांगात वीज सळसळून गेली.

‘तू….तू….’ शब्द शब्दात अडखळले.

‘नको बोलूस काही.. तुझ्या अगोदर तुझे डोळे सारं काही बोलून टाकतात.’ ती मोकळेपणाने हसली.

त्याने सारा धीर एकवटला आणि ताटलीमधली बर्फी उचलली, हळूच तिच्या ओठांकडे नेली. तिने पटकन हात पुढे करत बर्फी धरली. त्याचा चेहरा झरकन उतरला.

पुढे काय होणार आहे हे कळायच्या आधी ‘तोंड पाडत जाऊ नकोस’ तिने दटावलं.

त्याचा चेहरा आणखीनच पडला.

तिने बर्फीचा तुकडा तोडला, इथे-तिथे पाहिलं.

हं… त्याने आपसूक तोंड उघडलं, तिने हलकेच बर्फी भरवली.

आनंदाने थुईथुई नाचणारं मन सांभाळत तो भांबावून तसाच उभा राहिला, हातात बर्फीचा तुकडा धरून.

तिने त्याला हुंकारत खुणावलं, आणखी एकदा खुणावलं.. तो तसाच उभा. शेवटी तिने त्याचा हात धरून बर्फी भरवून घेतली आणि पळाली. पैंजणांचा आवाज करत घाईघाईने जाणाऱ्या तिच्याकडे तो पाहत होता, पापणी मारायचं भानही त्याला नव्हतं.

*-*-*-*-*-*-*-*

हॉलमध्ये तो उभा होता. पावलं वाजली.

समोर ती…

केशरी सोनेरी रंगाची पैठणी, मॅचिंग बांगड्यांनी गच्च भरलेला हात आणि टिकलीखाली उमटवलेली हळद-कुंकवाची बोटं.

अनिमिष नजरेने तो तिच्याकडे पाहत होता. दोघांच्या चेहऱ्यावर हलक्या स्मिताचा सडा पडला होता.

नितांत सुंदर…. मनात लहरी उमटल्या. काही बोलायला म्हणून त्याचे ओठ विलग झाले. तिने पटकन त्या ओठांवर बोट ठेवलं.

‘काही बोलू नकोस, इतक्या वर्षांच्या सहवासाने तुझी नजरेची भाषा पाठ होऊन गेलीय…..पण आम्हाला बाई असं नजरेने बोलता येत नाही, शब्दच वापरायला लागतात.’ ती मिश्कील हसली.

‘खूप खूप खूप मस्त दिसतोहेस…’

त्याची नजर खळखळून हसली.

तिच्या हातातल्या डिशमधला बर्फीचा तुकडा त्याने उचलला. नकळत तिने तोंड उघडलं आणि चिमणीच्या दातांनी बर्फीचा तुकडा तोडला. दातातला तुकडा त्याला भरवला. तो भारावून तिच्याकडे पाहत होता.

तिने त्याला हुंकारत खुणावलं, आणखी एकदा खुणावलं.. तो तसाच उभा. शेवटी तिने त्याचा हात धरून बर्फी भरवून घेतली.

..बर्फीचा गोडवा फक्त त्यातल्या साखरेमुळे असतो असं थोडंच आहे!

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व  दिवाळी २०२२ ह्या विशेषांकात प्रकाशित झालेला डॉ. वसंत भूमकर यांनी लिहिलेला लेख)

डॉ. वसंत भूमकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..