नवीन लेखन...

आम्ही सारे कायस्थ

परवा मी गांवदेवी मार्केटमधे भाजी घेण्यात व्यस्त होते. तोच कानावर शब्द पडले….. अग मोहिनी उद्या सोमवार! पण  बिरड्याचे वाल टाकायचे राहिले नं काल, ते सोललेले वाल घ्यायला मला नाय बाई आवडत. आता करीन झालं ‘वडीचं सांबार’.….

ते टिपीकल “कायस्थी” शब्द ऐकून मी बाजूला आदराने बघितलं. मग ओळख निघाली … मग कुठूनतरी नातं देखील निघालं…हे अस्सं असतं आम्हां कायस्थांचं.

आमची तर बातच आगळी.
खरंतर मुठभर आमची ज्ञाती
तरी कर्तबगारी लई मोठी
तलवार अन् लेखणी दोन्ही आमच्या हाती
शौर्य आणि विद्वत्ता समान आमच्यासाठी

ह्याला इतिहास साक्षी आहे. तळपती तलवार चालवणारे  बाजीप्रभू देशपांडे, शिवाजीच्या अष्टप्रधान मंडळातील लेखणी बहाद्दर बाळाजी आवजी चिटणीस तसेच ब्रिटीशांच्या न्यायसभेपुढे भारताची बाजू मांडणारे ठाण्याचे रंगो बापू गुप्ते आणि स्वतंत्र भारतातील नेहरूंजींच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री कोकणचे सी.डी.देशमुख ही प्रामुख्याने ओठावर येणारी नावं.

आपल्या थोर कायस्थांपैकी काही नांवे पुढल्या पिढीला कदाचित ठाऊकही असणार नाहीत त्याच्यासाठी थोडं मागे जाऊन उल्लेख करावासा वाटतो.

कायस्थ ज्ञातीला अभिमान असणारं एक उत्तुंग  व्यक्तीमत्व म्हणजे खोपोलीचे निवासी र.वा. दिघे होय. भारत हा कृषिप्रधान देश असून देशाच्या विकासात  शेतीचा मोठा वाटा असणं गरजेचं आहे हे दिघेकाकांनी जाणलं. व्यवसायाने वकिल असलेल्या त्यांनी  मग वकिली सोडून शेती उद्योगात स्वेच्छेने आणि तळमळीने पाऊल टाकलं. स्वतः शेतकरी होऊन शेतीत अनेक नवनविन प्रयोग केले आणि शेतीला एका उंचीवर नेऊन ठेवलं.  एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांची सुखदु:ख अनुभवून त्यावर एक अभ्यासपूर्वक कादंबरी  लिहीली. पहिले “शेतकरी” कादंबरीकार म्हणून महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार दिघेकाकांना प्राप्त झाला होता. पुढे ह्याच क्षेत्रात अनेक पुरस्कारांनी ते गौरविले गेले.

कोणत्याही  शहर, राज्य अन् देशाचा “समाजकारण” हा एक महत्वाचा घटक आहे आणि  समाजकार्य हे त्याचं  प्रमुख अंग आहे. त्यासाठी उभं आयुष्य झोकून देऊन नि:स्वार्थ सेवा करणारे थोर समाजसेवक हे देखील आमचे कायस्थच. स्वातंत्र्य सेनानी श्री दत्ता ताम्हाणे ह्यांच्या कार्याला सलाम.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर महाडच्या चवदार तळ्याच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणारे  आमचे सुरबा टिपणीस होते.

मराठी भाषेतले “शेक्सपियर” अशी ज्यांची किर्ती  आहे ते  कायस्थ समाजरत्न भाषाप्रभू श्री राम गणेश गडकरी ह्यांचे साहित्यातील योगदान तर आजही चर्चिले जाते. त्यांचं मौलिक वाङमय कायस्थच काय सगळ्याच वाचक प्रेमींनी जतन केलं आहे. नाटकं, कविता, ललित लेखन, विनोदी लेखन अशी त्यांची चौफेर मुशाफिरी दिसून येते.  अशा ह्या  अफाट शब्दसंपदा असणाऱ्या  गडकऱ्यांच्या प्रतिभेला अभिवादन.

वर्तमानपत्राची  ठराविक मक्तेदारी मोडीत काढणारे प्रवर्तक म्हणून ज्यांचं  नांव घेतलं जातं ते म्हणजे  म टा चे संपादक श्री द्वा.भ. कर्णिक होय.तर समाजप्रबोधनातून जनतेच्या विचारात  परिवर्तन करणारे आमचे प्रबोधनकार ठाकरे हे  सर्वश्रुतच आहेत.

वर्तमान काळात  तर एकही क्षेत्र असं नाही की जिथे आमचा “कायस्थ” नाही.  मग ते समाजकारण असो राजकारण असो अर्थकारण असो वा देशाच्या संरक्षणार्थ असलेली तिन्ही दलं आणि पोलीस खातं असो. शिक्षण,साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, कला(नाट्य चित्र), क्रिडा,  स्वतंत्र व्यवसाय ह्या क्षेत्रात तर आमच्या कायस्थांची उल्लेखनीय वाटचाल आहे. किती नांवे घ्यावीत तेवढी कमी आहेत. लेखाच्या सुरुवातीला काही मान्यवरांचा मी थोडक्यात आढावा  घेतला आहे.  नुकतंच फेब्रुवारी 22च्या कायस्थ युगंधर अंकात मानाचे पुरस्कार प्राप्त झालेल्या, वयाने लहान मोठ्या अशा आदरणीय व्यक्तींचा गौरव माझ्या वाचनात आला. इथे महिलांची संख्या देखील कमी नाही.  ही खचितच अभिमानाची गोष्ट आहे.

वर अधोरेखित केलेल्या प्रत्येक क्षेत्रातल्या सगळ्या नावांचा उल्लेख करायलं गेलं तर ही जंत्री खूपच मोठी होईल.  पण देशासाठी शहीद झालेल्या  कॅप्टन श्री अरुण वैद्य आणि श्री दिलीप गुप्ते ह्या दोन विरांना आदरांजली वाहिली नाही तर तो कृतघ्नपणा ठरेल.

विद्वत्तेचा वारसा लाभलेली आमची चां.का. प्रभू ज्ञाती. त्यांचा पूर्वापार चालत आलेला अध्यात्मिक प्रगतीचा आलेख पाहता थक्क व्हायला होतं. कितीतरी “सी के पी”  संतपुरुष होऊन गेले. समाजउन्नती हेच त्यांचे ध्येय होतं. त्यांना प्राप्त झालेल्या सिध्दिचा उपयोग त्यांनी फक्त समाजकार्यासाठी केला. तेही सर्व जातीधर्मातील लोकांसाठी हे त्यांचं वैशिष्ट्य. मला तर तेव्हां  काय किंवा आजही काय आम्हां कायस्थांच्या व्यापक मनोवृत्तीचा गुण कायमच दिसतो. श्री संत राममारुती महाराज, श्री संत अण्णा पट्टेकर महाराज आणि संत जानकी आई(बायजी) ही सर्वमुखी असलेली संत मंडळी.

सांगायला आनंद वाटतो आजही ह्या अध्यात्माची कांस आम्ही सोडलेली नाही.  श्री स्वरुप प्रधान यांच्यासारख्या उच्च विभूषित मध्यमवयीन कायस्थाचं अध्यात्मिक ज्ञान हे पराकोटीचं आहे. भरकटलेल्या जिवांना दिशा दाखवण्याचं  महान कार्य ते आणि त्यांचे अनुयायी करतात. आता त्यांना श्री मंडलेश्वरस्वामी अभिषेक चैतन्य गिरी महाराज ह्या नावाने ओळखले जातात. आपली कायस्थ संत परंपरा अशीच प्रवाहात राहणार आहे हे नक्कीच.

आजची कायस्थ तरुण पिढी, अनुभवी लोकांचा हात धरून अल्पसंख्यांक असलेल्या आपल्या  समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी जीवापाड झटत आहे. मी हे प्रत्यक्ष बघते आहे. त्यासाठी आखिल भारतीय चां. का. प्रभू  मध्यवर्ती संस्थेने  ज्ञातीसंपर्क अभियान सुरु केलं आहे. खरोखर हा एक स्तुत्य उपक्रम आहे. CKP साहित्य संमेलन हा उत्तम आणि सुयोग्य पर्याय मध्यवर्तीने शोधून काढला आहे. ठाणे येथे संपन्न झालेल्या पहिल्या सिकेपी साहित्य संमेलनाला अपेक्षे बाहेर प्रतिसाद मिळाला होता. आता पुण्याला त्याहीपेक्षा जास्त संख्येने आमचे ज्ञाती बांधव भगिनी येतील ह्यात वादच नाही.

अल्पसंख्यांक असलेल्या आमच्या ज्ञातीनी आरक्षणाच्या कुबड्यांचा साधा  विचारही कधी केला नाही. हा वैचारिक प्रगल्भतेचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे ह्यावर कुणाही कायस्थाचे दुमत होणार नाही.

कायस्थांवर बोलूं काही…म्हटल्यावर आमच्या सुशिक्षित,  सुगरण, अतिथ्यशील, देखण्या अन्  निगुतीने सणवार जपणाऱ्या …. अशा “कायस्थिणीसाठी” चार शब्द( खरं तर कितीही) लिहिल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊच शकत नाही. प्रामुख्याने ती “अन्नपूर्णा” आहे. सुगरणपणाचे  बाळकडू तिला आजी, आई कडूनच मिळालेलं आहे.

तेलपोळी, खाजाचे कानवले,
निनावं नी सांजणी
शेवळाची वडी नी शेवळाची कणी
वडीचं सांबार, वालाचं बिरडं
ह्यात तिचा हात धरणार नाही कुणी

खरं आहे नं?  काही शब्दांचं पेटंट तर आम्हा कायस्थिणिंनाच दिलंय हो! उदा.   कालवण सवताळणे, पदार्थ  निगुतीने करणे, नारळाचं आपरस दूध इ.असो.

पिढ्या  बदलल्या तरी कायस्थी अन्नपूर्णेचा  वारसा टिकून आहे. अर्थात आजच्या तरुण मुलींना वेळ नाहीये एवढं हातगुतीचं कौशल्यपूर्ण काम करायला पण ती कसर भरुन काढली आहे आमच्या काही कायस्थ “लघुउद्योजिकांनी” We R For You हे जणूं ब्रीदवाक्य आहे त्यांचं.  हे सगळे पदार्थ एका फोन काॅलवर मिळू शकतात. आमच्या तरुण मुलांच्या जिभेची रुची ह्या पारंपारिक सिकेपी पदार्थांभोवती रुंजी घालतेय अजूनी. अगदी परकीय पदार्थांनी आमच्या घरात हल्लाबोल केला तरीही. सांगा आहे की नाही आपली खासियत?

जी गोष्ट कायस्थांच्या सुगरणपणाची तीच सणवार – व्रतवैकल्यांची.  नेमाने पुजल्या जाणाऱ्या सवाष्णी, चंपाषष्ठीचं नवरात्र, तळई,  गडावरील देवीचे उत्सव, पिठोरी सारख्या पुजा कराव्यात त्या आम्हीच. अगदी नैवेद्याचं पान सजवावं ते आम्हीच.

आणि हो सौंदर्याचं वर्णन करतांना आमची ललना काय म्हणते पहा,

आम्ही बाई चांद्रसेनीय कायस्थ प्रभू
लाखात देखण्या आम्हीच शोभू
पुढलाही जन्म सिकेपीच मागू.

आम्ही सारे कायस्थ स्त्री पुरुष एवढे “देखणे” असण्याचं कारण म्हणजे सि के पी ज्ञातीचं मुळ हे काश्मीरच्या श्रीनगर मधील आहे. चिनाब नदीच्या खोऱ्यात हे “चांद्रश्रोणीय” राहात होते. 14 व्या शतकात बिंब राजाने, प्रशासनात निपूण असलेल्या दोन जातींना ‘प्रभू’ ही पदवी बहाल केली. एक आपण आणि दुसरे पाठारे प्रभू. काश्मिरातून जे लोक कोकणाकडे आले ते आपण चां.का.प्रभु.

खरंच आपलं मुळ  देखील किती रंजक आहे नाही का?

“आम्ही सारे कायस्थ”  ह्या लेखाचा परामर्श घेतांना ऊर अभिमानाने भरून आला. केवढा  वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण खजिना आहे आपल्या ज्ञातीकडे.   जाता जाता एक दिलाने एक मुखाने आपण सारेच म्हणूया की….

“आम्ही सर्व कायस्थ”
असे होणे नाही कुणीच
कारण आमच्या सारखे फक्त आम्हीच

— सौ. अलका अरुण वढावकर.
ठाणे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..