नवीन लेखन...

आज आत्महत्या नाही का ?

तल्लफ ही भारीच असते. मग ती कोणती का असेना. चहाची तल्लफ लागली, तसे कपडे चढवून चौकाच्या दिशेने पावले वळली. नेहमीच्या चहाच्या टपरीवर गर्दी होती. चहाची केटली शेगडीवर ठेवलेली. तिच्या तोंडातून वाफ बाहेर पडत होती. चहाचा सुगंध दरवळला होता. चहाचा ग्लास हाती घेतला. चहाचा घोट घशात गेल्यावर एक वेगळीच अनुभूती देणारी समाधीच लागली म्हणा ना. पण ती जास्तवेळ टिकली नाही, लगेचच भंगली. टपरीवर उभे असलेले दोघे तिघे मोठ-मोठ्याने बोलत चर्चा करत होते. चर्चेतील विषय होता वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्यांच्या संदर्भातला. अमुक वृत्तपत्रात हे छापून आलंय. दुसऱ्या मध्ये ही बातमी आली. तिसऱ्यात हाणामारीची बातमी मोठी… असे विषय सुरू असतानाच कुणीतरी म्हणालं… ‘ती नेहमीची बातमी नाही का आज? आज कुणाची आत्महत्या नाही का?’ ‘नाही रे, आज काही दिसली नाही’ दुसऱ्याने हसतच उत्तर दिलं.

तिसऱ्यानेही तशीच री ओढत ‘रोज कुणी ना कुणी आत्महत्या करतच. कुणी रेल्वे खाली, कुणी विहिरीत, कुणी पंख्याला… कुणी मुलाबाळांसह…’.

‘पैसे मिळतात रे, आत्महत्या वाल्यांना, म्हणुन लटकतात पंख्याला’ चवथ्याने पुढची री ओढली. हा सगळा संवाद पुढे बराच वेळ सुरू राहिला. त्यांच्या संवादात आत्महत्या हा टिंगलीचा आणि चेष्टेचा विषय बनला होता. आत्महत्या करणाऱ्यांना सहानुभूती दाखवू नये, त्यांच्या कुटुंबियांना पैसा मिळतो म्हणुन आत्महत्या केली जाते, अशा विषयांवर त्यांच्या संवादाची गाडी जाऊ लागली….

खरच असं असते का? पैसा मिळवण्याच्या उद्देशाने आत्महत्या केल्या जातात का?

की जीवनातील समस्यांचे, प्रश्नांचे उत्तरे मिळवण्यात अपयश आले म्हणुन आत्महत्या केली जाते. की परिस्थितीचे फटकारे सहन न झाल्याने आत्महत्या केली जाते. की दुष्काळाचा दाह पचवू न शकल्याने, ठिसुळ झालेली हाडे दम सोडतात. की व्यवस्थेतील तानाशहांच्या माऱ्याने हतबल झालेले जीव दबुन जातात. की सावकाराच्या मजबुत पाशातून बाहेर पडण्यासाठी आकांत करणारे जीव शेवटी मृत्यूला कवटाळतात. की स्पर्धेत टिकण्यासाठी लागणारे परसेंटेज कमी पडले म्हणुन.. की समाज एकत्र येऊ देणार नाही या भीतीपोटी कुणीतरी दोघे एकमेकांच्या गळ्यात गळा घालून मृत्यूची वाट चालू लागतात… असे कितीतरी ‘की’ आणि प्रश्न घेऊन आत्महत्येची वाट चोखाळली जात असली पाहिजे. अर्थात ही वाट निवडणे सुद्धा चुकच…!

परिस्थितीचा सामना न करता आत्महत्या करणे केव्हाही चुकीचेच. आत्महत्येचे समर्थन अजिबात करता कामा नये. मात्र कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली, ती परिस्थिती का निर्माण झाली. शेजारी म्हणुन आपले काही कर्तव्य आहे की नाही. आपल्याच कॉलनीत राहणारा कुणी तरी तणावात असतो, त्याच्या अवती-भोवती समस्यांचा वेढा पडलेला असतो. अशा वेळी आपल्या सहानुभूतीची त्यांना गरज असते. देतो का आपण सहानुभूती…! आपुलकीचे दोन शब्द निराश झालेल्या मनाला उभारी देण्याचे काम करू शकतात, हे लक्षात घेतले पाहिजे. पण असे होत नाही. मला काय त्याचे? असा भाव निर्माण होतो आणि त्यांच्या पासुन आपण लांब राहतो.

समाज म्हणून आपण इतके निर्ढावलेलो आहोत की आपल्या समोर येणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांचे आपल्याला काहीच वाटत नाही. अंगावरची घाण झटकावी इतक्या सहजपणे आपण या घटना वाचतो, ऐकतो आणि दुसऱ्या क्षणाला विसरुन जातो. सामाजिक सुदृढतेसाठी एकमेकांचे दु:ख समजुन घेणे हे समाजाच्या सुसंस्कृत असण्याचे लक्षण मानले गेले आहे. पण ‘स्क्रिन’ वर हरवलेल्या आजच्या संस्कृतीचे या नाजुक विषयाकडे हळुवारपणे पाहणे होत नाही. खरच आपल्याला आपल्याच जबाबदारीचे भान आहे का…?

— दिनेश दीक्षित
९४०४९५५२४५

Avatar
About दिनेश रामप्रसाद दीक्षित 46 Articles
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..